prasad manerikar
prasad manerikar 
सप्तरंग

‘शाळा बंद’मधली नवी संधी (प्रसाद मणेरीकर)

प्रसाद मणेरीकर pmanerikar@gmail.com

कोरोनाच्या साथीनं सगळी समीकरणंच बदलून गेली आहेत. सगळ्यात मोठा परिणाम शिक्षणावर झालाय. एका अनिश्‍चित कालखंडानं सगळ्यांनाच अस्वस्थ केलंय. शाळा कधी सुरू होणार हे कुणीच ठामपणानं सांगू शकत नाही. सध्यातरी दिवाळीनंतर शाळा सुरू होणार असं जाहीर झालंय. या वेळाचं करायचं काय विद्यार्थ्यांमध्ये नवं काही तरी रुजवायची हच वेळ आहे हे पालकांनी समजून घेतलं पाहिजे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं मार्च महिन्यापासून बंद असलेल्या शाळा पुन्हा कधी सुरू होणार, याबाबतीत अजूनही काहीच स्पष्टता येताना दिसत नाही. विद्यार्थ्यांना काही प्रमाणात बोलवावं, तेही प्रामुख्यानं नववी ते बारावी या इयत्तांच्या विद्यार्थ्यांबाबत, अशी माहिती केंद्र सरकारच्या पातळीवर समोर येताना दिसते; पण राज्य सरकारांच्या बाबतीमध्ये मात्र अजूनही काही निश्चितता नाहीये. अर्थात, निश्चितता यावी अशी परिस्थिती भोवताली नाही. यामुळं शाळा सुरू करणं ही मोठा धोका पत्करण्याची जबाबदारी ठरू शकते. काही तज्ज्ञांच्या मते, मुलांची प्रतिकारक्षमता मोठ्या माणसांपेक्षा चांगली असल्यामुळं मुलांना कदाचित फारसा त्रास होणार नाही; पण शाळा सुरू केल्यामुळं कदाचित मुलं घरापर्यंत व मोठ्या समाजापर्यंत कोरोनाची वाहक ठरण्याचा धोका आहे. एकूणच याबाबत समाजामध्ये मोठ्या प्रमाणात भीती आहे. या स्थितीत मुलांचं व पर्यायानं स्वत:चं आरोग्य धोक्यात घालण्याची जोखीम कोणी घेऊ इच्छिणार नाही. यामुळंच गेल्या काही महिन्यांपासून शाळा सुरू होण्याबद्दलची अनिश्चितता सतत आहे आणि दरवेळेला पुढच्या पुढच्या तारखा दिल्या जातात. यात सरकारची अगतिकता आपण समजू शकतो.

प्रत्यक्ष शाळा सुरू होण्यातल्या अडचणी लक्षात घेता, सरकारनं ऑनलाइन शिक्षण अधिकाधिक सुरू करावं, यासाठी आग्रह धरला. यात मुलांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये, हा हेतू होता. पण, गेल्या तीन-चार महिन्यांतला अनुभव लक्षात घेता, ऑनलाइन शिक्षणातील मर्यादा लक्षात येऊ लागल्या आहेत. मग या मर्यादा तंत्रज्ञानातल्या असतील, किंवा शिक्षक-पालकांना पुरेसं तंत्रज्ञान अवगत नसण्याच्या असतील, किंवा तंत्रज्ञान शिक्षणासाठी कसं वापरायचं, याचा पुरेसा अनुभव वा त्यासाठी आवश्यक प्रशिक्षण नसण्याच्याही असतील. आजपर्यंत आपल्याला प्रामुख्यानं वर्गशिक्षणाची सवय. वर्ग-खडू-फळा-पुस्तक यांतून बाहेर पडून, तंत्रज्ञानाच्या मदतीनं शिकवायचं कसं, याचा आवश्यक अनुभव आपल्याला नाही. कारण, तशी गरज फारच कमी होती. तंत्रज्ञानाची जी काही थोडीफार मदत घेतली जायची, ती मदतही वर्गातच घेतली जायची. त्यामुळं तंत्रज्ञानाचा, त्याच्या क्षमता व मर्यादा लक्षात घेऊन, त्याप्रमाणे योग्य त्या पद्धती वापरून, शिक्षण देण्यासाठी आवश्यक तयारी आपली झालेली नव्हती. जे शिक्षक पुरेसे तंत्रज्ञानस्नेही नाहीयेत, त्यांच्याबाबतीत हे तंत्रज्ञान वापरायचं कसं, याच्याही अडचणी आहेत. ऑनलाइन शिक्षण हे स्वतंत्र कौशल्य आहे आणि ते कौशल्य शिक्षकांनी आत्मसात करणं व त्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण सरकारनं वा शाळा / संस्थाचालकांनी देणं हे गरजेचं आहे. कारण केवळ कॅमेऱ्यासमोर उभं राहून बोलणं पुरेसं प्रभावी होत नाही, त्याला इतर अनेक पूरक बाबींची जोड द्यावी लागते. व्हिडीओ तयार करण्यासाठी किमान तंत्रज्ञान परिचय व दृष्टी असावी लागते. याचबरोबर प्रत्यक्ष शिकवताना मुलं सतत समोर आहेत ना, ती लक्षपूर्वक काम करताहेत ना, याकडं सातत्यानं लक्ष देणं, हेही ऑनलाइन प्रक्रियेमध्ये एक मोठं आव्हान असतं. अर्थात, या सगळ्या मर्यादा लक्षात घेऊनही शिक्षकवर्ग सध्या बराच प्रयत्नशील आहे, यातून नव्या कल्पना, नवे प्रयोग उभे राहत आहेत, काही हौसेनं नवनव्या पद्धती अवलंबत आहेत, हेही जाणीवपूर्वक नमूद करावंसं वाटतं.

अशाच अडचणी मुलांच्या बाबतीतही आहेत. ऑनलाइन शिक्षणासाठी आवश्यक असे चांगल्या प्रतीचे फोन, कॉम्प्युटर, आवश्यक ते मोबाईल नेटवर्क, वीज इत्यादीचीही पुरेशी सोय नाही. दोनवेळच्या जेवणाची भ्रांत असलेल्या कुटुंबांसाठी स्मार्टफोन विकत घेणं परवडणारंही नाही. अशा विविध कारणांनी हजारो मुलं या शिक्षणापासून वंचित आहेत. अशा वेळेला ऑनलाइन शिक्षण कसं प्रभावी ठरणार, असे प्रश्न आता अधिकाधिक भेडसावू लागले आहेत. यामुळंच सरसकट बंदी करण्यापेक्षा जिथं शक्य आहे, तिथं तरी किमान शाळा सुरू कराव्यात, असा मुद्दा पुन:पुन्हा येतो आहे.
ऑनलाइनची शिक्षणमर्यादा शिकणं, ही एकाच वेळी व्यक्तिगत, तरीही एकत्रित होणारी प्रक्रिया आहे. मुलांच्या बाबत तर ती अधिक आहे आणि शिकण्यासोबत एकत्रितपणे खेळणं हा त्या शिकण्याच्या प्रक्रियेचा अविभाज्य असा भाग आहे. म्हणजे, प्रत्येक मुलाच्या शिकण्याचा प्रवास जरी स्वतंत्र असला; त्या व्यक्तीपरत्वे, तिच्या क्षमतांप्रमाणे भिन्न असला, तरी शिकणं एकमेकांच्या मदतीनं होतं. जसं शिक्षकांच्या मदतीनं मुलांचं होतं, त्याचबरोबर वर्गातील इतर सहकार्‍यांच्या मदतीनं मुलं कितीतरी अधिक शिकतात. भोवतालात वावरताना शिकतात. पण, ऑनलाइन शिक्षणामध्ये मूल एकटं असतं. दुसरी गोष्ट म्हणजे, लहान मुलांच्या बाबतीत तर शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये शारीरिक हालचालींना महत्त्वाचं, बरोबरीचं स्थान आहे. ती सतत हालचाल करत असतात आणि हालचालींतून त्यांच्या शिकण्याला मदत होत असते, त्यांचा मेंदू उत्तेजित होत असतो.

कॉम्प्युटरसमोर एका जागी बसून राहण्यानं हालचालींवर मर्यादा येतात. या सगळ्या मर्यादांतूनच सध्या ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. त्यामुळं ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय ठेवल्यानं एक जबाबदारी पूर्ण झाली, इतक्याच मर्यादित अर्थानं याकडं पाहून चालणार नाही आणि या एकूण परिस्थितीत ऑनलाइन शिक्षण व त्याची परिणामकारकता हे एका मर्यादेपर्यंतच लक्षात घ्यायला हवं. शिक्षणाकडं विविध अंगांनी पाहण्याची आणि शिक्षण कसं असतं वा असलं पाहिजे, हे नव्यानं समजून घेण्याची संधी आपल्याला सध्याच्या कोरोना काळानं दिलेली आहे. सध्या आपली सर्वांत मोठी अडचण होते ती शिक्षण वर्गकेंद्री आणि पाठ्यपुस्तककेंद्री ठेवल्यामुळं. साहजिकच, शिक्षणासाठी ज्या गोष्टी अधिक परिणामकारक आणि प्रभावी ठरतात असं आपण मानतो, तो वर्ग आणि पाठ्यपुस्तक या दोन्ही गोष्टी शिक्षणाच्या मुख्य मर्यादा ठरू लागल्या आहेत आणि सध्या कोरोनाकाळानं हे पुन्हा एकदा अधोरेखित केलेलं आहे.

अभ्यासक्रमाचा व्यापक विचार
आपण शिक्षणाचा विचार पाठ्यक्रमापेक्षा अभ्यासक्रमाच्या अंगानं जर केला, तर कदाचित आपल्याला शिक्षण अधिक विस्तारानं आणि दूरपर्यंत पोहोचवता येईल; पण हे करण्यासाठी आपल्याला शिक्षणामध्ये काही मूलभूत स्वरूपाचे बदल करावे लागतील. शाळा आणि पाठ्यपुस्तककेंद्री शिक्षण असण्याचा परिणाम असा आहे, की शिक्षण हे काही विशिष्ट गोष्टींशी केंद्रित झालेलं आहे. म्हणजे शिकण्यासाठी शाळेत गेलं पाहिजे, किंबहुना शाळेतच जास्त चांगलं शिक्षण होतं; शिक्षण हे पुस्तकाच्या आधारे करायचं असतं, म्हणजे पुस्तकांचा अभ्यास केला की शिक्षण झालं, याचा झालेला हा अतिरेक आहे.

शाळा नावाची व्यवस्था किंवा पाठ्यपुस्तक या बाबी उपयुक्त नाहीत असं माझं अजिबात म्हणणं नाही, त्या उपयुक्त आहेतच; पण त्या आपणच मर्यादित केलेल्या आहेत आणि शिक्षण हे त्याहीपलीकडं आहे, असतं, हे या प्रक्रियेत आपण सोईस्कर विसरून गेल्यामुळं आताचा प्रश्न आपल्याला अधिक मोठ्या प्रमाणात आणि तीव्रतेनं भेडसावतो आहे. यासाठी आपल्याला अभ्यासक्रमाचा विचार व्यापकतेनं करावा लागेल. म्हणजे पाठ्यपुस्तकात अडकून न पडता अभ्यासक्रमाची मुक्त चौकट ठेवली, तर तो अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे विविध पर्याय निर्माण निर्माण करता येतात, पालकांना अधिकाधिक सहभागी करून घेता येऊ शकतं. शाळाकेंद्री व्यवस्थेपासून समाजकेंद्री व्यवस्थेपर्यंत आपण शिक्षण आणू शकलो, तर कदाचित शिक्षणाला अधिक व्यापक असा अर्थ प्राप्त होईल.

शिक्षणाची समाजकेंद्री रचना
कारण, समाज हा विविधतेनं नटलेला आहे. एकाच गोष्टीचे विविध प्रकारचे अनुभव समाजात मिळतात. उदाहरणार्थ, एखाद्या समाजात एकच भाषा बोलली जात असेल; पण त्यातही विविध लकबी, शब्द, त्यांचे भिन्न उच्चार किंवा एखाद्या वस्तूसाठी, भावनेसाठी असणारे विविध शब्द हे सगळं समाजात वावरत असताना आपल्याला कळतं. प्रत्यक्ष व्यवहाराच्या संधी आपल्याला समाजातूनच उपलब्ध होतात आणि तेही विविध पातळ्यांवरचे असतात. या व्यवहारांतूनच अनेकविध संकल्पना स्पष्ट व्हायला, त्यांचे अर्थ नीटपणे समजायला मदत मिळते. त्यामुळं नागरिकशास्त्राच्या पुस्तकातून मांडलेली ‘विविधतेतून एकता’ ही संकल्पना खरंतर समाजात वावरताना अधिक चांगली कळत असते. या संकल्पना प्रत्यक्ष व्यवहारात उतरवताना काय अडचणी येतात, त्या सोडवण्याचे कोणकोणते पर्याय असू शकतात, हेही समाजात वावरताना समजतं. यामुळं शिक्षण समाजामध्ये जितक्या मोठ्या प्रमाणात पसरवता येईल, म्हणजेच समाजाला शिक्षणाशी जितकं जोडून घेता येईल, तितकं शिक्षण अधिक चांगलं होईल. दुसरी बाब म्हणजे, मुलं जशी कुटुंबाची घटक असतात, तशी ती समाजाचाही भाग असतात. त्यांच्यातूनच पुढचा समाज निर्माण होत असतो, हे लक्षात घेतलं तर मुलांचं शिक्षण समाजात समाजाच्या सहभागानं का झालं पाहिजे याचं महत्त्व लक्षात येतं.
शाळाकेंद्री व्यवस्थेमुळं अनुभवांच्या ज्या मर्यादा येतात, त्या समाजकेंद्री व्यवस्थेमध्ये कमी करता येतील.

आजपर्यंत आपण शाळा ही समाजाशी जोडली गेली पाहिजे, शाळा ही समाजाचं प्रारूप असलं पाहिजे असा विचार करत होतो; पण आता एक पाऊल त्यापुढं टाकून शिक्षण समाजाशी जोडलं गेलं पाहिजे, समाज हा शिक्षणाच्या केंद्रस्थानी आला पाहिजे, हा विचार आपल्याला करावा लागेल. समाजाशी शिक्षण जोडून घेण्याचा आणखी एक महत्त्वाचा भाग आहे, तो म्हणजे, समाजातील व्यक्ती या विविध प्रकारचे अनुभव घेऊन अनुभवी बनलेल्या असतात. त्यांच्यात अनेकविध कौशल्यं असतात आणि ज्ञानही असतं. या सगळ्याचा एकत्रित, एकसंध असा फायदा मुलांना शिकताना होऊ शकतो.
यात दोन्ही बाजूंचा फायदा होईल. म्हणजे पूर्वीच्या काळी एकदा घेतलेलं शिक्षण जीवनभर पुरायचं. आज तसं नाही. सातत्यानं तंत्रज्ञान बदलतंय, नवे शोध लागताहेत आणि या सगळ्यासोबत समाजातील सर्वांना पुढं जाणं ही मोठी कसरत होऊन बसते. शिक्षण हे समाजाशी जोडलं गेलं तर लहान-मोठ्यांची घुसळण होईल, त्यातून सगळ्यांचंच सातत्यानं शिक्षण होत राहील, सगळे मिळून एकत्रितपणे पुढं जातील.

तंत्रज्ञानस्नेही शिक्षण
दुसरा विचार आहे तो तंत्रज्ञानाचा आणि त्याआधारे शिक्षणव्याप्ती वाढवण्याचा. यापुढच्या काळात आपल्याला तंत्रज्ञानाबरोबरच जायचं आहे आणि या तंत्रज्ञानाचा अधिकाधिक प्रभावीपणे वापर करून घ्यायचा आहे. पण हे तंत्रज्ञान नेमकं कुठं प्रभावी ठरेल आणि कुठं आपल्या बुद्धिमत्तेवर, आपल्या शारीरिक क्षमतांवर आपल्याला भर द्यायचा, याचा विचार करावा लागेल. म्हणजे तंत्रज्ञानानं आपल्या भारंभार पाठांतराची गरज कमी केली आहे, तंत्रज्ञानाची माहिती लक्षात ठेवण्याची क्षमता प्रचंड आहे आणि त्याच्या आधारे आपण भरपूर गोष्टी/ माहिती हव्या तेव्हा समोर आणू शकतो. अशा वेळेला आपल्याला आपल्या बुद्धिमत्तेचा नेमका कुठं वापर करायचा, याची स्पष्टता यावी लागेल आणि त्यासाठी आतापासूनच शिक्षणामध्ये बदल करावे लागतील. आपल्याला तंत्रज्ञानासोबत जगायचं आहे, हे तंत्रज्ञान आपण निर्माण केलं आहे व ते आपले कष्ट कमी करण्यासाठी आहे. या तंत्रज्ञानाचा वापर आपल्या शिक्षणाची व्याप्ती वाढवण्यासाठीचे विविध पर्याय शोधण्यासाठी व त्याच्या अवलंबासाठी करावा लागेल. म्हणजेच एखादी संकल्पना स्पष्ट करताना किती विविध प्रकारे स्पष्ट करता येते आणि विविध बाबींशी जोडता येते, हे आपल्याला बघावं लागेल. म्हणजे आपल्याला उभ्या आणि आडव्या अशा दोन्ही अक्षांवर एखाद्या संकल्पनेचा व्यापक विचार करता येईल.
आपण एक सोपं उदाहरण पाहू. वनस्पतींचं पोषण कसं होतं, असा तिसरी-चौथीपासून ते सातवी-आठवीपर्यंत अभ्यासक्रमात असलेला मुद्दा. वनस्पतींची रचना, त्यांच्या अंगभूत क्षमता, त्यांच्या पोषणसाठी आवश्यक घटक, मातीची वैशिष्ट्यं, तिच्यात असणारे घटक; सूर्यप्रकाश, त्यात असणारे घटक, वनस्पतींमध्ये यासाठी गरजेचे असणारे अंगभूत घटक, मातीमध्ये बाहेरून पुरवल्या जाणाऱ्या गोष्टी आणि या सगळ्याची असणारी इकोसिस्टिम असा व्यापक पट आजच्या काळात सहज अभ्यासता येतो आणि तो लहान मुलांना समजेल इतका सोपा करता येतो. त्यासाठी अनेक चित्रं, फिल्म्स उपलब्ध आहेत, त्यांचा वापर करता येतो. त्यामुळं केवळ ‘सूर्यप्रकाश आणि हरितद्रव्याच्या माध्यमातून वनस्पती आपलं अन्न तयार करतात’ या एकाच वाक्यावर विसंबून न राहता अधिकाधिक खोलात जाऊन, या वाक्याचं संपूर्णपणे आकलन करून घेता येतं.

त्यामुळं हाच घटक जेव्हा आपण समाजाच्या मदतीनं शिकू पाहतो, तेव्हा समाजातल्या विविध लोकांचे अनुभव उपयोगी पडतात. वनस्पती आणि शेतीच्या संदर्भातलं जे पारंपरिक शहाणपण आपल्याकडे आहे, ते आपल्याला इथं मदत करू शकतं. त्याच्यासाठी त्या लोकांशी बोलणं, त्यांना शिक्षण व्यवस्थेमध्ये सहभागी करून घेणं गरजेचं आहे. आपल्याला शिक्षणाची रचना यादृष्टीनं बदलावी लागेल. म्हणजे, एखाद्या शेतकऱ्याला सावलीत झाडं का वाढत नाहीत, हेही माहिती असतं आणि कुठल्या जमिनीत, कुठल्या हवामानात कुठली झाडं वाढतात, त्यांना काय पोषण लागतं हेही माहिती असतं. कदाचित त्याला शास्त्रीय भाषेत ते सांगता येणार नाही. याचा उपयोग शिक्षणासाठी केला, तर शाळा आणि शिक्षक यांची जबाबदारीही अधिक ज्ञानमार्गी होते. शिक्षकांवरचा अनावश्यक ताण कमी होऊन ते अधिक सखोल अभ्यासामध्ये स्वतःचा वेळ देऊ शकतात. शिक्षकांची भूमिका ही केवळ शिकवण्यापुरतीच मर्यादित न राहता, शाळा अधिकाधिक समाजाशी जोडून घेणं आणि एखाद्या विषयाचे विविध आयाम लक्षात घेऊन ते मुलांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करणं अशी अधिक व्यापक होऊ शकेल.

परीक्षांचा पुनर्विचार
शाळा आणि पाठ्यपुस्तक या बरोबरीनंच आपलं शिक्षण हे परीक्षाकेंद्रित झालेलं आहे. म्हणजे शिकायचं का? तर परीक्षेत चांगले मार्क मिळावेत यासाठी, असाच मर्यादित दृष्टिकोन शिक्षणाकडं बघण्याचा आहे. संपूर्ण रचनाच त्या आधारावर उभी राहिली आहे; आणि या परीक्षाप्रधान पद्धतीमुळं मुलांचाही हाच दृष्टिकोन करून दिला जातो, की परीक्षा हेच सर्वस्व. शिक्षणात अजूनही सर्वांत जास्त महत्त्व आहे ते परीक्षेत किती उतरवता आलं आणि किती चांगले मार्क्स कोणत्या ना कोणत्या मार्गानं मिळालेत यालाच. सध्या परीक्षांच्या नावानं जे काही गोंधळाचं वातावरण आहे, त्यातून तर परीक्षांबद्दलच्या पुनर्विचाराचा मुद्दा अधिकच प्रकर्षानं पुढं येतो. आपल्याला शिकणं महत्त्वाचं का परीक्षा महत्त्वाची, असाच विचार करण्याची वेळ आली, तर शिकणं यालाच आपल्याला महत्त्व द्यावं लागेल. शिक्षा किंवा बक्षीस यांत अडकलेली आजची परीक्षापद्धती या स्वरूपापासून आपल्याला वेगळी काढता येईल का आणि ज्ञान संपादनातील महत्त्वाचा घटक म्हणून त्याचा विचार करता येईल का, हे आपल्याला पाहावं लागेल.

परीक्षेचा हा पुनर्विचार आणखी एका कारणासाठी महत्त्वाचा आहे. परीक्षा द्यायची असल्यामुळं सगळ्यांनी समान गोष्टी शिकणं हे अपरिहार्यपणे येतं. तसं जर ते शिकले नाहीत, तर परीक्षा घेणार कशी, हा आपल्यापुढचा पेच आहे. सगळ्यांना एकच अभ्यासक्रम, एकच पाठ्यक्रम, समान स्वरूपाचे प्रश्न, अशा बंधनात आपण सातत्यानं अडकत जातो आणि त्यातून बाहेर पडण्याचे मार्ग सापडत नाहीत. हे जे एक वर्ष आपल्याला मिळालेलं आहे, याकडं नव्यानं विचार करण्याच्या संधी म्हणून आपण पाहू या. एक वर्ष मुलं समान शिकली नाहीत, तर त्यातून काय अडचणी येतात किंवा मुलं काय वेगळं शिकू शकतात, हा प्रयोग म्हणून पाहायला काय हरकत आहे? मुलांनी काय वेगळं केलं, काय जमलं, कुठं अडचणी आल्या, हे सगळंच अभ्यासता येईल.

भविष्यकाळ पेलण्याचं आव्हान
ज्या भविष्यकाळाची सातत्यानं भीती आपल्याही मनात असते किंवा निर्माण केली जाते आणि ती मुलांच्याही मनात आपण निर्माण करतो, तो भविष्यकाळ नेमका कसा असणार आहे, हे आपल्यापैकी कुणालाच माहिती नाहीये, त्यामुळं जे माहिती नाही त्याची सातत्यानं भीती निर्माण करण्यापेक्षा त्याला सामोरं जाण्यासाठीच्या क्षमतांचा विचार आपल्याला करता येईल का, हे आपल्यासमोरचं आव्हान आहे. यासाठी गरज आहे ती आपल्या शारीरिक क्षमता आणि आपली बुद्धिमत्ता यांचा योग्य वापर कसा करायचा, हे लहान वयापासून शिकण्याची. ही संधी कोरोना आपल्याला देतो आहे. अनेक वर्षांच्या उत्क्रांतीतून आपलं शरीर विविध प्रकारची कामं करण्यासाठी तयार झालं आहे आणि जर ती कामं होत राहिली तर आपलं शरीर अधिक सक्रिय राहील. यात हातापायांपासून ते ज्ञानेंद्रियांच्या पुरेपूर वापरापर्यंत सर्व काही आलं. विविध गोष्टी दूरून पाहणं, जवळून न्याहाळणं, वैविध्यपूर्ण आवाज ऐकणं, विविध स्पर्श अनुभवणं , अनेकविध चवींचे पदार्थ खाणं, हे सगळं शिकणं समृद्ध करण्यासाठी आवश्यक आहे. त्यामुळं आपला मेंदूही सक्रिय राहील. ही बुद्धीची आणि शरीराची सक्रियता आपल्याला शिक्षणात जाणीवपूर्वक आणावी लागेल. शरीर आणि बुद्धी वापरून कोणतंही काम हे झोकून देऊन प्रयत्नपूर्वक करण्याच्या मुलांच्या क्षमता कशा वाढतील हे पाहावं लागेल. कोरोना आपल्याला हीच संधी देतोय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

T20 World Cup 2024: 'हार्दिकच्या जागेसाठी मोठी चर्चा, तर सॅमसन...', टीम इंडिया निवडीवेळी काय झालं, अपडेट आली समोर

LSG vs MI IPL 2024 Live : नेहलची झुंजार खेळी, टीम डेव्हिडची हाणामारी; मुंबईनं लखनौसमोर ठेवलं 145 धावांचे आव्हान

Covishield Vaccine : शरीरात रक्ताच्या गाठी होण्याचा धोका अन् हृदयासह मेंदूवर दुष्परिणाम; कोविशिल्ड लशीमुळे होणारा TTS काय आहे?

KL Rahul T20 WC 2024 : शुन्य दिवसांपासून... भारतीय संघाची घोषणा होताच लखनौने वगळलेल्या केएलसाठी केली पोस्ट

SCROLL FOR NEXT