teacher mahboob sayyad sakal
सप्तरंग

सामाजिक बांधिलकी जगणारा शिक्षक

घरात शिक्षणाचं वातावरण नाही...मित्रांची चुकीची संगत यामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष झालं व सय्यद हे बारावीत दोनदा नापास झाले. पुढं परीक्षाही दिली नाही.

हेरंब कुलकर्णी herambkulkarni1971@gmail.com

घरात शिक्षणाचं वातावरण नाही...मित्रांची चुकीची संगत यामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष झालं व सय्यद हे बारावीत दोनदा नापास झाले. पुढं परीक्षाही दिली नाही.

बारावीला दोनदा नापास झालेला मुस्लिम तरुण मराठीचा प्राध्यापक होतो... डॉक्टरेट मिळवतो व प्राध्यापकी करताना कामगारचळवळीत मोठे संघर्ष करतो...सांस्कृतिक चळवळी करतो... नोकरी सांभाळून उरलेला वेळ सामाजिक कामासाठी कसा वापरता येतो याचा वस्तुपाठ असलेले हे प्राध्यापक आहेत नगरचे महबूब सय्यद (९०७५४५९४४८).

घरात शिक्षणाचं वातावरण नाही...मित्रांची चुकीची संगत यामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष झालं व सय्यद हे बारावीत दोनदा नापास झाले. पुढं परीक्षाही दिली नाही. ‘स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया’ या विद्यार्थी-संघटनेशी नंतर ते संलग्न झाले. कॉम्रेड सुभाष थोरात यांच्यामुळे कार्ल मार्क्स, शहीद भगतसिंग, महात्मा जोतीराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पुस्तकं वाचू लागले. कॉम्रेड कुमार शिराळकर यांचं ‘ऊठ वेड्या, तोड बेड्या’ हे पुस्तक त्यांच्या वाचनात आलं आणि आयुष्य बदललं.

बारावी नापास झाल्यानंतर पुढं शिकायचं नाही असं सय्यद यांनी ठरवलं होतं; पण पुस्तकांची गोडी लागल्यानंतर त्यांनी परत बारावीची परीक्षा दिली. नंतर पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात एमए मराठी प्रथम वर्गात पास होऊन नंतर ते सेटची परीक्षाही पास झाले.

प्राध्यापकाची नोकरी शोधताना वाईट अनुभव आल्याचं सय्यद सांगतात. अनेक ठिकाणी तर अर्जच गहाळ होण्याचेही प्रकार झाले. शेवटी, टाकळी ढोकेश्वर इथं प्राध्यापकाची नोकरी लागली. कम्युनिस्ट-चळवळीत गेल्यावर विविध आंदोलनात ते सहभागी झाले.

सन १९८६ चं नवं शैक्षणिक धोरण रद्द करण्यासंदर्भात, ‘फॉरेस्ट आणि गायरान जमिनीं’वरील अतिक्रमणांबाबत व गुहागर येथील एन्रॉन प्रकल्प रद्द व्हावा यासाठीच्या आंदोलनांत त्यांचा सहभाग होता.

सध्या ‘सिटू’ याकामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून ते काम करतात. असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या ‘आशा’ कर्मचारी, अर्धवेळ स्त्री-परिचर, खासगी कंपनीत काम करणारे कामगार, बांधकामकामगार, रेल्वे मालधक्क्यावरील माथाडी कामगार, घरकामगार या असंघटित क्षेत्रातील कामगारांना संघटित करून त्यांचे प्रश्न सय्यद सोडवतात. कोरोनाकाळात कामगारांना त्यांच्या गावी जाण्यासाठीची व्यवस्था त्यांनी केली. एमआयडीसीतील कारखाने सुरू झाले पाहिजेत यासाठी प्रयत्न केले.

कोरोना महामारीच्या साथीचा फायदा घेत जिल्ह्यातील अनेक भांडवलदारांनी आपल्या कामगारांना वेतन आणि इतर कायदेशीर हक्क डावलले होते, तसंच ‘काम नाही’ या सबबीखाली कामगारकपातीचं धोरण स्वीकारलं होतं. या सर्वांच्या विरोधात सर्व कामगारांना बरोबर घेऊन लॉकडाउनच्या काळातील वेतन, इतर कायदेशीर हक्क आणि काम नेमून द्यावं यासाठी सय्यद यांनी प्रयत्न केले.

नगर शहरातील भाजीबाजार आणि फळबाजार हा शहराबाहेर जाणार होता, त्या वेळी त्यांनी प्रशासनाच्या विरोधात भूमिका घेतली. कोरोनाकाळाचा आधार घेत शासनानं रस्त्यावर कृती-कार्यक्रम करायला कामगारांना बंदी घातली होती. अशा वेळी कोरोनाविषयक सर्व नियमांचं पालन करत त्या वर्षी ता. १३ जून रोजी कॉम्रेड भैरवनाथ वाकळे, रामदास वागसकर आणि सय्यद असा अवघ्या तीन लोकांचा मोर्चा नगर जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला होता!

कामगारक्षेत्रात अशा प्रकारचं काम करत असतानाच स्त्री-पुरुष समता प्रस्थापित व्हावी यासाठी, तसंच स्त्रीअत्याचारांच्या विरोधात सय्यद यांनी अनेक आंदोलनं केली.

शेतकरीकायदे मागं घेण्याच्या मागणीसाठी ट्रॅक्टर-रॅली व चक्का जाम, हुतात्मा जवानांसाठी आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये बळी पडलेल्या शेतकऱ्यांसाठी ‘कॅंडल-मार्च’, देशव्यापी ‘रेल रोको’, रेल्वे माथाडी-हमाल-कामगारांना काम द्यावं यासाठी सहाशे कामगारांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, कोरोनाकाळात महापालिकेनं घरपट्टी माफ करावी यासाठी आंदोलन, एमआयडीसीमध्ये कामगारांसाठी रुग्णालय असावं यासाठी पाठपुरावा अशी विविध आंदोलनं सय्यद यांनी केली.

सध्या सय्यद नगरच्या ‘न्यू आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज’ येथे प्राध्यापक आहेत.

‘‘नोकरी करून इतकी कामं कशी करता? नोकरीकडे दुर्लक्ष होत नाही का?’ असं विचारल्यावर सय्यद म्हणाले, ‘सकाळी साडेसात ते साडेबारा या कालावधीत महाविद्यालयात असतो व त्यानंतरचा उर्वरित वेळ कामासाठी देतो. नोकरी करत असताना तेथील उपक्रमांत पूर्णतः सहभागी असतो; पण रविवारसह सर्व सुट्ट्या मात्र कामासाठी राखून ठेवतो. सुट्टीच्या कालावधीत राज्यात, जिल्ह्यात संघटनेसाठी प्रवास करतो. त्यामुळे नोकरी करूनही ही सारी कामं करता येतात.’’

साहित्यिक व सांस्कृतिक प्रबोधनाच्या विविध कार्यांतही सय्यद सतत सक्रिय असतात. ‘नारायण सुर्वे आणि दुष्यंतकुमार यांच्या कवितांचा तौलनिक अभ्यास’ या वेगळ्या विषयावर त्यांनी प्रबंध लिहिला आहे. या प्रबंधाला पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेकडून त्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट प्रबंधलेखनाचा पुरस्कार मिळाला.

सय्यद यांच्या तोंडून चळवळीशी निगडित हिंदी कविता, शेरो-शायरी ऐकणं हा वेगळा अनुभव असतो. शेकडो कविता त्यांना पाठ आहेत.

‘मुस्लिम मराठी साहित्य : एक आकलन’ अशी पुस्तिकाही सय्यद यांनी लिहिली असून, मराठी साहित्यातील मुस्लिम मराठी साहित्याची चिकित्सा करणारी ही पहिली पुस्तिका आहे असं ते सांगतात. तीत मराठी संतकवींनी केलेली रचना, मराठी साहित्यातील मुस्लिमांचं चित्रण, मुस्लिम ओबीसी चळवळ, मुस्लिम मराठी साहित्याची भूमिका इत्यादी विषयांचा ऊहापोह आहे. सन १९९९ मध्ये मुंबईत धारावी येथे भरलेल्या पहिल्या विद्रोही साहित्य संमेलनात नगर जिल्ह्यातून सुमारे शंभरच्या आसपास कार्यकर्ते आणि विद्यार्थी-विद्यार्थिनीसह सय्यद सहभागी झाले होते. विविध सांस्कृतिक उपक्रमही ते राबवतात.

‘‘एक मुस्लिम कार्यकर्ता या नात्यानं मुस्लिमांच्या विकासाची दिशा काय असावी, तुमच्या मते?’’ असं विचारल्यावर ते म्हणाले : ‘‘या देशात डाव्या, लोकशाहीवादी आणि धर्मनिरपेक्ष शक्ती यांच्या विचारांतच मुस्लिमांची सुरक्षितता आणि त्यांचा विकास सामावलेला आहे. आधुनिक काळात मुक्तीचा मार्ग शिक्षणातून जातो, हे वास्तव लक्षात घेतल्यानंतर शिक्षण मिळालं तरच मुस्लिमांचा विकास होईल यात काहीच शंका नाही.’’

नापास झाल्यावर शाळा सोडलेला एक विद्यार्थी वाचनाच्या बळावर पुढं प्राध्यापक होतो...गरिबांच्या चळवळीचं नेतृत्व करतो आणि नोकरी सांभाळून किती प्रकारची कामं केली जाऊ शकतात याचा वस्तुपाठ घालून देतो... उद्याच्या (ता. पाच सप्टेंबर) शिक्षकदिनानिमित्त शिक्षकासाठी सय्यद यांचं हे उदाहरण प्रेरक ठरावं.

आपण कार्यकर्ता का आहोत, हे सांगताना सय्यद हे त्यांच्या आवडत्या दुष्यंतकुमार यांच्या शब्दात ती भूमिका स्पष्ट करतात -

मुझ में रहते हैं करोड़ों लोग, चुप कैसे रहूँ?

हर ग़ज़ल अब सल्तनत के नाम एक बयान है।

(सदराचे लेखक हे शिक्षण व सामाजिक चळवळींत कार्यरत असून विविध विषयांवर लेखन करतात.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना लगावला टोला, म्हणाले...

SCROLL FOR NEXT