kalidas aapet
kalidas aapet sakal
सप्तरंग

हिंडता-फिरता कणखर संघटक

हेरंब कुलकर्णी herambkulkarni1971@gmail.com

शेतकरीदिंडी प्रत्येक गावच्या सोसायटीच्या परिसरात पोहोचते आणि निरांजन लावून ‘जयदेव जयदेव जय सहकारदेवा’ अशी सोसायटीची आरती केली जाते...

शेतकरीदिंडी प्रत्येक गावच्या सोसायटीच्या परिसरात पोहोचते आणि निरांजन लावून ‘जयदेव जयदेव जय सहकारदेवा’ अशी सोसायटीची आरती केली जाते... बीड जिल्ह्याच्या ११ तालुक्यांत १५ दिवस अशी दिंडी फिरत फिरत शेवटी सहकार राज्यमंत्र्यांच्या घरासमोर जाते...दिंडीचा विषय कर्जातला भ्रष्टाचार हा होता. गावोगावच्या सोसायट्यांनी गरीब शेतकऱ्यांना देण्यासाठी जिल्हा बँकेकडून ९९२ कोटीची कर्जं उचलली व स्वत:च वापरली. कर्ज भरण्याच्या नोटिसा मात्र गरीब शेतकऱ्यांना आल्या. तो भ्रष्टाचार उघड करण्यासाठी शेतकरीदिंडी गावोगावी काढली गेली होती. ९९२ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार उघड झाला. जवळपास तीन हजार व्यक्तींवर गुन्हे दाखल झाले आणि बघता बघता ६०० कोटी रकमेचा भरणाही त्या संचालकांनी करून टाकला...सहकारातील भ्रष्टाचाराची तड अशी जनतेच्या रेट्यानं लावणारा हा बिनीचा कार्यकर्ता आहे कालिदास आपेट (९८२२०६१७९५).

बीड जिल्ह्याच्या अंबेजोगाई तालुक्यात गिरवली इथं राहणारे आपेट हे शेतकरी-कार्यकर्ते. शेतकरी कुटुंबात वाढलेले आपेट यांचे वडीलबंधू शरद जोशी यांच्या ‘शेतकरी संघटने’चे कार्यकर्ते. जोशी यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या कर्तव्यासंदर्भात लिहिलेलं पत्र बारावीत असताना आपेट यांच्या वाचनात आलं. ते पत्र वाचून आपेट अतिशय अस्वस्थ झाले. आयुष्यात नेमकं काय करायचं आहे हे ध्येय त्या काळात नक्की झालं.

अंबेजोगाईच्या ‘ज्वारी परिषदे’च्या संयोजनात ते कार्यकर्ते झाले आणि परिषद यशस्वी केल्यावर त्यांना अडीच वर्षं जोशी यांच्यासमवेत आंबेठाण इथं राहण्याची संधी मिळाली. तिथं सततच्या संवादानं भूमिका पक्की झाली. तिथं सुरू असणाऱ्या प्रशिक्षणाची जबाबदारी, ‘शेतकरी-संघटक’ या नियतकालिकाची जबाबदारी व इतर कामं यांमुळे ऐन विशीत आपेट हे कार्यकर्ते म्हणून घडले.

तिथून आल्यावर ‘मराठवाडा’ या तत्कालीन दैनिकात आपेट यांनी उपसंपादक म्हणून काम केलं. नंतर ‘शेतकरी संघटने’चं काम सुरू झालं, तेव्हापासून आजपर्यंत आपेट हे रस्त्यावरची लढाई लढतच आहेत. नंतर लग्न झालं. त्याच काळात झोनबंदीसाठी हातोडामोर्चा जोशी यांनी काढला होता. लग्नाच्या त्या अगदी सुरुवातीच्या काळातच पत्नीसह ते त्या मोर्च्यात हातात हातोडा घेऊन सहभागी झाले. त्या काळात एकाधिकार खरेदीमुळे कापूस इतर राज्यांत जाऊन विकायला बंदी होती; पण त्या राज्यांतच कापसाला चांगला भाव होता. आपेट यांनी ही बाब शेतकऱ्यांच्या लक्षात आणून दिली आणि ५९ ट्रक कापूस गोळा केला व आंध्र प्रदेशात जाऊन विकून कायदेभंग केला. असं सलग चार वर्षं केलं. त्याच काळात, कृत्रिम धाग्यांपासून तयार करण्यात येणाऱ्या वस्त्रांची होळी करावी, अशी अशी हाक जोशी यांनी दिली. त्यानुसार, कृत्रिम धाग्याच्या कपड्यांच्या गावोगाव होळ्या करण्यात आल्या. जोशी यांचा प्रत्येक कार्यक्रम संपूर्ण मराठवाड्यात आपेट कमालीचा यशस्वी करत. शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्यासाठी कर्जमाफीचे फॉर्म भरावेत व ते न्यायालयात जमा करावेत, असा कार्यक्रम ठरल्यावर आपेट व त्यांच्या सहकाऱ्यांनी पाच हजार शेतकऱ्यांचे फॉर्म भरून जमा केले. स्त्री-पुरुषसमानतेची नुसती भाषा न बोलता महिलांच्या नावावर शेती करावी असं ‘लक्ष्मीमुक्ती आंदोलन’ जोशी यांनी सुरू केलं व ‘ज्या गावात १०० पुरुष पत्नीच्या नावावर जमिनी करतील त्या गावाला मी भेट देईन,’ असं जाहीर केलं. आपेट व त्यांच्या कार्यकर्त्यांनी ८३ गावांत ही कामगिरी करून दाखवली. या ८३ गावांत १०० पेक्षा जास्त कुटुंबांत शेती महिलांच्या नावावर झाली.

आपेट म्हणतात, ‘या एका कृतीनं आमची स्त्रियांकडे बघण्याची दृष्टी बदलली.’

सतत आंदोलनं केल्यानं आपेट यांच्यावर अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. ते गमतीनं म्हणतात, ‘बीड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील तुरुंग मी आतून बघितले आहेत...’

आपेट म्हणाले :‘‘खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, मारहाण असे काहीही गुन्हे पोलिसांनी आमच्यावर दाखल केले. असे ३० ते ४० गुन्हे दाखल झाले. त्या तारखा वर्षानुवर्षं सुरू असतात. वेगवेगळ्या कोर्टांत जावं लागतं. खूप मन:स्ताप होतो. पुरुषांनी जमिनी नावावर करूनसुद्धा तलाठी व प्रशासन ती प्रक्रिया पूर्ण करत नव्हतं. त्यातून संघर्ष झाला. पुन्हा गुन्हे दाखल झाले.’’

आपेट यांनी केवळ आंदोलनंच केली असं नव्हे तर, त्यांच्या पाठपुराव्यानं काही महत्त्वाचे निर्णयही झाले. पीककर्जासाठी ‘बे बाकी’ (इतर बँकाचं कर्ज नसल्याचा NOC दाखला) प्रमाणपत्र मागितलं जातं. प्रत्येक बँक त्यासाठी ५० रुपये घेते. सर्व बँकांचे मिळून हजार रुपयांपेक्षा जास्त पैसे द्यावे लागत व कर्मचारी ती रक्कम बँकेतही जमा करत नसत. आपेट यांनी पाठपुरावा करून पीककर्जासाठी असं प्रमाणपत्र आवश्यक नसल्याचा नियम करायला लावला व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे अक्षरश: लाखो रुपये वाचले. त्यांनी एका आंदोलनांतर्गत, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांना त्यांच्या केबिनमध्ये कोंडून ठेवलं व नंतर चर्चा करून ‘इलेक्ट्रॉनिक काट्यावर वजन करावं व पावती द्यावी,’ असं पत्रक काढायला लावलं. प्रत्येक आंदोलनात धोरणात्मक निर्णय व्हावेत हा आपेट यांचा प्रयत्न असतो.

हे सारं करताना घरच्या आघाडीवर कुटुंबाची ओढाताण होत होती. जोशी यांच्या आवाहनानुसार आपेट यांनी सोयाबीनप्रक्रिया उद्योग काढला; पण तो बुडाला व ते कर्ज फेडण्यासाठी शेती विकावी लागली. दुकान बंद पडलं. अल्पभूधारक जिरायत जमीन फक्त उरली. पत्नी शिवणकाम करते. त्यातून प्रपंच चालतो...एका मुलीच्या जन्मानंतर आपेट दाम्पत्यानं कुटुंबनियोजन केलं व कार्यकर्ता म्हणून इतरांना आदर्श घालून दिला. बिकट आर्थिक परिस्थितीतही आपेट यांनी आपल्या मुलीला डॉक्टर केलं आहे. ३० वर्षं कार्यकर्ता म्हणून भटकताना हे समाधान गाठीशी असल्याचं आपेट सांगतात.

शेतकऱ्यांच्या आत्महत्या बीड जिल्ह्यातही मोठ्या संख्येनं झाल्या.

‘असे नैराश्य आल्यास माझ्याशी संपर्क करा,’ असं आवाहन आपेट सातत्यानं करतात. त्यातून शेकडो शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त केल्याचं आपेट अभिमानानं सांगतात. शेतकरी संघटना जिथं आहेत तिथं शेतकऱ्यांना आधार वाटतो व नैराश्य येत नाही, असं त्यांचं निरीक्षण आहे. सध्या रघुनाथदादा पाटील यांच्या ‘शेतकरी संघटने’चे ते महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष आहेत.

राज्यभर फिरून ते आंदोलनांत भाग घेतात. खुल्या आर्थिक धोरणाचे ते समर्थक आहेत. शेतीमालाची निर्यातबंदी उठवली पाहिजे, त्यातून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटायला मदत होईल, असा विश्वास त्यांना आहे.

शेतकऱ्यांच्या कुटुंबातील नवीन शिकलेली पिढी या सर्व प्रश्नांवर जागरूक आहे असं वेगळं निरीक्षण आपेट नोंदवतात. वयाच्या अठराव्या वर्षापासून आज सलग ३५ वर्षं हा शेतकरी-कार्यकर्ता संपूर्ण मराठवाड्यात लढतो आहे. मोठं वाहन नसताना मोटारसायकलनं प्रवास करत त्यांनी भक्कम असं संघटन बांधलं आहे. शरद जोशी यांनी महाराष्ट्राला दिलेले असे कार्यकर्ते हे चळवळीचं वैभव आहे.

(सदराचे लेखक हे शिक्षण व सामाजिक चळवळींत कार्यरत असून विविध विषयांवर लेखन करतात.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Laughter Day 2024 : हसा लोकांनो हसा! तणाव,हृदयविकाराची करायचीय सुट्टी तर फक्त हसा, हसण्याचे ढिगभर फायदे

IPL 2024, RCB vs GT: विराटचा जबरदस्त डायरेक्ट थ्रो, तर विजयकुमारचा सूर मारत भन्नाट कॅच, पाहा Video

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य (०५ मे २०२४ ते ११ मे २०२४)

Latest Marathi News Live Update : प्रचाराचा आज सुपरसंडे, तोफा थंडावणार; जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी

Sakal Podcast : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला ते रावेरमध्ये लोकसभेत कोण बाजी मारणार?

SCROLL FOR NEXT