aneesh prabhune write article in saptarang
aneesh prabhune write article in saptarang 
सप्तरंग

सारीपाट सत्तेचा (अनीश प्रभुणे)

अनीश प्रभुणे prabhune.aneesh@gmail.com

मालिका किंवा चित्रपटांमध्ये राजकारण हा विषय नेमक्‍या प्रकारे कधीच मांडला जात नाही. डेन्मार्कमधल्या सत्तेचा सारीपाट मांडणारी ‘बोर्गन’ ही मालिका मात्र त्याला अपवाद होती. एका महिला व्यक्तिरेखेभोवती फिरणारी आणि राजकारणाबरोबर इतर अनेक गोष्टी उलगडून दाखवणारी ही मालिका खिळवून ठेवते.

‘राजकारण’ हा जवळपास प्रत्येक मनुष्यमात्राचा जिव्हाळ्याचा विषय! राजकारणाविषयी चर्चा करणं, वाद घालणं आणि एखाद्या विचारप्रणालीचं ठोस समर्थन किंवा कडवा विरोध करणं या सगळ्या गोष्टी न करणारा माणूस सापडणं थोडं दुर्मिळच आहे... तरीही राजकारणाचं खरं रूप दाखवणारी एखादा चित्रपट किंवा टीव्ही सीरियल अपवादानंच पाहायला मिळतात. बहुतांश कलाकृतींमधून राजकारण या विषयाची एकतर खिल्ली उडविलेली असते किंवा त्याला थेट ‘व्हिलन’ करून टाकलेलं असतं..

दोन-तीन दशकांपूर्वी अमेरिकी आणि ब्रिटिश टीव्हीवरच्या काही मालिकांमध्ये राजकारणाच्या पटाविषयी कलाकृती सादर करण्याचा चांगला प्रयत्न झाला होता. १९८० च्या दशकात ‘येस मिनिस्टर’, ‘हाऊस ऑफ कार्डस’ या ब्रिटिश मालिका आणि अलीकडच्या ‘द वेस्ट विंग’, ‘व्हिप’सारख्या अमेरिकी मालिकांमधून हे प्रयत्न झाले होते. ‘बीबीसी’च्या’ ‘हाऊस ऑफ कार्डस’चंच भावंड असलेल्या अमेरिकी ‘हाऊस ऑफ कार्डस’चं ’नेटफ्लिक्‍स’वर प्रचंड फॉलोइंग आहे. वर उल्लेख केलेल्या सर्वच मालिका प्रेक्षकांनी उचलून धरल्या होत्या आणि समीक्षकांनीही त्यांचं कौतुक केलं होतं. तरीही, अशा मालिकांमधलं राजकारण आणि नेते कधीच ‘खरे’ नसतात... त्यांचं विनोदी चित्रण तरी झालेलं असतं, किंवा त्यांची खलप्रतिमा तरी रंगवलेली असते... अशा मालिकांमधून ‘खरं’ राजकारण समोर आलंच नाही..

या सगळ्या पार्श्‍वभूमीवर उत्तर युरोपमधल्या एका छोट्याशा देशात तयार झालेल्या ‘बोर्गन’ ही कलाकृती म्हणजे दर्दी प्रेक्षकांसाठी ताज्या हवेची झुळूक होती... टीव्ही किंवा चित्रपटातून आपण राजकारणाचं चित्र कसं रंगवतो, याचं परिमाण या मालिकेनं बदलून टाकलं. अपघातानंच डेन्मार्कच्या पंतप्रधानपदी आरुढ झालेल्या महिला नेत्याभोवती ‘बोर्गन’ची कथा फिरते. ‘राजकारणाची कल्पना’ याऐवजी ‘वास्तवातलं राजकारण’ यावरच ‘बोर्गन’च्या निर्माते-दिग्दर्शकांचा भर होता. डेन्मार्कमधल्या मॉडरेट पक्षाच्या संसदेतल्या नेत्या बिर्जेट नायबोर्ग या नेत्याची ही कथा आहे. ‘बोर्गन’ म्हणजे डेन्मार्कमधली संसद! डेन्मार्कमधील सार्वत्रिक निवडणुकांमध्ये जनमताचा कौल जरा आश्‍चर्यकारकच लागतो आणि बिर्जेटच्या सर्वाधिक जागा मिळतात; पण बहुमत मिळत नाही. समविचारी पक्षांना एकत्र आणणं (!) या उद्देशानं प्रयत्न करणाऱ्या बिर्जेट यांना एक साक्षात्कार होतो... हा साक्षात्कार म्हणजे ‘तडजोड हे राजकारणाचे दुसरे नाव आहे!’ काहीशा नाराजीनं आणि अनिच्छेनंच बिर्जेट काही नेत्यांचा पाठिंबा घेऊन सत्ता स्थापन करतात आणि डेन्मार्कच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनतात. घटकपक्षांची मोट बांधत खिचडी सरकार चालवण्याची बिर्जेट यांची तारेवरची कसरत, काही वेळा स्वत:ची मूल्यं सोडून करावी लागलेली तडजोड आणि वैयक्तिक जीवनापर्यंत राजकारणानं केलेली नकोशी घुसखोरी यांचा अटळ प्रवास या मालिकेत आहे.

‘समविचारी पक्षांना एकत्र आणणं’ आणि ‘घटकपक्ष’ वगैरे गोष्टी आपल्याला फारशा नवीन नाहीत; पण ‘बोर्गन’ची ताकद म्हणजे त्या मालिकेतली पात्रं आणि घट्ट पकड असलेलं लिखाण..! स्त्री व्यक्तिरेखा मुख्य असणाऱ्या काही मोजक्‍या मालिकांमध्ये ‘बोर्गन’चा समावेश होतो. या मालिकेतली ‘बिर्जेट’ ही व्यक्तिरेखा सक्षम आहे, खंबीर आहे आणि मुख्य म्हणजे सहसा टीव्ही मालिकांमध्ये पाहिलेल्या इतर स्त्री पात्रांसारखी कचकड्याची नाही. या संपूर्ण मालिकेत बिर्जेट आपल्याला नेता, पत्नी आणि आई अशा तीनही भूमिका लीलया बजावताना दिसतात. राजकारण आणि घरातील जबाबदारीमधील संतुलन साधण्याची कसरत बिर्जेट करत असतात.
मालिकेचे निर्माते ॲडम प्राईस यांनी याविषयी छान विश्‍लेषण केलं होतं. ‘बिर्जेट नायबोर्गमध्ये दिसणारी आदर्शवादाची थोडीशी झलक खरी आहे. ती पक्की व्यावसायिक राजकारणी झाली आहे; पण तरीही तिच्यात एक आदर्शवाद आहे आणि तो सर्वाधिक महत्त्वाचा आहे,’ असं प्राईस म्हणाले होते.

बिर्जेट या मालिकेतली प्रमुख व्यक्तिरेखा आहे; तरीही ‘बोर्गन’ ही मालिका फक्त तिच्या आयुष्याभोवती नक्कीच फिरत नाही. राजकारणातल्या घडामोडी फक्त एक व्यक्ती आणि तिच्या कुटुंबापुरत्या मर्यादित नसतात. या मालिकेत इतर राजकीय नेतेही आहेत.. बिर्जेट यांचे कर्मचारी आहेत, त्यांचे मीडिया प्लॅनर, धोरणात्मक निर्णय घेणारे सहकारी आहेत... आणि या सगळ्या घडामोडी टिपणारा मीडियाही आहे... ‘काम करवून घेणं’ आणि ‘मला नेमकं काय साध्य करायचं आहे,’ यांत सतत संघर्ष आहे. वास्तवात दिसणाऱ्या कोणत्याही माणसाइतकाच खरेपणा आणि स्वभावातला दोष या मालिकेतल्या प्रत्येक पात्रामध्येही आहे..

‘बोर्गन’ मालिकेचे तीन ‘सीझन’ झाले. तीसहून अधिक भाग प्रसारित झाले. आतापर्यंत इतर कुठल्याही मालिकेला राजकारणाचं असं स्वरूप पडद्यावर साकारता आलं नव्हतं. प्रत्यक्षातल्या राजकीय नेत्यांच्या जीवनातला तो खास अर्क सादर करण्यात ‘बोर्गन’च्या चमूला नक्कीच यश आलं. राजकारणाविषयीचं असं कथानक स्त्री व्यक्तिरेखेला प्रमुख भूमिकेत ठेऊन सादर करणं ही त्या काळाच्या पुढची गोष्ट होती. ही मालिका २०१० ते २०१३ या काळात प्रसारित झाली. या मालिकेचा प्रभाव जगभर पडला.. स्थानिक भाषेत डब करून किंवा सब-टायटल्स देऊन जवळपास ७० देशांमध्ये ‘बोर्गन’ प्रसारित करण्यात आली; भारतामध्ये नाही..!

‘रिॲलिटी शो’मधला खोटारडेपणा आणि काल्पनिक कथांमधल्या ‘गुडी गुडी’ वातावरणापेक्षा टीव्हीवरून सादर करण्यासारखं इतरही भरपूर काही आहे, हे डेन्मार्कमधील या छोट्याशा राजकीय ड्रामानं सिद्ध करून दाखवलं. दुर्दैवानं आपल्याला भारतामध्ये ही मालिका पाहायला मिळाली नाही. (आता नेटफ्लिक्‍सच्या कृपेनं मिळाली.) शिवाय अशा दर्जाचं राजकीय कथानक टीव्ही किंवा चित्रपटांतून सादर करणंही आपल्याला जमलेलं नाही. ‘स्टोरीटेलिंग’च्या ‘जादू’वर तुमचा विश्‍वास असेल, तर ‘बोर्गन’चा अनुभव एकदातरी घ्यायलाच हवा..!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT