Thailand
Thailand sakal
सप्तरंग

थायलंडमध्ये गवसला आनंद...

सकाळ वृत्तसेवा

तिथं भेटलेल्या एका पाकिस्तानी मुलीनं सांगितलं की, भारतातील ताजमहाल पाहायची तिची खूप इच्छा असून, दोन देशांतील बिकट संबंधांमुळे ती कदाचित कधीच प्रत्यक्ष ताजमहाल बघू शकणार नाही.

- नितीन सोनवणे nonviolenceplanet@gmail.com

तिथं भेटलेल्या एका पाकिस्तानी मुलीनं सांगितलं की, भारतातील ताजमहाल पाहायची तिची खूप इच्छा असून, दोन देशांतील बिकट संबंधांमुळे ती कदाचित कधीच प्रत्यक्ष ताजमहाल बघू शकणार नाही. त्या ग्रुपमध्ये एक अमेरिकन गांधी विशेषज्ञ होता. जिथे जिथे अन्याय, शांती, अहिंसा येते, तिथे तिथे गांधीजी येतात. या कार्यक्रमात खूप लोक गांधीजींबद्दल बोलत होते आणि हेच दृश्य मी जगभरात पाहिलं आहे.

आम्हाला तिथे बोलण्याची संधी मिळाली. मला अजूनही आठवतं आहे ते भाषण. तेथील वनिदा ही थाई महिला चांगली मैत्रीण झाली होती. तिचं वय ४३ होतं आणि सायकलवर तिने आमच्यासोबत येण्याची इच्छा व्यक्त केली. तिने आम्हाला खूपच मदत केली. तिच्या देशात लोकशाही यावी यासाठी तिने खूप आंदोलनं केली आहेत. तिच्या गार्डनचं नावही तिने ‘लोकशाही गार्डन’ ठेवलं होतं. त्या गार्डनमध्ये ती लहान मुलांना प्रशिक्षण देत असे. मी, अजय आणि वनिदा मिळून वानिअ या बांबूच्या झाडाचं रोपण केलं. संस्थेत खूप चविष्ट जेवणही मिळे. थायलंडचं अन्न सर्व जगभर प्रसिद्ध आहे, ते माझं फेव्हरेट बनलं.

जेव्हा आम्ही बाजूला फिरायला गेलो, तेव्हा तिथे एक वृद्ध महिला रोडवर पेरू विकताना दिसली. तिला आम्ही विचारलं की, तुम्हाला गांधींबद्दल काही माहिती आहे का? ती बोलली, ‘‘लहान असताना आम्ही गांधीहत्येबद्दल ऐकलं होतं आणि आम्हाला गांधीजींची हत्या झालेलं कळलं तेव्हा खूप वाईट वाटलं.’’ हे माझ्यासाठी खूपच थक्क करणारं होतं. कोण्या एका देशात, ज्यांचा गांधीजींशी काही संबंध नव्हता त्या ठिकाणी, गांधीजींबद्दल एवढं प्रेम आणि आस्था! इकडे त्यांच्या हत्येचा वेडसर, कर्तव्यशून्य, आपली बुद्धी भ्रष्ट झालेला मारेकरी आपल्या पुणे, महाराष्ट्रातील असणं माझ्यासाठी शरम आणणारं होतं.

आमचा थायलंडचा मुक्काम आम्ही संपवला आणि आम्ही तिघं सायकलवर कंबोडिया या देशाकडे रवाना झालो. सोबत वनिदाही होती. तिच्यामुळे आम्हाला थायलंडमध्ये लोकांशी संवाद करायला मिळला. जेव्हा तुम्ही शुद्ध भावाने काहीतरी करता, त्यावेळेस चांगले लोक आपल्यासोबत येतात. आम्ही रोज ६० ते ७० कि.मी. सायकल चालवायचो. वाटेत लोकांशी भेटायचो. रोज रात्री बुद्धिस्ट मंदिरात जायचो. थायलंडमध्ये ठिकठिकाणी खूपच सुंदर आणि भव्य मंदिरं आहेत. मंदिरांमध्ये भन्ते राहत असतात, जे की खुपच करुणामय भेटले. त्यांनी आम्हाला कधी नकार दिला नाही. आम्ही त्यांना भेटायचो व या शांती यात्रेबद्दल सांगायचो. आम्ही बुद्धांच्या देशातून आलो याचं त्यांना खूप समाधान असे. हे माँक सकाळी ५ वाजता उठून साधना करतात व भिक्षा मागण्यासाठी गावात जातात. त्यांच्याकडे एक हंडा असतो, जो की ते पाठीला खांद्याला अडकवून पोटाच्या सामोर आणतात.

लोक त्यांच्यासाठी गरम जेवण बनवतात व ते दान करतात. दान करणाऱ्यांचा भाव आणि आनंद मी पहिला आहे आणि ते एक खूप सुंदर चित्र आहे. ते सकाळी थोडं जेवण करतात आणि दुपारी बाराच्या आधी एकदा, त्यानंतर ते जेवत नाहीत. मंदिरामध्ये चूल नसते. त्यांचं जीवन हे लोकाधारावर आहे. सोबत ते लोकांसाठी पूजापाठ करतात. कोणीही पुजारी होऊ शकतो. महिलापण यात आहेत. थायलंडमधील बुद्धिजम हा जगभरात प्रसिद्ध आहे. खूप विदेशी लोक इथे साधना करण्यासाठी येतात. नाश्त्यासाठी आम्हाला ते भिक्षेतील जेवण देत असत. त्यांचा नाश्‍ता झाला की आम्ही करत असू. अजय या वेळेस भात आणि फळे खात असे. थायलंडमध्ये भारतीय लोकांना आधी खूप सन्मान मिळायचा. भारतीय म्हणजे बुद्धांच्या देशातील लोक, यामुळे तर भारतीयांबद्दल खूप आदराची भावना होती, असं मला स्थानिक लोकांसोबतच्या चर्चेतून कळालं. पण, ५ ते १० वर्षांपूर्वी खूप भारतीय लोक इकडे आले. त्यांतील एक लाख लोक हे उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमधील असतील. त्यांनी इथे येऊन सावकारी सुरू केली आणि लहान लहान विक्रेत्यांना व्याजाने पैसे देणं सुरू केलं.

अव्वाच्या-सव्वा व्याजाची पद्धत त्यांनी रूढ केली. १० दिवसाला १० टक्के व्याजदर ते घेत आहेत. आम्ही काही अशा लोकांनाही भेटलो. या गोष्टीमुळे भारताची प्रतिमा खूप ढासळली आहे.

एके दिवशी वाटेत आम्हाला एक शाळा लागली. आम्ही त्यामध्ये गेलो व शिक्षक लोकांना विनंती करून आमची एक तासाची कार्यशाळा सुरू झाली. त्यात आम्ही त्यांना गांधीजींचा एक माहितीपट दाखविला आणि नंतर त्यावर चित्रकला करण्यास सांगितलं. त्या मुलांनी खूप चित्रं काढली. गांधीजींचा चेहरा, रेल्वे, सूर्य, डोंगर. आम्ही तीन सायकल करी आणि पिरॅमिड. त्यांना वाटलं की भारतात पिरॅमिड आहेत म्हणून. पण त्यांना गांधीजींची एक गोष्ट भावली, जी त्यांना साउथ आफ्रिकेत रेल्वेतून धक्का मारून बाहेर फेकून दिल्याबद्दलचा प्रसंग, त्यासाठी त्यांनी रेल्वेची चित्रं काढली होती. त्या गोंडस सुंदर लहान मुलांचा आनंद पाहून आम्ही खूप भारावून गेलो.

आम्ही पोईपोटी या कंबोडियाच्या सीमेपर्यंत पोहचलो. रात्री उशीर झाला होता. आजूबाजूला जुने कपडे आणि साहित्याची खूप दुकानं होती. वनिदा घाबरली होती, कारण त्या ठिकाणी खूप चोऱ्या होत होत्या. जगभरात हे मी नंतर अनुभवलं, की जिथे जिथे सीमा आहे, तिथे बेकायदा गोष्टी होत असतात, त्या रात्री आम्ही तेथील एका लोकप्रतिनिधीने दिलेल्या खोलीमध्ये राहिलो, जी आम्हाला खूप उशिरा मिळाली. तो थोडा त्रासदायक दिवस होता. तिथे जवळपास मंदिर नव्हतं. दुसऱ्या दिवशी वनिदा परत तिच्या संस्थेत गेली आणि आम्ही पुढे कंबोडियामध्ये प्रवास सुरू केला. आयुष्य खूप सोपं असतं हे मला थायलंड या देशातील प्रवासाने शिकवलं. भारतात पुढे जाण्यासाठीची चढाओढ, उच्चनीच भेदभाव हे खूप तणावपूर्ण वाटतं. थायलंड या सुंदर देशातून खूप शिकण्यासारखं आहे. थायलंड हा असा देश आहे की जगातील लोकांना इथे राहावंसं वाटतं. मला आशा आहे की, तुम्हीही या देशाला भेट द्याल व खूप अनुभव आत्मसात कराल.

( सदराचे लेखक जग भ्रमंती करणारे व महात्मा गांधी यांच्या विचाराचे प्रसारक आहेत. )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covaxin: कोव्हिशिल्डच्या गोंधळानंतर कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकचा मोठा दावा, वाचा काय म्हणाली कंपनी

SEBI Notice: अदानींना मोठा धक्का! समूहाच्या सहा कंपन्यांना सेबीकडून कारणे दाखवा नोटीस; काय आहे कारण?

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

T20 World Cup: टीम इंडियात ४ फिरकी गोलंदाज का घेतले? कर्णधार रोहित शर्माने दिलं स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : सुप्रिया सुळे अन् सुनेत्रा पवार यांना निवडणूक आयोगाची नोटीस

SCROLL FOR NEXT