Parenting tips by Dr Shruti Panse
Parenting tips by Dr Shruti Panse 
सप्तरंग

उगवतीकडे (डॉ. श्रुती पानसे)

डॉ. श्रुती पानसे

उगवत्या पिढीचं जगणं, त्यांची विचारप्रक्रिया, त्यांच्यासमोरची आव्हानं आणि त्यांच्यासमोरच्या दिशा, त्यांच्या समस्या आणि त्यांनी काढलेले त्यावरचे उपाय हे सगळं आधीच्या पिढ्यांपेक्षा वेगळंच असणार. हे एकमेकांना कळावं यासाठी एकमेकांची भाषा एकमेकांना कळायला हवी. एकमेकांच्या मनात शिरता यायला हवं. एवढी एक गोष्ट केली, तर उगवत्या पिढीला समजून घेण्याच्या प्रयत्नात असणारी पालकांची वाट धुक्‍यात हरवून जाणार नाही.

उगवत्या पिढीची नवी भाषा. त्यांचं जगणं, त्यांची विचारप्रक्रिया. त्यांच्यासमोरची आव्हानं आणि त्यांच्यासमोरच्या दिशा, त्यांच्या समस्या आणि त्यांनी काढलेले त्यावरचे उपाय... हे सगळं आधीच्या पिढ्यांपेक्षा वेगळंच असणार. हे एकमेकांना कळावं यासाठी एकमेकांची भाषा एकमेकांना कळायला हवी. एकमेकांच्या मनात शिरता यायला हवं. एवढी एक गोष्ट केली, तर उगवत्या पिढीला समजून घेण्याच्या प्रयत्नात असणारी आपली वाट धुक्‍यात हरवून जाणार नाही. 

इगो नको
घराघरात सुरू असणारी एक सर्वसाधारण गोष्ट म्हणजे तुझं खरं की माझं खरं? प्रत्येक जण स्वत:चा मुद्दा पुढे दामटवायला बघतात, तेव्हा धड कोणाचंच कोणाला ऐकू येत नाही. त्या गदारोळात मुद्दा मात्र निघून जातो. लहानशा तीन- चार वर्षाच्या मुलांनाही स्वत:चा इगो असतो. लहान असतात म्हणून त्या वयात मुलं ऐकतात; पण जसजशी ती मोठी होतात, तसा इगो हेच दुराव्याचं कारण होतं. इगो ही गोष्ट आपल्याला एकमेकांच्या मनात शिरू देत नाही. या ‘इगो’ला मॅनेज करता यायला हवं.

विसंवादातून संवाद
इगोमुळं विसंवाद होतात का हे बघायला हवं. वास्तविक विसंवाद होणं ही अतिशय नैसर्गिक गोष्ट आहे. उगवत्या पिढीशी विसंवाद हा तर बहुतेकदा नेहमीचाच. शहाणपणा यात आहे, की हा विसंवाद झाला तरी पुन्हा संवाद कसा सुरू करायचा? राग आलेला असताना एकमेकांशी बोलणं अशक्‍य असतं. त्यामुळं संवाद सुरू व्हायचा असेल तर राग आलेला असताना काहीही बोलायचं नाही हे पथ्य पाळावं लागेल. रागाच्या भरात जे बोलायचं नसतं, ते माणसं बोलून जातात. अशानं संवादाकडं गाडी वळणार नाही. 

विसंवादाची कारणं शोधणं ही दुसरी पायरी. कोणकोणती कारणं असू शकतात, याची एक यादी करावी लागेल. यातून ज्या काही खऱ्याखुऱ्या गोष्टी समोर येतील त्या मान्य कराव्या लागतील. विसंवादाची ‘लिहिलेली’ कारणं वाचतानाच त्यावरचे उपायही दिसू लागतील. आता फक्त हे उपाय एकमेकांना सांगायचे आहेत आणि अमलात आणायचे आहेत. काही करून गाडी संवादाकडे वळवायची आहे!

उगवत्या पिढीशी विसंवाद हा तर बहुतेकदा नेहमीचाच. शहाणपणा यात आहे, की हा विसंवाद झाला तरी पुन्हा संवाद कसा सुरू करायचा?

अपराधभावनेला जागा नको
काही झालं, तरी आई-बाबांनी अपराधभावना मनात येऊ द्यायची नाही आणि आली तरी तिला मनात रेंगाळू द्यायचं नाही. जी काही समस्या असेल, त्यावर मात कशी करता येईल याचाच विचार करायचा. 

एखादी समस्या सोडवण्यासाठी आपल्यासमोर समजा तीन मार्ग असतील, तर मुलांसाठी त्यातल्या सर्वोत्तम मार्गाची निवड केलेली असते, यावर आपला विश्वास हवा. त्या मार्गाचा अपेक्षित परिणाम दिसला नाही, तर पश्‍चात्ताप होतो आणि पाठोपाठ ही भावना येते. एकदा का असं अपराधी वाटायला लागलं, की आपण कोणापाशी तरी मन मोकळं करतो. कधीकधी बोलल्यामुळं ही भावना मनातून निघून जाते, तर कधीकधी ती अजूनच त्रासदायक ठरते. त्याबद्दल सतत बोलत राहिलं, की तेच खरं वाटायला लागतं. यामुळं मुलांनाही वाटायला लागतं, की आपल्या समस्यांना आपले आई-बाबाच कारणीभूत आहेत. असं झालं, तर एकमेकांच्या मनात शिरणार कसं? यासाठी ही अपराधभावना नको.

उद्धटपणाला ‘नीट’ मोडता
आजकालची मुलं उद्धट आहेत, हे नेहमीच ऐकून घ्यावं लागतं. त्यामुळे एकमेकांशी वागताना- बोलताना सभ्यतेचे संकेत शिकवावे लागणार आहेत. एवढंच नाही, तर या गोष्टी त्यांच्याकडून करवून घ्याव्या लागणार आहेत. आपल्याला जे योग्य वाटतं आहे त्यावर ठाम राहणं आवश्‍यक असतं. मुलांबरोबर मित्रांसारखं वागणं हा आदर्श आहे; पण त्याआधी एकमेकांबद्दल ममत्व तरी असायला हवं. इथं हे नमूद करावं लागेल, की बदलत्या काळाबरोबर भावनांचा कोरडेपणा ही एक नवी गोष्ट उदयाला आली आहे. ती मुलांमध्ये दिसून येते. म्हणून लहान वयापासून याकडं लक्ष द्यायला हवं. 

मुलं मोठी झाली, की आई-बाबांच्या वागण्याचं विश्‍लेषण करायला लागतात, ही चांगली गोष्ट आहे; पण त्यापुढं जाऊन ती आई-बाबांना कमी लेखत असतील ते थांबवायला हवं. आर्थिक- शैक्षणिक कोणत्याच बाबतीत नाही! एकदा तसं बोलू दिलं आणि ऐकून घेतलं, की पुनःपुन्हा तेच सुरू होईल. आणि मोडता घालता येणार नाही. म्हणून हे सुरवातीच्या काळातच करायला हवं.

स्मार्ट होण्याची गरज
मुलांची पिढी ही आपल्यापुढची आहे हे मुळीच विसरून चालणार नाही. भावना मॅनेज करणं, आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी कशा साध्य करून घ्यायच्या हे बरोबर माहीत असणं, यात ते जुन्या पिढीच्या पुढंच आहेत. तंत्रज्ञान ही नव्या पिढीच्या हाती असलेली अजून एक महत्त्वाची कळ. म्हणूनच कायमच त्यांच्याबरोबर नव्या गोष्टी शिकायच्या आहेत. मुलं स्मार्ट असतील, आहेतच; पण आई-बाबांनी स्मार्ट असायलाच हवं. त्यासाठी मनाची लवचिकता हा महत्वाचा मंत्र आहे. ‘आमच्या वेळी’ या शब्दांपेक्षा ‘आत्ता’ आणि ‘उद्या’ हे जास्त महत्त्वाचे शब्द आहेत. 

मुलांबरोबर मित्रांसारखं वागणं हा आदर्श आहे; पण त्याआधी एकमेकांबद्दल ममत्व तरी असायला हवं.

वय आणि अनुभवाचा विचार
मुलांशी मैत्री करण्याच्या नादात काही आई-बाबा आपण ‘पालक’सुद्धा आहोत हे विसरतात. गप्पा मारताना, खेळताना, मजा करताना मैत्रीच हवी; पण त्याचबरोबर आजचा ऑफिसमधला दिवस कसा गेला, हे मोकळेपणानं सांगता यायला हवं. एखादं कौशल्य शिकल्यामुळं कोणता प्रश्न सुटला हे तर सांगावंच. कधी मुलांनी केलेल्या सूचनाही ऐकायला हव्यात. मात्र, इथं एक दोरीवरची कसरत करायला लागणार आहे, ती म्हणजे आपण त्यांच्यापेक्षा मोठे आहोत आणि वय आणि अनुभव यांमुळे थोड्या जास्त गोष्टी कळतात, याची जाणीव मुलांना असू द्या. लहानपणी आपले मित्र असलेले आई-बाबा अचानक असे काय वागायला लागले, असा प्रश्न त्यांना पडायला नको. विविध प्रश्नांवर, समोर आलेल्या अडचणींवर आई-बाबांशी बोललं तर योग्य मार्ग निघतो, असा विश्वास निर्माण व्हायला हवा. आई-बाबा जर कायम मित्राच्या भूमिकेत राहिले तर अडचणींवर सल्ला घ्यायला जाणार कोणाकडे असा प्रश्न पडू शकतो.

वयाच्या या टप्प्यावरही आपण एकमेकांच्या मनात शिरू शकलो, तर मग फ्रेंडशिप पक्की! फ्रेंडशिप पक्की होण्यासाठी या काही गोष्टींकडं जाणीवपूर्वक लक्ष द्यायला हवं. या गोष्टी नात्यांच्या आड यायला नकोत. धुक्‍यामुळं आलेली अंधुकता सूर्यप्रकाशाच्या किरणांमुळे बाजूला होते आणि समोरची वाट स्वच्छ दिसायला लागते. त्या किरणांना आपलंसं करायला हवं. यानंतरच स्वच्छ मनाने, आशादायक विचारांनी उगवतीकडं जाता येईल.

आई-बाबा जर कायम मित्राच्या भूमिकेत राहिले तर अडचणींवर सल्ला घ्यायला जाणार कोणाकडे असा प्रश्न पडू शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

Latest Marathi News Live Update: अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : आवेश खानने हैदराबादला दिला मोठा धक्का; हेड अर्धशतकानंतर बाद आता रेड्डीवर मदार

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

SCROLL FOR NEXT