Rohit Sharma
Rohit Sharma sakal
सप्तरंग

त्यांनी रणजी खेळायलाच हवी...

शैलेश नागवेकर

त्या दिवशी चॅनेल सर्फिंग करत असताना अचानक रोहित शर्मा दिसला. दूरचित्रवाणीच्या पडद्यावर लाइव्हचं चिन्ह दिसलं... अरे हा कोणता सामना? भारतीय संघाची कोणती मॅच सुरू आहे? शोध घेतला तर भारतीय संघ अफगाणिस्तानविरुद्ध मालिका खेळतोय याचा उलगडा झाला... एका क्रिकेट चाहत्यानं गप्पांच्या ओघात व्यक्त केलेली ही प्रतिक्रिया...

खरं सांगू का, विश्वकरंडकाचा तो अंतिम सामना गमावल्यानंतर सध्या तरी क्रिकेट पाहण्यात रसच उरलेला नाही. आफ्रिकेविरुद्ध खेळा की अफगाणिस्तानविरुद्ध खेळा... जिंकलात तरी त्याला काय अर्थ... बुंद से गई वो हौदसे आनेवाली नही हैं !... हा संवाद काल्पनिक वाटला तरी सत्य आहे. विश्वकरंडक मिळो की न मिळो आपला संघ वर्षभर क्रिकेट खेळत राहिला पाहिजे, असं बीसीसीआयचं नियोजनच असतं.

कधीच काही नसेल तर अफगाणिस्तानविरुद्धची मालिकाही चालेल. याच अफगाणिस्तानविरुद्ध तीन सामन्यांची मालिका खेळून बीसीसीआय आणि भारतीय क्रिकेट संघानं काय साधलं, हा प्रश्न अनेकांना पडणं स्वाभाविक आहे. काय तर टी-२० स्पर्धेच्या विश्वकरंडकाच्या मालिकेच्या तयारीसाठी ही मालिका.

हा विश्वकरंडक जून महिन्यात होणार आहे आणि या मालिकेमुळं चार महिने आधी खरोखरच संघाची तयारी आणि सराव होणार आहे? बरं ही मालिका कधी तर काही दिवसांत इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळायची असताना झाली. कोठे टी-२० आणि कोठे कसोटी!

असो, विश्वकरंडक गमावून दोन महिने झाले तरी अजूनही त्याचं शल्य कुणीही विसरलेला नाही. आफ्रिका, अफगाणिस्तानविरुद्ध जिंकाल पण दुधाची तहान ताकावर मानायला अजूनही सच्चा भारतीय क्रिकेटप्रेमी तयार नाही हे तेवढंच सत्य आहे.

प्रायोजक, ब्रॉडकास्टर आणि प्रसारक यांच्याबरोबर केलेल्या कोट्यवधींच्या करारामुळं मैदानात उतरावंच लागलं, तसंच आपल्याशी जवळीक असलेल्या क्रिकेट बोर्डालाही मालिका खेळून थोडेसे पैसे मिळवून देण्याचं बीसीसाआयला औदार्य दाखवावं लागतं पण मायबाप प्रेक्षकांच्या लेखी नोंद नसावा इतकाही क्रिकेटचा भडिमार नसावा.

रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचं व्हाइटबॉल म्हणजेच मर्यादित षटकांच्या प्रकारातील भवितव्य काय ? असं आता वारंवार चर्चिलं जात आहे. जून महिन्यात होत असलेल्या टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत हे दोघं खेळणार की नाही, हा सर्वांत महत्त्वाचा प्रश्न भारतीय क्रिकेटला पडलाय. आपल्याला खेळायचंय हे जणू काही दाखवून देण्यासाठी रोहित आणि विराटनं अफगाणिस्तानविरुद्धच्या केवळ तीन सामन्यांच्या मालिकेत खेळण्याचा निर्णय घेतला.

प्रत्येक जण आपल्या सोईनुसार कसा बदलत असतो हे पाहू या. गेल्या महिन्यातील आफ्रिका दौऱ्यात दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेअगोदर झालेल्या मर्यादित षटकांच्या मालिकांतून रोहित-विराट यांनी विश्रांती घेतली कारण पुढची कसोटी मालिका प्रतिष्ठेची आणि महत्त्वाची होती.

एरवी अशी मोठी कसोटी मालिका असते, तेव्हा प्रमुख खेळाडू त्याकडं अधिक लक्ष देतात आणि व्हाइटबॉल क्रिकेट मालिकांतून विश्रांती घेतात, परंतु मायदेशात होत असलेली इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका जिंकण्याची प्रतिष्ठा महत्त्वाची असताना रोहित-विराट आणि अफगाणिस्ताविरुद्धच्या टी-२० मालिकेत खेळून काय साधले ? केवळ टी-२० विश्वकरंडक स्पर्धेसाठी आपली उपलब्धता दाखवून दिली?

वास्तविक या दोघांनी एक तरी रणजी क्रिकेट सामना या कालावधीत खेळायला हवा होता. खेळाडू मोठा झाला की तो देशांतर्गत स्पर्धांसाठी उपलब्ध नसतो किंवा वेळ मिळत असला तरी तो खेळण्यात उत्सुक नसतो. अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा आता मुख्य संघातून बाहेर गेल्यामुळं त्यांच्याकडे रणजी क्रिकेट हाच पर्याय उरला आहे.

अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेतून वगळलेला श्रेयस अय्यर लगेचच रणजी खेळण्यासाठी मुंबई संघाकरिता उपलब्ध झाला. दिग्गज खेळाडू रणजी स्पर्धेत खेळत नाही अशी ओरड केली जाते, या वेळी ती सुवर्ण संधी होती. रोहित आणि विराट शेवटचा रणजी सामना कधी खेळला हे त्यांनाही आठवणार नाही. थोडा विचार करा. हे दोघेही गेल्या सात दिवसांत अफगाणविरुद्धची मालिका खेळण्याऐवजी एकेक रणजी सामना खेळले असते, तर रणजी स्पर्धेची चर्चा झाली असती.

त्यांच्या संघातील उपस्थितीमुळं नवोदितांना अनुभवाचे बोल मिळाले असते आणि स्फूर्तीही मिळाली असती. या सर्व महान खेळाडूंचा आदर्श सचिन तेंडुलकरला संधी मिळाली की तो रणजीत खेळायचा. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याअगोदर तो सामना खेळून रणजी क्रिकेटमधून निवृत्त झाला होता.

हिस्सार येथे मुंबई-हरियाना सामन्यात सचिन खेळला. हरियाना संघातून अजय जडेजाही त्या सामन्यात खेळला होता. महान खेळाडू सुनील गावसकर परदेश दौऱ्यावरून पहाटे मुंबईत दाखल व्हायचे आणि दोन-तीन तासांत शिवाजी पार्क, दडकर अशा मैदानांत अनेकदा क्लब क्रिकेटचे सामने खेळायला हजर असायचे.

दिग्गज खेळाडूंची इच्छा असो वा नसो, जर दुखापती नसतील तर मोसमात एक तरी रणजी सामना खेळायला त्यांना बीसीसीआयनं भाग पाडायला हवं. पूर्वांपार चालत आलेली भारतीय क्रिकेटची रचना भरभक्कम असल्यामुळं नवी पिढी तयार होत आहेच पण त्यांना समृद्ध करणं आयपीएलमधून नव्हे तर देशांतर्गत स्पर्धात दिग्गजांनी खेळण्यातून घडू शकतं. हे सत्य कोणीही नाकारणार नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: शनिवार वाड्यात बेवारस बॅग आढळल्याने खळबळ, बॉम्ब शोधक पथक दाखल

Arvind Kejriwal: जेल की बेल! केजरीवालांचा तरुंगाबाहेर शेवटचा दिवस, आजची सुनावनी ठरवणार 'आप'चे भविष्य

Indian Typing Man : भारताचा टायपिंग मॅन! तिसऱ्यांदा गिनीज बुकमध्ये नोंद करत स्वतःचा रेकॉर्ड मोडला, पाहा व्हिडिओ

West Bengal EVM: मतदानकेंद्रावर धक्कादायक प्रकार! जमावाने EVM टाकले पाण्यात; व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update: "आम्ही बिहारमधील सर्व 40 जागा जिंकू," राबडी देवींचा राडा

SCROLL FOR NEXT