सप्तरंग

विश्‍वासू मार्गदर्शक

अवतरण टीम

कर्करोगासारख्या आजारावर उपचार करताना डॉक्टरांनी त्या रुग्णाला व नातेवाईकांना शस्त्रक्रियेविषयीची पूर्ण माहिती देणे गरजेचे आहे.

- डॉ. अविनाश सुपे

कर्करोगासारख्या आजारावर उपचार करताना डॉक्टरांनी त्या रुग्णाला व नातेवाईकांना शस्त्रक्रियेविषयीची पूर्ण माहिती देणे गरजेचे आहे. त्यातून संबंधितांना निर्णय घेणे सोपे होते. डॉक्टर हा रुग्णाचा एक चांगला मार्गदर्शक असतो आणि डॉक्टर रुग्णाला आजारातून बाहेर काढणारा एक विश्वासू सुहृद असतो. हा विश्वास रुग्णाच्या मनात दृढ व्हावा अशी अपेक्षा आहे. पूर्वीच्या काळी डॉक्टर हा पूर्ण कुटुंबाचा एक घटक असे. डॉक्टर सांगत आणि रुग्ण ऐकत. पण आता काळ बदलला आहे...

माझ्याकडे सुवर्णा नावाची ३२ वर्षांची बँकेत काम करणारी सुशिक्षित महिला एकदा आली होती. ती म्हणाली, ‘अंघोळ करताना डाव्या स्तनात कडक अशी छोटीशी गाठ लागली.’ ती साधारण अडीच सेंटीमीटरची होती. आम्ही मॅमोग्राफी करून गाठीची जागा बघितली आणि एफएनएसी फाईन नीडल ॲस्पिरेशन म्हणजे सुई घालून पेशी काढून त्याचा तपास केला. तिला कर्करोग असल्याचे लक्षात आले. तिच्या काखेत अजून गाठी आढळल्या नाहीत. सर्व तपास केल्यावर असे लक्षात आले, की तो रोग बाकी शरीरात कुठेही पसरला नव्हता. तिच्या कर्करोगाबद्दल तिला माहिती देऊन तिच्याशी उपचारांबद्दल नीट चर्चा केली.

अशा आजारावर दोन प्रकारे आपण उपचार करू शकतो. पारंपरिक उपचार म्हणजे ते स्तन आणि काखेतल्या गाठी पूर्णपणे काढून टाकणे हा आहे. या मध्ये स्त्रीला पुढे कृत्रिम स्तन किंवा कृत्रिम ब्रा वापरावी लागते; पण जर तरुण स्त्रीचा स्तन व्यवस्थित आकाराचा असून गाठ छोटी असेल तर फक्त गाठ काढणे आणि नंतर रेडिओ थेरपी व केमो थेरपी उपचार त्या जागेवर देणे असे गेल्या २५ वर्षांत केले जात आहे. यात स्तन वाचवता येतो आणि त्यामुळे तिला स्तनाच्या जागी कृत्रिम स्तन किंवा कृत्रिम ब्रा वापरावी लागत नाही; पण हा निर्णय रुग्णाने स्वतः डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यायचा असतो.

स्तनाच्या कर्करोगाच्या उपचारात गेल्या काही वर्षांत फार बदल होत आहेत. आजच्या शास्त्रीय संशोधनामध्ये हे मान्य आहे, की जर स्तनाचा कर्करोग लवकर लक्षात आला, तर आणि तो पसरला नसेल तर असा उपचार होऊ शकतो. अर्थातच त्यानंतर रुग्णाला डॉक्टरकडे नियमित तपास करणे आवश्यक असते. आम्ही जरी सुवर्णाला हे सर्व समजून सांगितले तरी तिने पूर्ण स्तन काढण्याचा निर्णय घेतला. तिच्या निर्णयाचा पूर्ण आदर करून आम्ही शस्त्रक्रिया केली व ती यशस्वी झाली. आज २२ वर्षांनंतर ती व्यवस्थित आहे.

माझ्या एक सहकारी डॉक्टर यांनी २००० साली यावर संशोधन केले. शास्त्रीय नियतकालिकांमध्ये आम्ही एक शोधनिबंध सादर केला. त्यात असे आढळले, की भारतीय स्त्रिया या पूर्ण स्तन काढण्यास जास्त प्राधान्य देतात. या निर्णयामागे पुन:पुन्हा रुग्णालयाच्या फेऱ्या वाचवणे, केमोथेरपी, रेडिओथेरपी घेण्याचे टाळणे किंवा कर्करोग पुन्हा होण्याची भीती असणे ही कारणे असतात. बऱ्याचदा असे दिसून येते, की कर्करोग समूळ काढणे याच्या तुलनेत सौंदर्यासाठी स्तन वाचवणे याचे पारडे नेहमी खाली राहिले. हा कदाचित संस्कृतीचा प्रभाव असेल किंवा समाजातील समज असेल; परंतु आज जास्त जागरुकतेने किंवा शिक्षणामुळे हे काहीसे बदलले आहे.

पूर्वीच्या काळी डॉक्टर हा पूर्ण कुटुंबाचा एक घटक असे. एक जिव्हाळ्याचे नाते असे. पूर्वीचा काळ असा होता, की डॉक्टर सांगत आणि रुग्ण ऐकत. डॉक्टरांना कुटुंबाची पूर्ण माहिती असे. मग त्यात अनुवांशिक आजार, मानसिकता, आर्थिक स्थिती या सर्वाला अनुलक्षून त्यांचा सल्ला असे आणि तो मानला जाई, पण आता काळ बदलला आहे. रुग्ण सुशिक्षित आहे. त्याच्याकडे गुगल आणि इंटरनेट अशी साधने आहेत. रुग्ण काही माहिती घेऊन येतो. तशात आजाराच्या उपचारांसाठी दोनतीन मार्ग असले तर नेमका कोणता निर्णय उपयुक्त होईल, यासाठी रुग्णाशी आणि नातेवाईकांशी सल्लामसलत करणे योग्य ठरते. प्रत्येक उपायाचे फायदे-तोटे त्यांना कळतात आणि डॉक्टर आणि रुग्ण दोघांनाही कमी मानसिक ताण होतो. आरोग्य शास्त्रात ऐनवेळी काहीही गुंतागुंत होऊ शकते, त्याची सर्व कल्पना चर्चा करून देता येते. कधी कधी रुग्ण गुगलवर माहिती घेऊन येतो. ती माहिती बाह्य देशातील असते.

आपल्या देशातील परिस्थिती तसेच प्रत्येक रुग्णाची मानसिक आणि शारीरिक स्थिती वेगळी असते. त्यामुळे ती त्या रुग्णाबाबत तंतोतंत लागू होत नाही, याची जाणीव त्या रुग्णाला आणि नातेवाईकांना करून देणेही गरजेचे असते. गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांच्या वेळी रुग्ण आणि त्याचे सगेसोयरे सगळे द्विधा मनस्थितीत असतात. त्या वेळी उपचार देणाऱ्या शल्यचिकित्सकाशी अशी चर्चा आणि योग्य मार्गदर्शन पूर्ण कुटुंबाला आश्वस्त करते आणि रुग्णाचे मानसिक आरोग्य सुदृढ करते. डॉक्टरने सध्याच्या काळात एकतर्फी निर्णय घेणे योग्य नाही. रुग्णाच्या मताचा आदर करणे हीच काळाची गरज आहे. रुग्णाच्या मनाचा अंदाज घेणे आणि त्याची मानसिक तयारी करणे हे डॉक्टर आणि रुग्ण दोघांनाही अत्यंत फायदेशीर होते.

ज्या वेळी रुग्ण अथवा नातेवाईकांना पूर्ण माहिती नसते, तेव्हा गैरसमजामुळे फार नुकसान होऊ शकते. प्रत्येक शस्त्रक्रियेपूर्वी रुग्णाच्या जवळच्या नातेवाईकाची छापील फॉर्मवर संमती/ सहमती घेतली जाते; पण प्रत्यक्ष चर्चा करून उपचारांची चांगली आणि वाईट बाजू समजावून सांगितली असता न्यायालयातसुद्धा ते प्रमाण मानले जाते. ‘वैद्यक शास्त्र किचकट आहे व रुग्णाला काय समजते?’ असे गृहित न धरता रुग्णाला व त्याच्या नातेवाईकांना साध्या व सोप्या भाषेत आजार व उपचारांबद्दल समजावून त्यानुसार सामायिक निर्णय घेतले गेले तर नेहमीच हे सर्वांसाठी हितावह असते.

मी न्यूयॉर्कमध्ये स्लोन्स केटरिंग सेंटरला असताना पाहिले होते की, तेथे प्रत्येक कक्षामध्ये एक समुपदेशन खोली असायची. एक समुपदेशक तिथे येऊन रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांना एक चित्रफीत दाखवायचा; ज्यामध्ये आजार, त्याचे उपचार, उपचाराचे फायदे, होऊ शकणारी गुंतागुंत आणि त्यानंतर घ्यायची काळजी याचे पूर्ण विवरण असायचे. अशी पूर्ण माहिती मिळाली की रुग्ण आणि संबंधितांना निर्णय घेणे सोपे होत असे. आज अनेक रुग्णालयांत अशी व्यवस्था असते. सामायिक निर्णय ही काळाची गरज आहे. डॉक्टर हा तुमचा एक चांगला मार्गदर्शक असतो आणि तुमच्या हाताला धरून तुम्हाला आजारातून बाहेर काढणारा एक विश्वासू सुहृद असतो. हा विश्वास रुग्णाच्या मनात अशा सामायिक निर्णयामुळे पुन्हा दृढ व्हावा अशी अपेक्षा आहे.

(लेखक केईएम रुग्णालयातून अधिष्ठाता पदावरून निवृत्त झाले असून, त्यांचे ‘सर्जन’शील हे पुस्तक प्रकाशित झाले आहे.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: सेंड ऑफ देणाऱ्या KKRच्या खेळाडूलाच BCCI ने दिला सेंड ऑफ; दंडाचीच नाही, तर बंदीचीही झाली कारवाई

Aditya Thackeray : बाहेरचे लोक कोण आम्हाला येऊन सांगणारे? आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका

LSG vs MI IPL 2024 Live : लखनौ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकली; मुंबईसाठी करो या मरो सामना

तुम्हाला पत्रावळीवर जेवायची इच्छा झाली आणि तुम्ही वाटोळे करून घेतलं; जितेंद्र आव्हाड यांची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका

Ulhasnagar News : उल्हासनगरातील बेवारस वाहने पालिकेच्या रडारवर; 11 वाहन मालकांकडून 17 हजाराचा दंड वसूल

SCROLL FOR NEXT