स्थळ : मातोश्री महाल, वांद्रे संस्थान. वेळ : रणोत्साही!
राजाधिराज उधोजीमहाराज पुढ्यातील बाजाशी झटापट करत आहेत. दोनचार बेसूर उमटतात. पिपाटणे वाजल्यागत सूर वाजतात. सारेग सारेगम पधनीपधनीसा..असा सराव चालू आहे. पण बाजाचे काहीतरी तंत्र बिघडले असावे! अब आगे...
उधोजीराजे : (त्रासिक सुरात) कोण आहे रे तिकडे? (गुणगुणत) क..क..कोण आ-आ-आ हे-हे तिकडेऽ...?...कुणी...ककक...कुणी...येणार आहे-हे- हे क्का? टुडुडुडुंग..!!
संजयाजी फर्जंद : (घाईघाईने येऊन मुजरा करत) महाराजांचा विजय असो! आमची याद केली होती का?
उधोजीराजे : (राजेशाही तोऱ्यात) कुणाची यादबिद करत नसतो आम्ही! हा बाजा दुरुस्त करण्यासाठी कारागीर येणार होता, त्याचं काय झालं?
संजयाजी : (बाजापेटीकडे निरखून बघत) काय झालं या डबड्याला?
उधोजीराजे : (चवताळून) खामोश! कडेलोट करीन!! या सुंदर वाद्याला डबडं म्हणता?
संजयाजी : मघापासून ऐकतोय, तेच तेच ‘सारेगमपधनीसा, सानिधपमगरेसा’ वाजतंय! काहीतरी गाणं वाजलं पाहिजे!!
उधोजीराजे : (खुलासा करत) आम्ही पवाडा वाजवत होतो!!
संजयाजी : (आच्चिर्यानं) अगंबाबौ...! अर्थात शूर मर्दाचा पवाडा शूर मर्दानंच गावा, हे खरंच!! पण पवाड्याला डफ-तुणतुण्याची साथ असते! हा बाजा कुठून उचलून आणला?
उधोजीराजे : (पेटीवर हळूवार बोटं फिरवत) सुरांची साथ प्रामाणिकपणानं देते ही पेटी! बाकी साऱ्या वाद्यांचे सूर गद्दार निघतात!!
संजयाजी : (फर्माइश करत) वाजवा बरं काहीतरी!!
उधोजीराजे : (संकोचानं) नको!!
संजयाजी : वाजवा हो!! कानाला गोड वाटंल, असं काहीतरी वाजवा!!
उधोजीराजे : (खाकरत विनम्रपणे) आज गळा नीट साथ देत नाही, पण प्रयत्न करतो!
संजयाजी : (चेकाळल्यागत) काय तरी हुरहुरं म्हणा की!!
उधोजीराजे : (तिरस्कारानं) मी भावगीतं गात नसतो!! इथे आम्ही काय ऑर्केस्ट्रा काढलाय का? नॉन्सेन्स!!
संजयाजी : (खट्टू होत) ऱ्हायलं! ते ‘पडोसन’मधलं गाणं म्हणा की! येक चतुर नार, कर के सिंगाऽऽर (एकदम चेवात येत) अय्यो, घोडे तेरी, येक घोडा बोलो, या तो चतुर बोलो...अब गाओ! येक चतुर नार, कर के सिंगार, मेरे मन के द्वाऽऽर...
उधोजीराजे : (खवळून) खामोऽऽश! काय भयाण आवाज आहे तुमचा? ह्या:!!
संजयाजी : (मखलाशी करत) ...कोकण दौऱ्यात तुमचा आवाज इतका बेस्ट लागला होता म्हणून सांगू? पण या बाज्यानं थोडा घोटाळा केला!
उधोजीराजे : (स्वत:वर खुश होत) चांगला फैलावर घेतला की नाही त्या खोकेबहाद्दर गद्दारांना!! विश्चासघातकी कुठले!
संजयाजी : (आणखी मखलाशी करत) ...काय ती भाषणं, काय ती गर्दी, काय तो प्रतिसाद...एकदम ओक्के!!
उधोजीराजे : (स्फुरण चढून) कोकण जिंकलं की आपण तसेच घाटावर जाऊ! तिथे तर मी जिभेचा असा दांडपट्टा चालवीन की बघत बसाल! मग मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र...सर्वात शेवटी विदर्भ जिंकणार म्हंजे जिंकणारच! का नको जिंकू? किंबहुना जिंकलाच पाहिजे!! जिंकल्याशिवाय राहणार नाही! नाही, नाही, अजिबात राहणार नाही!!
संजयाजी : (खात्री देत) तुम्ही महाराष्ट्र जिंकल्यात जमा आहे हो! प्रॉब्लेम गुजरातचा आहे!!
उधोजीराजे : (बाजाकडे लक्ष) ...पण हा बाजा का धड वाजत नाही?
संजयाजी : (तज्ज्ञ असल्याच्या थाटात) काय हुतंय बाज्याला?
उधोजीराजे : (बुचकळ्यात पडत) ‘मोदी माझे शत्रू नाहीत,’ ही ओळ थोडी भक्तिरसाच्या अंगानं वाजतेय! दुरुस्त करावी की तशीच ठेवावी?
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.