Sharad Pawar Saptarang
सप्तरंग

बॉम्बस्फोट, आरडीएक्स आणि पवार!

अयोध्येत बाबरी मशीद पाडली गेल्‍याची घटना आणि त्यानंतर डिसेंबर १९९२ आणि जानेवारी १९९३ या दोन महिन्यांत मुंबईत हिंसाचाराचा आगडोंब उसळला होता.

प्रकाश अकोलकर akolkar.prakash@gmail.com

तारीख होती १२ मार्च १९९३. त्या दिवशी मी मंत्रालयाच्या ‘प्रेसरूम’मध्ये नव्हे, तर सहाव्या मजल्यावरील मुख्य सचिवांच्या प्रशस्त दालनात बसलो होतो.

अयोध्येत बाबरी मशीद पाडली गेल्‍याची घटना आणि त्यानंतर डिसेंबर १९९२ आणि जानेवारी १९९३ या दोन महिन्यांत मुंबईत हिंसाचाराचा आगडोंब उसळला होता. त्याची परिणती, दिल्लीत संरक्षणमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारून गेलेले शरद पवार यांना फिरून महाराष्ट्राची सूत्रं हाती घ्यावी लागण्यात झाली होती. आठवडाभर आधीच ते मुंबईत दाखल झाले होते आणि दिल्लीहून येताना ते सोबत मुख्य सचिव म्हणून एन. रघुनाथन यांना घेऊन आले होते. त्यांच्याच मुलाखतीसाठी मी तिथं जाऊन पोहोचलो होतो. बोरीबंदरच्या ‘टाइम्स’च्या कार्यालयातून मंत्रालयाकडे रवाना होताना ‘स्टॉक एक्स्चेंज’मध्ये ‘आग’ लागल्याची बातमी आली होती...

मात्र, ती साधीसुधी आग नसून तिथं भीषण बॉम्बस्फोट झालाय याची कल्पना हुतात्मा चौकाच्या पूर्वेला असलेल्या दलाल स्ट्रीटचा परिसर वगळता कुणा म्हणजे कुणालाच आली नव्हती. अगदी राज्याच्या मुख्य सचिवांनाही. अन्यथा, त्यांनी त्या वेळी एखाद्या पत्रकाराला समोर तरी उभं केलं असतं का? मुलाखत अगदी दिलखुलास सुरू झाली आणि मुख्य सचिवांच्या टेबलवरील फोन घणघणू लागला...ते अस्वस्थ होत गेल्याचं त्यांच्या चेहऱ्यावरून जाणवतही होतं. अखेर एका फोननंतर ‘आता अधिक बोलता येणार नाही,’ असं सांगून मुलाखत आटोपती घेण्यात आली. सोबत ‘टाइम्स’चा एक पत्रकारही होता. आम्ही दोघं थेट तळमजल्यावरील ‘प्रेसरूम’मध्ये आलो आणि दुसऱ्याच क्षणाला तो आवाज कानाचे पडदे फाडून आत शिरला...

अवघं मंत्रालयच डोक्यावर कोसळल्यासारखं वाटून गेलं आणि घाबरून थेट बाहेर पळत येऊन मंत्रालयासमोरच्या डिव्हायडरवर येऊन उभं राहिलो. तर उजव्या, समुद्राच्या बाजूनं धुराचा प्रचंड लोट बाहेर येत होता...तो कान फाडून टाकणारा आवाज हा ‘एअर इंडिया’च्या त्या प्रख्यात टोलेजंग वास्तूत झालेल्या बॉम्बस्फोटाचा होता हे लक्षात आलं आणि तिकडं धाव घेतली. त्या दोन क्षणांतच पोलिसांनी ती वास्तू ‘कॉर्डन’ केली होती. कार्यालयात फोन करण्यासाठी आता आसरा उरला होता तो रस्त्यापलीकडच्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाचा. कसाबसा तिथं गेलो तर बॉम्बस्फोटाच्या त्या हादऱ्यानं तिथल्या सगळ्या काचा निखळून पडल्या होत्या. कार्यालयात फोन केल्यावरच कळलं की स्टॉक एक्स्चेंजला आग लागलेली नसून केवळ तिथंच नव्हे, तर मुंबईत अन्यत्रही मोक्याच्या जागी असेच भीषण स्फोट झाले आहेत.

अवघा फोर्ट परिसर पोलिसांनी आपल्या निगराणीखाली आणला होता आणि मंत्रालयाच्या त्या परिसरातून आता बोरीबंदरच्या कार्यालयात जाता येणार नाही, हेही स्पष्ट होऊन गेलं होतं. तेव्हा मंत्रालयातूनच मिळेल तेवढी माहिती गोळा करण्याचा निर्णय घेतला. याला भेट...त्याला भेट असा खेळ सुरू झाला. कुणाकडेच काहीही ठोस म्हणता येईल, अशी माहिती नव्हती. अखेर संध्याकाळच्या सुमारास मुख्यमंत्री, म्हणजेच शरद पवार, स्वत: त्यासंबंधीचा अधिकृत तपशील जाहीर करतील असं सांगण्यात आलं.

पवारांची पत्रकार परिषद सुरू झाली. मुंबापुरीत हा एवढा हाहाकार माजलेला असल्यानं आता मुख्यमंत्री काय सांगतात त्याबाबत कमालीचं औत्सुक्य निर्माण झालं होतं.

स्टॉक एक्स्चेंज, एअर इंडिया बिल्डिंग, वरळी पासपोर्ट कार्यालय, शिवसेनाभवनालगतची पिछाडी...पवार एकेक नाव घेत होते आणि दहशतवाद्यांनी या मुंबापुरीत कसं जाळं रचलं होतं, त्याची अंगावर काटा आणणारी कहाणी सामोरी येत होती. मुख्यमंत्र्यांनी शेवटचं नाव घेतलं, जव्हेरी बाजार...मस्जीद बंदर नगरचा हा परिसर मुस्लिबहुल वस्तीचा आहे. असे एकूण बारा ठिकाणी बॉम्बस्फोट झाल्याचं निवेदन पवारसाहेबांनी केलं, तसंच त्यासाठी ‘आरडीएक्स’ हे घातक रसायन वापरलं गेल्याची नवी आणि अत्यंत धक्कादायक माहितीही त्यांनी दिली.

दुसऱ्या दिवशी सर्वच वर्तमानपत्रांत ‘मुंबईत १२ बॉम्बस्फोट’ असे मथळे झळकले आणि दिवसभरात स्पष्ट झालं की बॉम्बस्फोट तर फक्त ११ ठिकाणीच झाले आहेत. जव्हेरी बाजार म्हणजेच मस्जीद बंदर परिसरात तर बॉम्बस्फोट झालेलाच नव्हता. मग पवारसाहेबांनी असं कसं सांगितलं, हाच त्या दिवसभर चर्चेचा विषय होता. मुख्यमंत्र्यांनी ही माहिती केवळ पत्रकार परिषदेतच दिली होती असं नाही, तर आकाशवाणी आणि दूरदर्शन या माध्यमांतूनही त्यांनी ‘बारा बॉम्बस्फोट झाले’ असं सांगून टाकलं होतं.

या ‘खोटेपणा’चा खुलासाही मग त्याच दिवशी पवारांनी स्वत:च केला. शुक्रवारच्या त्या दिवशी मुंबईत झालेले सर्व बॉम्बस्फोट हे टिपून हिंदुबहुल भागांत झाले होते. त्याची लगोलग अनुचित, म्हणजेच हिंसक, प्रतिक्रिया उमटू नये म्हणून पवारांनी स्वत:च एक बॉम्बस्फोट मस्जीद बंदर या मुस्लिमबहुल वस्तीतही झाल्याचं जाहीर करण्याचं प्रसंगावधान दाखवलं होतं...एका धर्मानं दुसऱ्या धर्माविरोधात केलेलं हे कारस्थान नाही, असं दाखवून देण्याचाच त्यामागं उद्देश होता.

बाबरी मशीद पाडली गेल्यानंतर मुंबईत झालेल्या दंगलींची चौकशी करण्यासाठी पुढं न्या. श्रीकृष्ण यांचा आयोग नेमण्यात आला. त्या आयोगाच्या चौकशीच्या कक्षेत हे बॉम्बस्फोट येणं अपरिहार्यच होतं. मुंबईत ११ बॉम्बस्फोट झाले असताना १२ बॉम्बस्फोटांची माहिती का दिली, याची विचारणा करण्यासाठी पवारांना पाचारण करण्यात आलं. तेव्हा, ‘आपलं विधान खोटं जरूर होतं; पण या बॉम्बस्फोटांनंतर होऊ शकणारी संभाव्य हिंसा टाळण्यासाठी आपण शहाणपणानं तो निर्णय घेतला होता,’ असं पवारांनी सांगितलं होतं आणि न्या. श्रीकृष्ण आयोगानंही आपल्या अहवालात ‘धिस इज द एक्झाम्पल ऑफ स्टेट्‍समनशिप’ असं त्यासंदर्भात नमूद केलं होतं.

दहशतवादी कारवायांना मुत्सद्देगिरीनं उत्तर देण्याचा तो एक प्रयत्न होता.

मात्र, बॉम्बस्फोटांच्या त्या दिवशीच्या वार्तांकनात कळीचा शब्द होता तो ‘आरडीएक्स’ हाच. तोपावेतो भल्या भल्या पत्रकारांनाही त्याचं ‘गमभन’ ठाऊक नव्हतं. मात्र, मुख्यमंत्री म्हणून मुंबईत परतण्यापूर्वी दिल्लीत संरक्षणखात्याची धुरा सांभाळल्यामुळे, हे इतके शक्तिशाली स्फोट साध्यासुध्या स्फोटकांनी घडवून आणता येणार नाहीत, याची पवारांना कल्पना होती. संरक्षणखात्यात तेव्हा पवारांचे सल्लागार होते, नंतरच्या काळात राष्ट्रपतिपदी विराजमान झालेले डॉ. अब्दुल कलाम...त्यांच्याशी बोलल्यानंतरच, हे ‘आरडीएक्स’ आहे, हे पवारांना समजलं होतं. ते फक्त देहूरोड आणि कराची इथल्या दारूगोळा कारखान्यातच तयार होतं, असंही कलामांनी पवारांना सांगितलं. तेव्हा पवारांनी तातडीनं माहिती काढली की देहूरोडला त्याआधीच्या दोन वर्षांत एक ग्रॅमही ‘आरडीएक्स’ तयार करण्यात आलेलं नाही.

त्यामुळेच मग, हे ‘आरडीएक्स’ कराचीहूनच आलं असणार, असंही स्पष्ट होऊन गेलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway Jewellery Theft : रेल्वे प्रवाशांना मदतीचा बहाणा; ४० लाखांचे हिरेजडित दागिने लंपास करणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड!

IND vs SA: शेवटच्या दोन T20I सामन्यांसाठी टीम इंडियात दोन वर्षांनी या अष्टपैलूचं पुनरागमन! अक्षर पटेलची घेणार जागा

Satara Accident : शिरवळ–लोणंद रस्त्यावर भीषण अपघात; वीर धरणाजवळ दोन कारची समोरासमोर धडक; एक ठार, सात गंभीर!

Sheetal Tejwani Arrest : शीतल तेजवानीची रवानगी येरवडा कारागृहात; ३०० कोटींच्या व्यवहाराबाबत मौन!

Solapur News : शेतकऱ्यांच्या तक्रारीला यश; आमदार खरे यांच्या हस्तक्षेपाने लांबोटी विद्युत केंद्रातील अभियंता निलंबित!

SCROLL FOR NEXT