सप्तरंग

‘ब्रेक्‍झिट’च्या परिणामांचे पडसाद

धनंजय बिजले

ब्रिटनवासीयांसाठी शुक्रवारची मध्यरात्र सर्वार्थाने वेगळी ठरली. ब्रिटिश पार्लमेंटवरील जगप्रसिद्ध घड्याळात रात्री अकराचा ठोका पडताच निम्म्याहून अधिक जनतेने एकच जल्लोष केला, तर अनेकांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. अर्थात, याला कारणही तितकेच महत्त्वाचे होते. ते होते युरोपीयन महासंघातून ब्रिटन बाहेर पडल्याचे. अर्थात, ‘ब्रेक्‍झिट’वर शिक्कामोर्तब झाल्याचे. गेली चार वर्षे ‘ब्रेक्‍झिट’च्या मुद्द्यावरून साऱ्या ब्रिटनचे राजकारण, समाजकारण ढवळून निघाले होते; इतके की यातून दोन पंतप्रधानांना आपली राजकीय कारकीर्द संपवावी लागली. याच मुद्द्यावर सध्याचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन निवडून आले होते. यावरून ‘ब्रेक्‍झिट’चे महत्त्व कळते. आता ‘ब्रेक्‍झिट’च्या परिणामांची चर्चा साऱ्या जगभर सुरू झाली आहे. जगभरातील जवळपास सर्वच देशांतील प्रमुख वृत्तपत्रांनी, दूरचित्रवाहिन्यांनी त्यावर सविस्तर भाष्य केले आहे. ‘सीएनएन’च्या म्हणण्यानुसार, पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यापुढे आता देशाला एकत्रित ठेवत पुढे नेण्याचे मोठे आव्हान असेल. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर ब्रिटनला नव्या स्वरूपात आणण्याची त्यांना संधी आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आता चीनशी स्पर्धा करताना ब्रिटनशी व्यापारी करार करतील, अशी शक्‍यता आहे. असे झाल्यास ब्रिटनसाठी ते मोठे राजकीय बक्षीस ठरेल.

‘वॉल स्ट्रीट जर्नल’च्या मते जग सध्या अनेक आव्हानांना तोंड देत आहे. राजकीय तसेच आर्थिक व्यवस्थांमध्ये अनेक रचनात्मक बदल होत आहेत. वाढते तंत्रज्ञान, हवामानबदल, वाढती विषमता असणाऱ्या या परिस्थितीत ‘ब्रेक्‍झिट’चा निर्णय होत आहे. या साऱ्या प्रश्‍नांना सामोरे जाताना धोरणकर्त्यांनी ‘ब्रेक्‍झिट’पासून योग्य तो बोध घेतला पाहिजे. मुळातच सध्या ब्रिटनची अर्थव्यवस्था फारशी चांगली नाही. त्यामुळे ‘ब्रेक्‍झिट’चे दूरगामी परिणाम अर्थव्यवस्थेला सहन करावे लागणार आहेत. त्याची तयारी ब्रिटिश नागरिकांनी केलेली बरी. ब्रिटनमध्ये गुंतवणूक कमी झाल्यास त्याचा थेट फटका रोजगाराला बसणार आहे. त्यामुळे पंतप्रधान जॉन्सन यांच्यापुढे आता आव्हानांचा डोंगर उभा असेल.

आखाती जगताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कतारच्या ‘अल जझीरा’ने म्हटले आहे की, ‘ब्रेक्‍झिट’चे परिणाम थोड्याबहुत फरकाने प्रत्येक देशांवर होणार आहेत. कारण, सध्या हे देश युरोपीय महासंघाशी करार करीत होते. आता व्यापार करताना दरवेळी त्यांना ब्रिटन व उर्वरित युरोपीय देश, असा वेगवेगळा विचार करावा लागेल. जागतिक व्यापार जर पुन्हा १९३० च्या काळाप्रमाणे सुरू झाल्यास जग आणखी सात टक्के गरीब होईल, असा अंदाज वर्तविला जातो. त्यामुळे मोठ्या संपन्न देशांनी सावध पावले टाकायला हवीत.

टोकाची मते
युरोपीय देशांतील माध्यमांनी ‘ब्रेक्‍झिट’वर अतिशय उलटसुलट व टोकाची मते मांडली आहेत. बेल्जियमचे ‘डी मॉर्गेन’ वृत्तपत्र म्हणते की, एखाद्या चोराप्रमाणे शुक्रवारच्या मध्यरात्री ब्रिटन युरोपीय महासंघातून बाहेर पडला आहे. स्थापनेपासून ४७ वर्षांत महासंघातून प्रथमच एखादा देश बाहेर पडला असून, हा सर्वांसाठी क्‍लेशदायक पराभव आहे. आयर्लंडमधील ‘आयरिश टाइम्स’च्या मते, ‘ब्रेक्‍झिट’ हे महासंघासाठी फार मोठे नुकसान आहे. नॉर्वेमधील ‘आफ्टनपोस्टन’च्या मते युरोपीय महासंघ हा जागतिक शांततेसाठी फार मोठा प्रकल्प आहे, असे मानणाऱ्या प्रत्येकासाठी आजचा दिवस हा पराभवाचा दिवस आहे. बेल्जियममधील ‘ली सोर’ वृत्तपत्राने जगासाठी हा मोठा पराभव असल्याचे म्हटले आहे. इटलीच्या ‘सोल २४ ओर’ या वृत्तपत्राने म्हटले आहे, की ज्यावे ळी लंडन महासंघातून बाहेर पडला, त्या वेळी अन्य युरोपीय देशांच्या मनात अनाथ झाल्याची भावना निर्माण झाली आणि ती स्वाभाविक आहे. कारण, आता सारा युरोप एक ही भावना लयाला गेली आहे. फ्रान्समधील ‘लिस एकोस’ वृत्तपत्राच्या मते ‘ब्रेक्‍झिट’मुळे महासंघाच्या तिजोरीतून ६० अब्ज युरो बाहेर पडणार असून, मोठी लोकसंख्याही या बाजारपेठेतून बाहेर पडली आहे. आता महासंघात सुरक्षा समितीचा कायम सदस्य असलेला एकच अण्वस्त्रधारी देश राहिलेला आहे. त्यामुळे याचे व्यापक राजकीय परिणामही होणार आहेत. ‘डेल अल पेस’ या स्पॅनिश दैनिकाच्या मते जागतिक मांदियाळीत युरोपची ताकद कमी होणार आहे. त्यामुळे युरोपपुढे अनेक आव्हाने ‘आ’ वासून पुढे ठाकणार आहेत. ‘हसावे की रडावे, हेच कळत नाही, अशा विचित्र अवस्थेत सारा युरोप सापडला आहे,’ अशा शब्दांत हंगेरीच्या वृत्तपत्राने या घटनेचे वर्णन केले आहे.

एकुणात, ‘ब्रेक्‍झिट’चे ब्रिटनप्रमाणेच साऱ्या युरोपवर अनेक दूरगामी परिणाम होणार आहेत. ‘ब्रेक्‍झिट’कडे जगातील प्रत्येक देश आपापल्या दृष्टिकोनातून पाहत आहेत. प्रत्येक देशाला आपली युरोपाबाबतची धोरणे, व्यापार करार पुन्हा तपासून पाहावे लागणार आहेत. त्यात योग्य ते बदल करावे लागणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : अर्चना पाटील यांच्या समर्थनार्थ पंतप्रधान मोदी यांच्या धाराशिवमधील सभेला सुरुवात

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल राहण्यासाठी बेस्ट आहे चिकनकारी कुर्ती, अशा पद्धतीने करा स्टाईल

Credit Card: ग्राहकांना मोठा फटका! 1 मे पासून क्रेडिट कार्डद्वारे बिल भरणे होणार महाग; किती वाढणार खिशावरचा भार?

T20 World Cup 2024 : IPL दरम्यान वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया होणार अमेरिकेला रवाना! तारीख आली समोर

Prajwal Revanna : 'मुलगा खोलीत तर बाप दुकानात बोलवायचा...', माजी पंतप्रधानांच्या नातवाचा सेक्स स्कँडल, कोण आहे प्रज्वल रेवण्णा?

SCROLL FOR NEXT