rohini padwal
rohini padwal 
सप्तरंग

झेप! (रोहिणी पडवळ)

रोहिणी पडवळ

ते सगळं ऐकताना अविनाशच्या डोळ्यांतलं पाणी पाहून नीता गदगदून गेली. अनिरुद्ध व अविनाश...दोघंही पुरुष; पण दोघांत किती तफावत विचारांची! तिच्या मनात आलं...

आज नीताकडं मोठा समारंभ आहे. त्यासाठी आम्ही निवडक
मित्र-मैत्रिणी एकत्र जमलेलो आहोत; पण समारंभ कसला आहे हे मात्र आमंत्रण देताना कुणालाच सांगितलेलं नसल्यानं आम्ही सर्वच जण मनात तर्क-वितर्क करत आहोत.
झुंबराच्या दिव्यांनी हॉलमध्ये लखलखाट आहे. फुलांचा मंद सुगंध सगळीकडं दरवळत आहे. मधुर संगीताची मंद धून वाजत आहे.
एकंदर, वातावरण अतिशय प्रसन्न आहे.
आम्हा सगळ्यांची उत्कंठा क्षणाक्षणाला वाढत आहे.
इतक्‍यात, नीता तीन-चार वर्षांच्या गोंडस मुलीला घेऊन बाहेर आली. अगदी नीताला शोभेशीच ती मुलगी आहे. घेरदार फ्रॉकमुळे ती परी वाटते आहे.
आम्हा सगळ्यांकडं पाहून नीता म्हणाली : ‘‘ही माझी मुलगी श्रुता. दत्तक घेतलेली. मी नीता नि ती श्रुता!’’
सगळ्यांनी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला. दोघींचं स्वागत केलं. श्रुता भिरभिरत्या नजरेनं सगळ्यांकडं पाहत होती.
मग चहापाणी होऊन या गोड सोहळ्याची सांगता झाली. एकेक जण नीताचं अभिनंदन करून परतला. माझ्या मनात आलं, खरंच फार मोठी झेप घेतली आहे नीतानं.
नीताकडं आज मोठा फ्लॅट आहे. ती भरपूर कमावते. आता तिला - दत्तक घेतलेली का होईना- मुलगी आहे. मात्र, हे सगळं मिळवताना तिला किती सहन करावं लागलं! तिची उमेदीची किती तरी वर्षं वाया गेली. हे ती कसं विसरेल? फुकट गेलेले दिवस परत येतील का? जिद्दीची म्हणूनच अजूनपर्यंत तग धरून राहिली.
मी व नीता शाळेपासून ते कॉलेजपर्यंतच्या मैत्रिणी. आमची घरंही जवळजवळ. त्यामुळे घरातली माणसंही एकमेकांशी आपोआप जोडली गेलेली. त्यांचा मोठा वाडा. नावालाच वाडा; पण आधुनिक सुखसोईनं युक्त. जुन्या-नव्याचं कॉम्बिनेशन! त्यांचं कुटुंब मोठं.

आजोबांचा आदरयुक्त दरारा. त्यांना आजीची साथ. काका-काकू, त्यांची मुलं व लग्नानंतर परतून आलेली बहीण. एकमेक नाती जपत खेळीमेळीनं राहत होते.
घरातलं वातावरण साधं; पण शिस्तप्रिय. नीताचे आई-वडील प्रेमळ, मदतशील. त्यामुळे पुष्कळ माणसं त्यांनी जोडलेली. नीतानं आईचं सौंदर्य व वडिलांचा करारीपणा घेतला होता. नीता थोरली मुलगी. हुशार, लाघवी, प्रेमळ, वडिलांची लाडकी. त्यामुळे धाकट्या दोघींना वडील नेहमी नीताचा दाखला देत. तिचा कित्ता गिरवायला सांगत.
रूपवान नीताची राहणीही नीटनेटकी, अद्ययावत असायची. त्यामुळे कितीतरी मुलं तिच्याजवळ जाण्याचा, तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करायची; पण ती कुणालाही जवळ येऊ देत नसे. अपवाद फक्त अनिरुद्धचा. त्याच्याशी तिची जवळीक मात्र दिवसेंदिवस वाढत चालली होती. तोही गोरा, उंच, बघताक्षणीच छाप पाडणारा असल्यानं ती त्याच्यात गुंतत चालली होती. मला ते जाणवत होतं, दिसत होतं. याबाबत मी तिला नेहमी टोकत असे; पण ती उडवाउडवीची उत्तरं देई. दोघंही ‘मेड फॉर ईच आदर’ असल्यासारखे दिसत असूनही माझ्या मनाला धाकधूक वाटे. अनिरुद्धच्या चेहऱ्यावरची अरेरावी व बेदरकारपणा मला जाणवे व मन शंकित होई, कॉलेजमधली दोघांची मैत्री मला माहीत असली तरीही. अनिरुद्धच्या घरची परिस्थिती तशी बेताचीच. वडील प्राध्यापक, आई गृहिणी. दोन बहिणींच्या पाठीवर झालेला मुलगा म्हणून अनिरुद्ध पुष्कळसा लाडावलेला. त्याच्या मागण्या सारख्या सुरूच असत. वडील समजवायचे; पण आई सगळे लाड पुरवायची. वडील एकटे कमावणारे, त्यात दोन मुलींची शिक्षणं, त्यांची लग्नं. त्यांना भ्रांत पडे.
मोठ्या बहिणी आईला त्याच्याबद्दल बोलायच्या; पण आई म्हणायची, ‘गप्प बसा गं, मोठा झाल्यावर येईल अक्कल.’ त्या गप्प राहत.
***

नीताच्या वडिलांचा मोठा व्यवसाय होता. नीताचे वडील आणि त्यांचे दोन भाऊ असे तिघंही उच्चशिक्षित. तिघंही व्यवसायच पाहायचे. थोडी शेतीवाडीही होती. गावात मोठं नाव होतं. आजी-आजोबा, काका-काकू यांच्या मुलांवर चांगले संस्कार घडलेले असल्यानं बाहेरचं वारं कुणाला लागलेलं नव्हतं.
एक-दोनदा अनिरुद्धबद्दल नीताच्या वडिलांच्या कानावर आलं होतं. त्यांनी नीताला विचारलंही; पण ‘तसं काही नाही’ असं उत्तर मिळाल्यानं वडील निर्धास्त झाले. त्यांचा आपल्या मुलीवर गाढ विश्‍वास होता.
***

‘अनिरुद्धनं मला प्रपोज केलं आहे’, असं एक दिवस नीतानं मला सांगितलं.
मी म्हटलं : ‘‘तू काय उत्तर दिलंस?’’
‘‘अगं लता, मी त्याला ‘माझ्या स्वप्नातला राजकुमार’ म्हणून केव्हाच निवडलं आहे. त्यानं विचारण्याचीच वाट मी पाहत होते. मला तो आवडतो. माझं त्याच्यावर जिवापाड प्रेम आहे. त्याला मी पहिल्यांदा पाहिलं होतं ना तेव्हाच मी त्याची झाले; पण त्याच्या वेगळ्या जातीमुळे बाबांना हे आवडणार नाही, घरातल्या कुणालाच हे पटणार नाही, याचीच धास्ती वाटते. मात्र, माझा निर्धार आहे. बाबांच्या माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत. माझ्या हुशारीबद्दल ते नेहमी बोलत असतात. त्यांनी माझे लाडही खूप केलेले आहेत. मला कधी दुखावलेलं नाही; पण काय करू गं? वय वेडं असतं. ते कधी काय करून बसेल कळत नाही.’’
***

काळ पुढं पुढं सरकत होता. आमचं शिक्षण संपून आम्ही नोकरीला लागलो. वास्तुविशारद असल्यानं आम्हाला कुठं कुठं जावं लागे. अनिरुद्धही नोकरी करू लागला. नीताचं आणि त्याचं भेटणं, फिरणं पूर्वीप्रमाणेच सुरू होतं. मी तिला माझ्या परीनं सारखी विनवायची :
‘जे काही करशील ते शांत चित्तानं विचार करून कर. माझ्या मनात त्याच्या स्वभावाबद्दल नाही नाही त्या शंका येतात. तू सगळ्यांशी मिळून-मिसळून वागणारी; पण त्याचा स्वभाव तसा नाही. तो राखून बोलतो. त्याच्या बोलण्यात अहंभाव जाणवतो. तुला हे सगळं सहन होईल का? तू भावनाशील आहेस.’
यावर ‘‘अगं लता, अजून वेळ आहे...आत्ता कुठं नोकरी लागली आहे. अनिरुद्ध म्हणतो, ‘एका वर्षानं लग्न करू. थोडं बस्तान तरी बसू दे’ ’’ असं नीता म्हणायची.
मात्र, इकडं नीताला मागण्या येऊ लागल्या होत्या. कारण, त्यांच्या घराण्याचा नावलौकिक सर्वत्र होता. नीताच्या वडिलांच्या मित्रानं त्यांच्या मुलासाठी नीताला मागणी घातली होती. घरी नेहमी येणं-जाणं असल्यामुळे दोघांनीही एकमेकांना पाहिलेलं होतं.
नीताच्या वडिलांनी तिला याविषयी विचारलं तेव्हा नीता काहीशी धास्तावून आतल्या खोलीत पळाली होती. मात्र, ती लाजूनच पळाली आहे असं वाटल्यानं तिचा मूक होकार गृहीत धरून घरात तिच्या लग्नाची तयारी सुरू झाली!
नीता वडिलांपुढं काहीच बोलू शकली नाही. वडिलांना नकार दर्शवू शकली नाही. हतबल होऊन तिच्या मनात घालमेल सुरू झाली होती.
घरचे लोक मात्र आनंदात होते. तिच्यासाठी कपडेलत्ते, दागदागिने यांची तयारी जोरात सुरू होती. तीही नाइलाजास्तव त्यात भाग घेत होती.
मैत्रिणीकडं जात होती, तशी अनिरुद्धलाही भेटत होती.
इकडं घरात पाहुणे यायला सुरवात झाली होती. वाडा आनंदानं डोलत होता. रोषणाई केली जात होती. घरातले लोक गडबडीत होते.
पत्रिका वाटल्या जात होत्या. लग्न आठ दिवसांवर आलं. नीता मैत्रिणीकडं केळवणाला नेहमी जायची तशीच ती एक दिवस गेली आणि रात्री घरी परतलीच नाही. घरच्यांनी सगळीकडं शोधाशोध सुरू केली. त्या मैत्रिणीकडंही नीता अर्थातच नव्हती. खूप शोधाशोध करून घरची मंडळी हवालदिल होऊन घरी आली तेव्हा त्यांना तिच्या खोलीत चिठ्ठी सापडली : ‘मी लग्न करत आहे अनिरुद्धशी.’ घरात हलकल्लोळ माजला. नीता जाताना दागदागिने व काही पैसे घेऊन गेली होती. वडील तर कोसळलेच. त्यांना तो मोठाच धक्का होता. त्यांचं बीपी वाढलं. आजोबांचीही स्थिती तशीच झाली. दोघांनाही हॉस्पिटलमध्ये ठेवावं लागलं. घरातले सगळे लोक हादरले. ज्या मुलीवर चांगले संस्कार केले, तिनंच मोठा धक्का दिला! सगळीकडं छी थू झाली. घराला सुतकी कळा आली. घरात कुणी कुणाशी बोलेनासं झालं. दोन्ही काकांचं लक्ष हॉस्पिटलमध्येच असल्यानं घरात फक्त सर्व महिलाच रडत बसलेल्या होत्या. एवढ्या मोठ्या एकत्र कुटुंबात या मुलीमुळे मिठाचा खडा पडला होता, त्याचं दुःख फार मोठं होतं. समाजात मान खाली घालावी लागली होती. तिचं नाव सगळ्यांनी टाकलं.
***

काहीही झालं तरी दिनक्रम सगळ्यांना सुरू ठेवावाच लागतो. तसा तो सगळ्यांचाच सुरू झाला.
नीता-अनिरुद्धनं मित्राच्या दोन खोल्यांमध्ये संसार मांडला. हनिमून नीताच्याच पैशानं पार पडला. दोघं जोडीनं नोकरीसाठी बाहेर पडत. हसत-खेळत. कधी हॉटेलमध्ये जेवूनच घरी येत. घरात काहीच नसल्यानं नीताच्याच पैशानं भांडीकुंडी, थोडं सामान, थोडं फर्निचर अशा एकेक वस्तू आणल्या गेल्या. संसाराला मुळापासूनच सुरवात असल्यानं पैसे संपून काही दागिने विकण्यापर्यंत वेळ आली; पण ते मनावर न घेता छान संसार सुरू होता. तिनं ऑफिसच्या लोकांना घरी चहाला बोलावलं. ती कामाला तत्पर असल्यानं, सगळ्यांना कामात मदत करत असल्यानं तिला सगळे जण मान देत. तिच्याशी सौजन्यानं वागत. संसाराचं रुटीन बसत चाललं होतं.
दोन वर्षं कशी गेली ते कळलं नाही. मग मात्र ‘खरा संसार’ सुरू झाला! अनिरुद्धच्या बेशिस्त, उद्धट वर्तनामुळं त्याची नोकरी गेली. स्वतःची चूक असूनही तो बॉसशी उद्धट बोले, उद्धट वागे. पाहिजे तेव्हा ऑफिसला जाई. ऑफिसातून वेळेच्या आधी बाहेर पडे. असलं बेशिस्त वर्तन कोण सहन करणार? साहजिकच नोकरीवर गदा आली. मग दोघांमध्ये सुरवातीला किरकोळ वाद-विवाद होऊ लागले आणि पुढं त्या वादांचं रूपांतर मोठ्या भांडणांमध्ये होऊ लागलं.

‘तुला स्वयंपाकच जमत नाही’ असं कारण सांगून पुढं पुढं अनिरुद्ध बाहेरूनच जेवून येई. हिचं उपाशी राहणं सुरू झालं. बरं, घरी आल्यावर ‘तू जेवलीस का?’ वगैरेही तो विचारत नसे. नीताला फार वाईट वाटे; पण ती सगळं सहन करून गप्प बसे.
मात्र, एके दिवशी अनिरुद्ध रात्री पिऊन आलेला पाहून - तेही तिच्या विकलेल्या दागिन्यांच्या पैशानं - तिचं डोकं भडकलं. तेव्हा मात्र दोघांचं बरंच मोठं भांडण झालं. असं वारंवार होत राहिलं. तेवढ्यापुरती माफी मागून तो वेळ मारून नेऊ लागला. मात्र, तो सुधारण्याची काही चिन्हं दिसेनात. नोकरी शोधायचं तो नाव घेत नसे. आता त्याचं पिणं रोजचंच झालं होतं. रोज रात्री पिऊन आल्यावर आपला स्वार्थ मात्र तो हक्कानं वसूल करी. अशा सगळ्या वातावरणामुळे नीता हळूहळू खचत चालली. अशीच चार वर्षं गेली.
छोट्या छोट्या कारणांवरून अनिरुद्ध भांडणं उकरून काढतच होता.
‘मैत्रिणीकडंच कशाला गेली होतीस?’, ‘हेच कपडे का घातलेस?’ इत्यादी.
नीताला अशा वेळी माहेरची फार आठवण येई व तिला रडू फुटे. अशा वेळी आधार देणं तर दूरच; उलट तो तिला टाकून बोले.
एकदा असंच झालं तेव्हा नीता त्याला म्हणाली : ‘‘अरे, त्यांच्याच पैशावर व दागिन्यांवर मजा करतोस नि मला वाटेल तसं बोलतोस? अरे, पुरुष ना तू? बांगड्या भर त्यापेक्षा...’’

ती एवढं बोलली मात्र...अनिरुद्धनं तिला मारझोड सुरू केली. तेव्हापासून तिनं उलट उत्तर दिलं की तो मारझोड सुरू करी. नीताची सहनशक्ती आता संपलीच होती. अखेर, एके दिवशी तिनं शांत चित्तानं विचार केला आणि ती मैत्रिणीकडं राहायला गेली व तिनं घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला.
अधूनमधून अनिरुद्ध भानावर येत असे. ‘मी दारू पिणार नाही, तू घरी चल,’ असं मैत्रिणीकडं व ऑफिसात जाऊन तिला विनवत राही. मात्र, ती त्यावर काहीच बोलत नसे. अशा वेळी थोडा वेळ वाट पाहून तो निघून जाई.
मग नीता विचारांत गुरफटून जाई. तिला वाटे, ‘मी इतकी कशी वाहवत गेले? लग्न ठरलं असताना घरातून कशी पळाले? लता मला किती प्रकारे सांगण्याचा प्रयत्न करायची; पण ते माझ्या डोक्‍यात शिरलंच नाही...’
हेच सारखं सारखं नीताच्या मनात येत राही. मग रात्र रात्र झोप लागत नसे. प्रकृती ढासळू लागली. स्वतःकडं दुर्लक्ष होऊ लागलं. जेवणाची आबाळ, मानसिक ताण यामुळे अशक्तपणा वाढू लागला. त्यातच तिला जाणवलं की आपल्याला दिवस गेले आहेत. बाळाच्या चाहुलीनं प्रतिकूल परिस्थितीतही तिला खूप आनंद झाला...मन भरून आलं.
एक दिवस नीताची प्रकृती ऑफिसातच खूप बिघडली. सगळ्यांनी तिला दवाखान्यात नेलं; पण अखेर गर्भपात झाला. मैत्रिणींनी तिला जपलं. औषधपाणी केलं. त्याच वेळी अविनाश नावाच्या ऑफिसातल्या सहकाऱ्यानंही तिला भरपूर आधार दिला. तिची औषधं आणणं, तिला सोबत करणं इत्यादी. नीता आजारातून हळूहळू बाहेर येऊ लागली. तिला आता अनिरुद्धपासून घटस्फोटही मिळाला होता. एक प्रकारे सगळीकडून सुटका झाली होती! माहेरचे लोक, आई, बहिणी वडिलांना पत्ता लागणार नाही अशा पद्धतीनं नीताला भेटून जात असत. त्यांचा आधार होता. मैत्रिणी तर होत्याच.
आपलं बाळ गेल्यानं दवाखान्यात असताना नीताला सारखं रडू येई. ती आपल्या नशिबाला दोष देई. अशा वेळी मैत्रिणी तिला धीर देत. आई धीर देई. पाठीवरून हात फिरवी. तिला बरे वाटे. असाच एकदा अविनाशचा पाठीवरून फिरणारा उबदार स्पर्श तिला खूप काही सांगून गेला.

अविनाशचं तिच्यावर मनापासून प्रेम होतं; पण भिडस्त स्वभाव व गरिबी यामुळे तो कधी ते व्यक्त करू शकला नाही अथवा दर्शवू शकला नाही. नीताही त्याच्यात थोडी थोडी गुंतत चालली होती, म्हणून नीतानंच त्याला एकदा लग्नाबद्दल विचारलं. त्यावर अविनाश म्हणाला : ‘‘सॉरी नीता, मी ऑफिसात नुकताच रुज झालो होतो तेव्हा तुझी घटस्फोटाची केस चालली होती. तेव्हापासून तू मला आवडत होतीस. मी मनातल्या मनात तुझ्यावर प्रेम करत होतो. मला तुझी सगळी माहिती होती. तुझं दुःख मला पाहवत नव्हतं. मात्र, माझ्या घरची गरिबी व माझा भिडस्त स्वभाव यामुळे मी प्रेमाविषयी कधीच बोलू शकलो नाही. मात्र, तुला मदत करण्यात, आधार देण्यात मला आनंद होत होता. तुझं दुःखी असणं मला पाहवत नव्हतं...पण नीता, माझ्या घरचं धार्मिक, कर्मठ वातावरण, पौरोहित्य करणारे वडील...त्यात माझं पहिलं लग्न, तर तुझं दुसरं लग्न अशा परिस्थितीत मी घरच्यांना कितीही जीव तोडून सांगितलं तरी माझं कुणी ऐकणार नाही. मी जरी घरच्यांच्या विरोधात जाऊन तुझ्याशी लग्न केलं तरी त्याचा त्रास तुलाच होईल आणि तो त्रास मला कधीच पाहवणार नाही, म्हणून मला माफ कर. तुझ्यावर माझं प्रेम असूनदेखील तुझ्याशी लग्न करण्याइतकी धमक माझ्यात नाही. एवढी ‘झेप’ मी घेऊ शकत नाही!’’

हे सगळं ऐकताना अविनाशच्या डोळ्यांतलं पाणी पाहून नीता गदगदून गेली. अनिरुद्ध व अविनाश...दोघंही पुरुष; पण दोघांत किती तफावत विचारांची! तिच्या मनात आलं.
या प्रसंगानंही ती कोलमडलीच. परत एकटी पडली. मात्र, अखेर मन घट्ट करून, आता कुणाचाही मानसिक आधार न घेता स्वतःसाठी उभी राहिली. लग्नाबाबत वडील विचारायचे; पण आता तिचा विश्‍वासच उडाला होता.
नव्या जीवनाला सुरवात करताना नीतानं पहिल्यांदा घर घेतलं नि मग मुलगी दत्तक घेतली. आधाराला वडील, आई, मैत्रिणी असे सगळे जण होतेच...पण कितीही झालं तरी एकटी ती एकटी. एकटेपणाचा असा समंजस स्वीकार करणं हीच तिची मोठी झेप!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

Latest Marathi News Update: निवडणूक आयोगाची मोठी कारवाई! रत्नागिरीत तीन कोटींची रोकड पकडली

SCROLL FOR NEXT