marathi features in Saptarang
marathi features in Saptarang 
सप्तरंग

तुकड्यातली जगबुडी! (संजय कळमकर)

संजय कळमकर

देवेंद्रांनी ब्रह्मदेवाला विचारलं : 'पृथ्वीवर निर्माण केलेल्या मानवाला तुम्ही प्रगतीचं वरदान दिलं. त्याला मुखपोकळी देऊन त्यातून भाषा निर्माण होईल अशी सोय केली. बोलल्यामुळे माणसं एकमेकांचे विचार समजून घेऊ लागली. त्यातून त्यांचा सुसंवाद घडून माणूस माणसाच्या जवळ आला; परंतु आजकाल आम्ही पाहतो की माणसं माणसांशी बोलतच नाहीत. कुठला तरी चपटा तुकडा हातात घेऊन त्याच्याशीच खेळत बसतात. माणसाची भाषा व सहसंबंध हरवत चालले आहेत. माणूस त्या तुकड्यात स्वतःला हरवून-विसरून जात मुका व्हावा, अशी कोणती जादू त्या चपट्या तुकड्यात आहे?' 

यावर ब्रह्मदेव विषादानं म्हणाले : 'त्या चपट्या तुकड्याला मोबाईल असं म्हणतात, महाराज! तो मानवी बुद्धीचा शोध आहे, आविष्कार आहे. पृथ्वीवर काही माणसं अक्कल वापरून काही साधनं तयार करतात आणि बाकीची माणसं त्या साधनांत आपली सारी अक्कल हरवून बसतात. त्या चपट्या तुकड्यामुळे माणसं मुकी होऊन आभासी जगात जगू लागली आहेत.' 

देवेंद्रांनी विचारलं : 'त्यात एवढं आहे तरी काय?' 

यावर ब्रह्मदेव म्हणाले : 'काय नाही ते विचारा, महाराज! सांगायचंच झालं तर त्यात ट्विटर नावाचा एक प्रकार आहे. बहुतेक थोर, बुद्धिजीवी माणसं त्याचा वापर करतात. अर्थात ते कुणीही वापरू शकतं; परंतु त्या प्रांतातले लोक व्हाट्‌सऍप, फेसबुक वापरणाऱ्यांच्या तुलनेत काहीसे वेगळे असतात. समाजाचं, मीडियाचं आपल्याकडं दुर्लक्ष होत आहे, असं काही मोठ्या लोकांना वाटलं की ते लोक हेतुपुरस्पर काहीतरी खळबळजनक ट्विट करतात. त्यावरून वादळ उठतं आणि त्या थोर व्यक्तीचंही अस्तित्व सगळ्यांच्या नजरेस नव्यानं येतं. मात्र, काही ट्विटमुळे चांगले संदेशही जातात आणि समस्याही सुटतात.

अनेक शहाणी माणसं यावर रोज टिटवीसारखी टिवटिव करत असतात. नंतरचा प्रकार आहे फेसबुक. गल्लीत एकही मित्र नसलेला माणूससुद्धा यावर पाच हजार मित्र जोडू शकतो. यावर काही माणसं खरं रूप लपवून आपली खोटी प्रतिमा तयार करतात. एखादा सुंदर चेहरा स्वतःचा म्हणून दाखवतात. त्यामुळे फ्रेंड रिक्वेस्ट जास्त येतात! प्रत्यक्ष पाहिल्यावर भ्रमनिरास होतो हा भाग वेगळा. फेसबुकवर बहुतेकजण स्वतःचे वाढदिवस जोरात साजरे करून घेतात. पूर्वीच्या काळी काही कर्तृत्व असलेल्या लोकांचेच वाढदिवस साजरे केले जात असत. आता जो जन्माला येतो त्याचा वाढदिवस कम्पलसरी साजरा केला जातो. समाजकंटकांनाही शुभेच्छा देणारे लोक फेसबुकवर आढळतात. काही लोकांना तर फेसबुक म्हणजे आपल्या धर्माच्या प्रसारासाठी निर्माण झालेला दैवी चमत्कारच वाटतो. त्यामुळे समाजात कलह निर्माण होऊ शकतो, हे अशा मंडळींच्या गावीही नसतं. कायम चॅटिंगची सवय असलेली दोन माणसं प्रत्यक्ष भेटली तरी बावरून जातात. डोळ्यात डोळे घालून बोलण्याची हिंमत त्यांच्यात राहत नाही. फेसबुकच्या माध्यमानं संबंध येऊन दोन संसार उभे राहिले तरी चार मोडल्याची उदाहरणंही आहेत. अनेकांची आर्थिक फसवणूक झाल्याच्याही काही घटना घडल्याचं सांगण्यात येतं. अर्थात हे माध्यम विवेकानं वापरलं तर त्याचे अनेक फायदे आहेत; पण माणसाला टरबुजाबरोबरच बिया गिळण्याचीही वाईट सवय आहे. त्याला आपण काय करणार, महाराज! 

यापेक्षा व्हाट्‌सऍप हा प्रकार लोकांना फारच प्रिय आहे. लोकलच्या डब्यात जशी गर्दी असते तशी इथं माणसांची गर्दी असते. तेवढाच कोलाहलही असतो. प्रत्येकाची व्यक्त होण्यासाठी नुसती धांदल उडालेली असते. माणसं रात्री-बेरात्री, मनात येईल तेव्हा काहीही आणि कसेही व्यक्त होतात. ग्रुपचं नाव, डीपी आणि स्टेटसवरून ज्या त्या माणसाची एकंदर लायकी लक्षात येते. काही माणसं रोज स्वतःचे वेगवेगळे फोटो डीपीवर लावत असतात. ती स्वतःच्या प्रेमात अखंड बुडालेली आहेत, असं समजावं. रोज डीपी बदलणारी माणसं चंचल स्वभावाची...विनोद पोस्ट करणारी आनंदी...नकारात्मक पोस्ट टाकणारी दु:खी...प्रत्येकाच्या पोस्टला आडवं चालणारी अडेलतट्टू...कायम अपघातांच्या वा तशाच स्वरूपाच्या अप्रिय बातम्या टाकणारे विकृत...वाद घालणारे भांडकुदळ...इतरांच्या पोस्टला प्रतिक्रिया न देणारे स्वमग्न...इतरांच्या लांबलचक पोस्ट फॉरवर्ड करून, पोस्टमनगिरी करणारे परावलंबी...कविता, लघुकथा पोस्ट करणारे रसिक किंवा नवकवी...कायम व्हाट्‌सऍपवर मुक्कामी असणारे अस्वस्थ मनोवृत्तीचे... थोडक्‍यात काय तर, सार्वजनिक नळावर जमणाऱ्या बायांप्रमाणे व्हाट्‌सऍपवर अशी गर्दी साचून त्या गर्दीची कलकल अखंड सुरू असते. काहींचं आख्खं आयुष्य व्हाट्‌सऍपमय झालं असून हा छंद आता आजारात बदलत चालला आहे, महाराज! 

'अर्थात योग्य वापर केला तर व्हॉट्‌सऍपसुद्धा उत्तम माध्यम ठरू शकतं. ठरवलं तर चांगल्या कामासाठी त्याद्वारे निधी जमा होतो...हरवलेल्या व्यक्ती सापडतात...एकमेकांशी सुसंवाद घडतो...सुरक्षित अंतरावरून का होईना, नातलग परस्परांशी जोडलेले राहतात...यापेक्षा गुगल आणि यू ट्यूब हे प्रकार म्हणजे अलीबाबाची गुहाच आहे, महाराज! गुगलवर पाहिजे ती माहिती मिळते. स्वर्गातला कल्पतरूच जणू. स्वतः केलेल्या करामती माणसं यू ट्यूबवर टाकतात. त्या जगाला माहीत होतात. त्यामुळे उपेक्षित कलाकारांना चांगले दिवस आले आहेत; परंतु मनावर नियंत्रण नसलेली माणसं यावर हरवून जातात आणि नको ते पाहत बसतात. त्याचा वाईट परिणाम कोवळ्या मुलांवरही होतो. काही मुलांची वेगवेगळ्या गेम्सच्या आहारी जाऊन वाताहत झाली आहे, तर काही मुला-मुलींनी काही गेम्सच्या निर्देशानुसार सूचना पाळून आत्महत्या केल्याच्याही घटना घडल्या आहेत. माणसाच्या अन्न-वस्त्र-निवारा या गरजा बदलून आता त्या टीव्ही-मोबाईल-इंटरनेट अशा झाल्या आहेत..' 

सुस्कारा सोडत देवेंद्र म्हणाले : 'प्रगतीच्या नादात आपण दिलेल्या नियमांचं मनुष्य उल्लंघन करतो आहे. आता तर तो अवकाशात पोचला आहे. सूर्याच्या आसपास घिरट्या घालतो आहे, म्हणतात. काही दिवसांनी तर जिताजागता मनुष्य थेट स्वर्गात पोचेल की काय अशी भीती आम्हाला वाटू लागली आहे...त्याची सर्वस्वी जबाबदारी तुमची राहील. मानवाचा आत्ताच बंदोबस्त करा. नपेक्षा सरळ जगबुडी करून टाका...!' 

यावर ब्रह्मदेव हसत म्हणाले : 'जो निर्माण करतो त्याच्याजवळ विनाशाचं शस्त्रही तयार असतं. हे जग आकाराला यायला कित्येक युगं गेली. आता ते असंच सावकाशीनं संपेल. आपण जगबुडी करण्याची गरज नाही. नवीन जग निर्माण करण्याच्या नादात माणूस स्वतःचं जग आपोआप बुडवू लागला आहे. एक दिवस इंटरनेट सेवा काही कारणानं बंद झाली तर लाखो माणसं वेडीपिशी होतील...हतबल होतील...अस्वस्थ-बेचैन होऊन जातील... 

माणसानं स्वतःच स्वतःच्या विनाशाची ही अशी सोय करू ठेवली आहे. आपण निश्‍चिंत असावं, महाराज! प्रणाम. येतो आम्ही...' 

देवेंद्र हळू आवाजात म्हणाले : 'थांबा, तेवढं यमाला सांगून पृथ्वीवरून आमच्यासाठी एखादा मोबाईल आणायला सांगा. त्या चपट्या तुकड्याविषयी आम्हालाही भलतंच आकर्षण निर्माण झालं आहे.' 

प्रत्यक्षात 'हो' म्हणत ब्रह्मदेव मनाशी पुटपुटले : 'म्हणजे स्वर्गाचा विनाशही समीपच आहे म्हणायचा...!' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs KKR Live Score: दमदार सुरुवातीनंतर कोलकाताने गमावली पहिली विकेट; नवीन-उल-हकने आक्रमक खेळणाऱ्या ओपनरला धाडलं माघारी

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT