शोध पत्रकारितेला गुन्हा ठरवू नका!
शोध पत्रकारितेला गुन्हा ठरवू नका! sakal
संपादकीय

शोध पत्रकारितेला गुन्हा ठरवू नका!

विजय साळुंके

शस्त्रास्त्र निर्माते आणि त्यांची राजकीय व्यवस्थेतील प्यादी यांना मानवजातीचा संहार करण्यापासून रोखायचे असेल, तर विकिलिक्स आणि ज्युलियन असांजसारखे जागले जगवले पाहिजेत. असांजची लढाई केवळ वृत्तपत्र स्वातंत्र्यापुरतीच मर्यादित नाही. तिला व्यापक परिमाण आहे.

अमेरिकेवर वीस वर्षांपूर्वी ९-११चा दहशतवादी हल्ला झाला. त्यात पेन्टॅगॉनलाही (संरक्षण खात्याचे मुख्यालय) फटका बसला होता. तेथे पाहणीसाठी गेलेल्या वरिष्ठ सेनाधिकाऱ्याच्या हातात गुप्त पत्र ठेवण्यात आले. येत्या पाच वर्षांत जगातील सात देशांवर आक्रमण करण्याची ती योजना होती. ९-११ हल्ल्यामागील सूत्रधारांचा तपशील नसताना ही युद्धखोरी. १९६०च्या दशकात व्हिएतनाम युद्धाच्या वेळी अमेरिकेतील सक्तीच्या लष्करी सेवेस विख्यात बॉक्सर मोहंमद अली याने विरोध केला. लष्कर भरती नाकारल्यास तुरुंगवासाच्या धमकीला त्याचे उत्तर होते, ‘आम्ही (कृष्णवर्णीय) तर गेली चारशे वर्षे तुरुंगात आहोत. अमेरिकेपासून हजारो किलोमीटर दूरच्या लोकांवर आम्ही शस्त्र का चालवायचे?’ तर असे हे अमेरिकी राजतंत्र.

विकिलिक्सचा संपादक ज्युलियन असांज याने २०१० मध्ये अमेरिकेचे राजकीय नेते, मुत्सद्दी, लष्कर आणि गुप्तचर यांनी इतर देशांवर आक्रमणे करून किती युद्घ गुन्हे केले, याची अधिकृत कागदपत्रे, व्हिडिओ पुरावे जगापुढे आणले. प्रस्थापित व्यवस्थेचा क्रूर, घृणास्पद व कारस्थानी चेहरा जगापुढे आणला. तो त्याचा अपराध ठरला. त्यामुळेच गेली बारा वर्षे तो एकप्रकारे बंदीवास भोगतोय. अमेरिकेने त्याच्यावर हेरगिरी कायद्याचा आरोप ठेवल्यावर त्याने लंडनमधील इक्वेडोरच्या वकिलातीत सात वर्षे आश्रय घेतला. इक्वेडोरमध्ये राजवट बदलानंतर नव्या सरकारने असांजचा आश्रय मागे घेतल्यावर ब्रिटिश पोलिसांनी त्याला खेचून तुरुंगात डांबले. पूर्वीच्या जामीन शर्तींचा भंग केल्याबद्दल त्याला ५० आठवड्यांची शिक्षा झाली. त्या आधीपासून अमेरिका त्याला ताब्यात घेण्याच्या प्रयत्नांत होती. स्वीडनमध्ये दोन महिलांवर बलात्काराचे प्रकरणही लादण्यात आले होते. जानेवारी २०२१ मध्ये लंडनमधील कनिष्ठ न्यायालयाने अमेरिकेची असांजच्या प्रत्यार्पणाची मागणी फेटाळली. त्याविरोधात अमेरिकेने लंडनच्या उच्च न्यायालयात (रॉयल कोर्ट ऑफ जस्टीस) अपील केले होते. २७ व २८ ऑक्टोबरला सुनावणी झाली. परंतु निर्णय झाला नाही. पुढील सुनावणी व निकाल जानेवारी २०२२ मध्ये होईल, असा अंदाज आहे. असांजने अमेरिकी हेरगिरी कायद्यानुसार गोपनीय कागदपत्रे उघड केली, हा आरोप सिद्ध झाल्यास त्याला १७५ वर्षे तुरुंगवास होऊ शकतो. त्याआधी त्याचे प्रत्यार्पण गरजेचे आहे. ते झाल्यास अमेरिकी न्यायालयात खटला चालविला जाईल. त्यात अनेक वर्षे जातील. कुठलाही अपराध सिद्ध झालेला नसताना असांजला तुरुंगात खितपत ठेवण्याचा डाव आहे.

असांजला संपवण्याचे प्रयत्न

ज्युलियन असांजवरील खटला हे राजकीय कारस्थान आहे. अमेरिका, ब्रिटन आदी पाश्चात्य सत्तांनी गेल्या वीस वर्षात इराक, अफगाणिस्तान, येमेन, लीबिया आदी देशात लष्करी हस्तक्षेपाने जो धुमाकूळ घातला, तो दडपण्यासाठीच ही कोर्टबाजी. पाश्चात्य देश लोकशाही, मानवी हक्कांचा गजर करतात, परंतु तेथील प्रस्थापित व्यवस्था त्याच तत्वांचा खून पाडीत असतात. असांजवरील खटल्याला व्यापक परिमाण आहे. जगातील वृत्तपत्र स्वातंत्र्याची सर्वाधिक महत्त्वाची लढाई असांज एकट्याने लढतोय. लंडन उच्च न्यायालयातील सुनावणीत पहिल्या दिवशी तो व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजर राहिला. दुसऱ्या दिवशी त्याच्या बचावाचे कामकाज होणार होते. तेव्हा मात्र त्याला सहभागी होऊ दिले नाही. २०१७ मध्ये अमेरिकी गुप्तचर विभाग (सीआयए) आणि ब्रिटनने असांजचे इक्वेडोरच्या वकिलातीतून अपहरण करून रस्त्यावरील चकमकीत त्याला ठार करण्याची योजना आखली होती. त्याआधी त्याच्यावर विषप्रयोगही झाले, ते फसले. डोनाल्ड ट्रम्प प्रशासनात परराष्ट्रमंत्री असलेले माईक पाम्पेओ सीआयएचे संचालक असताना ही योजना आखली होती. सीआयएमधील निवृत्त अधिकाऱ्यानेच हे बिंग फोडले.

ज्युलियन असांज हा ऑस्ट्रेलियाचा नागरिक आहे. त्याच्यावर ज्या गुन्ह्याचा आरोप केला जातो, तो त्याने अमेरिकेच्या भूमीवर केलेला नाही. त्यामुळे अमेरिकेचा हेरगिरी कायदा त्याला लागू होत नाही, असा बचाव पक्षाचा मुद्दा आहे. जानेवारी २०२१ मध्ये लंडनमधील कनिष्ठ न्यायालयाने असांजचे प्रत्यार्पण नाकारताना हा मुद्दा विचारात घेतला नव्हता. त्याला ब्रिटनमधील बेलमार्श तुरुंगात एकांत कोठडीत ठेवण्यात आले आहे. तेथे त्याचा शारीरिक व मानसिक छळ झाल्याने त्याने अनेकदा आत्महत्येचा प्रयत्न केला. संयुक्त राष्ट्रांच्या छळ विरोधी शाखेच्या अधिकाऱ्याने बेलमार्श तुरुंगातील असांजची अवस्था प्रत्यक्ष भेटून पाहिली आहे. अमेरिकी वकिलाने असांजचा वैद्यकीय अहवाल खोटा ठरविण्याचा प्रयत्न केला. असांज अमेरिकी कायद्याच्या कक्षेत येत नाही, शिवाय तेथील तुरुंग व्यवस्था कैद्यांच्या अमानुष छळासाठी कुप्रसिद्ध आहे, हे मुद्देही कनिष्ठ न्यायालयाने लक्षात घेतले नाहीत. सीआयए व ब्रिटनद्वारे असांजच्या अपहरणाचा व त्याद्वारे रस्त्यावरील चकमकीत त्याला ठार करण्याच्या कथित कारस्थानाची दखल घेतली असल्यास असांजचे प्रत्यार्पण लांबणीवर जाईल. त्याच्यावरील खटला खुल्या न्यायालयात चालविला जाईल. तेथे त्याला एकांत कोठडीत ठेवले जाणार नाही, तसेच शिक्षा झाल्यास ती तो त्याच्या मायदेशात (ऑस्ट्रेलियात) भोगू शकेल, असा अमेरिकेचा युक्तिवाद आहे. ऑस्ट्रेलियाच्या सरकारने याला दुजोरा दिलेला नाही. लष्करी मोहिमांबाबत ब्रिटन, ऑस्‍ट्रेलिया हे अमेरिकेच्या कच्छपी लागलेले आहेत. अमेरिकेच्या युद्धविषयक अपराधात तेही सहभागी आहेत.

ज्युलियन असांज हा विकिलिक्सचा संस्थापक, त्याला अमेरिका पत्रकारच मानायला तयार नाही. अमेरिकी घटनेच्या दुसऱ्या दुरुस्तीने अभिव्यक्ती स्वातंत्र्याची हमी दिली आहे. तोच असांजच्या बचावाचा आधार आहे. अमेरिकादी पाश्चात्य देशांच्या लष्करी मोहिमांचा भीषण चेहरा उघडा पाडणे हा व्यापक मानवी हिताच्या दृष्टीने गुन्हा ठरत नाही. असांजची लढाई ही जगातील वृत्तपत्र स्वातंत्र्याचीच लढाई आहे. त्याच्या कार्याबद्दल २०१० ते २०१९ या काळात त्याला जगभरचे सन्मान जाहीर झाले. राष्ट्रीय सुरक्षेआडून लष्कर, गुप्तचर व राजकीय नेत्यांची दुष्कृत्ये लपवून ठेवू इच्छिणाऱ्या सत्तांना जरब बसविण्याची ही लढाई आहे. अमेरीका, ब्रिटनमधील प्रसारमाध्यमे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उद्‍घोष करतात. मात्र असांजच्या अपहरणाच्या कटाच्या वृत्ताची बीबीसीने फक्त एकदा बातमी दिली. न्यूयॉर्क टाइम्स, वॉशिंग्टन पोस्ट या अमेरिकी वर्तमानपत्रात गेल्या काही महिन्यात एकही लेख आला नाही. शस्त्रास्त्र लॉबीने राजकीय नेत्यांप्रमाणेच प्रसारमाध्यमांनाही खिशात घातले आहे.

शस्त्रास्त्र उत्पादक व कॉर्पोरेट लॉबीच्या आर्थिक हितासाठी विविध निमित्ते शोधून छोट्या देशांवर आक्रमण करून लक्षावधी लोकांचा कसा बळी घेतला जातो, हे ज्युलियन असांज, एडवर्ड स्नोडेन, चेल्सी मॅनिंग, जेरेमी हॅमंडसारखे पत्रकार व जागले (व्हिसल ब्लोअर) जगापुढे आणीत असतात. हे काम आणखी कोणी करायला धजू नये म्हणून त्यांच्यात दहशत पसरविण्याच्या उद्देशानेच असांजवरील खटला आहे. जॉर्ज डब्ल्यू. बुश, टोनी ब्लेअर, बराक ओबामा, जनरल डेव्हिड पेट्रायस यांच्या भूमिकांचे आणि दायित्वाचे काय?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT