नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा रोज लिहिणे.) माणसाने नेहमी बदलाला सामोरे गेले पाहिजे. परिस्थितीतील बदल टिपून स्वत:मध्ये हवे ते बदल करुन घेण्यास तयार असले पाहिजे.
आजची तिथी : श्रीशके १९४४ कार्तिक कृ. अष्टमी. (कालभैरव जयंती.)
आजचा वार : बुध्दिवार.
आजचा सुविचार : बदला हा विकासाचा स्थायीभाव आहे. (दुरुस्ती : ‘बदल’ असे हवे, एक काना जास्त पडला. सॉरी!)
नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा रोज लिहिणे.) माणसाने नेहमी बदलाला सामोरे गेले पाहिजे. परिस्थितीतील बदल टिपून स्वत:मध्ये हवे ते बदल करुन घेण्यास तयार असले पाहिजे. मी आहे! मी बदलाला तयार झालो, म्हणून तर महाराष्ट्राच्या सत्ताकारणात बदल झाला….
होय, मी बदला घेतला! घेतला!! घेतला!!!
आमच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी बदला घेण्याची गरजच होती. गेल्या तीन कार्यक्रमात मी नेमके हेच सांगितले. अगदी उघडपणे, कुठलाही आडपडदा न ठेवता सांगितले, ‘हो, हो, हो! बेतला घदला! आय मीन…घेतला बदला! तसे पाहू गेल्यास मी काही सूडबुध्दीने वागणारा मनुष्य नाही. चांगला हसतमुख, गप्पिष्ट, मोकळ्याढाकळ्या स्वभावाचा नागपुरी (उच्चार : नाप्पुरी) गृहस्थ आहे. सूडबिड घेत बसायला इथे वेळ तरी कोणाला आहे? पण मला तेव्हा नेमका मोकळा वेळ मिळाला. मग काय करणार? घेतला बदला!
सूड हा पदार्थ थंड खाल्लेला चांगला असे म्हणतात. मी चांगली अडीच वर्षे थंड करुन हा प्रकार खाल्ला. बरा लागतो! सूड हे प्रकरण थोडेसे पुरणपोळीसारखेच आहे. रोज खाणे वाईट. पण एकदा कधीतरी खाऊन त्याबद्दल पन्नास ठिकाणी बोलायला बरे पडते! अगदी टीव्हीवरही!!
‘तुम्ही सूडबुध्दीचे आहात का?’ असा प्रश्न मला कुणी विचारला तर मी सरळ नाही म्हणेन! कारण मी नाहीच्चे मुळी. मला सर्वांचे भले व्हावे, राज्याचा विकास व्हावा, (आणखी) औद्योगिक प्रकल्प इथून पळून जाऊ नयेत, असे सारखे वाटत असते. पळून गेलेल्या प्रकल्पाच्या संचालकांनीही मला घाबरत घाबरत फोन करुन विचारले : ‘आता तुम्ही आमचाही सूड नाही ना घेणार, साहेब?’ मी त्यांना ‘चिंता करु नका’ असे आश्वासन दिले.
हल्ली तुम्ही फार बेधडक बोलायला लागला आहात, असे मला परवा कुणीतरी सांगत होते. मी पहिल्यापासूनच तसा आहे. कुणालाही (दोन जण सोडून) घाबरत नाही. त्यात घाबरायचे काय? कर नाही त्याला डर कशाला? माझ्या सूडाच्या कबुलीमुळे विरोधी पक्षांमध्ये मात्र थोडीशी घाबरगुंडी उडाली आहे, हे खरे. माझा तोच हेतू होता…
पण सुक्यासोबत थोडे ओलेही जळतेच. (की ओल्यासोबत सुके? जे असेल ते..) परवा एका कार्यक्रमात मी पुन्हा एकदा ‘होय, घेतला सूड…’ चे स्वगत ऐकवले. लोकांनी दाद दिली. पण त्याच रात्री दीड वाजता दाराची बेल वाजली. पाहातो तो आमचे नवे सन्मित्र कर्मवीर!! मी म्हटले, ‘‘ एवढ्या उशीरा?’’
‘दीड तर वाजतोय! उशीर कुठे?,’ स्वत:चाच चष्मा काढून दिव्याकडे बघून न्याहाळत ते म्हणाले.
त्यांच्यासाठी मध्यरात्री दीड म्हणजे काहीच नाही! असो.
‘बोला!,’ मी.
‘गुवाहाटीला कामाख्यदेवीला जायचंय! नवा नवस बोलायचाय!,’ ते. मी च्याटंच्याट!
‘कसला नवस?’ मी.
‘तुमच्या बदल्याच्या कबुलीनं आमच्या लोकांचं धाबं दणाणलंय पुन्हा! म्हणतात, आपला घेतला तर काय घ्या?’ ते निर्विकारपणाने म्हणाले. मी कपाळावर हात मारुन घेतला. म्हणून म्हटले, मी तसा सूडबुद्धीचा नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.