murder rape case
murder rape case 
सप्तरंग

भय इथले  संपत नाही

ॲड. सुप्रिया कोठारी

आपण रोज ऐकतो, आज इकडे बलात्कार झाला, तिकडे झाला. प्रत्येक जण आपापल्या परीने कयास लावतो, असे का होते, त्यावर काय उपाययोजना करायला हव्यात...त्यावर चर्चा होते, बातम्या येतात, लोक संतापतात, आंदोलने, कॅन्डल मोर्चा आणि बरंच काही...पण त्यामागची थोडीशी पार्श्‍वभूमी आपण जाणून घेऊयात...बलात्कार करणारा नराधम विकृत मानसिकतेचा असतोच असतो, पण आपण काय करतो, फक्त चर्चा...त्यावर उपाय शोधतच नाही म्हणण्यापेक्षा उपाय अमलातच आणत नाही.

जरा बारकाईनं पाहिले तर हे सगळं फक्त आणि फक्त बलात्कारासारख्या घटना घडल्यावरच होते. आपण त्यावर भाषणं ऐकतो, वेगवेगळ्या बौद्धिक स्तरातून उपाय सुचविले जातात, बरंच काही होतं. पण कधीपर्यंत, तर एखादी बलात्काराची घटना घडल्यानंतर ते त्या केसमध्ये आरोपीविरुद्ध चार्जशीट फाइल होईपर्यंत...नंतर सगळा राग, रोष, उद्विग्नता सगळं मावळत जातं हळूहळू, ते दुसरी एखादी घटना परत होईपर्यंत. 

माझ्या वैयक्तिक दृष्टिकोनाबद्दल बोलायचे झाले, तर मी याचा दोष सिस्टिमला किंवा त्या विकृतीला देणार नाही. तर सुरवात होते ती पोलिसांपासून. समाजावर पटकन जरब बसणारा असा एकच वर्ग तो म्हणजे गणवेशातील पोलिस, यालाच फक्त लोक घाबरतात. खरंच घाबरतात का हो? हो, घाबरतात ना, पण गुन्हेगार सोडून बाकीचा सर्व पांढरपेशा समाज प्रचंड घाबरतो. कारण पोलिसांनी त्यांचं ब्रीदवाक्‍य ठरवूनच ठेवलंय, ते म्हणजे घटना घडल्याशिवाय काही नाही! याची दोन उत्तम उदाहरणे... 

आता काल परवाची घटना आहे. एक १३ वर्षांची मुलगी जिच्या आई-वडिलांचा घटस्फोट २-३ वर्षांपूर्वी पुणे कौटुंबिक न्यायालयात झाला. त्या वेळी मुलांनी वडिलांकडे राहायचे आणि आईने त्यांना ठरवून दिलेल्या वेळात भेटायचे, असे ठरले. त्यानंतर मुलीला थोडी समज येऊ लागली आणि तिला वडिलांबरोबर राहणे थोडे असुरक्षित वाटू लागले. कारण वडिलांना दारूचे व्यसन होते. दारू पिल्यानंतर ते काय करतात, वागतात, बोलतात याचे त्यांना भान नाही. घरात मुलीला समजून घेईल असे कोणी नाही. मग मुलीने आईला सांगितले, ‘‘मला वडिलांकडे सुरक्षित वाटत नाही. मला तुझ्यासोबत राहायचे आहे.’’ आईने मुलीची मानसिक स्थिती समजून घेतली आणि मुलीला घेऊन पुणे ग्रामीण पोलिस स्टेशन गाठले. तिथे मुलीने एक अर्ज लिहून द्यायचा प्रयत्न केला...अर्ज असा की...मी माझ्या आईबरोबर राहायला जात आहे. कारण मला वडिलांबरोबर असुरक्षित वाटत आहे. खरं तर या दोन ओळी बरंच काही सांगून जातात, पण ते त्या संबंधित अधिकाऱ्याला कळालं नाही कदाचित. त्याने नियमांचे पाढे वाचून त्यांना अर्ज कसा घेता येणार नाही हे सांगितले. खरं तर प्रकरण खूप गंभीर आहे. नको तिथे कायदा दाखवायची किंवा वापरायची त्यांची सवयच गुन्हेगारांना बळ देऊन जाते, आणि नंतर मग बलात्कारासारखे गंभीर गुन्हे घडले की पळापळ होते. कितीदा तरी असे भयानक अनुभव येतात, तिथे फक्त आणि फक्त पोलिसांकडून मिळालेल्या वागणुकीमुळे पीडितेलाही अपराध्याची भावना निर्माण होते. आपण न्याय व्यवस्थेला दोष देतो, पण अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये किंवा अगदी किरकोळ गुन्ह्यांमध्ये सर्वांत पहिला आधार म्हणजे पोलिस असतात. पोलिसांच्या दारात गेल्यावर अत्यंत उपहासात्मक वागणूक मिळते. बऱ्याचदा मलाही असे अनुभव येतात, तक्रार द्यायला एखाद्या मुलीला किंवा स्त्रीला पोलिस स्टेशनला पाठवायचे असेल तर एखादी मोठी ओळख काढून संबंधित अधिकाऱ्यांना त्याकरवी सांगून तक्रारदाराला पाठवावे लागते.

बऱ्याचदा काय होतं पोलिसांना, खूप मोनोटोनीस काम करायची सवय असल्याने एकाच पठडीत तक्रार जबाब नोंदवून घेतात. पीडितेचा जबाब बऱ्याचदा तिच्या सांगण्याप्रमाणे नसतो किंवा तिची मानसिकता ठीक नसल्याने तिने आपण सांगितले तसेच लिहिले आहे का हे गांभीर्यानं त्या वेळी बघितलेले नसते. त्याचे दुष्परिणाम मग तिला भोगावे लागतात, म्हणून अशा घटनांमधल्या प्रत्येक पीडितेला पोलिस स्टेशनमध्ये मानसिक बळ, वेळ आणि आधार मिळाला पाहिजे. एका रेप केसमध्ये एक मुलगी २२ वर्षांची गरोदर राहते. केस दाखल होते, नेहमीप्रमाणे जबाब आणि केस चार्जशीट फाइल होऊन कोर्टात येते आणि सुरू होते. दरम्यानच्या काळात बलात्कारातून जन्माला आलेले मूल सात वर्षांचे झालेले असते. मुलीच्या जिवाची आणि तिच्या घरच्यांची घालमेल चालू होते. पुढे काय? मग त्या आरोपींकडून लग्नाची मागणी येते. मुलीकडे आणि जन्माला आलेल्या मुलाकडे बघून समझोता होतो, मुलीला लग्न करून नेले जाते. पण महत्त्वाचे म्हणजे पीडितेला किती गंभीर परिणामातून जावे लागते या गोष्टीची जाणीव कोणालाच होत नाही. केस संपते, आरोपी सुटतात आणि परत काही दिवसांनी पीडिता आणि तिचे मूल हे रस्त्यावर येतात. 

सगळ्याच बाबतीत पोलिसांना दोष देऊन चालणार नाही; पण आपणही, समाजाने काहीतरी शिकायला हवं आता. कायदा आहेच, पण तो वापरायचा कसा, तेही आपणच ठरवायला हवं. कोणताही गुन्हा करायच्या आधी गुन्हेगाराला परिणामाची जाणीव इतकी गंभीरपणे व्हायला हवी, की काही करण्याच्या आधी परिणाम समोर दिसायला हवेत आणि मगच कोणताही गुन्हेगार जेव्हा बलात्कार केल्यावर त्याला काय मिळणार आहे हे समजून घेतो, तसेच तो गुन्हा केल्यावर त्याची शिक्षा काय मिळेल हेही समजून घ्यायच्या मनःस्थितीत येईल. यासाठी सिस्टिममध्ये असणारा प्रत्येक माणूसच नव्हे तर सामान्य माणसालाही कायद्याचे आवश्‍यक असं ज्ञान असणं गरजेचं आहे. त्यामुळे अशा एक ना अनेक निर्भया, प्रियांका सुरक्षित आयुष्य जगू शकतील. पोलिसांनो, इतक्‍या मिळमिळीत आणि बोथट नका होऊ देऊ संवेदना! एक आठ तासांचे कर्तव्य म्हणून ड्यूटी करू नका, तुमच्यातला माणूस आणि जरब जिवंत ठेवा. गुन्हेगार पोलिसाला घाबरलाच पाहिजे, पण गुन्हा करायच्या आधी; गुन्हा घडल्यानंतर नको. शेवटी कायदा, कायदा म्हणजे तरी काय? Law is nothing but the common sense तोही वापरायला शिकलं पाहिजे ना! 

मोकळे व्हा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT