dr shruti panse write article in saptarang
dr shruti panse write article in saptarang 
सप्तरंग

रुजणं, फुलणं, बहरणं! (डॉ. श्रुती पानसे)

डॉ. श्रुती पानसे drshrutipanse@gmail.com

मुलं चमकावीत असं वाटणं काही चुकीचं नाही; पण या लहान मुलांचा कल नक्की कुठं आहे, हे आपल्याला खात्रीनं माहीत आहे का? तिला किंवा त्याला काय आवडतं, काय करावंसं वाटतं, हेच तेवढं महत्त्वाचं आहे. कदाचित ज्या गोष्टींची आपण कधी कल्पना केली नव्हती, कल्पना करूही शकणार नाही, असं अगदी वेगळंच, आधुनिक क्षेत्र उलगडू शकतं. आपण एकच करू शकतो. त्या दिवसासाठी थांबावं. रोपाला आपण रोज पाणी घालतो. खत घालतो; पण म्हणून आपल्याला हवं त्यावेळी फुलं येणार नाहीत. फुलं यायची योग्य वेळ असेल तेव्हाच ती येतील...

प्रत्येक आईबाबाच्या मनात या विषयी किती स्वप्नं असतात. या स्वप्नांना आशेची जोड असते. या नुसत्या विचारातही खूप सारा आनंद लपलेला असतो.
मूल झाल्या क्षणापासून त्याचं चांगलं कसं होईल, त्याला जास्तीत जास्त चांगलं कसं आणि काय देता येईल हा विचार केंद्रस्थानी असतो. या विचारांचाच पुढचा भाग म्हणजे, आपलं मूल कशात चांगलं आहे हा शोध प्रत्येक आईबाबा अगदी मनापासून घेत असतात. यात कुतूहलाचा भाग मोठा आहे. आपल्या मुलीचं- मुलाचं आयुष्य कसं जाईल, करिअर कसं असेल? तो किंवा ती मोठा झाल्यावर कोण होईल, असे प्रश्न मनात रुंजी घालत असतात.

साधारण चार वर्षांपर्यंत आपलं मूल सर्वगुणसंपन्न आहे; या मुलाला किंवा मुलीला जे काही करायचं असेल, ज्या मार्गावर जायचं असेल तिकडे सहज जाता येईल एवढे गुण आहेत याबद्दल पुरेपूर विश्‍वास असतो. हळूहळू मुलं जशी मोठी होतात, तसतसे त्यांच्यातले दोषही लक्षात येतात. मात्र, लहान म्हणजे चार वर्षांपर्यंच्या पालकांचा उत्साह वाखाणण्यासारखा असतो.

काही पालक उत्साहाच्या भरात मुलामुलींचं आयुष्य "सेट' करायला जातात. याचं कारण आपल्या मुलांमध्ये जे गुण, जी कौशल्यं आहेत, ती शक्‍य तेवढ्या लवकर समजावीत, म्हणजे त्याचा पाठपुरावा करता येईल अशी त्यांची इच्छा असते. एका आईचं मूल बालवाडीत होतं, तेव्हा "मोठा झाल्यावर हा कोणत्या क्षेत्रात जाईल, याचा काहीच अंदाज येत नाहीये. ते कळलं, की त्याला कधी उठवायचं - कधी झोपवायचं हे समजेल. म्हणजे त्याला आत्तापासूनच सवय लागेल आणि पुढे त्रास होणार नाही,' असं त्याच्या आईला खरोखर वाटत होतं.

मुलांचं आयुष्य अगदी व्यवस्थित सेट करण्याचं "उद्दिष्ट' असलेले आई-बाबा मुलांना चौथ्या-पाचव्या वर्षापासूनच वेगवेगळ्या प्रकारच्या क्‍लासेसना घालतात. चांगला नावलौकिक प्राप्त केलेला एखादा किंवा एखादी खेळाडू मुलाखत देते. त्यांच्यात तिसऱ्या- चौथ्या वर्षापासून खेळाची चुणूक दिसलेली असते. मग आपल्याला त्या जागेवर आपलं गोंडस लहानसं मूल दिसायला लागतं. आज चमकणाऱ्या एखाद्या गायक/गायिका, नर्तक/नर्तिका, संशोधक, शास्त्रज्ञ, उद्योजक यांच्या लहानपणातली उदाहरणं कानावर पडली, की आपलं बाळही अशीच भरारी घेईल का, अशी स्वप्नं पडतात. त्यात काहीही अनैसर्गिक नाही. प्रत्येक आईबाबांना स्वप्नं पाहण्याचा हक्क असतो. आपल्या मुलांसाठी आई-बाबा स्वप्नं बघणार नाहीत, तर दुसरं कोण?
मात्र, ही स्वप्नं पटापटा पूर्ण व्हावीत अशी विचित्र आशा, अपेक्षा- आकांक्षा- महत्त्वाकांक्षा (चढत्या क्रमानं) नाही ना, हे तपासायला पाहिजे. तुम्ही मुलांसाठी काय स्वप्नं बघत आहात हे अजून त्यांच्या गावीही नाही.

मुलं चमकावीत असं वाटणं काही चुकीचं नाही; पण या लहान मुलांचा कल नक्की कुठं आहे, हे आपल्याला खात्रीनं माहीत आहे का? तिला किंवा त्याला काय आवडतं, काय करावंसं वाटतं, हेच तेवढं महत्त्वाचं आहे. कदाचित ज्या गोष्टींची आपण कधी कल्पना केली नव्हती, कल्पना करूही शकणार नाही, असं अगदी वेगळंच, आधुनिक क्षेत्र उलगडू शकतं. आपण एकच करू शकतो. त्या दिवसासाठी थांबावं.
आई-बाबा मुलांची वाढ आणि विकास यासाठी खूप काही करू शकतात. करतातही. पैसे पुरवतात. वेळ देतात. शक्‍य ती सर्व साधनं पुरवतात. प्रेम करतात. सल्ला देतात. स्वत: दोन पावलं पुढे राहून योग्य तो मार्ग दाखवतात. मात्र, हे करताना आपण हे सर्व एका मर्यादेपर्यंत करू शकतो, याचं भान अवश्‍य ठेवावं. त्या मर्यादेच्या पलीकडं जर मुलांना जायचं असेल, तर त्यासाठी अवकाश देणं फार आवश्‍यक आहे.
मुलांना त्यांच्या आयुष्यात जे काही करायचं आहे, ते त्यांनी ठरवायला पाहिजे. आपण आतापासून त्याची अतिचिंता करणं, काळजी वाहणं योग्य आहे का? स्वत:मध्ये काय आहे, याचा शोध त्यालाच लागला पाहिजे. त्यासाठी योग्य वेळ आली पाहिजे. स्वत:चा रस्ता स्वत: शोधला पाहिजे.

आपण मातीत प्रेमानं बिया लावतो. त्या रुजेपर्यंत थांबतो. पहिलावहिला हिरवागार अंकुर काळ्याशार मातीतून बाहेर येण्याची वाट बघतो. दोन पानं- चार पानं- नाजूकसं खोड आधी तयार होतं. त्या रोपाचं वाढणं आपण रोज उत्सुकतेनं पाहतो. रोपाला छान आकार येईल, भरपूर पानं येतील. मग सावकाश लहानशी, नाजुकशी कळी उमलेल. एक दिवस- एका सकाळी ती कळी फुलेल- स्वत:हून फुलेल. जेव्हा ती सुंदरशी आणि नैसर्गिक वेळ येईल, तेव्हा हे घडेल; पण ती वेळ केव्हा येईल हे अचूकपणे कोणीच सांगू शकत नाही.

रोपाला आपण रोज पाणी घालतो. खत घालतो; पण म्हणून आपल्याला हवं त्यावेळी फुलं येणार नाहीत. फुलं यायची योग्य वेळ असेल तेव्हाच ती येतील, अशा अर्थाचं वाक्‍य एके ठिकाणी वाचनात आलं. या विधानातून खूप काही समजून घेण्यासारखं आहे. या एका विधानात अनेकानेक अर्थ आहेत. एक तर सगळी झाडं एकसारखी नसतात. प्रत्येकात विविधता असते. प्रत्येकाची वाढ आणि विकास या गोष्टी वेगवेगळ्या वेळेला आणि वेगवेगळ्या प्रकारे होत असतात. भरपूर आणि लवकर फुलं यावीत, म्हणून भरपूर पाण्याचा मारा केला, तर झाडाची मुळं कोमेजून जाण्याची शक्‍यता असते. असं झाड उभारी धरत नाही. असं होऊ नये, याची काळजी घेणं मात्र आवश्‍यक. त्यासाठी योग्य वेळी, मोजकं पाणी घालणं महत्त्वाचं. खत घातलं, वेळोवेळी काटछाट केली, अधूनमधून मुळांना ऑक्‍सिजन मिळावा म्हणून माती वरखाली केली, सूर्यप्रकाश दाखवला, तर जास्त चांगलं.

काही झाडं अशी असतील, की ती कदाचित फार बहरणार नाहीत. खूप फुलणार नाहीत. कदाचित त्यांना फळंही येणार नाहीत; पण चांगल्या पद्धतीनं स्वत:चं अस्तित्व टिकवून ठेवतील. आपल्याला जे, जसं आणि जेव्हा हवं आहे, तसं कदाचित होणारही नाही. झाडाची अंतर्गत यंत्रणा ज्याप्रमाणे ठरवेल, त्याप्रमाणे त्याची वाढ होईल. झाड मोठं होत असताना ते छोट्या कुंडीत मावत नाही. योग्य वेळी मोठ्या कुंडीत लावलं, झाडाला योग्य अवकाश दिला तर झाड बहरेल. या सगळ्या गोष्टी एका निश्‍चित क्रमानं घडून येतात. हा क्रमही प्रत्येक झाडाचा वेगवेगळा असतो. तो त्या झाडाचं बीज, मिळणाऱ्या मातीचा कस, योग्य तितका सूर्यप्रकाश- अशा त्या विशिष्ट झाडाला मिळणाऱ्या विविध प्रकारच्या अनुभवांवर अवलंबून असतो.

या सगळ्यासाठी धीर धरणं फार आवश्‍यक आहे. धीर धरण्यातही एक सकारात्मकता आहे. आजवर योग्य दिशेनं जे प्रयत्न केले आहेत त्यावर विश्वास आहे. चांगलं काही घडेल, याची अपेक्षा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

LSG vs MI IPL 2024 Live : मुंबईच्या गोलंदाजांनी केला टिच्चून मारा; लखनौचा निम्मा संघ गारद, सामन्यात रंगत

SCROLL FOR NEXT