Ravi Pandit's article about new research
Ravi Pandit's article about new research 
सप्तरंग

संशोधनात्मक बदलासाठी प्रयत्न गरजेचे

रवी पंडित

अल्बर्ट आइनस्टाइन यांचं एक प्रसिद्ध वाक्‍य आहे, "भारतीयांना आम्ही खूप मोठं देणं लागतो. त्यांनी मोजायचं कसं ते जगाला शिकवलं, त्याशिवाय कोणतंच फायदेशीर संशोधन होऊ शकलं नसतं.' मानवाला ज्ञात असलेले सुरवातीच्या काळातील काही महत्त्वाचे गणितीय व शास्त्रीय शोध भारतानेच लावले. भारतीयांनी शून्याचा शोध, बायनरी नंबर सिस्टीम, अंतराळशास्त्र, अणूसिद्धांत, प्लॅस्टिक सर्जरी, बिनतारी संदेशवहन अशा कितीतरी शोधांचे योगदान जगाला दिले आहे. सिंधू संस्कृती हे प्राचीन भारतातील सर्जनशीलतेचे एक लखलखीत उदाहरण. ते जगभरात नावाजले गेले. भारताच्या मोठ्या भूभागावर पसरलेल्या या महान संस्कृतीत प्रभावी सांडपाणी व्यवस्थेपासून ते भांडी उत्पादनाच्या कारखान्यांपर्यंत अनेक क्षेत्रांत अभिनव अभियांत्रिकी कौशल्ये दिसून येतात.

परंतु आज मात्र देश म्हणून आपण सर्जनशीलतेवर पुरेसे लक्ष केंद्रित करत नसल्याची भावना तयार होत आहे. "क्वीन एलिझाबेथ प्राइज फॉर इंजिनिअरिंग' यांच्या अहवालानुसार, भारत जगभरात सर्वाधिक इंजिनिअर तयार करणारा देश म्हणून समोर येईल. म्हणजे संख्येने अभियंते भरपूर; परंतु नावीन्यपूर्ण संशोधनातील आपली कामगिरी मात्र अजूनही म्हणावी तितकी उंचावलेली नाही. ही जी दरी निर्माण झाली आहे, ती भरून काढणे हे आता आपल्यापुढील तातडीचे आव्हान आहे. त्यासाठी पहिली गोष्ट करावी लागेल, ती म्हणजे आपल्या देशातील शिक्षणपद्धती बदलणे आवश्‍यक आहे. शिक्षणातील सैद्धांतिक मांडणीवरील आधारित पद्धती बदलून त्याजागी प्रात्यक्षिकांमधून शिकण्याची पद्धत आली पाहिजे. चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या जगात "फिजिकल" व "डिजिटल' जग एकत्र आले आहे आणि त्यामुळे आपल्या जगण्याच्या पद्धतीतच आमूलाग्र बदल होत आहेत. आपल्य व्यवसाय-उद्योगांचे स्वरूपही त्यामुळे पालटते आहे. त्याचाच परिणाम म्हणजे विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित यांचे शिक्षण देण्याच्या पद्धतीत मोठा बदल होऊ घातला आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, डिजिटल, रोबोटिक्‍स, क्‍लाऊड, बिग डाटा, ऍनॅलिटिक्‍स, इंटरनेट ऑफ थिंग्ज असे नवे तंत्रज्ञान आपलेसे केलेल्या मनुष्यबळाला नजीकच्या काळात खूप जास्त मागणी असेल. तंत्रज्ञान क्षेत्र आणि शैक्षणिक संस्था यांना गुणवत्ता विकसित करण्यासाठी हातात हात घालून काम करावे लागणार आहे, ते त्यामुळेच.

येथे उल्लेख केलेल्या सर्व क्षेत्रांत विद्यार्थ्यांच्या अभिनव कल्पनांना चालना देण्यासाठी तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या मदत करू शकतात. संशोधन व विकास, इन्क्‍युबेशन व फंडिंग अशा सोयीसुविधा पुरवून या कंपन्या विद्यार्थ्यांमधील कौशल्यांचा विकास घडवू शकतील. इंजिनिअरिंग व सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी "केपीआयटी'ने आयोजित केलेल्या "स्पार्कल' या देशपातळीवरील "डिझाइन व डेव्हलपमेंट इनोव्हेशन' स्पर्धेच्या वेळी आम्हाला मुलांमधील सुप्त कलागुणांचा अनुभव आला. या स्पर्धेतून विद्यार्थ्यांना वाहतूक व ऊर्जा क्षेत्रातील रोजच्या जगण्यातील समस्या तंत्रज्ञानाधारित ऍप्लिकेशन्सच्या द्वारे सोडवण्याची संधी दिली होती. उज्ज्वल भविष्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून पाहण्याची ही संधी होती.

वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून भारत सरकारही तंत्रज्ञानाचा अवलंब व कौशल्ये विकसित करण्यासाठी उत्तेजन देत आहे. डिजिटल प्रॉडक्‍ट डेव्हलपमेंटमधील जगातील सर्वांत मोठा इव्हेंट ठरलेले "स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन 2017' हे तरुणांमधील गुणवत्तेला वाव देण्यासाठी प्रभावी व्यासपीठ ठरले. या उपक्रमातील एक भागीदार म्हणून विद्यार्थ्यांच्या कल्पनांचा दर्जा व ते ज्या ध्यासाने समस्यांशी भिडत होते ते पाहणे उत्साह वाढविणारे आणि आशा पल्लवित करणारे होते. सरकार व खासगी क्षेत्रांमध्ये अशा उपक्रमांच्या माध्यमातून दिसणारे परस्परसहकार्य आपल्याला नावीन्यपूर्ण संशोधनातील ध्येय गाठण्यासाठी उपयोगी ठरेल.

भारतातील सामाजिकदृष्ट्या महत्त्वाच्या कृषी, वाहतूक, ऊर्जा, आरोग्य अशा क्षेत्रांमध्ये नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब मूलगामी बदल घडवून आणेल, यात शंका नाही. त्यातून औद्योगिक विकासाला चालना मिळेल. आगामी काळात तरूण अभियंते आणि तंत्रज्ञांना विकासाची, कल्पक संशोधनाची; त्याचबरोबर बाळसे धरू लागलेल्या "स्टार्ट अप' क्षेत्रात उतरून कर्तृत्व दाखविण्याची संधी तर आहेच; पण त्यायोगे इतरांनाही नोकऱ्या उपलब्ध करून देणे त्यांना शक्‍य होणार आहे. त्यामुळे हा बदल घडवून आणण्यासाठी सर्वांनीच जोमाने प्रयत्न करायला हवेत.

(लेखक केपीआयटी टेक्‍नॉलॉजीचे सहसंस्थापक- अध्यक्ष आहेत)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT