nagzira forest
nagzira forest 
सप्तरंग

नागझिरा मनाच्या कोपऱ्यातलं जंगल

अनुज खरे informanuj@gmail.com

नागपूरपासून जवळच भंडारा जिल्ह्यात एक नितांतसुंदर जंगल आहे. ते म्हणजे नागझिरा वन्यजीव अभयारण्य. गेली अनेक वर्षं या जंगलानं अनेकांना भुरळ घातली आहे. वेडच लावलं आहे म्हणा ना. एकदा का तुम्ही नागझिऱ्याच्या सहवासात आलात की तुम्हाला निसर्गाचं वेड लागतं आणि मग फक्त निसर्ग निसर्ग आणि निसर्ग... निसर्गाशिवाय तुम्हाला काहीही दिसत नाही. प्रत्येकानं एकदा तरी भेट द्यावं असं हे जंगल. मात्र, नागझिऱ्याच्या जंगलाला केवळ एकदाच भेट देऊन भागणार नाही हेही, तुम्ही एकदा का या जंगलात गेलात की तुमच्या लक्षात येईल. या जंगलाची ओढ तुम्हाला स्वस्थ बसू देणार नाही. मध्य भारतातल्या विविध जंगलांपैकी असं हे एक जंगल असलं तरी इतर जंगलांपेक्षा किंचित् वेगळी भूरचना या जंगलाला आहे. सातपुड्याच्या रांगांमध्ये वसलेलं हे जंगल आपल्या अनोख्या सौंदर्यानं कायम साद घालतं आणि मग हे जंगल मनाच्या कोपऱ्यात कायमचं वसतीला येतं!

तूर्त ‘नागझिरा वन्यजीव अभयारण्या’बद्दल माहिती घेऊ या. उष्णकटिबंधीय शुष्क पानझडी प्रकारात मोडणारं हे जंगल सातपुडा पर्वताच्या उपरांगांमध्ये आहे. अभयारण्याच्या पिटेझरी प्रवेशद्वारापासून सुमारे १५ किलोमीटरवर पर्यटनसंकुल आहे. आजही जंगलाच्या आत या पर्यटनसंकुलात वास्तव्य करू शकतो. अशा प्रकारची मुभा असलेलं हे महाराष्ट्रातलं एकमेव ‘व्याघ्र राखीव क्षेत्र.’ भंडारा जिल्ह्यात असणाऱ्या या अभयारण्यात जैवविविधता ठासून आहेच; शिवाय या जंगलात भौगोलिक विविधताही तितकीच आढळते.

बिबट्यांची लक्षणीय संख्या हे नागझिऱ्याचं वैशिष्ट्य. स्वभावतः बुजरा असणारा हा हुशार आणि धूर्त शिकारी इथं मात्र हमखास दर्शन देतो. आलेवाही पाणघाट, अंधारबन यांसारख्या दाट जंगलांच्या जागा, हत्तीखोदरासारखे विरळ प्रदेश, सातमोडीसारखे घाटरस्ते, गौरीडोह, बंदरचुवा, सर्क्युलर रोड यांसारख्या पाण्याच्या जागा, चितळ मैदानासारखा गवताळ प्रदेश, नागदेव पहाडीसारखे डोंगराळ भाग आणि वाघाच्या अस्तित्वाच्या खुणा दर्शवणारे गौर गल्ली, टायगर ट्रेल यांसारखे भाग आणि निसर्ग पर्यटनसंकुलाच्या बाजूला पसरलेला नागझिरा तलाव या सर्वांनी नागझिऱ्याच्या सौंदर्यात भर टाकली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुढची पिढी सक्षम होण्यासाठी वयात आलेल्या वाघांनी हद्दीच्या शोधार्थ दुसऱ्या जंगलात जाणं गरजेचं असतं. एकाच कुटुंबातले आई आणि मुलगा अथवा बाबा आणि मुलगी यांचं मीलन झालं तर पुढची पिढी सक्षम होत नाही. अशा वयात आलेल्या वाघांना दुसऱ्या जंगलात जाण्यासाठी सुरक्षित जंगलांचे काही भाग असावे लागतात. त्यांना ‘कॉरिडॉर्स’ म्हणतात. नागझिऱ्याचं त्यादृष्टीनं महत्त्व आहे. 

महाराष्ट्रातले ‘ताडोबा’, ‘बोर’, ‘उमरेड-कऱ्हांडला’, ‘पेंच’, तसंच मध्य प्रदेशातली ‘कान्हा’, ‘पेंच’; आंध्र प्रदेशमधला ‘कावल’ हा व्याघ्रप्रकल्प आणि इतर वन्यजीव अभयारण्‍ये एकत्र जोडण्यात आणि या व्याघ्रप्रकल्पातून होणाऱ्या युवा वाघांच्या स्थलांतरात नागझिऱ्याची मोलाची भूमिका आहे.

वन्यजीव-अभ्यासक किरण पुरंदरे यांनी या जंगलात सलग ४०० दिवस वास्तव्य केलं आणि संपूर्ण ऋतुचक्राचा अभ्यास केला. ‘सखा नागझिरा’ हे नागझिऱ्याच्या त्यांच्या अनुभवांवरचं  पुस्तक प्रसिद्ध आहे. पुरंदरे शहराच्या गजबजाटाला कंटाळून नागझिऱ्याच्या प्रवेशद्वाराजवळ पिटेझरी गावात कायमस्वरूपी वास्तव्याला गेले. तिथल्या स्थानिक गोंड आदिवासींना रोजगार मिळावा यासाठी त्यांनी नवीन उपक्रम सुरू केले. नागझिऱ्यामध्ये या उपक्रमांना  भेट देता येऊ शकेल आणि हातभारही लावता येऊ शकेल. एखादी गोष्ट, एखादं वेडच असं असतं ज्याची वाट बघण्यात, त्याच्या मागं धावण्यात सगळं आयुष्य निघून जातं. त्या वेडाच्या मागं धावताना मग आपल्याला जाणीव होत राहते...हा ध्यास, हे वेड आपण पूर्ण करू शकलो नाही तरीही हा प्रवासच खूप सुंदर होता, ही ती जाणीव. हा प्रवास थकवा आणत नाही; किंबहुना त्या वेडामागं धावण्याची जास्तच ऊर्मी  देतो...माझ्या निसर्गवेडाची जाणीव मला नागझिऱ्यात आल्यावर पहिल्यांदा झाली. अनेक वर्षं इथे येतोय; पण ही जादू आजही टिकून आहे. 

कसे जाल? 
नागपूर : भंडारा-पिटेझरी-नागझिरा
भेट देण्यासाठी उत्तम काळ : ऑक्टोबर ते मे

काय पाहू शकाल? 
आवर्जून पाहा :
वटवाघळांच्या काही प्रजाती, झाडचिचुंद्री, तीनपट्टी खार, जरबेल उंदीर, मुंगूस, जवादी मांजर, उदमांजर, खवल्या मांजर, साळिंदर, रानकुत्रे, खोकड, चांदी-अस्वल, रानडुक्कर, अस्वल, गवा, रानमांजर, चितळ, दुर्मिळ पिसोरी हरीण, नीलगाय, चौशिंगा, बिबट्या, पट्टेरी वाघ, पखमांजर आदी.

पक्षी : सुमारे २५० प्रजातींचे पक्षी : तुरेबाज व्याध, शिक्रा, मोहोळ-घार, कापशी घार यांसारखे शिकारी पक्षी, मत्स्यघुबड, कंठेरी शिंगळा घुबड(इंडियन स्कॉप्स आउल), गव्हाणी घुबड, ठिपकेदार पिंगळा, नागझिऱ्याची खासियत असणारा मत्स्यगरुड, कोतवाल, कुरटुक, सूर्यपक्षी आदी.

सरपटणारे प्राणी : मगर, कासव, पाल, गेको, सरडा, घोरपड, सापसुरळी, वाळा, डुरक्या घोणस, अजगर, दुतोंड्या, तस्कर, धामण, धूळनागीण, कवड्या, कुकरी, गवत्या, पाणदिवड, नानेटी, हरणटोळ, मांजऱ्या, चापडा, नाग, फुरसे, मण्यार, घोणस आदी.

(शब्दांकन : ओंकार बापट)   
(सदराचे लेखक वनपर्यटक आणि ‘महाराष्ट्र राज्य वन्यजीव सल्लागार मंडळा’चे सदस्य आहेत.)

Edited By - Prashant Patil

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs SRH: कोण गाठणार फायनल? कोलकता-हैदराबादमध्ये रंगणार ‘क्वॉलिफायर वन’चा थरार

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

SCROLL FOR NEXT