achyut godbole
achyut godbole 
सप्तरंग

डीटीएच आणि चॅनेल्स (अच्युत गोडबोले)

अच्युत गोडबोले achyut.godbole@gmail .com

सगळ्या चॅनेल्सचे प्रोग्रॅम्स डीटीएच सेंटरकडे आल्यावर डीटीएचची कंपनी ते प्रोग्रॅम्स पुन्हा सॅटेलाईट्‌सचा वापर करूनच आपल्या घराकडे पाठवतात. मात्र, यासाठी ते इस्रोनं सोडलेले सॅटलाईटस्‌ वापरतात. जमिनीवरून हे कार्यक्रम डीटीएच कंपनीकडून रिसीव्ह करणं आणि ते पुन्हा खाली वेगवेगळ्या ग्राहकांकडे पाठवणं याकरता या सॅटेलाईटवर ट्रान्स्पॉंडर्स नावाची यंत्रणा असते. प्रत्येक सॅटेलाईटमध्ये भारताचा नकाशा फीड केलेला असतो. त्यामुळे हे सिग्नल्स नेमके कुठं पाठवायचे ते त्या सॅटेलाईटला समजतं. आपल्या घरावर जो अँटेना बसवलेला असतो; त्याच्या छत्रीची दिशा डीटीएचच्या कंपनीप्रमाणे योग्य तऱ्हेनं बसवावी लागते. त्यामुळे इस्रोच्या सॅटलाईट्‌सपासून प्रक्षेपित केलेले कार्यक्रम त्या डिशपर्यंत पोचतात.

अगदी सुरवातीला जेव्हा टेलिव्हिजन आले, तेव्हा त्यावर फक्त एक-दोन वाहिन्याच (चॅनेल्स) आपल्याला दिसायच्या. त्या म्हणजे डीडी 1 आणि डीडी 2. तेव्हा आपल्या घराच्या गच्चीवर फक्त एक अँटेना बसवला, की आपल्याला टीव्ही दिसायला लागायचा. त्या काळी टीव्हीचं प्रसारणही दिवसाचे काही ठराविक तासच व्हायचं; पण आता दिवसाचे 24 तास शेकडो चॅनेल्स आबालवृद्धांचं मनोरंजन करायला तत्पर असतात. मात्र, ही प्रगती नेमकी कशी झाली, हे सगळे चॅनेल्स कसे चालतात आणि त्यात कृत्रिम उपग्रहांचा सहभाग कसा असतो हे समजून घेणं खूपच रंजक आहे.
सुरवातीच्या काळानंतर खासगी कंपन्यांचे अनेक चॅनेल्स आपल्या टीव्हीवर दिसण्यासाठी आपल्याला आपल्या गावातल्या केबल ऑपरेटरकडून केबल घ्यावी लागायची. या केबल ऑपरेटरकडं एक छत्री बसवलेली असायची. वेगवेगळ्या चॅनेल्सचे प्रोग्रॅम्स त्यांच्यात्यांच्या स्टुडिओजमधून सॅटेलाईटद्वारे या छत्रीकडे यायचे. मग या केबल ऑपरेटरकडची यंत्रणा हे सगळे प्रोग्रॅम्स कोऍक्‍सियल केबलमध्ये किंवा अलीकडं फायबर ऑप्टिक्‍सच्या केबलमध्ये घालायची. प्रत्येक व्हिडिओ प्रोग्रॅमला साधारणपणे 6 मेगाहर्टझ्‌ इतकी बॅंडविड्‌थ लागते; पण कोऍक्‍सियल केबलची क्षमता त्यापेक्षा बरीच जास्त असल्यामुळे एका केबलमधून बरेच प्रोग्रॅम्स जाऊ शकतात. ऑप्टिकल फायबरची क्षमता त्यापेक्षाही बरीच जास्त असल्यामुळे त्यामधून तर त्याहीपेक्षा जास्त चॅनेल्स एकाच वेळी प्रवास करू शकतात. हे चॅनेल्स म्हणजेच त्यांचे सिग्नल्स एकमेकांत मिसळू नयेत म्हणून प्रत्येक चॅनेलसाठी एक ठराविक फ्रिक्वेन्सी बॅंडविड्‌थ नक्की केलेली असते. उदाहरणार्थ, 54 ते 60 मेगाहर्टझ्‌ म्हणजे चॅनेल नंबर 2, तसंच 60 ते 66 मेगाहर्टझ्‌ म्हणजे चॅनेल नंबर 3 वगैरे. याशिवाय कॉम्प्रेशनची अनेक टेक्‍निक्‍स वापरल्यामुळे आणखीही जास्त चॅनेल्स पाठवता येतात. कॉम्प्रेशन, बॅंडविड्‌थ हे शब्द आज कदाचित कळायला अवघड असे "जार्गन' वाटतील; पण त्यांच्याविषयी आपण नंतर सविस्तर बोलणारच आहोत.

आता केबल ऑपरेटर ही केबल प्रत्येक घरापर्यंत पोचवतो आणि प्रत्येक टीव्हीला जोडून देतो. थोडक्‍यात सगळे चॅनेल्स आपल्या टीव्हीपर्यंत येत असतात. मग रिमोटच्या बटणाचा वापर करून आपण जेव्हा चॅनेल निवडतो (उदाहरणार्थ, चॅनेल 2) तेव्हा त्या केबलच्या फक्त त्या निवडलेल्या चॅनेलच्या फ्रिक्वेन्सीज्‌ (उदाहरणार्थ, 54 ते 60 मेगाहर्टझ्‌) निवडल्या जातात आणि मग तो चॅनेल आपल्या टीव्हीवर दिसायला लागतो. असे अनेक चॅनेल्स मग लोक केबलच्या माध्यमातून बघू शकतात.
मात्र, यामध्ये एक खूप मोठी त्रुटी राहून गेली होती. ती म्हणजे एखाद्यानं केबल ऑपरेटरकडून केबल न घेता शेजारच्याच्या केबललाच आपली केबल जोडली, तर त्याही माणसाला आपल्या टीव्हीवर सगळी चॅनेल्स फुकटात दिसायची. त्यामुळे या यंत्रणेमध्ये चोरी खूप वाढली होती. तसंच हे केबल ऑपरेटर एका मर्यादेपेक्षा जास्त चॅनेल्स दाखवू शकायचे नाहीत. आणखी एक गोष्ट म्हणजे शहरात केबल टाकणं शक्‍य होतं; पण दूर डोंगराळ भागात ते अवघड होतं. या सगळ्यांवर उपाय म्हणून सॅटेलाईट टीव्ही आणि त्याबरोबरच त्यांचे सेट टॉप बॉक्‍सेस आले.

या सेट टॉप बॉक्‍समध्ये आपल्या एटीएम कार्डासारखं एक कार्ड बसवलेलं असतं. त्यातून आपला ग्राहक क्रमांक आणि त्यासंबंधी गोष्टी सेट टॉप बॉक्‍सच्या कंपनीला मिळतात आणि आपण त्यांचे अधिकृत ग्राहक होतो. या सेट टॉप बॉक्‍समध्ये आपण निवडलेले चॅनेल्स, रिचार्ज केल्याचे तपशील वगैरे माहिती असते; पण तरीही या सेट टॉप बॉक्‍सपर्यंत हे चॅनेल्सचे प्रोग्रॅम्स कसे येतात याचं आपल्याला कोडं असतंच. सध्या भारतात सेट टॉप बॉक्‍स पुरवणाऱ्या रिलायन्स डिजिटल, एअरटेल डिजिटल टीव्ही, व्हिडिओकॉन डीटूएच, डिश टीव्ही, टाटा स्काय आणि सन डायरेक्‍ट या सहा डीटीएच कंपन्या आहेत. या कंपन्यांची डिश आपल्या गच्चीवर लावली आणि जे चॅनेल्स बघायचे आहेत, त्यांच्यासाठीचे पैसे भरले, की ते चॅनेल्स तर आपल्याला बघता येतातच; पण त्याचबरोबर जे चॅनेल्स विनामूल्य असतात, तेही बघता येतात.
आता जे चॅनेल्स आपण पाहतो त्यांची वेगवेगळी प्रॉडक्‍शन हाऊसेस असतात. उदाहरणार्थ, झी, सोनी, स्टार इत्यादी. प्रॉडक्‍शन हाऊस किंवा ब्रॉडकास्टर म्हणजे एखादया दृक्‌श्राव्य कार्यक्रम तयार करणाऱ्या कंपनीचं ऑफिस आणि कार्यक्रम तयार करण्यासाठी असणारा शूटिंग स्टूडिओ. या वेगवेगळ्या प्रॉडक्‍शन हाऊसेसमध्ये वेगवेगळे कार्यक्रम शूट (ध्वनीचित्रमुद्रित) होत असतात. या प्रॉडक्‍शन हाऊसेसची स्वत:ची नेटवर्क्‍स असतात. म्हणजे झीच्या नेटवर्कमध्ये झी मराठी, झी गुजराती, झी न्यूज, झी टॉकीज असे वेगवेगळे चॅनेल्स असतात, तसंच सोनीच्या नेटवर्कमध्ये सोनी टीव्ही, सेट मॅक्‍स, सब इत्यादी चॅनेल्स असतात. एका नेटवर्कमधल्या (उदाहरणार्थ, झी) एखाद्या चॅनेलचे (उदाहरणार्थ, झी युवा) सगळे ध्वनीचित्रमुद्रित झालेले कार्यक्रम ज्या दिवशी ज्या क्रमानं प्रक्षेपित करायचे असतील, त्या क्रमानं त्यातल्या जाहिरातींसहित एका रोलवर अपलोड केले जातात. त्यानंतर त्याच नेटवर्कच्या इतरही चॅनेल्सचे कार्यक्रम (उदाहरणार्थ, झी टॉकीज) अशाच तऱ्हेनं एकापुढे एक ठेऊन त्यांचाही एक रोल बनवला जातो. यानंतर अशा वेगवेगळ्या रोल्सचा एकच बंच तयार केला जातो. आता प्रत्येक प्रॉडक्‍शन हाऊसचं स्वतंत्र ट्रान्समीटिंग सेंटर असतं. तिथून हे बंच रोजच्या रोज ठराविक सॅटेलाईट्‌सकडे पाठवले जातात.

आता सॅटेलाईटकडे आलेले हे कार्यक्रम तो सॅटेलाईट टाटा स्काय किंवा एअरटेलसारख्या डीटीएच प्रोव्हायडर्सच्या सेंटर्सकडे सिग्नल्सच्या स्वरूपात पाठवतो. डीटीएच प्रोव्हायडर्स ते सगळे सिग्नल्स पकडतात. हे सिग्नल्स सांकेतिक भाषेत म्हणजेच एनक्रिप्टेड स्वरूपामध्ये असतात. त्यामुळे सॅटेलाईटकडून आलेले हे सिग्नल्स मधल्या मध्ये कोणी डिक्रिप्ट करू शकत नाही म्हणजेच वाचू शकत नाही. त्यामुळे आधी जशी केबलवरच्या प्रोग्रॅम्सची चोरी व्हायची तशी चोरी आता कोणी करू शकत नाही.

आता सगळ्या चॅनेल्सचे प्रोग्रॅम्स डीटीएच सेंटरकडे आल्यावर डीटीएचची कंपनी ते प्रोग्रॅम्स पुन्हा सॅटेलाईट्‌सचा वापर करूनच आपल्या घराकडे पाठवतात. मात्र, यासाठी ते इस्रोनं सोडलेले सॅटलाईटस्‌ वापरतात. जमिनीवरून हे कार्यक्रम डीटीएच कंपनीकडून रिसीव्ह करणं आणि ते पुन्हा खाली वेगवेगळ्या ग्राहकांकडे पाठवणं याकरता या सॅटेलाईटवर ट्रान्स्पॉंडर्स नावाची यंत्रणा असते. ती खूप महाग असते. एका ट्रान्स्पॉंडरसाठी या डीटीएच कंपन्यांना इस्रोला दरवर्षी दहा कोटी रुपये द्यावे लागतात. एक ट्रान्स्पॉंडर चाळीस चॅनेल्स रिसीव्ह करून पुन्हा खाली ट्रान्स्मिट करू शकतो; पण टाटा स्कायसारख्या कंपनीला चाळीसपेक्षा बरेच जास्त चॅनेल्स दाखवायचे असतात. त्यामुळे त्यांनी इन्सॅट 4 ए आणि जीसॅट 10 अशा दोन सॅटलाईट्‌सवर प्रत्येकी 12 असे एकूण 24 ट्रान्स्पॉंडर्स राखून ठेवले आहेत. त्यामुळे ते 24 X 40 म्हणजे 960 चॅनेल्स दाखवू शकतात; पण त्यासाठी त्यांना दरवर्षी प्रत्येक सॅटलाईटसाठी 12 X 10 म्हणजे एकशे वीस कोटी रुपये इस्रोला द्यावे लागतात. असं इतरही डीटीएच कंपन्या करतात. काही वेळा इस्रोच्या सॅटलाईट्‌सवर जागा नसेल, तर इस्रो ती जागा नासाच्या किंवा इतर विदेशी सॅटलाईट्‌सकडून भाड्यानं घेते आणि मग ती डीटीएच ऑपरेटर्स वापरू शकतात.

प्रत्येक सॅटेलाईटमध्ये भारताचा नकाशा फीड केलेला असतो. त्यामुळे हे सिग्नल्स नेमके कुठं पाठवायचे ते त्या सॅटेलाईटला समजतं. प्रत्येक सॅटेलाईटचं पृथ्वीसापेक्ष स्थान आणि दिशा ठरलेली असते- त्यामुळेच प्रत्येक डीटीएच डिश अँटेनाची आकाशाकडे रोखण्याची दिशा वेगवेगळी असते.

आता आपल्या घरावर जो अँटेना बसवलेला असतो; त्याच्या छत्रीची दिशा डीटीएचच्या कंपनीप्रमाणे योग्य तऱ्हेनं बसवावी लागते. त्यामुळे इस्रोच्या सॅटलाईट्‌सपासून प्रक्षेपित केलेले कार्यक्रम त्या डिशपर्यंत पोचतात. त्यानंतर त्या अँटेनाला जोडलेल्या केबलमार्फत त्या कार्यक्रमांचे सिग्नल्स प्रथम घरातल्या सेट टॉप बॉक्‍सपर्यंत आणि नंतर आपल्या टीव्हीपर्यंत पोचतात. आपण जे चॅनेल्स निवडलेले असतात आणि ज्यांचे पैसे आपण भरलेले असतात, तेवढ्याच चॅनेल्सचे सिग्नल्स तो सेट टॉप बॉक्‍स टीव्हीपर्यंत जाऊ देतो. बाकीचे चॅनेल्स आपण बघू शकत नाही. यानंतर रिमोटवर आपण चॅनेल नंबर दाबल्यावर ठराविक फ्रीक्वेन्सी बॅंडविड्‌थचे म्हणजेच ठराविक चॅनेलचे कार्यक्रम आपण कसे बघू शकतो ते आपण जाणतोच.

यात कोण कसे पैसे मिळवतो हे बघणं गमतीचं आहे. आपले कार्यक्रम दाखवण्याची परवानगी दिल्याबद्दल डीटीएच कंपन्या प्रॉडक्‍शन हाऊसच्या चॅनेलला पैसे देतात. ते पैसे आणि जाहिरातींमुळे मिळणारा पैसा हे चॅनेल्सचं मुख्य उत्पन्न असतं. अलीकडे हेच कार्यक्रम यूट्यूब किंवा इंटरनेटवर टाकून तिथूनही जाहिरातींचे पैसे मिळवणं चॅनेल्सनी सुरू केलंय. अर्थात तो कार्यक्रम चांगला असेल, तर तो जास्त लोक बघतात आणि त्याचा "टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट' (टीआरपी) वाढतो. हा टीआरपी काढण्याचं काम भारतात "इंडियन नॅशनल टेलिव्हिजन ऑडियन्स मेजरमेंट' (INTAM) नावाची कंपनी करते. त्यासाठी काही निवडक टीव्ही सेट्‌समध्ये एक वेगळी यंत्रणा बसवावी लागते. एखाद्या कार्यक्रमाचा टीआरपी जेवढा जास्त, तेवढे त्यात दाखवल्या जाणाऱ्या जाहिरातींचे दर वाढतात आणि मग चॅनेलचं उत्पन्न वाढतं. त्यातून कलाकारांचं मानधन, स्टुडिओचं आणि इतर गोष्टींचं भाडं, तसंच शूटिंग, वीज, प्रवास अशा इतर गोष्टींचा खर्च वगळला, की चॅनेलचा नफा काढता येतो.

डीटीएच प्रोव्हायडर्स आपले पैसे ग्राहकांकडूनच वसूल करतात. शेवटी या सगळ्या डीटीएच प्रोव्हायडर्सना सॅटेलाईटला पैसे द्यावे लागतात, त्यांना सेट टॉप बॉक्‍स आणि डिश तयार कराव्या लागतात, त्या ग्राहकांना त्यांच्या गच्चीवर बसवून द्याव्या लागतात. त्यांना ग्राहकांसाठी कस्टमर केअर केंद्रं उभारुन ती चालवावी लागतात. या सगळ्यात काही शे ते काही हजार कोटी रुपयांची गुंतवणूक असते. त्यांना पडणारा हा सगळा खर्च त्यांच्या उत्पन्नातून वजा केला, की त्यांचा नफा काढता येतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT