Narendra Kale
Narendra Kale Sakal
सप्तरंग

पत्नीने दिलेले १० हजार, आता १२५ एअरलाइन्सची संगणकीकृत यंत्रणा सांभाळतात

सकाळ वृत्तसेवा

शिक्षण घेताना आयआयटीमध्ये प्रवेश घेणं हे अनेकांचं स्वप्न असतं. तसंच स्वप्न नरेंद्र काळे यांनीही पाहिलं; पण संधी मिळूनही आयआयटीमध्ये जायचं नाही असं निकाल लागल्यावर त्यांनी ठरवलं..

- प्राची कुलकर्णी kulkarnee.prachee@gmail.com

शिक्षण घेताना आयआयटीमध्ये प्रवेश घेणं हे अनेकांचं स्वप्न असतं. तसंच स्वप्न नरेंद्र काळे यांनीही पाहिलं; पण संधी मिळूनही आयआयटीमध्ये जायचं नाही असं निकाल लागल्यावर त्यांनी ठरवलं.. आणि हाच माणूस आज त्यांच्या काळे लॉजिस्टिक्स आणि काळे कन्सल्टंट्स या कंपन्यांच्या माध्यमातून जगभरातल्या जवळपास १२५ एअरलाइन्सची संगणकीकृत यंत्रणा सांभाळतो आहे.

काळे मूळचे पुण्याचे. मॉडर्न स्कूलमध्ये त्यांचं शिक्षण झालं. त्यानंतर गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकमध्ये डिप्लोमा केला. त्यानंतर सीओईपीमधून बी.ई. इन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनची पदवी घेतली. पुढे कॉम्प्युटर सायन्समध्ये उच्च शिक्षण घ्यायचं त्यांनी ठरवलं. हा कोर्स फक्त आयआयटी कानपूरमध्ये होता. सबंध भारतातून या कोर्ससाठी फक्त सात जागा होत्या. काळेंचे कॉलेजमधले विभागप्रमुख म्हणाले, तू प्रयत्न करून बघ. काळेंनी परीक्षा दिली आणि ते भारतातून तिसरे आले. त्यानंतर वडिलांच्या पाया पडून काळे म्हणाले, ‘‘ मी पास झालोय; पण मी काही आता जात नाही!’’ अर्थात, वडिलांनी हे मान्य करण्याची शक्यताच नव्हती. काळे आयआयटीमध्ये गेले आणि त्यानंतर मात्र त्यांनी मागे वळून बघितलं नाही.

काळेंनी पहिली नोकरी केली ती टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये. तेव्हा अमेरिकन कंपन्यांसाठी सिस्टिम तयार करून द्यायचं काम या कंपनीमार्फत चालायचं. हे करत असतानाच नरेंद्र काळेंच्या लक्षात आलं, की आपल्याकडे कशाचेच इंटलेक्च्युअल राइट्स नसतात. त्यांनी त्यांच्या बॉसकडे स्वतःचं सॉफ्टवेअर तयार करण्याची कल्पना मांडली. कल्पना तर मांडली; पण बॉसकडून उत्तर आलं की, हे करणं शक्य नाही. ‘‘१३ जुलै १९८९ ही ती तारीख. त्याक्षणी मी हे ठरवलं की, आपण प्रयत्न तर करून बघू. आपण कदाचित सूर्य होणार नाही; पण एखाद्या दिवाणखान्यातील पणती तर होऊ! आपण छोटंसं सॉफ्टवेअर तयार करू, जे जगभरात जाईल आणि त्याच क्षणी मी राजीनामा दिला,’’ काळे सांगतात.

दरम्यान, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू त्यांना म्हणाले की, तुमची दोन वर्षं मला हवीत. २६-२७ वर्षांच्या काळे यांच्यासमोर निकाल वेळेवर लागावेत यासाठी सिस्टिम तयार करण्याची जबाबदारी आली. अनेक कंपन्यांनी प्रयत्न करून झाले होते. पण, काळे यांनी फक्त थोडा वेळ मागितला आणि तो प्रकल्प यशस्वीदेखील करून दाखवला. तोवर ॲकॅडमिक्समध्ये रमलेल्या काळे यांनी मग बीसीएस आणि एमसीएचा अभ्यासक्रम तयार करायला घेतला. आज अनेकांना आयटी क्षेत्रात संधी देणाऱ्या या कोर्सचे जनक नरेंद्र काळे.

हे दोन वर्षं चाललं; पण त्यांच्या पत्नीला कल्पना होती की, त्यांचं खरं स्वप्न आहे ते व्यवसाय उभा करण्याचं. पत्नीने त्यांना १० हजार रुपये देऊ केले आणि सांगितलं, तुम्ही स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा. याच पैशांतून मग एक टेबल आणि तीन खुर्च्या घेऊन काळेंची कंपनी सुरू झाली. त्यांना पहिला प्रोजेक्ट मिळाला तो ताज ग्रुपचा.. त्यानंतर हॉटेल, हॉस्पिटॅलिटी क्षेत्रासाठी काळे काम करत गेले. अर्थात, हा प्रवास सोपा नव्हता. काळेंच्या आयुष्यात चढ-उतार आलेच. त्यांनी काळे कन्सल्टन्सीचा आयपीओ आणला आणि त्याला प्रचंड यशही मिळालं. पण, काळे यांचं स्वप्न होतं ते लॉजिस्टिक क्षेत्रातलं गुगल व्हायचं. काळे म्हणतात, ‘‘कंपनीला २५ वर्षं झाली होती. त्या वेळी मला वाटलं की, आपण सॉफ्टवेअर प्रॉडक्ट तर तयार केलं; पण आपण सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्मच्या क्षेत्रात काही करायला पाहिजे.’’

हा टप्पा सुरू झाला. त्यानंतर थेट एअरलाइनच्या लॉजिस्टिक्ससाठी काम सुरू केलं. काळेंच्या शब्दांत, ‘‘परदेशात तुम्ही किती मोठे आहात, यापेक्षा तुम्ही काय करताय याला महत्त्व होतं. मी सुरुवात केली तेव्हा आयबीएमसारखे स्पर्धक होते; पण या एअरलाइन कंपन्यांना कदाचित आमच्या कंपनीचा प्रॉडक्ट चांगला आहे आणि आम्ही स्वतंत्र आहोत असं वाटलं असावं. म्हणून अनेक दिग्गज स्पर्धकांमध्ये त्यांनी काळे कन्सल्टंट्सची निवड केली. आज जगभरातल्या १२५ एअरलाइन कंपन्या आणि ४ हजार ग्राहकांना आम्ही सेवा पुरवतो आहोत.’’

पहिलं डिजिटल कार्गो कॉरिडॉर बनवणे यासारखे प्रयोग काळे लॉजिस्टिक्सनी केले आहेत. नरेंद्र काळे यांना यासाठी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. पण स्वस्थ बसणं, हे त्यांच्या स्वभावात नाही.आता ‘सीओइपी’मध्ये भाऊ इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून तरुण उद्योजकांसाठी ते काम करत आहेत. या संस्थेच्या स्थापनेची कहाणीपण रंजक आहे. काळे शिकवत होते आणि अशाच एका व्याख्यानानंतर एक विद्यार्थिनी त्यांना येऊन म्हणाली, ‘‘आजपर्यंत मी शिक्षण घेऊन नोकरीत काय करायचं याचं स्वप्न बघत होते. आता मात्र मी स्वप्न बघेन ते नोकरी देणारा कसं व्हायचं याचं.’’ यातूनच त्यांना आपण तरुण उद्योजक होऊ पाहणाऱ्या मुलांसाठी काही करावं अशी कल्पना सुचली. असं काही करतोय म्हणाल्यावर आम्हाला अर्थातच त्या क्षेत्रात काही केलेल्या कोणाला सोबत घ्यावं अशी इच्छा होती. अर्थातच, आम्ही एपीजे अब्दुल कलाम यांच्याकडे गेलो. त्यांना संकल्पना सांगून म्हणालो की, हे होईपर्यंत आम्ही काही देह ठेवणार नाही. ते म्हणाले, तुम्हाला दीर्घायुष्य तर मिळेलच; पण तुम्ही तुमचं स्वप्नपण मोठं करा. मग यातून स्थापना झाली ती भाऊ इन्स्टिट्यूट आणि इन्क्युबेशन सेंटरची. काळे यांच्याबरोबरच निखिल जकातदार, अतुल किर्लोस्कर आणि संजय इनामदार यांनी यासाठी निधी दिला. काळे आजही एका तत्त्वावर विश्वास ठेवतात आणि ते म्हणजे, ‘‘बुद्धिमान माणसं आणि तंत्रज्ञान एकत्र आलं की नव्या संधी शोधता येतात आणि सामाजिक प्रश्नही सोडवता येतात.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : अर्शदीपचा अप्रतिम यॉर्कर अन् रहाणे झाला बाद

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

South India Travel : उन्हाळ्यातही करू शकता दक्षिण भारताची सफर; जाणून घ्या 'ही' थंड हवेची ठिकाणं

SCROLL FOR NEXT