
MK Stalin's Bold Response to Thackeray Event : महाराष्ट्रात आजचा दिवस राजकीय दृष्ट्या ऐतिहासकित होता. कारण, दोन दशकानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे बंधू एकाच मुद्य्यावर एकत्र आणि एका मंचावर आले होते. यावेळी दोघांनीही अगदी जोरदार भाषणं केली. ज्यामध्ये मराठी भाषेच्या मुद्य्यावर कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे ठासून सांगितले. शिवाय, हिंदी सक्तीवरून राज्य शासन तसेच केंद्र सरकारवही टीका केली.
या मेळाव्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया उमटत असतानाच, आता थेट तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांचीही मोठी प्रतिक्रिया समोर आली आहे. विशेष म्हणजे राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात हिंदी, तामिळ भाषिक राज्यांचा उल्लेख केला होता, एवढंच नाहीतर शिक्षणाबाबत बोलताना स्टॅलिन यांच्या शिक्षणाचाही दाखला दिला होता.
एकूणच ठाकरे बंधूंच्या या मेळाव्यावर मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी एक इंस्टाग्रामवर पोस्ट लिहून प्रतिक्रिया दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की भाषेच्या हक्कांसाठीचा संघर्ष राज्यांच्या सीमा ओलांडून पुढे गेला आहे, तो आता महाराष्ट्रात वादाळाप्रमाणे जोर धरत आहे. स्टॅलिन यांनी तमिळमध्ये लिहिले आहे की, "हिंदी लादण्यापासून रोखण्यासाठी द्रविड मुन्नेत्र कळघम आणि तमिळनाडूच्या लोकांनी पिढ्यानपिढ्या चालवलेला भाषा हक्काचा संघर्ष आता राज्यांच्या सीमा ओलांडून महाराष्ट्रात वादळासारखा पसरत आहे."
याशिवाय मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी म्हटले की, 'तामिळनाडूच्या शाळांमध्ये हिंदी ही तिसरी भाषा म्हणून शिकवली तरच निधी वाटप केला जाईल, असे सांगून बेकायदेशीर आणि अराजक पद्धतीने वागणाऱ्या भाजपला महाराष्ट्रात लोकांच्या बंडाच्या भीतीने दुसऱ्यांदा माघार घ्यावी लागली आहे, जिथे ते सत्तेत आहेत. तसेच,' स्टॅलिन यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या प्रभावी भाषणांचेही कौतुक केले. उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये तिसरी भाषा कोणती असेल आणि प्रगतीशील बिगर हिंदी भाषिक राज्यांमधील लोकांवर हिंदी का लादली जात आहे या मनसे प्रमुखांच्या प्रश्नाचे केंद्राकडे उत्तर नाही असे ते म्हणाले.
राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात म्हटले होते की, 'हिंदी भाषिक राज्ये आर्थिकदृष्ट्या मागास आहेत. लोक या राज्यांमधून बिगर हिंदी भाषिक राज्यांमध्ये स्थलांतरित होत आहेत. हिंदीने त्यांची प्रगती का केली नाही?' तामिळनाडूने राष्ट्रीय शिक्षण धोरण लागू केले नसल्यामुळे निधी जारी न केल्याबद्दल स्टॅलिन यांनी केंद्रावर टीका केली. हिंदी शिकल्याने लोकांना नोकऱ्या मिळण्यास मदत होईल असा दावा करणाऱ्यांवरही त्यांनी निशाणा साधला.
तर, द्रमुक प्रमुख स्टॅलिन शाळांमध्ये विद्यार्थ्यांना त्यांची मातृभाषा आणि किमान एक भारतीय भाषा यासह तीन भाषा शिकण्याची आवश्यकता असलेल्या त्रिभाषिक सूत्राच्या विरोधात हे आघाडीवर आहेत. केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार तीन भाषा शिकणे सक्तीचे करून तामिळनाडूवर हिंदी लादू इच्छित असल्याचा दावा स्टॅलिन यांनी केला होता. सध्या तामिळनाडूत दोन भाषांचे धोरण आहे, त्या म्हणजे तमिळ आणि इंग्रजी आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.