Dhing Tang Sakal
satirical-news

ढिंग टांग : दोन निरीच्छ पंतप्रधान !

सुप्रसिद्ध बंगल्याच्या बाहेर एक साधीसुधी व्यक्ती ताटकळत उभी आहे. बंगल्याच्या गेटवरील दारवान आत सोडायला तयार नाही.

ब्रिटिश नंदी

सुप्रसिद्ध बंगल्याच्या बाहेर एक साधीसुधी व्यक्ती ताटकळत उभी आहे. बंगल्याच्या गेटवरील दारवान आत सोडायला तयार नाही.

स्थळ : १२, तुघलक रोड, न्यू डेल्ही. वेळ : संध्याकाळची.

या सुप्रसिद्ध बंगल्याच्या बाहेर एक साधीसुधी व्यक्ती ताटकळत उभी आहे. बंगल्याच्या गेटवरील दारवान आत सोडायला तयार नाही. ‘हम कोई ऐसेवैसे नहीं बा, बिहारसे आए बा’ ती व्यक्ती ठणकावून सांगते. पण बंगल्याच्या मालकाशी अपॉइण्टमेंट ठरली आहे, असे सांगूनही दारवान ऐकत नाही. तेवढ्यात भर्रदिशी मोटार येते. मोटारगाडीतून बंगल्याचे मालक ऊर्फ राहुलजी हसतमुखाने हात हलवत येतात. वाट पाहणारी व्यक्ती हर्षभरित होते. ती व्यक्ती म्हणजे दुसरी तिसरी कोणीही नसून आपले लाडके सुशासनबाबू नीतीशजी!त्यांच्या हृद्य गळाभेटीतील संवादाचा मराठी तर्जुमा येणेप्रमाणे :

राहुलजी : (खुशीत)…कधी आलात?

नितीशजी : (गेले तीनेक तास ताटकळत होतो, हे विसरुन-) हा काय आत्ताच तर येतोय!

राहुलजी : (विजयी मुद्रेने) मी गुजरातला जाऊन आलो! धमाल आली!! पुढल्या वेळेला तुम्हीही चला!!

नितीशजी : (दातओठ खात) येणारच आहे! सोडतो की काय!!

राहुलजी : (हात झटकत) तिथं फाफडा फार टॉप मिळतो!

नितीशजी : (सर्द होत ) मला फाफडा आवडत नाही! पण तुम्ही म्हणता तर जाईन!!

राहुलजी : (प्रेमाने) चहा घेतलात?

नितीशजी : (मान डोलावत) हो…सकाळीच! आणि इथून केजरीवालांकडे जाणार आहे, तिथं होईलच चहा!!

राहुलजी : चहा देतील, पण बिस्किट देणार नाहीत! इथून हवं तर बिस्कुटं घेऊन जा दोन!!

नितीशजी : (ओशाळत) मला बिस्किटंही आवडत नाहीत!

राहुलजी : (गालावर तर्जनी टेकवून गंभीरपणाने) दिल्लीला काय काम काढलंत? मी आलो असतो की पाटण्याला!!

नितीशजी : (अवघडून) म्हणूनच मी आलो! तुम्हाला कशाला उगीच त्रास? सध्या मी प्रमुख विरोधी पक्षनेत्यांच्या गाठीभेटी घेतोय!!

राहुलजी : (लाजत) थँक्यू! मला आमच्या पक्षाचा प्रमुख म्हटल्याबद्दल! पण मी अजून व्हायचोय!!

नितीशजी : ती फॉर्म्यालिटी आहे हो! खरे प्रमुख तुम्हीच!!

राहुलजी : (डोळे बारीक करुन) बोला, काय प्लॅन आहे?

नितीशजी : …मोदीजींना धडा शिकवायचा प्लॅन आहे!! सगळ्यांनी मिळून त्यांना इंगा दाखवला पाहिजे!

राहुलजी : (हात झटकत) हा जुना प्लॅन आहे! नवा आणा!!

नितीशजी : (दुर्लक्ष करत) सगळ्या विरोधकांना एकत्र आणलं तर मोदीजींना नमवणं सहज शक्य आहे!!

राहुलजी : (विचारपूर्वक) मी आधी ट्राय केला होता! यशवंत सिन्हाजींनी केला होता! ममतादिदींनी केला होता! दक्षिणेतले नेते तर दर पंधरा दिवसांनी प्लॅनिंग करतात!! आता तुम्ही आलात!

नितीशजी : (संकोचत) त्याचं काय आहे…मी सुशासनबाबू आहे ना! माझी इमेज तुलनेनं बरी आहे!!

राहुलजी : (चमकून) असं म्हंटा?

नितीशजी : मला काही पंतप्रधान होण्याची इच्छा नाही!

राहुलजी : (डब्बल जोरात खांदे उडवत) मलाही नाही! ममतादिदींनाही नव्हती!! कुणालाच नव्हती!

नितीशजी : (आत्मविश्वासाने) विरोधकांची एकजूट साधणं मला जमेल असं वाटतं!

राहुलजी : …त्यासाठी बरीच पूर्वतयारी करावी लागेल!

नितीशजी : (उत्साहाच्या भरात) सगळी पूर्वतयारी झाली आहे, महाराज! आपण फक्त हो म्हणा! पुढचं मी बघतो!!

राहुलजी : (एक डेडली पॉज घेत)…तुमच्यासाठी एखादा ‘वायनाड’सारखा खात्रीचा मतदारसंघ शोधून ठेवा! मग पुढचं पुढं!!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Walmik Karad: वाल्मिकच्या दोषमुक्तीचा अर्ज फेटाळला पण मालमत्तेचं काय होणार? उज्ज्वल निकम केस लढणार का?

ENG vs IND: इंग्लंडच्या ओपनर्सला का फैलावर घेतलं? शुभमन गिलने केली पोलखोल; त्यांचा रडीचा डाव जगासमोर आणला

Maharashtra Rain Update: महाराष्ट्राला पाऊस झोडपणार! पुढील ४-५ दिवस महत्त्वाचे; पहा मुंबईत कसे असेल हवामान?

Pune Crime: दोघेही 'क्लास वन' अधिकारी, स्पाय कॅमेरे लावून पत्नीचे खासगी व्हिडीओ केले शूट; पुण्यात खळबळ

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT