life partner
life partner sakal
सप्तरंग

ये गलियाँ, ये चौबारा...

डॉ. कैलास कमोद kailaskamod1@gmail.com

ये गलियाँ, ये चौबारा

यहाँ आना ना दो बारा

अब हम तो भये परदेसी

के तेरा यहाँ कोई नही

कन्येची विवाहनिश्चिती होणं हा खरं तर माता-पित्याच्या स्वप्नपूर्तीचा क्षण. यौवनात पदार्पण केलेल्या कन्येसाठी अनुरूप असं स्थळ शोधून बोलणी पक्की झाली की त्यांच्या चेहऱ्यावर समाधान झळकू लागतं. कन्यासुद्धा आनंदित होऊन भविष्यातल्या जोडीदाराबरोबरची स्वप्नं रंगवू लागते. तो उल्हास काही आगळावेगळाच असतो. त्याच वेळी या आनंदाला दुःखाची, वेदनेची एक हलकीशी किनारही असते.

मुलीच्या मनात विचार सुरू होतात : माता-पित्याच्या मायेची पाखर आता असणार नाही...भावा-बहिणींची ताटातूट होणार...ज्या मोकळेपणानं आजवर मी वावरले त्यावर आता मर्यादा येणार...ज्या घराचा कोपरा न् कोपरा मला परिचित आहे त्या घराला मी पारखी होणार...बालपणापासून ज्यांनी मायेनं वाढवलं ते नोकर-चाकरही दुरावणार...एवढंच नव्हे तर; कुत्रं, मांजर यांसारखे घरातले पाळीव प्राणीसुद्धा आता इथून पुढं माझ्याशी खेळायला-बागडायला नसणार... अशा स्वरूपाचं ते दुःख असतं...वेदना असते.

हर्षोल्हास आणि हे दु:ख अशी अनामिक हुरहूर मुलीच्या मनात असते. ही हुरहूर या गीतातली नायिका काहीशा आनंदानं, तर काहीशी दु:खित होऊन व्यक्त करत आहे...

रमा मोठ्या घरातली लाडाची लेक. आता वयात आली आहे. बालपणापासूनचा तिचा मित्र देव शिक्षणानिमित्त बाहेरगावी होता. तोही आता तरुण होऊन परतलाय. गरीब घरातला देव सुशिक्षित तर आहेच; पण तितकाच सुसंस्कृत आणि समजूतदारही आहे. ‘मोठ्या घरातली लेक आणि आपली मैत्री ही मैत्रीच्या पातळीवरच राहू शकते...त्यापुढं ती जाऊ शकत नाही,’ याची पक्की जाणीव त्याला आहे.

निखळ मैत्रीतून तो कधीमधी तिला घरी जाऊन भेटतोसुद्धा. रमाचा निरागस अल्लडपणा आजही कमी झालेला नाही. तिचा विवाह निश्चित झाला आहे. घरात लग्नाची तयारी चालली आहे. सख्या, शेजारणी जमल्या आहेत. सगळ्या स्त्रियांची कामाची लगबग सुरू आहे. देवही कामात हातभार लावतो आहे.

अशा वातावरणात हर्षोल्हासित रमा हसत-नाचत गाऊ लागते :

‘ये गलियाँ, ये चौबारा...’

ले जा रंगबिरंगी यादें

हॅंसने-रोने की बुनियादे

अब हम तो...

‘इथून पुढं माझ्या घराकडं पुन्हा फिरकू नकोस. मी आता परकी झाली आहे. इथं आता तुझं म्हणावं असं कुणीही नाही,’ असं ती देवला हसत-खेळत सांगत आहे. हे सारं सांगण्याचा तिचा हेतू मुख्यत: देवला उद्देशून जरी असला तरी त्यानिमित्तानं ती आपल्या मैत्रिणी, आपली आई, आपल्या घरातल्या इतरेजनांनाही हेच सांगत आहे.

सुरुवात मात्र ती देवचा हात धरून त्याच्यापासूनच करते. नंतर ती आपल्या हातातल्या हिरव्या बांगड्यांचं वर्णन करत करत मैत्रिणींनाही सल्ला देते - ‘मी जाणार म्हणून तुमचे डोळे भरून आले आहेत हे ठीक आहे; पण उद्या तुम्हीही परक्या घरी जाणार आहात...’

देख मिलती है तेरी-मेरी चूडियाँ

तेरे जैसी सहेली मेरी चूडियाँ

तू ने पीसी वो मेहंदी रंग लाई

मेरी गोरी हथेली रचाई

तेरी आँख क्यूँ लाडो भर आई

तेरे घर भी बजेगी शहनाई

सावन में बादल से कहना

परदेस में है मेरी बहना

अब हम तो...

मैत्रिणींशी असं हितगुज सुरू असताना रमाला आपली आई दृष्टीस पडते आणि ती भावनावश होऊन रडवेल्या स्वरात आईशी बोलू लागते : ‘आई, मला एकदा कुशीत घे. तुझ्या अंगणात माझं बालपण त्यजून मी आता निघाले आहे. उद्या सकाळचा सूर्य उगवेल...पक्ष्यांचं कूजन सुरू होईल...सारं सारं काही जसंच्या तसं असेल; पण मी मात्र तुझ्या नजरेस पडणार नाही.’

आ माये आ मिल ले गले

चले, हम ससुराल चले

तेरे आँगन में अपना

बस बचपन छोड चले

अब हम तो...

आईकडून ती परत देवकडं वळते : ‘सनईचे सूर येऊ लागतील... बॅंडबाजा वाजू लागेल, तेव्हा तुला कळून चुकेल की फुलांनी सजलेली माझी डोली आता उचलली जात आहेत...मौजमजा करत घालवलेली बालमैत्री मात्र तू विसरू नकोस...’

देख तू ना हमे भुलाना

माना दूर हमे है जाना

थोडे दिन के ये नाते थे

कभी हॅंसते थे, गाते थे

अब हम तो...

मैत्रिणी, माता आणि मित्र यांच्याशी एखादी सौभाग्यकांक्षिणी ज्या भावनेनं बोलेल तीच भावना चित्रपटातल्या प्रसंगाशी अतिशय सुसंगत करून गीतकार संतोष आनंद यांनी या गीतातून व्यक्त केली आहे. संगीतकार लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी गाण्याचा उत्सवी मूड छान पकडला आहे; विशेषत: इंट्रोला ढोलक, तसंच बासरीची धून मजा आणते. इंटरल्यूडला सनई आणि घुंगरं एकाच वेळी उत्सव आणि विरह या दोहोंचा मिलाफ घडवतात!

‘मेरे हाथों मे भरी भरी चूडियाँ...मुझे भा गई हरी हरी चूडियाँ’ या कडव्यात त्यांनी कांकणांची खणखणसुद्धा ऐकवली आहे. कमाल केली आहे लता मंगेशकर यांनी. सुरुवातीला देवला खिजवायला केलेले शब्दांचे उच्चार, नंतर मैत्रिणींना समजावतानाचे उच्चार, त्यानंतर आईला पाहताच भावनावश होत केलेले शब्दोच्चार आणि शेवटी पुन्हा देवकडं येत केलेले काळजीयुक्त उच्चार या सगळ्यांमधला सूक्ष्म फरक त्यांनी लीलया साधला आहे. त्यामुळे गाणं उत्सवी असूनही त्यातली भावविभोरता जाणवल्यावाचून राहत नाही. हॅट्स ऑफ टू लतादीदी.

अल्लड बालिकेची यौवनेत रूपांतरित झालेली रमा अर्थातच पद्मिनी कोल्हापुरे चांगली शोभलीय या भूमिकेत. तिचं वयसुद्धा गाण्याला पूरक असंच आहे. नृत्याचं अंग तिला फार काही नसेल कदाचित; पण तरीही तिचा परफॉर्मन्स चांगला आहे. चेहऱ्यावरचं हास्य तिनं संपूर्ण गाण्यात टिकवून ठेवलं आहे. तिची आई झालेली अभिनेत्री नंदा क्षणभर सुखद दर्शन देते.

‘तेरे आँगन में अपना बचपन छोड चले’ असं रमा गाते तेव्हा क्षणभरासाठी उमटणारे विरहाचे भाव आणि रमा शेवटी पुन्हा देवला खिजवते तेव्हा, त्यांची मैत्री ही मैत्रीच्या पातळीवरच आहे ना, अशी पुसटशी शंका...असे दोन्ही भाव नंदानं काही क्षणांत चेहऱ्यावर दाखवले आहेत.

आलिशान हवेलीतला प्रशस्त दिवाणखाना, घरातली बुजुर्ग, कर्ती स्त्री मध्यभागी बसलेली, इतर आयाबाया तिच्या आजूबाजूला, नृत्य करणाऱ्या तरुण मुली, त्यांचे रंगीबेरंगी पोशाख असं सगळं स्त्रीप्रधान नेपथ्य छान आहे. त्यांच्यात वावरणारा देव कधी धावपळ करताना दिसतो, तर कधी तिच्या खिजवण्यानं बावरलेला, तर कधी अंतर्मुख होत विचार करणारा...असा हा देव ऋषी कपूरनं फार चांगला साकारला आहे.

अर्थात् गाण्याचे बोल, संगीताचा सूर, कलापूर्ण नेपथ्य, कलाकारांचा अभिनय या सगळ्यावर दिग्दर्शकाची मोठी छाप आहेच आहे. ‘प्रेमरोग’ या १९८२ मध्ये आलेल्या या सिनेमाचे दिग्दर्शक होते ‘द ग्रेट शोमन’ राज कपूर. गेल्याच आठवड्यात, ता. पाच मार्च रोजी, त्यांचा जन्मदिवस होता.

गीतकार संतोष आनंद यांची गाणी संख्येनं तशी फार नाहीत; पण जी आहेत ती खूप छान आहेत. त्यांची एकदा प्रत्यक्ष भेट घडली होती आणि बोलण्याचा योग आला होता. पायात साधी चप्पल आणि सदऱ्याचं छातीवरचं बटण तुटलेलं अशा वेशातला हा साधा दिसणारा माणूस एवढी छान छान गाणी लिहितो यावर विश्वास ठेवणं मला जड गेलं होतं! एखादा माणूस प्रत्यक्षात अमुक अमुक प्रकारचा असणं आणि त्याचं तसं दिसणं वा न दिसणं याचा काहीएक संबंध नसतो हेच खरं.

(लेखक हे हिंदी सिनेगीतांचे अभ्यासक-समीक्षक, तसंच ‘गाने अपने अपने’ या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत. ‘गुनगुना रहे है भँवरे’ हे याच विषयावरचं पुस्तक त्यांच्या नावावर आहे.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Loksabha: प्रशासनाचा भोंगळ कारभार, मतदार यादीत नाव नसल्याने मतदार हैराण

HSC Result 2024 : उद्या लागणार बारावीचा निकाल, गुणपडताळणी कशी करायची ? एका क्लिक मध्ये जाणून घ्या

Google Map Address Update : गुगल मॅपवर पत्ता बदलणे आता तुमच्या हातात ; फॉलो करा 'या' ट्रिक्स

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: पवईतील हिरानंदानी मतदार केंद्रावर दोन तासांपासून मतदारांच्या रांगा

Kolhapur Lok Sabha : लोकसभा निकालाची उत्सुकता शिगेला; कार्यकर्त्यांत लागल्या पैजा, सट्टाबाजारातही उलाढाल जोरात

SCROLL FOR NEXT