Sachin Tendulkar with aamir
Sachin Tendulkar with aamir sakal
सप्तरंग

क्रिकेटची हवा जोरात

सुनंदन लेले saptrang@esakal.com

गल्लीपासून दिल्लीपर्यंत असे जर शब्द वापरले तर तुम्ही नक्कीच म्हणाल की मी राजकारणाबद्दल किंवा निवडणुकांबद्दल बोलत आहे. नाही हो... माझा तो प्रांत नाही. मी आपला क्रीडा जगात रंगलेला माणूस आहे. त्यातून माझं क्रिकेटप्रेम तुम्हाला माहीत आहे. आजचा विषयही क्रिकेटचाच आहे आणि त्याची व्याप्ती खरंच गल्लीपासून दिल्लीपर्यंतची आहे.

थोडक्यात सांगायचं तर मुंबईत नुकताच रणजी स्पर्धेचा अंतिम सामना झाला तसंच ठाण्यात खऱ्याखुऱ्या गल्ली क्रिकेट शौकिनांचा महोत्सव झाला. ज्याला ‘आयएसपीएल’ (द इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग) म्हटलं गेलं होतं. रविवारी दिल्लीत ‘बीसीसीआय’नं भरवलेल्या वुमेन्स प्रीमिअर लीगचा अंतिम सामना पार पडला आणि शुक्रवारपासून ‘इंडियन प्रीमिअर लीग’ म्हणजेच आयपीएलला सुरुवात झाली आहे. म्हणून मी गल्लीपासून दिल्लीपर्यंत क्रिकेटची हवा जोरात पसरली असल्याचं म्हणत आहे.

टेनिस बॉल क्रिकेटचा मंच

बारावीच्या परीक्षा झालेल्या असल्यानं काही प्रमाणात सुट्टी सुरू झाली आहे. याच काळात जर तुम्ही महाराष्ट्राच्या आतल्या भागात कुठंही फिरायला बाहेर पडलात, तर तुम्हाला मोटर सायकल वरून क्रिकेटचे रंगीत कपडे घालून हातात बॅट मिरवणारी पोरे दिसतील. मार्चपासून मे महिन्याच्या अंतापर्यंत प्रचंड मोठ्या प्रमाणात गावोगावी टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धा भरवल्या जातात.

अगोदर याचं आयोजन किंवा व्याप्ती जरा आटोपशीर असायची. जमाना खरंच बदलला आहे. परळीला झालेल्या स्पर्धेचा बक्षीस समारंभ झहीर खान आणि युवराज सिंगच्या हस्ते झाला. या उदाहरणावरून टेनिस बॉल क्रिकेटची लोकप्रियता जरा ध्यानात येऊ शकते.

टेनिस बॉल क्रिकेट प्रचंड प्रमाणात खेळले जाते मान्य केलं, तरी त्यातील खऱ्या तरबेज खेळाडूंना मिळणारी मान्यता प्रसिद्धी त्या त्या जागांपुरती मर्यादित होती. यंदाच्या वर्षी आयएसपीएल स्पर्धा भरवली गेली ती मुंबई क्रिकेट संघटनेचे आशिष शेलार आणि अमोल काळेंसारखे दिग्गज पदाधिकार्‍यांनी एकत्र येऊन. त्यात अमिताभ बच्चनसह नामांकित व्यक्ती पाठीशी उभ्या राहिल्या. आणि भारतरत्न सचिन तेंडुलकरनं जातीनं लक्ष घातलं. परिणामी टेनिस बॉल मनापासून खेळणाऱ्या दर्जेदार खेळाडूंना अतिशय मोठं व्यासपीठ मिळालं.

कृष्णा सातपुतेसारखा महाराष्ट्रातील मानलेला टेनिस बॉल खेळाडू असो किंवा श्रीनगरचा आमीर असो, सगळ्यांना आयएसपीएल स्पर्धेनं मोठं स्थान मिळवून दिलं. ग्लॅमर बरोबर दर्जेदार क्रिकेटच्या संयोगानं स्पर्धा बघायला प्रेक्षकांनीही तोबा गर्दी केली होती.

सचिननं स्पर्धेच्या ठिकाणी हजेरी लावून पहिला चेंडू दिव्यांग खेळाडू आमीरला टाकायला लावून जो विचार सगळ्यांच्यात रुजवला त्यानं स्पर्धेचं रूप बदललं. सचिननं समोर आलेल्या अनेक खेळाडूंना क्रिकेटसंदर्भात मार्गदर्शनही केलं. ‘मी विशेष काहीच केलं नाही रे... माझं क्रिकेटही टेनिस बॉल खेळूनच झालं आहे. त्यातून अनेक दर्जेदार टेनिस बॉल क्रिकेटर्सना भेटायची संधी मिळाली...

स्पर्धेच्या निमित्तानं मेहनती खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म तयार करून खेळण्याची संधी देता आली याचं मोठं समाधान लाभलं. आमीरसारखा खेळाडू आपल्या सगळ्यांसाठी प्रेरणेचा स्रोत आहे... दोन्ही हात गमावूनही त्याचं क्रिकेटचं प्रेम, त्याची जिद्द कणभर कमी झालेली नाही.’ भारावून गेलेला सचिन तेंडुलकर ‘आयएसपीएल’ बद्दल बोलताना म्हणाला.

विक्रमी रणजी जेतेपद

अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबई संघानं संपूर्ण मोसमात कमालीचा सातत्यपूर्ण खेळ करून रणजी विजेतेपदाला गवसणी घातली. मुंबई संघाची ताकद फलंदाजीत लपलेली असते हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. यंदाच्या मोसमात मुंबई संघाला विजेतेपदाचा मार्ग दाखवताना गोलंदाजांची भूमिका तितकीच मोलाची ठरली आहे.

रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल, सर्फराज खान आणि दुबेसारखे अंतिम अकरा जणांच्या संघात नक्की बसणारे खेळाडू खेळत नसून मुंबईनं विजेतेपद पटकावलं, ज्यातून मुंबई क्रिकेटची क्षमता लक्षात येते. शम्स मुलानी, मोहीत अवस्थी, तनुष कोटीयन आणि मुशीर खानच्या खेळानं मुंबई संघाला विजेतेपदाचा मार्ग सुकर झाला. उपांत्य आणि अंतिम सामन्यात शार्दूल ठाकूरनं निर्णायक क्षणी केलेला अष्टपैलू खेळ योग्य परिणाम साधून गेला.

आयपीएल स्पर्धेत वेळोवेळी चांगली चमक दाखवूनही अंतिम यश बेंगलोर रॉयल चॅलेंजर्स संघाला हुलकावणी देत होते. जी गोष्ट प्रयत्न करूनही विराट कोहलीला जमली नाही ती स्मृती मानधनानं करून दाखवली. दुसऱ्याच वर्षात बेंगलोर संघानं वुमेन्स प्रीमियर लीगचं जेतेपद पटकावलं. उपांत्य सामन्यात मुंबई इंडियन्स संघाच्या हातात विजय होता. फिरकी गोलंदाजांनी योग्यवेळी कमाल कामगिरी केल्याने बेंगलोर संघाला निसटता विजय मिळवून अंतिम सामन्यात धडक मारता आली.

अंतिम सामन्यात बिनबाद ६४ धावांवरून दिल्लीचा संघ कोलमडला. ११३ धावांवर सगळे खेळाडू बाद करण्यात यश आल्यावर हाती आलेली नामी संधी बेंगलोर संघानं साधली आणि विजेतेपदाला गवसणी घातली. उपांत्य आणि अंतिम सामन्यात श्रेयांका पाटीलनं केलेली भेदक फिरकी गोलंदाजी संघाला तारून नेणारी ठरली.

विजयानंतर मुलींनी बेभान होत नाचून आनंद साजरा केला ज्यात विराट कोहली फोनवरून नाचत सहभागी झाला. वुमेन्स प्रीमिअर लीग सामन्यांना प्रेक्षकांचा मिळालेला जबरदस्त प्रतिसाद समाधान देणारा होता. महिलांच्या क्रिकेटला जनमानसात स्थान मिळाल्याची ती निशाणी आहे, असं वाटत आहे.

आयपीएल स्पर्धेला आता सुरुवात झाली आहे. चेन्नई संघाचं नेतृत्व ऋतुराज गायकवाडकडं सोपवण्यात आलंय. वयाची चाळिशी पार केलेला महेंद्रसिंह धोनी फक्त खेळाडू म्हणून चेन्नई सुपर किंग्स कडून खेळणार आहे. गेल्या आयपीएल स्पर्धेत पहिल्याच सामन्यात गुढग्याला दुखापत होऊन धोनी तसाच संपूर्ण स्पर्धा खेळला. अंतिम सामन्यात सामना गुजरात संघाकडे झुकलेला असताना धोनीला फलंदाजी करताना अपयश आलं होतं.

शेवटचे दोन चेंडू धोनी डोळे मिटून हात जोडून देवाची प्रार्थना करताना दिसला होता. रवींद्र जडेजाने प्रचंड दडपणाखाली शांत डोक्याने फलंदाजी करता संघाला अशक्यप्राय वाटणारा विजय साकारून दिला होता. त्यानंतर धोनीनं गुढग्यावर शस्त्रक्रिया करून घेतली. गेल्या सात महिन्यांत धोनी दुखापतीतून सावरला असला, तरी त्यानं क्रिकेट खेळलेलं नाही. दोन आठवडे सराव करून आयपीएल सारखी स्पर्धा खेळण्याचे धाडस तो करतो आहे.

म्हणजेच तो काही प्रमाणात क्रिकेटला गृहीत धरण्याची चूक तर करत नाहीये ना, अशी शंका मनात डोकावत आहे. क्रिकेट देवाने धोनीची प्रार्थना ऐकून चेन्नई सुपर किंग्ज् संघाला २०२३ मध्ये जेतेपद दिलं होतं. २०२४ मध्ये धोनीला काय कामगिरी करता येते आणि दैवाची साथ त्याला कशी लाभेल याची उत्सुकता मला पत्रकार म्हणून आहे. दिवसामागे चढत जाणाऱ्या गरम हवेच्या काळात ‘आयपीएल ’ स्पर्धेनं क्रिकेटचं वातावरण अजून गरम होणार आहे हे नक्की.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shantigiri Maharaj Nashik Lok Sabha: शांतिगिरी महाराजांच्या अडचणी वाढणार? EVM मशीनला घातला हार 

Manipur Violence: मणिपूरमध्ये थरार! 2 तासांच्या चकमकीनंतर कुकी दहशतवाद्यांपासून 75 महिलांची सुटका

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: आशिष शेलारांनी बजावला मतदानाचा हक्क, म्हणाले महायुती मुंबईतील सर्व सहा जागा जिंकेल...

Loksabha Election : राज्यात आज अखेरचा टप्पा;मुंबई, नाशिकसह देशभरातील ४९ मतदारसंघांत मतदान

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 20 मे 2024

SCROLL FOR NEXT