dr babasaheb ambedkar
dr babasaheb ambedkar 
संपादकीय

अष्टावधानी, सामाजिक जाण असलेले डॉ. आंबेडकर 

सकाळवृत्तसेवा

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना केवळ दलितांचे कैवारी, दलितांचे उद्घारकर्ते, भारतीय संविधानाचे शिल्पकार एवढ्यापुरतेच मर्यादित करण्यात आले, मात्र त्यांनी शेती व शेतकरी, महिला, कामगार, मजूर, आदिवासी, ओबीसी या शोषीत समाजघटकांबरोबरच सिंचन, पाणी, ऊर्जा, वित्त अशा अनेकविध क्षेत्रात केलेले कार्य अतुलनीय आहे. त्यावर टाकलेला प्रकाश... 

व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अष्टावधानी आणि सामाजिक ऋणांची जाण असणारे होते. कायदा, अर्थकारण, राजकारण, समाजकारण, शेती, सिंचन, कामगार, शेती क्षेत्रात त्यांचा केवळ हातखंडाच नव्हे; तर त्या क्षेत्रात त्यांनी नवीन आणि सुधारीत संकल्पना मांडल्या. त्यांचा राष्ट्रउभारणीत उपयोग केला, म्हणून त्यांचे योगदान अतुलनीय आहे. त्यांचे कायद्याचे शिक्षण इंग्लंडमध्ये झाले. संविधानात कायदा तयार करताना तो समाजाच्या सर्व घटकांशी संबंधित हवा, याची पूर्णपणे खबरदारी त्यांनी घेतली. संविधान तयार करण्यातील त्यांचे कार्य निःसंदेह प्रशंसनीय आहे. सर्वसामान्य माणसाच्या हक्क व अधिकाराचे रक्षण केले. संविधान तयार करताना समानता हे अतिशय महत्त्वाचे तत्व पाळले गेले. 

‘अनंत पैलूंचा सामाजिक योद्धा़' या पुस्तकाचे लेखक आणि प्रसिद्ध समीक्षक डॉ. प्रल्हाद लुलेकर म्हणतात, की डॉ. आंबेडकर यांनी आयुष्यभर नैतिकता आणि चारित्र्य सांभाळत ज्ञानसाधना केली. शेतकरी, शेतमजूर, कामगार, गावकामगार, दलित, बारा बलुतेदार, भटके आणि भटके विमुक्त, महिला, आदिवासी यांच्यासह सर्वच वंचितांच्या, शोषितांच्या चळवळी उभ्या केल्या आणि चालवल्या. परकी सत्तेच्या विरुद्ध आणि अंतर्गत शोषकसत्तेच्या विरुद्ध त्यांनी लढा पुकारला. देशाशी अविचल निष्ठा आणि त्यातून सामान्य जनतेसाठी अविस्मरणीय कार्य हे या लढ्याचे सूत्र होते. माणूस म्हणून जगण्याचे हक्क जाती धर्माच्या नावाने संपुष्टात आणणे हे भ्रष्टवर्तनच आहे, असे त्यांचे मत होते. निकोप समतेवर आधारलेल्या शोषणविरहित निर्भय समाजाचे त्यांचे स्वप्न होते. त्यांच्या परिवर्तनाच्या सर्व चळवळींचे हेच उद्दिष्ट होते. 

शेती, शेतकऱ्यांसाठी लढा दिला  
डॉ. आंबेडकर यांच्या शेतीविषयक विचारांविषयी कृषिअभ्यासक व गटशेतीचे प्रणेते डॉ. भगवानराव कापसे सांगतात की, शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांविषयी वैधानिक ठिकाणी बोलणारे, शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर मोर्चे काढण्याचे मोठे काम त्यांनी केले. त्यांनी शेतकरी संघ चालवला. आयुष्यभर शेतकऱ्यांसाठी भूमिका घेतली, चळवळी चालवल्या. शेतसारा, शेतीधारण क्षेत्र, लोकसंख्यावाढीमुळे शेतीवर पडणारा बोजा, शेती व्यवसायातील भांडवलाचे नियोजन, पाटबंधाऱ्याची गरज, शेतीतील भांडवली गुंतवणूक यासाठी अनेक चळवळी उभ्या केल्या. देशातली शेती आणि शेतकरी या विषयाकडे त्यांनी या चळवळींच्या माध्यमातून सर्वांचे लक्ष वेधले. सिंचनाच्या क्षेत्रातही डॉ. आंबेडकर यांचे खूप मोठे योगदान आहे. पाण्याचे संवर्धन करून त्याचा योग्य वापर केला तर विकास शक्य होईल, असा विचार करायला लावणारा नवा दृष्टिकोन त्यांनी दिला. नद्या जोडण्याचाही विचार त्यांनी त्यावेळी मांडला होता. 

स्त्रियांचे उद्धारकर्ते  
स्त्रियांचे सामाजिक स्थान उंचावण्याची डॉ. आंबेडकरांनी प्रतिज्ञाच घेतली होती. कुणाही नागरिकाबाबत भेदभाव करता येणार नाही. सर्व समान आहेत, अशी कायद्याद्वारे तरतूद करून स्त्रियांना समानता बहाल केली. सामाजिक क्षेत्रात कार्यरत मंगल खिवंसरा म्हणतात की, डॉ. आंबेडकर हे स्त्रियांचे उद्धारकर्ते आहेत. हिंदू कोड बिल हे त्याचे प्रमाण आहे. देशाच्या समतोल विकासाचे मापदंड त्या देशातील स्त्रियांच्या विकासावर अवलंबून असते. यासाठी विवाहिता, विधवा, परित्यक्ता, घटस्फोटीत स्त्रियांच्या संरक्षणाचा हक्क व विकासाचे उद्दिष्ट ठेऊन त्यांनी हिंदू कोड बिलाचा आग्रह धरला होता. बाबासाहेबांनी सातत्याने स्त्रियांच्या प्रश्‍नांचा विचार केला. 

सर्वसामान्य विकासाचा केंद्रबिंदू  
डॉ. आंबेडकर यांचा अर्थतज्ञ हा पैलू दुर्लक्षिला गेला आहे. मिलिंद कला महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य डॉ. इंद्रजीत आल्टे म्हणाले, की औद्योगिक विकासासाठी डॉ. आंबेडकरांनी महत्त्वाच्या उद्योगांचे राष्ट्रीयकरण करण्यावर भर दिला. खासगी क्षेत्रालाही सहभागी करून घेण्याचे धोरण आखले. हे सार्वजनिक क्षेत्र खासगी क्षेत्रासाठी रोल मॉडेल ठरावे, ही त्यांची अपेक्षा होती. शेती आणि शेतीच्या उत्पादकतेत वाढ होण्यासाठी त्यांनी शेतीबाबत राज्य समाजवाद व सामुदायिक शेतीच्या संकल्पनेचा पुरस्कार केला. यात सर्व संसाधने व सामग्री पुरवण्याची जबाबदारी राज्यावर टाकली होती. तसेच राजकीय हस्तक्षेपविरहित स्वतंत्रपणे वित्तीय नियंत्रण ठेवणारी मध्यवर्ती संस्था स्थापन करावी, असे सुचवले होते. त्यावरच पुढे रिझर्व्ह बॅंकेची कार्यपद्धती ठरली. सर्व चलनविषयक व्यवस्थापनाची जबाबदारी ही संस्था पाहात आहे. सर्वसामान्य माणूस हा आर्थिक विकासाचा केंद्रबिंदू असावा, असे त्यांचे मत होते. राजकीय स्वातंत्र्याबरोबर आर्थिक व सामाजिक स्वातंत्र्याचा डॉ. आंबेडकरांनी पुरस्कार केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट! परिसर हादरला; घरांची मोठी पडझड, पाहा व्हिडीओ

Pune Station: पुण्यासह पाच रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला बेड्या

Virat Kohli : इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमावर विराटचीही टीका;सामन्याचा समतोल बिघडत असल्याचे व्यक्त केले मत

VIDEO: आरसीबी प्लेऑफमध्ये जाताच विरुष्काचं भन्नाट सेलिब्रेशन; व्हिडीओनं वेधलं साऱ्यांचे लक्ष

शेतीवर कर्ज घेणारा शेतकरी झाला अब्जाधीश! खात्यात आले ९९ अब्ज रूपये, रक्कम पाहून बँकेसह खातेधारकाला बसला धक्का

SCROLL FOR NEXT