Kidnapping
Kidnapping 
सप्तरंग

SUNDAY स्पेशल : अपहरणाच्या गुंत्याला : युवक सहभागाची काजळी

मंगेश कोळपकर

देशात अपहरण आणि डांबून ठेवणे अशा गुन्ह्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे ‘नॅशनल क्राइम रेकॉर्ड्‌स ब्युरो’च्या  (एनसीआरबी) अहवालातल्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. खंडणी, ईझी मनीसाठी शॉर्टकट, मालमत्तेचे वाद, नात्यांमधील गुंतागुंत, हेवेदावे अशी अनेक कारणे त्यामागे असली, तरी सोशल मीडियाचा वाढता प्रभावही अशा घटनांमागे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अपहरणाच्या गुन्ह्यांना शहरी-ग्रामीण अशी हद्द राहिलेली नाही, तर किशोरवयीन केंद्रबिंदू होत आहेत अन्‌ हाच चिंतेचा विषय आहे.

‘अपहरण’ हा अजय देवगणचा चित्रपट आठवतोय... रूढ व्यवस्थेमध्ये न्याय मिळत नाही म्हणून गुन्हेगारी कृत्यांकडे खेचला गेलेला किशोरवयीन नंतर माफिया होतो अन्‌ जितक्‍या वेगाने तो उत्कर्ष बिंदू गाठतो, तितक्‍याच वेगाने लयालादेखील जातो! हा चित्रपट आठवण्याचे कारण म्हणजे देशातील गुन्हेगारीविषयक आकडेवारी ‘नॅशनल क्राइम रेकॉर्डस ब्युरो’ने (एनसीआरबी) नुकतीच प्रसिद्ध केली. त्यात अपहरण, डांबून ठेवणे या कलमाखाली नोंदल्या गेलेल्या गुन्ह्यांची संख्या देशातील सर्वच राज्यांत वाढते आहेच; पण त्यातील आश्‍चर्याची बाब म्हणजे अपहरणाच्या गुन्ह्यात १६ ते १८ वयोगटातील युवक-युवतींची ‘व्हिक्‍टिम’ म्हणून वाढलेली संख्या चिंताजनक आहे. त्यापाठोपाठ १२ ते १६ हा वयोगट येतो. 

खंडणी, मालमत्तेच्या वादातून आणि वैयक्तिक वैमनस्यातून होणारे अपहरण हे गंभीर गुन्हे आहेतच. परंतु, नातेसंबंधातून घडणाऱ्या घटनाही अनेकदा ‘अपहरण’ या गुन्ह्याखाली नोंदल्या जातात. नातेसंबंधातून नोंदला जाणारा गुन्हा तडजोड झाल्यावर मागे घेतला जातोच, असे नाही. त्यामुळे काही वेळा ही आकडेवारी फुगलेली दिसते.

अपहरणाचे गुन्हे घडण्याचे सर्वात मोठे कारण हे लग्न (२६ टक्के) असल्याचे ‘एनसीआरबी’च्या अहवालातून स्पष्ट झालेले आहे. पण, त्याचबरोबर देशात दिल्ली, मुंबई, बंगळुरू, चेन्नई, कोलकता, हैदराबाद, पुणे, लखनौ, गाझियाबाद, पाटणा यांसारख्या शहरांत खंडणी अन्‌ मालमत्तेचा वाददेखील अपहरणाच्या यादीतील कारणांमध्ये अग्रभागी आहे. 

अपहरण किंवा डांबून ठेवणे या कलमांखाली दाखल होणारा गुन्हा हा गंभीरच समजला जातो. अनेकदा त्यातून अपहृत व्यक्तीचा जीव गेल्याचीही उदाहरणे आहेत. खंडणीची रक्कम मिळाल्यावरसुद्धा पुरावा मागे राहायला नको, म्हणून खून केल्याच्या घटना मुंबई-पुण्यातही घडल्या आहेत. तर, काही वेळा पोलिसांच्या भीतीपोटी अपहरण केलेल्या व्यक्तींचे खून झाले आहेत. पण, यामध्ये सर्वाधिक गुंतलेला दिसतो तो किशोरवयीन घटकच! अगदी १२ ते १८ हा वयोगट असा आहे, की त्यातील युवक-युवतींसाठी पालक अतिसंवेदनशील असतात. खंडणी, बदला यांच्यासाठीही हाच वयोगट गुन्हेगार निवडत असतात. तर, अनेकदा महाविद्यालयात सूत जुळल्यानंतर पळून जाणाऱ्या युवक-युवतींचा वयोगटही १६ ते १८ हाच असतो. अल्पवयीन मुलगी सहमतीने निघून गेली, तरी कायद्याच्या भाषेत अपहरणाचा गुन्हा दाखल होतो. तपासानंतर दाखल झालेला गुन्हा रद्दबातल ठरविण्याची प्रक्रिया फारशी होताना दिसत नाही. त्यामुळे नोंदीची संख्या वाढते अन्‌ आकडेवारीही फुगते! 

सोशल मीडियाचा दुष्परिणाम
शहरीकरणाची प्रक्रिया अन्‌ सोशल मीडिया यांचा परिणाम हा गुन्ह्यांच्या प्रकारावर सातत्याने होत असतो. मोबाईल-इंटरनेट यांच्या उपलब्धतेमुळे ग्रामीण-शहरी असा भेद ‘व्हर्च्युअल वर्ल्ड’मध्ये अजिबात राहिलेला नाही. वेबसीरिजच्या माध्यमातून कल्पनांच्या भराऱ्या प्रेक्षकांना वास्तविकतेपासून दूर नेत आहेत. त्यातूनच चित्ताकर्षक, मुक्त जीवनशैलीचा प्रचार आणि प्रसार होत आहे. त्याचाही परिणाम गुन्ह्यांच्या वाढण्यावर होतो आहे. भारत अन्‌ इंडियातील फरक रुंदावू लागला आहे. त्यामुळेच देशातील बहुतेक सर्व राज्यांत अपहरण, डांबून ठेवण्याच्या गुन्ह्यांची संख्या वाढते आहे. एकेकाळी गॅंगस्टर्सचीच खंडणी, अपहरणाच्या गुन्ह्यांत नोंद होत होती. पण, आता तशी परिस्थिती राहिलेली नाही.

जागांना सोन्याचे भाव
वीस लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांबरोबरच ग्रामीण भागातसुद्धा हा ट्रेंड दिसू लागला आहे. ए आणि बी ग्रेडच्या शहरांमध्ये जागांना आता सोन्याचे भाव आले आहेत. लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे जागा कमी पडू लागल्या आहेत. परिणामी जागांवरील ताबे हा परवलीचे शब्द झाले आहेत. तर दुसरीकडे आर्थिक व्यवहारांत शब्द पाळला गेला नाही तर, ‘उचलून’ नेण्याच्या घटनांचे प्रमाण वाढत आहे. त्याचे कारण म्हणजे सोशल मीडिया. हा मीडिया वेगवान झाल्यामुळे वास्तविक जगाचाही वेग तेवढाच असावा, असे वाटू लागते अन्‌ त्यात गल्लत होते आहे. त्यातून भावनांचा उद्रेक होतो अन्‌ गुन्ह्यांना आमंत्रण मिळते...

...तर गुन्हे कमी होतील
मीरा बोरवणकर (माजी पोलिस महासंचालक) - लग्न, लैंगिक शोषण, अनैतिक व्यवसाय इत्यादींसाठी महिलांचे अपहरण करण्याचा ट्रेंड चिंताजनक आहे. परंतु, त्या बाबत जागरूकता होत असल्यामुळे पोलिसांकडे त्या संदर्भातले गुन्हे आता दाखल होऊ लागले आहेत. एकूण गुन्ह्यांच्या तुलनेत खंडणीसाठी खून आणि अपहरण यांसारख्या गुन्ह्यांची संख्या वाढलेली नाही, हे सुचिन्ह म्हणावे लागेल. योग्य प्रकारे तपास आणि गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाण वाढले, तर खून-अपहरणासारखे गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांचे प्रमाण नक्कीच कमी होईल. 

युवकवर्गाचा सहभाग चिंताजनक
किशोर जाधव (निवृत्त पोलिस विशेष महानिरीक्षक) - दिवसेंदिवस सोशल मीडियाचा प्रभाव वाढत आहे. त्याचा परिणाम गुन्ह्यांवर आणि कार्यपद्धतीवर होत आहे. खंडणी, खून, अपहरण या गुन्ह्यांबरोबरच नातेसंबंधांतील किंवा मालमत्तेच्या वादातूनही अपहरणाचे गुन्हे घडत आहेत. त्यात अपहृत किंवा आरोपी असलेला युवक वयोगट हा काळजीचा मुद्दा आहे. शहरांप्रमाणेच गुन्ह्यांचे प्रमाणही विस्तारत असल्याचे मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई, नाशिक, अमरावती, औरंगाबादमधील गुन्ह्यांमधून दिसून येत आहे. 

बेरोजगारी, ईझीमनीचा हव्यास घातक
सुनील पवार (सहायक पोलिस आयुक्त, पुणे) - रोजगाराच्या अपुऱ्या संधी, मुक्त आणि ऐषाआरामाच्या जीवनशैलीचे आकर्षण, ईझीमनीचा हव्यास यासारख्या कारणांमुळे अपहरणासारख्या गंभीर गुन्ह्यांची संख्या वाढत आहे. मात्र, तांत्रिक स्वरूपाचे गुन्हेही पोलिसांना दाखल करावे लागत असतात. त्यामुळे कागदोपत्री संख्या जास्त दिसते. परंतु, एकंदरीतच वाढत असलेले गुन्ह्यांचे प्रमाण हे बदलत्या जीवनशैलीचा परिणाम आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : ऋतुराजने पुन्हा नाणेफेक गमावली; पंजाबने घेतला गोलंदाजीचा निर्णय

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

South India Travel : उन्हाळ्यातही करू शकता दक्षिण भारताची सफर; जाणून घ्या 'ही' थंड हवेची ठिकाणं

SCROLL FOR NEXT