ordeal war end is destruction Not peace army soldier
ordeal war end is destruction Not peace army soldier sakal
सप्तरंग

अग्निपरीक्षा

डॉ. यशवंत थोरात

युद्धातला मूर्खपणा आणि क्रूरपणा ज्यानं अनुभवलाय त्याला ठाऊक आहे की, त्याचा शेवट विनाश हाच असतो; शांतता नव्हे.’

- डॉ. यशवंत थोरात

मिळालेलं उत्तर त्या मुलाच्या मनावर चांगलंच बिंबलं होतं - ‘युद्धात मर्दुमकी नाही. स्वतःला विचारी प्राणी म्हणवणाऱ्या माणसाचं ते अपयश आहे. युद्धातला मूर्खपणा आणि क्रूरपणा ज्यानं अनुभवलाय त्याला ठाऊक आहे की, त्याचा शेवट विनाश हाच असतो; शांतता नव्हे.’

प्लॅटफॉर्मवरच्या गर्दीतून वाट काढत तो पहिल्या वर्गाच्या डब्याकडे येऊ लागला...गणवेश घातलेला एक तरुण लष्करी अधिकारी. काही वेळानं तो डब्यात शिरला, हमालाला पैसे दिले, सामान जागेवर ठेवलं आणि बसला. ओळख झाली.

लेफ्टनंट राठोड त्याचं नाव. अधिकारी म्हणून नुकतीच त्याची नेमणूक झाली होती आणि काश्मीरच्या खोऱ्याकडे तो निघाला होता. थोडा वेळ बोलणं झालं. माझ्या हातातल्या १९६२ च्या युद्धावरच्या पुस्तकाकडे बोट दाखवत त्यानं विचारलं : ‘‘नवीन काही आहे यात?’’

‘‘हो’’ मी म्हणालो : ‘‘त्या कठीण काळात परिस्थितीवर मात करण्यासाठी केनेडी सरकारनं कशी मदत केली याची माहिती आहे.’’ ‘‘ते असो...परंतु संख्येनं कमी असून आणि पुरेशी तयारी नसताना चांगला लढा देऊनदेखील आपण हरलो. तेव्हा मी असायला पाहिजे होतो तिथं.’’

वाक्य विचित्र होतं. मी कोड्यात पडलो. ‘‘युद्धात भाग घेणं इतकं महत्त्वाचं आहे?’’ मी विचारलं. ‘‘हो. युद्ध म्हणजे सर्वश्रेष्ठ साहस आणि युद्धात प्राण देणं हा सर्वोच्च सन्मान!’’ तो म्हणाला. यापेक्षा वेगळं उत्तर दुसऱ्या एका सैनिकानं पूर्वी दिलं होतं.

त्याच्या छातीवरची पदकांची रांग पाहून एका मुलानं युद्धातल्या पराक्रमाचं आणि वलयाचं गुणगान गायिलं होतं तेव्हा हे उत्तर त्या मुलाला देण्यात आलं होतं. राठोडला हे सांगताच तो हसला आणि म्हणाला : ‘‘भित्र्या माणसाचं उत्तर आहे हे.’’

‘‘नाही,’’ मी म्हणालो.

‘‘खरं तर, तो एक वीर होता...’’

‘‘मग तर हे विचित्रच आहे,’’ असं म्हणत तो गप्प झाला.

सन १९३९ ते १९४५ या काळात जग महायुद्धाच्या खाईत अडकलं होतं. आपल्यावर राज्य करणाऱ्या वसाहतवादी साहेबांनी - आपल्या नेत्यांशी सल्लामसलत न करता - भारताला मित्रराष्ट्रांच्या बाजूनं वचनबद्ध केलं होतं. त्या महाकाय युद्धयंत्रणेचा छोटासा भाग असलेल्या माझ्या वडिलांना दक्षिण आशियात भरधाव निघालेला जपानी युद्धरथ रोखण्यासाठी म्हणून बर्माला पाठवण्यात आलं होतं.

ते युद्धावर निघाले असताना धाकट्या मुलीनं त्यांच्या खिशात एक वस्तू सरकवली आणि रडायला लागली. क्षणभर त्यांनी तिला जवळ घेतलं - पण क्षणभरच - आणि मग सकाळच्या दाट धुक्यात त्यांची जीप गडप झाली.

तसं बघितलं तर आघाडीची पोस्टिंग ते टाळू शकले असते; परंतु इंफाळ आणि कोहिमाच्या जंगलात शत्रूशी संघर्ष करत असताना अडकून पडलेल्या आपल्या रेजिमेंटमध्ये सहभागी होण्याची परवानगी त्यांनी आवर्जून मागितली होती. परत येण्याची फारशी शक्यता नाही हे त्यांना ठाऊक होतं; परंतु तो सैनिकाचा मार्ग होता आणि त्यावर त्यांनी फारसा विचारही केला नाही.

‘रिएन्फोर्समेंट कॅम्प’वर ते पोहोचले आणि बटालियनमध्ये सहभागी झाले. आधी इंफाळला अडकून पडलेल्या मित्रराष्ट्रांच्या तुकड्यांची सुटका करून मग कोहिमाला जाऊन दिमापूरचा रस्ता ताब्यात घेऊ पाहणारी जपानी फौज रोखण्यास त्यांना सांगितलं गेलं. कारण, तिथूनच अवजड युद्धसामग्री रणांगणावर नेली जात होती.

कोहिमामध्ये असताना त्यांचे कमांडिंग ऑफिसर आजारी पडले आणि ‘सेकंड इन कमांड’ असल्यानं त्यांना सूत्रं हाती घ्यायला सांगितलं गेलं. आजूबाजूच्या टेकड्यांवर दबा धरून बसलेल्या जपानी सैनिकांच्या सततच्या हल्ल्यांमुळे बटालियनमधल्या शिपायांचा जीव वाचवणं हे त्यांच्यासमोरचं तातडीचं काम होतं.

ऐन युद्धाच्या प्रसंगी बटालियनचे कमांडर म्हणून जबाबदारी देण्यात आलेल्या पहिल्या काही भारतीयांपैकी ते एक होते आणि आपल्या सैनिकांचा विश्वास संपादन करणं गरजेचं आहे याचं त्यांना पूर्ण भान होतं.

आजूबाजूच्या भागाची त्यांनी स्वतः पाहणी केली आणि मग त्यांनी थेट शत्रूच्या टेकडीवर हल्ला चढवला. चाल यशस्वी ठरली. उद्दिष्ट साध्य होताच ताब्यात आलेल्या टेकडीवरची पकड अधिक घट्ट करायला त्यांनी आपल्या साथीदारांना सांगितलं. त्यासाठी बरीच खोदाई करावी लागणार होती.

राऊंड घेऊन ते परत येईपर्यंत सारे शिपाई आपापल्या नेमलेल्या जागेवरच संध्याकाळचं जेवण आटोपण्याच्या तयारीत होते. तेही त्याच विचारात असताना जमिनीतून काहीतरी वर आलेलं त्यांच्या नजरेस पडलं. अधिक तपास केल्यावर आढळलं की, त्यांच्या छावणीच्या ठिकाणी मृतदेहांचे वेगवेगळे तुकडे सगळीकडे पसरले आहेत.

माघारी परतत असताना जपानी सैनिकांनी आपल्या तुकडीतल्या मृत्यू पावलेल्यांचे देह तिथल्या उथळ खड्ड्यात ढकलून त्यावर हलकेच माती लोटली होती. आणि, नकळतपणे नेमक्या त्याच जागेवर यांनी आपलं मुख्यालय उभारलं होतं! उशीर झालेला होता.

दुसऱ्या ठिकाणी तळ हलवणं शक्य नव्हतं. ‘सर्वजण आहात त्या ठिकाणीच थांबा’ असं फर्मान सोडून ते आपल्या बंकरकडे निघाले असताना वाटेत एक तुटलेला; पण पाकीट घट्ट धरलेला हात त्यांना दिसला. ते तसेच पुढं गेले असते तर काहीच बिघडलं नसतं; पण नशिबानं एक अनपेक्षित वळण घेत ते पाकीट उचलून घ्यायला त्यांना भाग पाडलं.

आत लहान मुलाचा एक लोकरी मोजा आणि दोन हसऱ्या मुलींचे फोटो होते. आघाडीवर निघण्यासाठी घर सोडत असताना त्यांच्या धाकट्या मुलीनं त्यांच्याही खिशात नेमकी तीच वस्तू सरकवलेली होती. क्षणात त्यांचं विश्वच कोलमडलं आणि अथांग काळोखामध्ये आपण फेकले गेलोय असं त्यांना वाटलं.

मन सुन्न झालं आणि त्या अंधारात युद्धातल्या शौर्याच्या साऱ्या कल्पनांची कुणीतरी घोर थट्टा करतंय एवढंच त्यांना जाणवलं. त्या रात्री जे घडलं ते पूर्णपणे त्यांनी कधीच सांगितलं नाही; पण त्यांच्यासाठी तो आयुष्य बदलून टाकणारा अनुभव होता.

त्यातून बाहेर पडलेला माणूस तोच; पण वेगळा होता. जगाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन बदलून गेला होता. ते शांततावादी बनले असं नव्हे; पण वाद मिटवण्यासाठी माणसं युद्धाच्या थराला का जातात हा प्रश्न त्यांच्यासाठी कळीचा बनला होता.

युद्ध म्हणजे काय यापेक्षा ते घडण्यामागचं कारण काय आणि मुळात विवेकी असलेली माणसं एकमेकांच्या जिवावर कशासाठी उठतात हे समजून घेण्याची खटपट आयुष्यभर त्यांनी केली. व्यावहारिक पातळीवर त्यांनी स्वतःलाच प्रश्न केला : ‘आपल्या देशाचं - ज्यांच्या सेवेत ते होते त्या वसाहतवादी साहेबांचं नव्हे - आणि जपानी लोकांचं काय वैर आहे?

वैयक्तिक आपल्याला तरी मेलेल्या जपानी सैनिकांबद्दल तिरस्कार कुठं आहे? तसं नसेल तर त्यांच्यावर हल्ला करण्याचा हुकूम आपण का दिला? त्या फोटोकडे बघून त्यांच्या मनात विचार आला : ‘आता त्या दोन मुलींचं कसं होईल?

त्यांची काळजी कोण घेईल? त्यांची आई हे दु:ख सहन करू शकेल की ती आशा सोडून देईल?’ हे सगळे प्रश्न डोक्यात घुमत असतानाच त्यांच्या स्वतःच्या बायको-मुलांच्या प्रतिमा त्या जपानी माय-लेकींच्या दुःखात मिसळून गेल्या. नंतर पहाट व्हायच्या आधी नेहमीप्रमाणे खुदाबक्ष हा त्यांचा सेवक चहाचा मग घेऊन आला आणि त्यांनी स्वतःला सावरलं.

‘स्वत:वर ताबा ठेव’ ते मनाशीच पुटपुटले : ‘हे कोल्हापूर नाही, कोहिमा आहे. तू इथं युद्ध लढतोयस. जर तू आधी गोळीबार केला नाहीस तर शत्रू तुझ्यावर गोळीबार करील. आणि तू कोसळलास तर काही फरक पडणार नाही; पण तुझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ज्यांनी आपलं आयुष्य तुझ्या हाती सोपवलंय तेही मरतील.

तुझ्या वैयक्तिक भावना काहीही असोत; पण कमांडर म्हणून तू आपल्या लोकांना निराश करू शकत नाहीस.’ आणि, त्यांच्या लक्षात आलं की, ‘बोलण्यापुरती गोष्ट काहीही असली तरी शत्रू समोर उभा असताना चाप ओढण्याचं एकमेव कारण म्हणजे आत्मरक्षण आणि आपल्या नेतृत्वाखालील लोकांचं रक्षण.’

मी सामान्य नागरिक आहे. माझा युद्धाशी संबंध नाही. खरं तर मुळात मानवानं युद्धाचा शोध लावलेला नाही. तो त्याला मिळालेला वारसा आहे. शस्त्रास्त्रं अजूनही अस्तित्वात आहेत आणि पूर्वीच्या मानानं ती अधिकघातक बनली आहेत.

अजूनही सैनिक आणि मुत्सद्दी असे दोघंही युद्धाकडे एक शक्यता म्हणून पाहत आहेत...अजूनही सेनापती योजना आखत आहेत...शत्रूला मारण्याचं प्रशिक्षण सैन्यदलात अजूनही दिलं जात आहे आणि कित्येक देशांची संरक्षणविषयक तरतूद वाढतच चालली आहे...

शतकभरापूर्वीपर्यंत युद्ध हा एक उदात्त आणि पराक्रमी उपक्रम आहे असा सर्वसामान्य लोकांचा समज होता; परंतु पहिल्या महायुद्धाच्या वेळी झालेल्या सैनिकांच्या सामूहिक कत्तलीमुळे तो समज दूर झाला. आणि तेव्हापासून, युद्ध ही एक गंभीर समस्या आहे, असं ‘सुजाण जनते’ला वाटत आहे - आणि ते योग्यच आहे.

वस्तुस्थिती अशी आहे की, युद्धाची सुरुवात नेमकी कुठून होते किंवा ते कशा रीतीनं चालतं याची आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती नसते आणि विशेष म्हणजे, आपल्याला अशी भीती वाटते की, खूप खोलात जाऊन तपासणी केली तर आपल्या देशाच्या रक्षणासाठी ज्यांनी प्राणांची आहुती दिली त्यांच्याबद्दलचा आदर आणि कृतज्ञता कमी होईल.

माझी तंद्री मोडत लेफ्टनंट राठोड म्हणाले : ‘‘ डॉक्टर थोरात, ‘युद्ध हे विचारी प्राणी म्हणून माणसाचं अपयश आहे आणि त्याचा अंत म्हणजे मृत्यूच, शांती नव्हे’ असं सांगणाऱ्या त्या अधिकाऱ्याच्या भावना निंदनीय आहेत. कोणताही कणखर बाण्याचा फौजी असं कधीच बोलणार नाही. कोण होता तो?’’

‘‘तुम्ही त्यांच्याबद्दल ऐकलं नसणार,’’ मी म्हणालो.

‘‘अधिकारी होता का?’’

‘‘हो’’ मी उत्तर दिलं.

‘‘आरामखुर्चीवाला असणार मग.’’

‘‘नाही,’’ मी म्हटलं.

‘‘अफगाणिस्तान, दुसरं महायुद्ध, कोरिया अशा अनेक ठिकाणी झालेल्या कारवाया त्यांनी जवळून अनुभवल्या होत्या.’’ कदाचित ‘कोरिया’चा उल्लेख आणि ‘थोरात’ हे माझं आडनाव लक्षात घेताच त्याच्या डोक्यात प्रकाश पडला.

‘‘जनरल थोरातांबद्दल तुम्ही बोलताय का? फार थोर जनरल होते ते,’’ तो म्हणाला.

‘‘थोर वगैरे माहीत नाही,’’ मी म्हणालो.

‘‘कारण, भारतमातेनं अशा अनेक शूर सुपुत्रांना जन्म दिलाय; पण ते जनरल थोरातच होते.’’

‘‘ते तर एक आदर्श होते,’’ तो म्हणाला : ‘‘त्यांच्याबरोबर माझे आजोबा कोरियात गेले होते आणि त्यांच्याविषयी ते सतत बोलत असायचे.’’ त्याला काय उत्तर द्यावं हे मला समजेना. कारण, एकाच वास्तवाकडे दोन भिन्न दृष्टिकोनांतून आम्ही बघत होतो.

‘‘कदाचित जनरल थोरात थोर असतील,’’ मी म्हणालो : ‘‘पण त्यांना थोर मानण्याची आपली कारणं वेगवेगळी आहेत. कदाचित तुमच्यासाठी ते सच्चे सैनिक...बाहेरून मोठा दबाव असूनही आपल्या भूमिकेवर ठाम राहण्याचं नैतिक धैर्य असणारे मूल्यनिष्ठ सेनापती...पण त्यांच्या लष्करी जीवनाशी मला फारसं देणं-घेणं नाही.

माझ्यासाठी ती अशी व्यक्ती होती, जिच्यात स्वतःचा शोध घेण्याची हिंमत होती. ज्यांनी अंतर्मुख होऊन अंतर्मनातला प्रकाश आणि अंधार शोधला आणि मानवतेला संकुचित करू पाहणाऱ्या शक्तींविरुद्ध लढण्याचा संकल्प केला. कारण, लढण्यासारखं तेच खरं युद्ध आहे हे त्यांना कळून चुकलं आणि ते शब्दाला जागले.

लेफ्टनंटसाहेब, त्यांनी मिळवलेली शौर्यपदकं माझ्यासाठी महत्त्वाची नाहीत. इतरांनीदेखील ती मिळवली आहेत. त्यांनी ती मिळवली नसती तरी मला काही फरक पडला नसता. कारण, जगातली सर्वात श्रेष्ठ लढाई लढण्याची दुर्मिळ संधी मिळालेल्या मोजक्या लोकांपैकी ते एक होते. ती लढाई चालली सुरुवातीला कोहिमामधील टेकडीवरच्या तात्पुरत्या स्मशानभूमीवर बसून आणि पुढं सबंध आयुष्यभर...’’

एकदा त्यांच्यासोबत फिरत असताना मी त्यांना विचारलं होतं, ‘तुम्हाला काय उमगलं त्या रात्री?’ तेव्हा बराच वेळ ते गप्प राहिले आणि मग म्हणाले, ‘त्या गडद काळोखात असताना -

इस तरह अपनी ख़ामुशी गूँजी, गोया हर सम्त से जवाब आए

थी राह सर-ब-सर मंज़िल, हम जहाँ पहुँचे कामयाब आए

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

New Zealand squad T20 WC24 : टी-20 वर्ल्ड कप 2024 साठी संघाची घोषणा! 'हा' खेळाडू सांभाळणार कर्णधारपदाची धुरा

Israel-Hamas War: शस्त्रसंधीच्या चर्चा सुरू असतानाच इस्राइलने गाझामध्ये डागली क्षेपणास्त्रे; हल्ल्यात 13 जणांचा बळी, कित्येक जखमी

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

Ruturaj Gaikwad CSK vs SRH : ऋतु बहरला, देशपांडेही चमकला; सीएसकेनं बालेकिल्ला परत मिळवला!

SCROLL FOR NEXT