kishori janorikar
kishori janorikar 
सप्तरंग

'भेंडीबझार गायकी जतन करणं हे कर्तव्य' (किशोरी जानोरीकर)

किशोरी जानोरीकर

"मी गायिका व्हावं,' यात माझे प्रयत्न तर आहेतच; पण त्यात फार मोठा वाटा माझ्या गुरूंचाही आहे; म्हणूनच संगीतक्षेत्रात गुरूवर नितांत श्रद्धा व विश्‍वास ठेवून साधना करणं आवश्‍यक असतं. शिवाय, गुरूंचाही आशीर्वाद, संकल्प आपल्या साधनेला बळ देत राहतोच.

ही सन 2005 मधली गोष्ट आहे. एका रविवारी आमच्या घरी माझे सासरे त्र्यंबकराव जानोरीकर, म्हणजेच दादा, यांना भेटायला त्यांच्या शिष्या डॉ. सुहासिनीताई कोरटकर आल्या होत्या. त्या दोघांमध्ये काहीतरी चर्चा चालली होती. मी चहा देण्यासाठी त्यांच्याजवळ गेले, तेव्हा सुहासताई एकदम म्हणाल्या ः ""अगं, तू भोपाळला माझी शिष्या म्हणून माझ्याआधी अर्धा तास गाशील का?'' हे ऐकून मी थक्कच झाले आणि काहीशी घाबरून त्यांना म्हणाले ः ""अहो, सध्या मी रियाजात नाही. मला गाता येईल का?''
""अगं, उत्तम गाशील तू,'' असं त्यावर त्या पटकन म्हणाल्या.
प्रापंचिक अडचणींमुळे माझी संगीतसाधना थोडी थांबली होती. या प्रसंगानंतर ती जोरदार सुरू झाली. पुढं भोपाळच्या कार्यक्रमात मी उत्तम गायले. मी दादांकडं शिकत होते तरी भोपाळच्या त्या कार्यक्रमात मी सुहासताईंची शिष्या म्हणून गायले. दादांनीच माझी तयारी करून घेतली. "मी चांगलीच गाणार'
असा जणू या माझ्या दोन्ही गुरूंचा संकल्पच होता, असं मला वाटतं.
शिष्य जसा संगीताची साधना करत असतो, तसा "एखादा शिष्य तयार व्हावा' हा गुरूचाही संकल्प असतो.

माझी आई विमल कुलकर्णी व बहीण कुंदाताई या गात असल्यामुळे संगीताचं बाळकडू मला लहानपणीच मिळालं. मात्र, संगीताच्या माझ्या रीतसर शिक्षणाची सुरवात जरा उशिराच झाली. दहावी झाल्यावर आईनं मला गंगाधरबुवा पिंपळखरे यांच्याकडं शिकायला पाठवलं. त्यांनी प्राथमिक शिक्षण - म्हणजे सुरांचे पलटे, तानांचा रियाज - फार चांगला करून घेतला. ते फार प्रेमानं शिकवत असत. क्‍लास बुडवलेला त्यांना चालत नसे. एखाद्या वेळी क्‍लासला जायला जमायचं नाही.
अशा वेळी, मी क्‍लासला का आले नाही, हे जाणून घेण्यासाठी ते दुसऱ्या मुलीला आमच्या घरी पाठवत असत.

पुढं मी पुण्यात एसएनडीटी विद्यापीठातून संगीतात एमए केलं. त्या वेळी डॉ. सुनीता खाडिलकर व डॉ. वीणाताई सहस्रबुद्धे यांची तालीम मिळाली. तेव्हा खरी शास्त्रीय गायनाची गोडी निर्माण झाली. संगीत हे किती व्यापक आहे व रियाज करणं हे किती महत्त्वाचं आहे हे लक्षात आलं. संगीतात विद्यापीठात दुसरा क्रमांक मिळाला आणि "गानहिरा' पारितोषिक मिळालं. "एमएची पदवी ही सर्वोच्च नसून, संगीताच्या सागरात विहार करण्यासाठीचा पास आहे,' असं वीणाताईंनी सांगितलं. त्याची प्रचीती आजही येते. त्या वेळी वीणाताईंच्या गाण्याच्या साथीला बसण्याचा योग आला. त्यांची गाण्यातली कुशलता, जिद्द, चिकाटी व राहणीतला साधेपणा खूप काही शिकवून गेला. ती एमएची दोन वर्षं अगदी वीणाताईमय होऊन गेली होती.

पूर्वपुण्याईनं लग्नानंतर घरातच मला भेंडीबझार घराण्याचे ज्येष्ठ गायक त्र्यंबकराव जानोरीकर यांच्याकडं शिकण्याचा योग आला. कारण, मी त्यांची सून झाले होते. शास्त्रीय संगीत म्हणजे काय, हे कळेपर्यंतच माझी गायकी बदलली होती. भेंडीबझार घराण्याची गायकी ही कणयुक्त आहे. रागाच्या प्रकृतिस्वरूप रागाचं प्रस्तुतीकरण इथं होत असतं. यात आलापीसाठी "खंडमेर' हे तत्त्व वापरलं जातं. दीर्घ मिंड, स्वरांची आंतरिक लय, गमकयुक्त तान ही काही याची वैशिष्ट्यं सांगता येतील. सरगमलाही महत्त्व आहे. स्वर-लयीबरोबरच शब्दांनाही महत्त्व दिलं जातं. भेंडीबझार घराण्याच्या अनेक बंदिशी प्रसिद्ध आहेत. विलंबित गायकीबरोबर मध्य लयीचीही गायकी गायली जाते. मध्य एकतालाबरोबर, मध्य रूपकही खूप गायला जातो.
सुरवातीला दादांनी मला आवाज लावायची पद्धत शिकवली. अलंकार, पलटे, ओंकारसाधना सांगितली. रागांची स्वरूपं कळण्यासाठी अनेक सरगम त्यांनी मला बसवून दिल्या. गुंजनयुक्त आवाज कसा लावायचा, गमकेची तान, वैशिष्ट्यपूर्ण मिंड, सरगम अशा अनेक गोष्टी शिकवल्या. ""आता तुला
कळलं नाही तरी शिकवून ठेवतो. पुढं तुला कळेल,'' असं म्हणून ते मला शिकवत राहायचे.

आणि खरंच तेव्हा या गोष्टी कळत नव्हत्या. गुरू घरातलाच असल्यामुळे जरा बेफिकरीची वृत्ती होती; पण आज त्यांच्या म्हणण्याचं महत्त्व लक्षात येत आहे. ता. 23 नोव्हेंबर 2006 रोजी दादा नादब्रह्मात विलीन झाले.
""माझ्यानंतर सुहास (सुहासिनीताई कोरटकर) तुला शिकवेल,'' हे दादांनी सांगून ठेवलं होतं; त्यामुळे माझा संगीताचा पुढचा अभ्यास सुहासताईंकडं सुरू झाला. दादांनी भेंडीबझार घराण्याची गायकी शिकवली; पण सुहासताईंनी ती उलगडून दाखवली. मनन, चिंतन करायला शिकवलं. घराण्याच्या खास रागांची, उदाहरणार्थ ः हेम, खेम, जोग, हंसध्वनी, नागस्वरावली, प्रताववराळी आदींची तालीम दिली. अमान अली खॉंसाहेबांच्या बंदिशी शिकवल्या; त्यामुळे त्यांचं "अमर बंदिशें' हे पुस्तक व सीडी प्रसिद्ध झाली, तेव्हा त्या सीडीसाठी मला गाता आलं व या कामाला हातभार लावता आला.

सुहासताई शिकवताना खूप शिस्तप्रिय होत्या. क्‍लासला गेल्यावर गप्पा न मारता गाणंच झालं पाहिजे, यावर त्यांचा कटाक्ष असायचा. त्या समजावून फार उत्तम सांगत असत. प्रत्येक वेळी वेगळा मुखडा घेऊन त्या समेला येत. बोलबाट करताना इतकी विविधता असे की त्यात रंगून जायला होई.
सुहासताईंनी "निगुनी' या नावानं अनेक उत्तम बंदिशी रचलेल्या आहेत व त्या सगळ्या त्यांनी मला शिकवलेल्या आहेत. संगीतसाधकांना व अभ्यासकांना त्यांचा उपयोग व्हावा म्हणून आता या बंदिशींची सीडी व नोटेशनसहित पुस्तकही येत असून, येत्या 29 नोव्हेंबरला त्याचं प्रकाशन होईल. केवळ गुरुकृपेमुळेच हे कार्य माझ्याकडून होत आहे.

भेंडीबझार घराण्याचे अनेक महोत्सव दिल्ली, गोवा, मुंबई, नाशिक, पुणे इथं झाले आहेत. या सर्व महोत्सवांत मला भाग घेता आला आणि ही गोष्ट मला देवपूजेइतकीच महत्त्वाची वाटते!
"भेंडीबझार गायकी' या विषयावर मी पुणे विद्यापीठातल्या ललित कला केंद्रात, एसएनडीटी विद्यापीठात लेक्‍चर डेमो सादर केले आहेत. "अमर बंदिशी', "निगुनी बंदिशी' असे बंदिशींवरचे कार्यक्रमही मी सादर करते.
दिल्लीच्या "सामप' संस्थेतला कार्यक्रम, मुंबईच्या एनसीपीएलमधला कार्यक्रम हे माझ्या दृष्टीनं महत्त्वाचे आहेत; पण एखाद्या छोट्या कार्यक्रमातली उत्स्फूर्त दादसुद्धा खूप समाधान व हुरूप देऊन जाते.

एकाच घराण्यातल्या दोन महान गुरूंकडून मला शिकायला मिळालं; त्यामुळे भेंडीबझार घराण्याच्या शास्त्रशुद्ध गायकीचा अभ्यास करता आला आणि याचा मला अभिमान आहे. "मी गायिका व्हावं,' यात माझे प्रयत्न तर आहेतच; पण फार मोठा वाटा माझ्या गुरूंचाही आहे; म्हणूनच संगीतक्षेत्रात गुरूवर नितांत श्रद्धा व विश्‍वास ठेवून साधना करणं आवश्‍यक असतं. शिवाय, गुरूंचाही आशीर्वाद, संकल्प आपल्या साधनेला बळ देत राहतोच.

मधल्या काळात भेंडीबझार गायकी लुप्त होत चालली होती. तिचं जतन व संवर्धन करण्यासाठी माझे दोन्ही गुरू त्र्यंबकराव जानोरीकर व सुहासिनीताई कोरटकर हे दोघंही आयुष्यभर झटले. भावी काळात त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करणं ही माझी जबाबदारी, माझं कर्तव्य आहे. मला त्यासाठी दोन्ही गुरूंचे आशीर्वाद आहेत.
दोन्ही गुरूंनी खूप शिकवून ठेवलेलं आहे. त्याचं मनन-चिंतन व रियाज करताना एक जन्मसुद्धा पुरणार नाही. त्यामुळे संगीतसाधनेची ज्योत मनात अखंड तेवत ठेवणं हे पुढच्या आयुष्यातलं माझं ध्येय राहणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

T20 World Cup 2024: 'हार्दिकच्या जागेसाठी मोठी चर्चा, तर सॅमसन...', टीम इंडिया निवडीवेळी काय झालं, अपडेट आली समोर

LSG vs MI IPL 2024 Live : नेहलची झुंजार खेळी, टीम डेव्हिडची हाणामारी; मुंबईनं लखनौसमोर ठेवलं 145 धावांचे आव्हान

Covishield Vaccine : शरीरात रक्ताच्या गाठी होण्याचा धोका अन् हृदयासह मेंदूवर दुष्परिणाम; कोविशिल्ड लशीमुळे होणारा TTS काय आहे?

KL Rahul T20 WC 2024 : शुन्य दिवसांपासून... भारतीय संघाची घोषणा होताच लखनौने वगळलेल्या केएलसाठी केली पोस्ट

SCROLL FOR NEXT