Mumbai
Mumbai sakal
सप्तरंग

कष्टकऱ्यांवर मुंबई प्रेम करते...!

संदीप काळे sandip.kale@esakal.com

माझा जुना सहकारी सागर गवई याची वाट बघत मी बेलापूरच्या सेक्टर चारमध्ये थांबलो होतो. दुपारचे चार वाजले होते. त्याचवेळी अचानकपणे महापालिकेची गाडी आली.

माझा जुना सहकारी सागर गवई याची वाट बघत मी बेलापूरच्या सेक्टर चारमध्ये थांबलो होतो. दुपारचे चार वाजले होते. त्याचवेळी अचानकपणे महापालिकेची गाडी आली. त्या गाडीने रस्त्यावर लावलेल्या सगळ्या विक्रेत्यांचे गाडे उचलायला सुरुवात केली. त्या गाडीवाल्यांच्या अनेक गरीब विक्रेते पटापटा पाया पडत होते. एक माणूस माझ्या बाजूला उसाचा रस विकण्याचं काम करत होता. त्यांनी तातडीने रस काढणारं मशिन आणि सगळं साहित्य आतमधल्या गल्लीमध्ये नेलं. ते सामान आतमध्ये ठेवून दिलं. एक छोटासा माठ आणि छोट्याशा बॅगमध्ये पाणीपुरी असं घेऊन ती व्यक्ती रस्त्यावर आली. अतिक्रमणवाल्यांची कारवाई सुरू होती. त्याकडे लक्ष न देता या व्यक्तीने पाणीपुरी विकायला सुरुवात केली. पाणीपुरीच्या गाड्याभोवती गर्दी जमली. मीही ती चवदार पाणीपुरी खाल्ली. मी फोनवर बोलत होतो. अजून सागर येतच होता. काही वेळात त्या व्यक्तीकडे असणारी पाणीपुरी संपून गेली. ती पाणीपुरी विकणारी व्यक्ती त्या गल्लीमध्ये गेली. त्या व्यक्तीने कुल्फीचा गाडा रस्त्यावर आणला. तिथेही तशीच गर्दी. माझी आणि सागरची भेट झाली. मी बेलापूरला ऑफिसमध्ये गेलो. काम आटोपून घरी निघालो. पुन्हा त्याच जागेवर ती व्यक्ती मला भाजीपाला विकताना दिसत होती. मी गाडी बाजूला घेतली आणि त्याच्याकडे भाजीपाला खरेदी करत-करत त्याच्याशी बोलत होतो. तसंही भाजीपाला घेणं हा एक बहाणा होता. मला त्या व्यक्तीशी बोलायचं होतं. आमचं बोलणं सुरू झालं.

मी ज्या व्यक्तीशी बोलत होतो, त्यांचं नाव सूरज यादव. सूरज हे मूळचे बिहारचे. चाळीस वर्षांपूर्वी मुंबईत आले आणि आता मुंबईकर झाले. येणारी प्रत्येक व्यक्ती, ‘भैया मेथी कितने की है?’, ‘भैया कोथिंबीर का क्या भाव है?’ असं म्हणत. अनेक लोक सूरज यांना ‘भैया’ म्हणत होते. भाजीपाला घेणारं ग्राहक भाजीपाला घेऊन गेलं की, मी पुन्हा त्यांच्याशी बोलत होतो. आमचा हा संवाद मध्ये-मध्ये तुटत होता. सूरज यांच्याकडील भाजीपाला संपत आला होता. ते आता घरी जायच्या तयारीला लागले होते. आमच्या गप्पा सुरू होत्या. त्यांच्याबरोबरच्या गप्पांमधून अनेक विषय माझ्यापुढे आले. सूरज यांची कामगिरी ऐकून मी थक्क होत होतो.

पहिल्यांदा मुंबईला येताना सूरज यांच्याकडे तिकिटाचे पैसेही नव्हते. ते मुंबईत आले, आपल्या एका मित्राकडे थांबले. सूरज यांनी सगळ्यात पहिल्यांदा कामाला सुरुवात केली, ती लोकांच्या गाड्या साफ करून देण्याची.

पहाटे पाच वाजता उठायचं, ठरलेल्या सोसायट्यांमधलं गाड्या स्वच्छतेचं काम करायचं. असं करत-करत सुरुवातीची पाच वर्षं सूरज यांनी फक्त गाड्या साफ करायचं काम केलं. त्या पाच वर्षांमध्ये त्यांनी आपले दोन्ही लहान भाऊ मुंबईत आणले. गाडी साफ करण्याच्या कामामध्ये आपल्या भावांनाही सहभागी करून घेतलं.

सूरज मुंबईला येताना नेमकं त्यांचं लग्न झालं होतं. मी सूरज यांना विचारलं, ‘‘आता राहता कुठं? कुटुंब कुठं आहे? तुमचे भाऊ कुठं आहेत?’’ सूरज म्हणाले, ‘‘माझे दोन्ही भाऊ मुंबईमध्येच आहेत. एक भिवंडीमध्ये बांधकाम व्यावसायिक आहे. दुसरा कांदिवलीला जुन्या गाड्या खरेदी करून विकायचं काम करतो.’’ ते पुढं म्हणाले, ‘‘मी बेलापूरलाच राहतो. भावांनी अलीकडे आपलं कुटुंब मुंबईत आणलं आहे. माझी बायको गावीच राहते. माझं वर्षातून एक वेळा गावी जाणं होतं. बिहारमधल्या करीमपूर इथं माझं कुटुंब राहतं. सध्या घरी पत्नी एकटीच असते. आई-वडील हयात नाहीत. एक बहीण आहे, तिचे यजमान वारलेले आहेत. त्या दोघीजणी गावी असतात. तीन मुली आहेत, त्या तिघी डॉक्टर आहेत. एक मुलगा आहे, तो इंजिनिअर आहे.’’ मी मध्येच म्हणालो, ‘‘तुमची मुलं कुठं शिकली?’’ सूरज म्हणाले, ‘‘महाराष्ट्रातच शिकली. पुढे ती नोकरीच्या निमित्ताने, दवाखान्याच्या निमित्ताने बिहारमध्येच स्थाईक झालीत.’’ मुलं नेहमी म्हणतात, ‘‘बाबा, तुम्ही हे काम सोडा, आमच्याकडे येऊन राहा; पण माझी मुंबई सोडण्याची इच्छा होत नाही.’’

सामानाची बांधाबांध करून सूरज अगदी तल्लीन होत मला आपल्या आयुष्याची कहाणी सांगत होते. सूरज बोलताना म्हणाले, ‘‘या मुंबईने मला सगळं काही दिलं. माझं वय आता बासष्ट वर्षं आहे. मुंबईत मला स्वतःचं घर आहे; पण ते मी भाड्याने दिलं. माझ्यासोबत असणारे पाच जण आम्ही एका रूममध्ये राहतो, ती रूमदेखील भाड्याने घेतली आहे. आम्ही घरीच जेवण बनवतो. सकाळी-सकाळी पाच वाजल्यापासून पेपर टाकायचा. पेपर झाल्यावर चहा आणि इडली-डोसाचं दुकान लावायचं. दुपारनंतर चार वाजेपर्यंत चपला विकण्याचा व्यवसाय करायचा. त्यानंतर ज्यूसविक्री, पाणीपुरी आणि रात्री भाजीपाला विक्रीचा व्यवसाय, असा माझा दिनक्रम असतो.’’

मध्ये मध्ये अनेक वेळा विशेषतः निवडणुकीच्या वेळी खूप वावड्या उठतात, असं सांगत सूरज म्हणाले, ‘‘भैया हटाव, मुंबई बचाव. स्थानिक लोकांच्या उद्योग, नोकऱ्या भैयांनी पळवल्या, असं म्हणत आमच्यावर अनेकवेळा अत्याचार होतात. निमूटपणे कित्येक वेळा मी मार खाल्ला. पोलिसांचा त्रास किती वेळा झाला बापरे! या सगळ्यांमध्ये एक तत्त्व स्वीकारलं, कोणाला रागवायचं नाही, कोणाशी भांडायचं नाही. आपलं काम ठरलेल्या वेळेमध्ये करत राहायचं. या सूत्राच्या जोरावरच आज इथपर्यंत आहे. आता वाटतं हे खूप झालं. आपल्या गावी जावं. छोटसं घर बांधावं आणि आपल्या आई-वडिलांच्या आठवणीत जगावं. पण, पाय मुंबईच्या बाहेर निघत नाही. मी किमान दीडशे जणांना बिहारमधून मुंबईमध्ये आणलं असेल. हे सगळेजण मला त्यांचा देव मानतात.’’ सूरज त्यांचा मुंबईमधला सगळा प्रवास मला सांगत होते आणि मी ते ऐकत होतो.

ही सत्यघटना, एका सूरजची नाही, तर मुंबईत मोठ्या आशेनं येणाऱ्या त्या प्रत्येकाची आहे, ज्यांनी मुंबईत कष्टाचं रोपटं लावलं, त्या रोपट्याला रोज मेहनतीचं पाणी घातलं, अशा सर्वांची ही कहाणी आहे. सूरज घरी निघाले आणि मीही. सूरज यांच्या डोक्यावर उरलेल्या भाजीपाल्याचं ओझं होतं; पण रोज गच्च असणारं मन हलकं झालं होतं, हे त्यांच्या चालण्याच्या गतीवरून वाटत होतं.

सूरज यांच्यासारखे गावाकडून मुंबईत माणसांना घेऊन येण्याचे प्रयोग मीही केले; पण चार दिवसांनंतर मला घरची फार आठवण येते, असं म्हणत कित्येकजण तर न सांगता आपल्या गावी निघून गेले, असा अनुभव माझ्यासह अनेकांच्या पाठीशी आहे. हा भैया, हा बाबू, तो या राज्यातला, तो या भागातला, असं गुऱ्हाळ लावणारे मुंबईत पावलोपावली भेटतात; पण यापेक्षाही एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि तो म्हणजे, अटकेपार कष्टाचा झेंडा मिरवणारा तो प्रत्येक स्वाभिमानी माणूस. जी माणसं प्रामाणिकपणे आपल्या कामाला न्याय, प्राधान्य देतात, प्रचंड काबाडकष्ट करतात, त्यांच्यावर मुंबईही प्रेम करते. बरोबर ना...!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Share Market Opening: शेअर बाजाराची वाढीसह सुरुवात; निफ्टी बँक पुन्हा नवीन विक्रमी उच्चांकावर

Rohit Sharma Birthday : 'सलाम रोहित भाई...' मुंबईने टीम इंडियाच्या कर्णधारचा बड्डे अनोख्या पद्धतीने केला साजरा - Video

VIDEO: वडील असावेत तर असे! घटस्फोट झालेल्या मुलीचे माहेरी केले जंगी स्वागत; व्हिडिओ होतोय व्हायरल

Latest Marathi News Live Update : विजय शिवतारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला

SCROLL FOR NEXT