Shivrajyabhishek
Shivrajyabhishek Sakal
सप्तरंग

‘ही गोष्ट काही सामान्य जाली नाही...’

सकाळ वृत्तसेवा

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या शपथविधीस तीन वर्षं पूर्ण झाली. वृत्तपत्रांत याचा बराच ऊहापोह झाला.

- डॉ. उदय कुलकर्णी udayskulkarni2@gmail.com

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या शपथविधीस तीन वर्षं पूर्ण झाली. वृत्तपत्रांत याचा बराच ऊहापोह झाला. साहजिकच २०१९ मधली ३० मे रोजीची दिल्लीतली ती उकाड्याच्या वातावरणातली सायंकाळ आठवली. राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात जमलेला तो प्रचंड जनसमुदाय, कडेकोट सुरक्षा व्यवस्था, प्रत्येकाला देण्यात आलेल्या आमंत्रणपत्रिका, राष्ट्रपती निवासाची भव्यता, तेथील ते ‘टस्कन खांब’, त्यावर केलेली रोषणाई हे सर्व अगदी भव्यदिव्य वाटत होतं. चौथ्याच रांगेत बसल्यामुळे मलाही अनेक राजकीय व्यक्ती अगदी जवळून पाहता आल्या. या घटनेला जरी तीन वर्षं झाली असली, तरी त्या आठवणी ताज्या आहेत. तीन वर्षं पूर्ण झाल्यानिमित्ताने सरकारने आपला वाढदिवस साजरा केला. माझीही नजर नकळत भूतकाळाकडे वळली.

शेकडो वर्षांचा इतिहास असलेल्या भारतवर्षात असे अनेक राजांचे राज्याभिषेक झाले. प्रभू रामचंद्रांच्या राज्याभिषेकापासून मनाच्या पटलावर अनेक काळ काही क्षणांत उमटून गेले. या भ्रमणात एके ठिकाणी नजर थांबली, एका विशिष्ट टप्प्यावर येऊन स्थिरावली. कालयंत्रात तारीख पाहिली, तर ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, शके १५९६ चा दिवस होता. त्या दिवशी भूतलावरील सर्वांत महत्त्वाच्या घटनेपाशी, किल्ले रायगड इथं मी येऊन पोचलो होतो. वास्तविक ३४९ वर्षांपूर्वीचा आजचाच तो दिवस. रायगडावर राज्याभिषेकाचा दिमाखदार सोहळा पार पडत होता आणि सिंहासनाधीश्‍वर होते छत्रपती शिवाजी महाराज.

यापूर्वीदेखील राज्याभिषेक झाला नसला तरी शिवराय स्वतंत्र राज्यकर्ते म्हणूनच वागत असत. विजयनगरचं साम्राज्य १५६५ मध्ये अस्ताला गेल्यावर भारतात स्वतंत्र हिंदू राज्य राहिलं नाही. विजापूरच्या आदिलशाहीने शिवराय हे सार्वभौम राजासारखेच वावरत हे यापूर्वीच जाणलं होतं. १६५९ मध्ये अफजल खानाला यासाठी त्याने शिवरायांविरोधात धाडलं होतं. खानाच्या वकिलाने जो संदेश शिवाजी महाराजांना दिला, तो काहीसा असा होता :

‘ज्या अर्थी तुम्ही निर्भयपणे स्वतःच चक्रवर्ती राजाची चिन्हं धारण करीत आहा, आणि अन्यायाने सुवर्ण सिंहासनावर बसता, आणि स्वतःच मनुष्यांचा निग्रहानुग्रह करिता, स्वतंत्र होऊन वंदनीयांना वंदन करीत नाही, अजिंक्‍य होऊन लुंग्यासुंग्यांना भीत नाही, त्या अर्थी प्रतापी आदिलशाहने मला तुम्हावर पाठवलं आहे.’

अर्थात, यानंतर अफजल खानाची काय गत झाली हे आपण जाणतोच.

राज्याचा विस्तार झाला आणि १६७३ मध्ये नाशिक - बागलाणपासून गोव्याच्या सीमेपर्यंत स्वराज्याचा विस्तार झाला. सार्वभौमत्व राजांकडे असतं, जहागीरदाराकडे नाही आणि परराज्यांशी व्यवहार करताना समान दर्जा असणं आवश्‍यक असतं, या विचारांमधून १६७४ मध्ये राज्याभिषेक करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. अनेक महिने तयारी केली गेली. गागाभट काशीकर यांनी सोहळ्याचं उपाध्येपण स्वीकारलं. जुन्या विस्मृतीत जात असलेल्या राज्याभिषेक पद्धतीचा अवलंब करून पहाटे ४ वाजून ५२ मिनिटांनी शिवराय सिंहासनावर विराजमान झाले.

आपल्या मस्तकावर छत्र धरून आपल्या सार्वभौमत्वाची जाहीर घोषणा झाली. छत्रपती आणि क्षत्रियकुलावतंस या उपाध्या महाराजांनी आपल्या नावास जोडल्या. याशिवाय स्वतंत्र राजाची आणखीन दोन लक्षणं उपयोगात आली. पहिलं - शिवशाहीची तांबे व सोन्याची नाणी पाडण्यात आली. दुसरं - विक्रम संवतप्रमाणेच त्या दिवसापासून राज्याभिषेक शक अर्थात शिवशक सुरू करण्यात आलं. यामुळेच ‘शककर्ता’ ही उपाधीदेखील शिवरायांना जोडली गेली.

राज्याभिषेकासाठी इंग्रज वकील हेन्‍री ऑक्‍जेंडन हजर होता. रायगडावरील या सोहळ्याचं वर्णन त्याने लिहून ठेवलं आहे :

‘मी राजेंना भव्य सिंहासनावर विराजमान झालेलं पाहिलं. भोवताली उंची वस्त्रं परिधान केलेले त्यांचे अष्टप्रधान उभे होते. युवराज संभाजी राजे, पेशवा मोरो पंडित हे सिंहासनानजीकच बसले होते. सिंहासनाच्या दोन्ही बाजूस अलंकारित भाले आणि त्यावर स्वातंत्र्य आणि अधिकाराची चिन्हं होती.’

परत येताना महाद्वारापाशी उभे असलेले दोन छोटे हत्ती पाहून इंग्रजांना आश्‍चर्य वाटलं की, एवढ्या अवघड मार्गाने त्यांना गडावर कसं आणलं असेल?

शिवराज्याभिषेकानंतर अवघ्या २२-२३ वर्षांनी कृष्णाजी अनंत सभासद यांनी या देखण्या सोहळ्याची आणखी थोडी माहिती लिहिली : ‘‘छत्र जडावाचे, मोतीलग झालरीचे करून मस्तकावर धरिले. छत्रपती असे नाव चालविले. कागदीपत्री स्वस्तिश्री (राज्याभिषेक) शक, सिंहासनावर बसले त्या दिवसापासून नियत चालविला. पन्नास सहस्र ब्राह्मण वैदिक मिळाले. या वेगळे तपोनिधी व सत्पुरुष, संन्यासी, अतिथी, मानभाव, जटाधारी, जोगी, जंगम, नाना जाती मिळाले. निरोप देता, पात्र पाहून द्रव्य, अलंकार, भूषणे, वस्त्रे अमर्याद दिधली. गागाभट मुख्य अध्वर्यु त्यांस अपरिमित द्रव्य दिले. संपूर्ण खर्चाची संख्या एक क्रोड बेताळीस लक्ष होन जाले. अष्टप्रधानास लक्ष लक्ष होन बक्षीस दर असामीस, त्याखेरीज एक हत्ती, घोडा, वस्त्रे, अलंकार असे देणे दिले. येणेप्रमाणे राजे सिंहासनारूढ जाले. या युगी सर्व पृथ्वीवर म्लेच्छ बादशाह मऱ्हाटा बादशाह येवढा छत्रपती जाला ही गोष्ट काही सामान्य जाली नाही.’’

गेल्या हजार वर्षं इतिहासात झालेल्या सर्वांत असामान्य घटनांमध्ये शिवराज्याभिषेकाची गणना होते. कारण त्या दिवशी गुलामगिरीच्या अंधारातून आपण स्वराज्याच्या लख्ख प्रकाशात प्रवेश केला.

(सदराचे लेखक शल्यचिकित्सक असून, अठराव्या शतकातील मराठेशाहीच्या इतिहासावर त्यांनी काही पुस्तकं लिहिली आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI IPL 2024 : लखनौनं मुंबईची कडवी झुंज काढली मोडून; गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर झेप

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT