maharashtra politics bjp rebel mla leaders
maharashtra politics bjp rebel mla leaders  sakal
satirical-news

ढिंग टांग : मी परत येतोय...!

ब्रिटिश नंदी

वज्रचूडेमंडित सौभाग्यवाशिणी अखिल विश्वाची महात्मीण बाई कमळाबाई यांच्या चरणारविंदी बालके नाथाभाऊचा सा. नमस्कार विनंती विशेष. फारा दिवसांनी तुजला पत्र लिहीत आहे. मध्यंतरी काही कारणाने मी घर सोडून गेलो होतो.

पण हल्ली तुझी फार सय येते. असा एकही दिवस जात नाही की तुझी आठवण येत नाही. सबब मी घराकडे यायला निघालो आहे. येत्या दोन-तीन किंवा तीन-चार किंवा चार-सहा दिवसात घरी पोचेन. तू त्याच घरी राहात्ये आहेस ना? की वेगळा महाल घेतलास? तुझ्याबद्दल बरेच उलटसुलट ऐकतो आहे, म्हणून विचारुन घेतले. आड्रेस चुकीचा निघाला तर माझी खेप फुकट जाईल.

बाई कमळाबाई, तू कनवाळू आहेस. आपल्या चुकलेल्या लेकरांना तू पदरात घ्यायचे नाही तर कोणी घ्यायचे? मी रागावून घर सोडले कारण आपल्याच घरातील काही लोकांनी मला भयंकर छळले होते. -घरातली महावाह्यात पोरे!!

लहान नाही, मोठे नाही, उगाच खोड्या काढत हिंडायची. मी माजघरात जरा आडवारलो की दाराची कडी घालून जात असत. दोन-चारदा न्हाणीघरात तीन-चार तास अडकवले होते मला! ही काय ज्येष्ठांशी वागण्याची पद्धत आहे का?

माझे बाई, आपल्या घराण्यासाठी मी किती कष्ट घेतले, हे विसरु नकोस. किंबहुना, तुझे बस्तान माझ्यामुळेच बसले, याची तरी जाणीव राहू दे. एके काळी आपल्या घरासाठी मी शेजाऱ्यांशी भांडणे उकरली. समाईक अंगणात पापड कुणी वाळत घालायचे यावरुन शेजारपाजाऱ्यांशी किती खडाजंगी झाली, ते जरा आठव. शेवटी शेजारी हरले!! जाऊ दे, जुन्या आठवणी त्या!!

बाई, मी घरवापसी करतो आहे. घरातला कुठलाही कोपरा दे, पडून राहीन! भलत्या ऑर्डरी सोडणार नाही की अद्वातद्वा बोलणार नाही. पानात पडेल ते निमूट खाईन. (शिळा) फोडणीचा भातही चालेल!! मी परत येतोय! मी परत येतोय! मी परत येतोय!! तुझाच. नाथाभाऊ.

प्रिय नाथाभाऊ यांस सौ. कमळाबाईचा नमस्कार,

इतक्या वर्षांनी पत्र पाठवलंत, तेही गुलाबी कागदावर? मधल्या काळाली अनुभवांमुळे तुम्ही बरेच विरक्त झाला असणार, असा माझा कयास होता. पण छे! कुठलं काय!! (अजूनही) गुलाबी कागद? असो.

मी अजून तिथंच राहात्ये. (आड्रेस बदललेला नाही, हे पत्रोत्तरावरुन कळलं असेलच.) तुम्ही घर सोडून गेलात, तेव्हा आपलं घर एकाच माडीचं होतं, मी ते रिडेव्हलपिंगला देऊन चांगली बहुमजली इमारत उभी केली आहे.

काही मजले भाड्याने दिले आहेत. पण बरंच चटई क्षेत्र आपल्याकडेच आहे. अंगणात गार्डन आणि पार्किंगची व्यवस्था आहे. चोवीस तास वीज आणि पाणी आहे. (तुम्हाला विहिरीवरुन पाणी शेंदावं लागत असे, आठवतंय का?) तुम्ही आलात तरी काही बिघडत नाही. या! मी वाट पाहात्ये!!

आपल्या वाड्यात हुंदडणारी आणि तुम्हाला त्रास देणारी ती कार्टी आता चांगलीच मोठी झाली आहेत. दाराच्या कड्या घालून बेल वाजवून पळ काढणे, न्हाणीघरात कोंडून ठेवणे, चपला गायब करणे आदी कृत्यं करणं त्यांनी आता बंद केलं आहे.

ते स्वागतशील झाले आहेत. येईल त्याला घरात घेण्याचा त्यांनी सपाटा सुरु केला आहे. ‘तुम्हाला घरात घ्यायचं का?’ असं मी त्यांना फायनली विचारलं तेव्हा त्यांनी एकमेकांकडे बघत खांदे उडवले, ‘तुमची मर्जी’ असे म्हणून एकमेकांना हसून टाळीही दिलीन!! आता याचा अर्थ काय घ्यायचा हे तुम्हीच ठरवा!! थांबत्ये!! तुमच्या स्वागतासाठी गुढ्या उभारायच्या आहेत. वाट पाहात्ये.

सदैव तुमचीच. कमळाबाई.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Loksabha: प्रशासनाचा भोंगळ कारभार, मतदार यादीत नाव नसल्याने मतदार हैराण

Google Map Address Update : गुगल मॅपवर पत्ता बदलणे आता तुमच्या हातात ; फॉलो करा 'या' ट्रिक्स

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: पवईतील हिरानंदानी मतदार केंद्रावर दोन तासांपासून मतदारांच्या रांगा

Iran Helicopter Crash : इराणच्या राष्ट्राध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या 'बेल 212' हेलिकॉप्टरमुळे अनेकांनी गमावलाय जीव ; जोडलं जातंय अमेरिकेच नाव

Latest Marathi Live News Update: उद्या महाराष्ट्रात बारावीचा निकाल जाहीर होणार

SCROLL FOR NEXT