sameehan kashalkar write article in saptarang
sameehan kashalkar write article in saptarang 
सप्तरंग

लौकिकाला साजेसंच सादरीकरण व्हायला हवं (समीहन कशाळकर)

समीहन कशाळकर sameehank@gmail.com

एका बुजुर्ग गायकाचा मी मुलगा असल्यानं गाण्याची भीती व दडपण माझ्यावर अगदी लहानपणापासून कधी आलं नाही; परंतु त्याच वेळी माझ्यावर जबाबदारी अधिक असल्याचं मला जाणवतं. अर्थात ही जबाबदारी मी आव्हान म्हणून नम्रपणे स्वीकारली आहे. काळ कोणताही असो, बुजुर्ग कलाकाराची नक्कल करणारा कोणताही शिष्य मोठा कलाकार कधीच बनू शकत नाही.

मी गाण्याकडं वळण्याचा प्रश्नच आला नाही, कारण मी नकळत गाण्यातच होतो! माझा जन्म रत्नागिरीचा. माझे आई-वडील (सौ. संजीवनी आणि पंडित उल्हास कशाळकर) ऑल इंडिया रेडिओमध्ये नोकरीला होते. बदलीच्या निमित्तानं आम्ही मुंबई, बदलापूर इथं राहायला होतो. मी इयत्ता दुसरीत असताना आम्ही कोलकत्याला गेलो. आयटीसी संगीत रिसर्च अकॅडमीमध्ये (एसआरए) बाबा "गुरू' म्हणून होते. सुमारे आठ ते दहा एकर असा हा मोठा परिसर आहे. आम्ही तिथं गेलो तेव्हा पहिल्या बंगल्यात उस्ताद निसार हुसेन खॉं (उस्ताद राशिद खॉं यांचे गुरू), तर दुसऱ्या बंगल्यात आम्ही राहायचो. आमच्या शेजारी पंडित अजय चक्रवर्ती आणि त्यांच्या शेजारी मालविका कानन असे शेजारीपाजारी बुजुर्ग गायक-वादक राहत होते. तिथले संचालक आग्रा घराण्याचे पंडित विजय किचलू हेदेखील आमच्या जवळच राहत होते. मी सगळ्यांना काका म्हणून हाक मारायचो. या सगळ्या व्यक्तींची महती किती मोठी आहे, हे कळण्याचं तेव्हा माझं वय नव्हतं. या सगळ्या कलाकारांचं आमच्या घरी येणं-जाणं असायचं. गेली अनेक वर्षं एसआरएचे दरवर्षी सलग तीन दिवस तिथल्या विस्तीर्ण मोकळ्या जागेत संगीतसंमेलन होतं. त्यात गानसरस्वती किशोरी आमोणकर, पंडित भीमसेन जोशी, उस्ताद अली अकबर खॉं, उस्ताद विलायत खॉं, पंडित हरिप्रसाद चौरसिया अशा अनेक बुजुर्ग कलाकारांचं गायन-वादन मी लहानपणापासून ऐकत आलो आहे. आई-बाबांनी मला प्रत्येक कार्यक्रमाला नेलं. मी एके ठिकाणी शांत बसून ऐकायचो, असे आता मला माझे आई-बाबा सांगतात.
मी जसजसा मोठा झालो, तसतसे बाबांनी माझ्याकडून सरगम, पलटे, अलंकार घोटून घेतले. आधी "यमन' किंवा "भैरव'च शिकला पाहिजे, असं बाबांनी कधी केलं नाही. मला गाण्याची गोडी निर्माण होण्याच्या दृष्टीनं माझ्या ज्या बंदिशी पाठ होत्या, त्यांना अनुसरून त्यांनी राग निवडले. सुरवातीला बाबा मला तानपुरा लावून देत असत. जेव्हा मी स्वतः तानपुरा जुळवून गाऊ लागलो, तेव्हा मला खूप आनंद वाटू लागला. बाबा मृदू व गोड स्वभावाचे म्हणून सगळ्यांना ज्ञात आहेत. मात्र, शिष्यांना व स्वतःच्या मुलाला गाणं शिकवताना त्यांचा स्वभाव कठोर व शिस्तीचा आहे. गाण्यात ते कोणतीही तडजोड खपवून घेत नाहीत. माझ्या मते रियाज हा दोन प्रकारचा असतो. स्वतः तानपुरा घेऊन गायला बसायचं. जी गोष्ट आपल्याला साध्य करायची आहे किंवा जी गोष्ट साध्य होत नाही आहे, ती साध्य होईपर्यंत प्रयत्न करणं. थोडक्‍यात, "घोटणे रियाज' व दुसरा रियाज म्हणजे बुद्धीचा रियाज. भरपूर ऐकल्यानंतर व शिकल्यानंतर नवीन नवीन कल्पना आपल्या गाण्यात कशा घेता येतील याचा रियाज. मात्र, डोक्‍यात खूप गाणं आहे; परंतु तेवढा गळा साथ देत नाही, तसंच गळा खूप चांगला आहे; पण तेवढं गाणं डोक्‍यात नाही, म्हणून गाऊ शकत नाही. असं कोणत्या कलाकाराच्या बाबतीत होऊ नये.

तेराव्या वर्षी माझा स्वतंत्र गायनाचा पहिला कार्यक्रम औंध संगीत महोत्सवात झाला. ते हीरकमहोत्सवी वर्ष होतं. मी तिथं "गौड मल्हार' राग गायलो. सुरेशकाकांनी (तालयोगी पंडित सुरेश तळवलकर) यांनी मला तबलासाथ करताना माझं मनोधैर्य वाढवलं. "उल्हासदादांच्या मुलाचा पहिला कार्यक्रम' म्हणून गंगूबाई हनगल, उस्ताद शाहीद परवेझ समोर ऐकायला बसले होते. एका ज्येष्ठ रसिक-श्रोत्यानं एक हजार रुपयांचं बक्षीस मला "आशीर्वाद' म्हणून दिलं. त्यामुळं माझा आत्मविश्वास वाढला.
आम्ही कोलकत्याला गेल्यानंतर आठ-दहा वर्षांनी गिरिजादेवी आमच्या शेजारी गुरू म्हणून राहायला आल्या. त्यांच्याशी आमचे घरचे संबंध तयार झाले. जणू त्या माझ्या आजी होत्या. त्या म्हणायच्या ः ""उल्हास मेरा बेटा है और तू मेरा पोता है।'' आईला त्या "बहू' मानायच्या. आमच्याकडची काळ्या गोड्या मसाल्याची आमटी, उपमा व साबूदाण्याची खिचडी खूप आवडायची. मी कित्येकदा हे सगळे पदार्थ त्यांना द्यायला जायचो. बाबांनी आम्हा सर्व शिष्यांना सांगितलं होतो ः "त्या फार मोठ्या ठुमरी-गायिका आहेत. त्यांच्याकडून तुम्ही सगळ्यांनी ठुमरी शिकून घ्या.' बाबांनी गिरिजादेवींना हे सांगितलं. त्या संगीतातले बनारसी रीती-रिवाज पाळणाऱ्या होत्या. त्या बाबांना म्हणाल्या ः ""हॉं, हॉं... तुम्हारे सब शिष्यों को मैं ठुमरी जरूर सिखाऊंगी । वो तो मेरे पोते जैसे है। लेकिन पहले शास्त्र के अनुसार गुरुपूजन होना चाहिए। उस के सिवाय मैं नही सिखाऊंगी।' मग एक दिवस आम्ही सगळ्यांनी गुरुपूजन कार्यक्रम केला व माझं ठुमरीचं शिक्षण सुरू झाले. ठुमरीमध्ये दोन प्रकार आहेत. एक पूरब अंगाची तर दुसरी पंजाबी अंगाची. गिरिजादेवी पूरब अंगाची ठुमरी गात असत. ती भावप्रधान असते. एकदा त्या "तडप तडप जिया सावरियॉं बिन'. हा दादरा शिकवत होत्या. त्यात विरहरस असलेला आशय आहे. हा दादरा गाताना गळा चांगला चालतो म्हणून मोठमोठ्या ताना कुणी आनंदानं गायला लागला, तर गिरिजादेवी सारख्या सांगायच्या ः "हमेशा ठुमरी और दादरा के शब्द क्‍या है देखो, भाव क्‍या है देखो और वो गाने की कोशिश करो।'

कारकीर्दीच्या प्रारंभापासून अनेक मानाच्या संगीतमहोत्सवांमध्ये मला गाण्याची संधी मिळाली, हे माझं भाग्यच. एका बुजुर्ग गायकाचा मी मुलगा असल्यानं गाण्याची भीती व दडपण माझ्यावर अगदी लहानपणापासून कधी आलं नाही; परंतु त्याच वेळी माझ्यावर जबाबदारी अधिक असल्याचं मला जाणवतं. अर्थात ही जबाबदारी मी आव्हान म्हणून नम्रपणे स्वीकारली आहे. काळ कोणताही असो, बुजुर्ग कलाकाराची नक्कल करणारा कोणताही शिष्य मोठा कलाकार कधीच बनू शकत नाही. कलेत नावीन्य न दिसल्यास अथवा उचित सादरीकरण न झाल्यास श्रोते कलाकाराला नाकारतात. कला ही दर्जेदार व त्या कलाकाराच्या लौकिकाला साजेशीच सादर व्हावी लागते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Viral Video: "मला माहीत आहे 'डिक्टेटर' यासाठी अटक करणार नाही," ट्रोल होऊनही पंतप्रधानांचे भन्नाट उत्तर

काँग्रेसच्या प्रयत्नांवर वडेट्टीवारांनी पाणी फेरले, निवडणूक संपेपर्यंत शांत बसण्याचे निर्देश

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. अजित पवार, उदयनराजे भोसले यांनी केलं मतदान

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

Sakal Podcast : मावळ लोकसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार? ते सुनीता विल्यम्सची पुन्हा अवकाश भरारी

SCROLL FOR NEXT