Dhing Tang
Dhing Tang Sakal
satirical-news

ढिंग टांग : खटक्यावर बोट!

-ब्रिटिश नंदी

सदू : (फोन फिरवत अदबीने) दादूरायाऽऽ...!

दादू : (आत्मबळाच्या जोशात) बोला! जय महाराष्ट्र!

सदू : (हळूवारपणे) माझा आवाज नाही का ओळखलास, दादूराया!

दादू : (कणखरपणे) ओळखला! काय काम काढलं?

सदू : (आणखी हळूवारपणे) तब्बेत सांभाळ! मास्क लाव, हात धू आणि अंतर पाळ!

दादू : (सावध होत) हा काय चावटपणा आहे, सद्या?

सदू : (नाराज होत) प्रेमानं बोलणाऱ्या माणसाला चावट म्हणतात का तुमच्यात? कधी नव्हे ते स्वत: फोन करुन मी तुझ्याशी प्रेमानं बोलतोय! आम्ही काय दरवेळी ‘खळ्ळ खटॅक’चीच भाषा करायची का?

दादू : (गडबडून) हे बघ, शिळोप्याच्या गप्पा मारायला माझ्याकडे फुर्सत नाही!

सदू : (खोचकपणाने) मग? नवी मुंबईच्या विमानतळाचं नाव काय देणार आहात?

दादू : (दातओठ खात) आम्ही लाख देऊ नाव, आणि तुम्ही कोलदांडा घाला!! हे विघातक राजकारण आहे, विघातक!

सदू : (खुलासा करत) मी एवढंच म्हणालो की, नवी मुंबईचा विमानतळ हा मुंबईच्या विमानतळाचा फक्त विस्तार आहे! नाव बदलण्याचा प्रश्न येतोच कुठे?

दादू : (चिडून) हो का? मग तुम्ही नवा पक्ष काढला तेव्हा का नवनिर्माण सेना असं नवीन ठेवलंत! जुन्या पक्षाचाच विस्तार होता ना तुमचा? मग? बोल, बोल, आता बोल ना!!

सदू : (सर्द होत) ...हल्ली तुझं आत्मबळ सॉलिड वाढलंय हं दादूराया! वाटलं नव्हतं, एवढा टणक निघशील!!

दादू : (मूठ उगारत) मी पहिल्यापासूनच टणक आहे! शेर को कभी घास खाते देखा हय क्या?

सदू : (टोमणा मारत) नाही! पण हमने शेरकू बटाटावडा खाते देखा है!!

दादू : (चिडून) सद्याऽऽ...!

सदू : (प्रेमाने) रागावू नकोस रे! गंमत केली!!

दादू : (कर्तव्यकठोरपणाने) महाराष्ट्राच्या हितासाठी मी कुणाशीही वाईटपणा घ्यायला तयार आहे!

सदू : (सद्गदित होत) माझ्याशीही?

दादू : (किंचितही न डगमगता) माझा महाराष्ट्र, माझं कुटुंब! माझं कुटुंब, माझी जबाबदारी!

सदू : (हतबुद्ध होत) क्येवढा वाढलाय तुझा कान्फिडन्स! माय गॉड!! एकदम खटक्यावर बोट...!

दादू : (मोठ्या आत्मविश्वासाने) अलबत! सदूराया, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव! आत्मविश्वास म्हंजे आत्मबळ आणि आत्मबळ म्हंजे स्वबळ! काय कळलं?

सदू : (खालच्या आवाजात) गेल्या आठवड्यात दिल्लीला जाऊन मोदीजींची बंद खोलीत भेट घेऊन आलास, तेव्हापासून वाढलंय तुझं हे आत्मबळ! कळतंय आम्हाला!!

दादू : (शहाजोगपणे) माझा कारभार, माझं आत्मबळ!

सदू : (आणखी खालच्या आवाजात) हल्ली ‘सिल्वर ओक’च्या काकांशी नाही जमत वाटतं मेतकूट! थेट त्यांच्या निर्णयाला स्थगिती दिलीस! मानला तुला!!

दादू : (साळसूदपणे) मी? छे... कुठल्या?

सदू : (आणखी खोलात शिरत...) ‘म्हाडा’च्या सदनिकांचं प्रकरण रे! किल्ल्या वाटपाचे फोटो छापून आले होते की रे!विसरलास?

दादू : (प्रकाश पडल्यागत) हां हां, ते म्हणतोस! छे, छे, स्थगिती-बिगिती काही नाही! तांत्रिक बाब आहे ती! होईल सगळं नीट!

सदू : (ठामपणाने) त्यांच्या कामगिरीमुळे तुम्हांला हे दिवस दिसताहेत, हे विसरु नका, म्हंजे झालं!!...बाय द वे, या आत्मबळासाठी नेमकं काय करायचं असतं रे?

दादू : (चतुरपणाने) दिल्लीला जाऊन ये नुसता! सगळं आपोआप होतंय! जय महाराष्ट्र!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : अर्चना पाटील यांच्या समर्थनार्थ पंतप्रधान मोदी यांच्या धाराशिवमधील सभेला सुरुवात

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल राहण्यासाठी बेस्ट आहे चिकनकारी कुर्ती, अशा पद्धतीने करा स्टाईल

Credit Card: ग्राहकांना मोठा फटका! 1 मे पासून क्रेडिट कार्डद्वारे बिल भरणे होणार महाग; किती वाढणार खिशावरचा भार?

T20 World Cup 2024 : IPL दरम्यान वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया होणार अमेरिकेला रवाना! तारीख आली समोर

Prajwal Revanna : 'मुलगा खोलीत तर बाप दुकानात बोलवायचा...', माजी पंतप्रधानांच्या नातवाचा सेक्स स्कँडल, कोण आहे प्रज्वल रेवण्णा?

SCROLL FOR NEXT