कंबोडियामध्ये अप्सरानृत्याचा अतिशय रमणीय असा सोहळा होतो. कुठंही पातळी न सोडता केलेला हा अभिजात आविष्कार व्यावसायिक गणितांमध्येही थक्क करून टाकतो. सांस्कृतिक उद्योजकतेचा हा मनोरम आविष्कार असतो. भारतातही असे प्रयोग आपल्याला नक्कीच करता येतील.
संध्याकाळचे चार वाजलेले होते. सकाळपासून आळसावलेला रस्ता हळूहळू जागा होत होता. आता कुठं जराशी हालचाल दिसू लागली होती. सियामरिप शहरातल्या मुख्य रस्त्यावरच्या कुवालेन सभामंडपामध्ये आताशी लगबग सुरू झाली होती. साधारण दीड एक हजार लोक बसू शकतील असा तो भव्य सभामंडप होता. त्याच्या मध्यभागी एक लांबलचक व्यासपीठ होतं. व्यासपीठाच्या मागच्या बाजूला अंकोरथॉममधले भव्य हसतमुख चेहरे. जणू अजिंठ्याची चित्रंच सजीव झाली आहेत असं भासत होतं. त्या चित्रशिल्पांमधलं कोरीवकाम, नाजूक हातांनी केलेली अवर्णनीय नक्षी, सारं काही विलक्षण. जणू काही तुम्हाला एका वेगळ्या अद्भुत विश्वाची अनुभूती देणारं. व्यासपीठाची अजून एक गंमत होती. आपण नेहमी व्यासपीठाकडं तोंड करून बसतो. इथं वेगळाच प्रकार होता. व्यासपीठासमोर रांगेत उभी डायनिंग टेबलांची रांग होती. त्या टेबलांवर आपण एकमेकांसमोर तोंड करून बसायचं आणि नंतर माना डावीकडे- उजवीकडं वळवून (आणि नंतर हळूच खुर्ची वळवून) व्यासपीठावरच्या कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा, अशी अनोखी पद्धत होती. सभामंडपाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे मध्यभागी व्यासपीठ आणि चारही बाजूला साधारण आठ फुटांच्या भिंती. त्यामुळं हवेचं चलनवलन फार चांगलं. बंदिस्त नसल्यानं चारही बाजूंनी हवा खेळती राहिलेली. सर्व टेबलं शिसवी लाकडांची. अत्यंत स्वच्छता. टापटिप. त्यावर काटे, चमचे, पेले सर्व काही नीट मांडून ठेवलेलं. एकाच रंगांची टेबल क्लॉथ. सभामंडपामध्ये मंद दिवे लावलेले. वरच्या बाजूला काचेची प्रकाशमान झुंबरे. त्यातून जणू काही प्रकाश पाझरत होता आणि खाली भूमीला न्हाऊ घालत होता. एक रोमांचक वातावरण. एक दाटून आलेली हूरहूर. कोणीतरी येणार होतं तिथं. त्यांच्याच आगमनाची तयारी सुरू होती. कुणीतरी विशेष. उत्सुकता ओसंडून वाहत होती. एक अधीरता भरून राहिली होती.
आता तिथं अप्सरांचं आगमन होणार होतं. होय अप्सराच! स्वर्गातल्या अप्सरा! त्यांच्या स्वागताची तयारी सुरू होती. त्यांना पाहण्यासाठी. त्यांचं नृत्य पाहण्यासाठी. त्यांच्या कथा जाणून घेण्यासाठी. त्यांचा अभिनय पाहण्यासाठी. देश-विदेशांतल्या रसिक श्रोत्यांची गर्दी जमत होती. कुवालन सभामंडप नटला होता. सजला होता. चारी बाजूंना बाहेरून दिव्यांची रोषणाई केली होती. साधारण सहा वाजले होते. रसिक श्रोत्यांचं आगमन होत होते. कुणी चीनमधून आलेले, कुणी जपानमधून. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, युरोपमधल्या विविध देशांमधल्याही पाहुण्यांनी गर्दी केली होती. काही अमेरिकी पाहुणेही दिसत होते. लगबगीनं लोक आत जात होते. त्यांची टेबलं आधीच रिझर्व्ह झाली होती. काहींनी ऑनलाइन रिझर्व्ह केली होती किंवा कुणीतरी त्यांच्या वतीनं अगोदरच रिझर्व्ह केली होती. टेबलांवर पाहुण्याच्या पाट्या शोभत होत्या. त्यांचं स्वागत अगदी भारतीय पद्धतीनं कमरेत वाकून दोन्ही हात जोडून नमस्कार करून केलं जात होतं.
आपली टेबलं पकडल्यावर मग पाहुण्यांनी मोर्चा वळवला तो बुफेकडे. त्या ठिकाणी किमान पन्नास ते साठ टेबलं मांडली होती. त्यावर सर्व प्रकारचे अन्नपदार्थ शिस्तशीर पद्धतीनं मांडून ठेवले होते. विविध प्रकारची सूप्स, शाकाहारी; तसंच सामिष पदार्थ. त्यांची नावं लिहून ठेवली होती. दहाहून अधिक प्रकारचे गोड पदार्थ, विविध प्रकारची फळं; कलिंगड, पपई, आंबा, अननस, लिची इत्यादी पायसम, नारळाची जेली बर्फी. सहा प्रकारच्या खिरी, खोबऱ्याची बर्फी, तांदळाची गोड बर्फी, नानाविध प्रकार, भाजलेले बटाटे, वांगी; सामिष पदार्थांचं वैविध्य तर कल्पनातीत. चिकन, मटण, बीफ, पोर्क, अंडी जे जे हवे त्याचा फडशा पाडावा...
एकदा पोटोबा शांत झाल्यावर हळूहळू मंडळी टेबलांकडं परतत होती. साधारण सात वाजायला दहा मिनिटं कमी असताना अंधार झाला. व्यासपीठाच्या बाजूला वादक आणि सहकारी येऊन बसले. लगोलग व्यासपीठावर तीन प्राचीन वाद्यप्रकार घेऊन तिघेजण येऊन बसले. त्यांनी एका विशिष्ट लयीमध्ये वाद्यं वाजवायला सुरवात केली. सर्व जण आतूरतेनं वाट पाहत होते. सुगंधी अत्तराचा सर्वत्र मंद सुगंध पसरला होता. तेवढ्यात व्यासपीठावरचे वादक आपापली वाद्यं घेऊन उठून गेले. काही काळ एक अस्वस्थ रिकामेपण भरून राहिले आणि अचानक तिचं आगमन झालं. हळूहळू एकेक पाऊल टाकत. इकडं तिकडं पाहत. मनमोहक हालचाल करत ती समोर येऊ लागली. अत्यंत सुंदर वेशभूषा, कमनीय बांधा, आकर्षक चेहरा, डोक्यावर आकर्षक मुकुट, कमरेला खोचलेली कमल पुष्पे, गुडघ्याखाली आलेली धोतरासारखी वस्त्रं, केसांमध्ये माळलेली फुलं, गळ्यांमध्ये फुलांच्या माळा, डोळ्यांमध्ये काजळ, तीक्ष्ण नजर, कोरलेल्या भुवया. होय! ती मूर्तिमंत अप्सराच होती. देवलोकातून आलेली. तिच्या आगमनानं जणू काही आसमंतामध्ये चैतन्य अवतरलं होते. मंत्रमुग्ध होऊन देशविदेशातल्या पाहुण्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. संयत हालचाल. कुठंही भडकपणा नाही. अश्लीलता नाही. शुद्ध सात्विकता जणू तिच्या रूपानं सर्वत्र भरून राहिली होती. सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळल्या होत्या.
जणू काही ते तिचं अंगणच होतं. विविध प्रकारे ती व्यासपीठावर मुक्त विहार करीत होती. इतक्यात दोन्ही बाजूंनी तिच्या सख्यांचा प्रवेश झाला. त्याही तिच्यासारख्याच. त्या सख्यांनी मग तिला घेरलं आणि मग सुरू झाला एक अपूर्व सोहळा. त्या व्यासपीठावर त्यांनी मनमोहक नृत्यरचनांनी जो अतिसुंदर अविष्कार सादर केला, त्याचं वर्णन शब्दांनी करता येणार नाही. ईश्वरी भावनांचा, संकल्पनांचा, विचारांचा तो मानवी अविष्कार चित्ताचा ठाव घेता होता. साधारण पंधरा मिनिटं हा अद्भुत सोहळा सुरू होता. सर्व जण भारावून गेले होते. स्वत:ला विसरून अप्सरांच्या जगात रममाण झाले होते. त्यानंतर एक समूहनृत्य झालं. आपल्या कोळी नृत्याप्रमाणं त्यामध्ये नाट्याचाही अविष्कार होता. प्रियकर-प्रेयसीचं लुटूपुटूचं भांडण आणि मग मनोमिलनातला गोडवा पाहणाऱ्याला सुखावत होता. त्यानंतर एक पारंपरिक नृत्य, त्यामध्ये माकडासारखा मुखवटा धारण केलेला प्राणी आणि एक सौदर्यवती यांचा परस्परसंवाद, खोटा खोटा वाद आणि आनंददायी शेवट असा भाग होता. पुन्हा एक समूहनृत्य आणि शेवटी पुन्हा एक अप्सरानृत्य. साधारणपणे एक ते सव्वा तासाचा एकूण कार्यक्रम होता. बरोबर आठ वाजता संपला. आयोजकांनी आवाहन केल्यावर अप्सरांबरोबर फोटो काढून घेण्यासाठी, सेल्फी काढण्यासाठी सगळ्यांनी व्यासपीठावर एकच गर्दी केली; पण कुठंही गडबड नाही. गोंधळ नाही. कुणाची भाषा कुणाला कळत नव्हती. मात्र, एक अद्भुत अमूर्त अनुभूती घेतल्याची जाणीव प्रत्येकाच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होती. साडेआठ वाजता सभागृह पूर्ण रिकामं झालं होतं. एकही पाहुणा तिथं उरला नव्हता. अप्सरा पुन्हा देवलोकात निघून गेलेल्या होत्या. प्रत्येक पाहुणा आयुष्यभरासाठी एक अनमोल आठवण आपल्या डोळ्यात आणि हृदयात साठवत होता.
कला, संस्कृती आणि व्यवसाय यांचा अभूतपूर्व संगम म्हणजे अप्सरानृत्य. खरंतर अप्सरानृत्य नव्हे, हे तर एक हॉटेलच. मात्र, कला आणि संस्कृती यांची जोड देऊन तयार केलेली ही "व्हॅल्यू ऍडेड' हॉटेलची संकल्पना. मुळात एकूण तीन तासांचाच कार्यक्रम. व्यासपीठ, सभागृह आणि बुफे व्यवस्था यांच्या आधारावर चालणारी चतुराईनं विकसित केलेली एक व्यावसायिक संकल्पना. कला आणि संस्कृतीचं एका अत्यंत उच्च आणि अभिरूचीसंपन्न पातळीवर नेऊन केलेलं रंगमंचीय सादरीकरण. कुठंही उत्तानपणा नाही, बीभत्सपणा नाही, बेशिस्त नाही. सर्जनशीलतेचा विस्मयकारी सन्मान आणि संयत अविष्कार असंच याचं वर्णन करावे लागेल. विकृततेच्या दिशेनं न जाता प्रत्येकाला सहकुटुंब सात्त्विक आनंद देणारी ही संकल्पना.
यातलं व्यावसायिक गणित लक्षात घेतलं, तर धक्का बसेल. एका पाहुण्यासाठी 15 यूएस डॉलर तिकीट म्हणजे साधारण एक हजार रुपये. दीड हजारांची क्षमता. त्यात सरासरी एक हजार जरी आले, तरी एका संध्याकाळची दहा लाख रुपये मिळकत. शिवाय बुफे सोडून इतर प्रत्येक वेगळा पदार्थ, पेय, बेव्हरेज इत्यादींसाठी जास्तीचे चार्जेस. त्यातून किमान दोन ते तीन लाखांची मिळकत. सीझनमध्ये तर दररोज किमान वीस लाखांची मिळकत नक्की होणार. शिवाय या अभिनव हॉटेलिंग कल्पनेतून देशाची कला आणि संस्कृती यांचा प्रचार प्रसार होणार. माणसांच्या अभिजात कला आणि सर्जनशक्तीला वेगळी दिशा देणारा, त्यांना रोमांचित करणारा, प्रसन्न आनंद देणारा अनोखा अनुभव. देशाचा इतिहास, परंपरा आणि संस्कृती याचा अद्भुतपणे प्रचार, प्रसार. त्याचं महात्म्य आणि सन्मान यांच्यामध्ये भर टाकणारी ही संकल्पना.
एखाद्या लॉनवर, हॉटेलच्या सभागृहामध्ये किंवा अगदी मंगल कार्यालयातही संकल्पना राबवता येऊ शकते. भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये कल्पक उद्योजकांनी पुढं येऊन ही संकल्पना राबवायला हवी. नृत्याला विविध व्यक्तिरेखांची जोड दिली, तर एक अतिशय उत्तम कलाविष्कार सादर करता येईल. तसंच त्याला पौराणिक कथाही जोडता येतील. धनगरी नृत्य, लावणी, कोळी नृत्ये, भारुड, गोंधळ यांचीही जोड देता येईल. संपूर्ण भारतामध्ये अशा प्रकारे सांस्कृतिक उद्योजकता राबवता येईल. भारतीय मनाला प्राचीन संस्कृतीची उपजत ओढ आहेच. विशेषत: अप्सरा, गंधर्व, यक्ष, किन्नर यांच्याविषयी आकर्षण आहे. यक्षगान, दशावतार असे कितीतरी प्रकार लोकप्रिय आहेत. त्यांना व्यावसायिक वळण देऊन कला, साहित्य आणि संस्कृती यांना तरुण पिढी आणि समाजाबरोबर या माध्यमातून थेट जोडता येईल. त्याचबरोबर विविध देशांमधून यासाठी पर्यटक आकर्षित करता येतील. तरुण कलाकारांना नवनवीन संधी निर्माण होतील. मोठ्या प्रमाणामध्ये रोजगारसंधी निर्माण होतील. संपूर्ण देशामध्ये आणि विदेशामध्ये भारतीय संस्कृतीचा आपणहून आपसूक प्रचार प्रसार होईल.
पूर्वीच्या काळी भारतातून साहित्य, कला, संस्कृती, स्थापत्य यांचा प्रवास कंबोडिया, थायलंड, इंडोनेशिया, बाली इत्यादी देशांकडं झाला. आता तिथल्या यशस्वी व्यावसायिक संकल्पनांचा आपण उपयोग करून रोजगाराची आणि संपत्ती-निर्माणाची नवी क्षितिजं सांस्कृतिक उद्योजकतेच्या माध्यमातून आपण साकार करू शकतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.