सप्तरंग

ऑन एअर : मतांच्या ‘सिस्टिम’मधला ‘एरर’

आर. जे. संग्राम, ९५ बिग एफ. एम.

या सदरात मागच्या आठवड्यात मी ‘किळस’ या आपल्या गुणधर्माबद्दल, नॉन-व्हेज खाद्यसंस्कृतीसंदर्भातील विरोधाभास मांडायचा प्रयत्न केला. एखाद्या खाद्यपदार्थाबद्दल एवढी किळस आपल्याला का येते? आपली प्रतिक्रिया केवळ मानसिक नसून शारीरिक असते. नाक मुरडलं  जातं. कपाळाच्या  आठ्या  मेंदूच्या बाहेरील भागासारख्या होतात. डोळे आपोआप मिटायला लागतात. ओठानं  आपण सेल्फीवाला पाउट  (पण थोडा घट्ट)  केल्यासारखं करतो. आपली  मान फिरते,  एक पाय मागे सरकतो.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

उत्क्रांतीनं ही प्रतिक्रिया आपल्यामध्ये तयार केली ती रोगदायक आणि विषारी खाद्यांपासून आपल्याला लांब ठेवण्यासाठी. विशिष्ट चव, वास, रंगसंगती, पोत वगैरे असलेले  पदार्थ आपल्यासाठी वाईट असावेत आणि ते  न खाल्लेले बरे, यासाठीची  ही ऑटोमॅटिक सिस्टिम. मात्र, उत्क्रांतीद्वारे बनलेल्या या अनेक ऑटोमॅटिक सिस्टिम आधुनिक जगात वावरताना मात्र ‘एरर’ देताना दिसतात. खाण्याबरोबरच खाणाऱ्या व्यक्तीबद्दल किळस वाटणे हा आपल्या आधुनिक संस्कृतीमधला मोठा दोष आहे. हजारो वर्षं आपण छोट्या समूहांत राहायचो. अनोळखी व्यक्ती दिसली, की धोका वाटणं, ‘लढावं किंवा पळावं’ची प्रतिक्रिया ही आपल्या (आणि आपल्या कुटुंबाच्या, टोळीच्या) हिताची होती. पण, आज मात्र ती आपल्या समाजाला, राज्याला, देशाला आणि मानवतेला घातक ठरत आहे.

किळस हा खूप गमतिशीर विषय आहे. नैतिकता (morality) आणि किळस यांचा खूप जवळचा संबंध आहे. आपल्याला वाटतं, की आपली नैतिकता आपण ठरवतो. म्हणजे, आपले संस्कार (आई-वडील, समाज यांनी दिलेले, त्या प्रकारे आपल्याला घडवलं गेलंय वगेरे), आपला अनुभव, अभ्यास आणि त्यावर आधारित आपले विचार, यावर आपली नैतिकता ठरते. तिचा वेळोवेळी कसा वापर करायचा, हे आपण आपला  बुद्धिप्रामाण्यवाद वापरून ठरवतो ना?
जॉनथन हाईड, डेविड  पिझारोसारख्या  शास्त्रज्ञांनी या शतकाच्या सुरुवातीला एक प्रयोग केला; ज्याचा सुगंध आजही दरवळत आहे. त्यांनी अनेक लोकांना नैतिकतेबद्दल प्रश्न विचारले. मानवी नैतिकता ही खाणं आणि सेक्सच्या पावित्र्याभोवती रेंगाळत असते. याच्याशी निगडित एखादं कृत्य हे नैतिक आहे का अनैतिक आहे, या प्रश्नाचं उत्तर आपण वर नमूद केलेल्या प्रक्रियेप्रमाणं आलं पाहिजे. म्हणजे बरोबर आणि चूक, याबद्दलची आपली धारणा आणि त्यावर सद्सद्विवेकबुद्धी वापरून आपण उत्तर दिलं पाहिजे.

पण, हा सगळा बुद्धिप्रामाण्यवाद गळून पडायला- आणि तोही उत्तर देणाऱ्यांच्या नकळत, फार कष्ट लागत नाहीत. शास्त्रज्ञांनी गुपचूप प्रश्न विचारताना त्या खोलीमध्ये एक घाणेरडा वास सोडला. या वासामुळे त्या लोकांची नैतिकता बदलली, त्यांची भूमिका अधिक टोकाची झाली. तीच कृती त्यांना अधिक अनैतिक वाटू लागली.

हा प्रयोग अनेक शास्त्रज्ञांनी जगभर पुनःपुन्हा केला आणि तोच परिणाम मिळाला! हे असं का होतं? एखादा घाणेरडा वास आला, की तो आपल्याला क्षणभर तीव्रतेनं जाणवतो. पण, मग आपण ते विसरून जातो. मात्र, यातून आपल्या मनात जो खेळ निर्माण झालेला असतो तो तसाच राहतो. समोर असलेला नैतिकतेचा प्रश्न म्हणजे ते कृत्य आणि आपल्याला वाटत असलेली किळस, यांचा एकमेकांशी काहीही संबंध नसताना आपल्याला ते कृत्य अधिक किळसवाणं वाटायला लागतं. आपला ‘बुद्धिप्रामाण्यवाद’ किती पोकळ आहे, किती फसवा असू शकतो, याचं हे एक उदाहरण आहे! 

याचाच फायदा घेऊन राजकीय आणि धार्मिक पुढारी आपल्यात ‘त्यांच्या’बद्दल किळस निर्माण करतात आणि ‘त्यांच्या’ नैतिकतेबद्दल प्रश्न उभे करतात. म्हणूनच माझ्या धर्माचा, जातीचा, माझ्या पंथाचा, माझ्या प्रांताचा, माझी भाषा बोलणारा, माझ्यासारखाच दिसणारा, खाणारा, राहणारा- माझा वाटतो. आणि इतरांप्रती किळस, द्वेष, तिरस्कार, राग, या भावना एका व्हॉट्सॲप मेसेजमुळे सहज वाढतात... यावर उपाय? अनेक आहेत. पण, तूर्तास आपल्यापेक्षा खूप वेगळ्या वाटणाऱ्या लोकांकडे जेवायला जाऊया!

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup, IND vs PAK: भारताने शेवटच्या क्षणी पाकिस्तानशी खेळण्यास नकार दिला तर काय होईल? सुपर-४ मध्ये प्रवेश मिळेल का?

PM-Kisan Samman Nidhi : 'या' शेतकऱ्यांना मिळणार नाही किसान सन्मान निधीचा २१ वा हप्ता, नवी अपडेट समोर; तुमचं नाव तर नाही ना? असं करा चेक

Pune Crime:'विनापरवाना पिस्तूलाची स्टंटबाजी दोघा मित्रांना भोवली'; तळेगाव एमआयडीसीतील घटना, एक गंभीर जखमी तर दुसरा पोलीस कोठडीत

Pro Kabaddi 12: पुणेरी पलटनचा तेलुगू टायटन्सवर ३९-३३ ने दमदार विजय! गुणतालिकेत गाठलं अव्वल स्थान

Jejuri Theft News: अख्खं गाव चोराच्या पाठीमागे, अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकलेच | Sakal News

SCROLL FOR NEXT