shweta chakradeo
shweta chakradeo 
सप्तरंग

अंतराळातील स्त्रीशक्ती (श्वेता चक्रदेव)

श्वेता चक्रदेव shwetachak6@gmail.com

नासातर्फे पुढच्या वर्षी होऊ घातलेल्या मंगळ मोहिमेत महिलांचा मोठा वाटा असणार आहे. नंतर होणाऱ्या मंगळावरच्या मानवी मोहिमेत तर पहिलं पाऊल कदाचित महिलेचं असू शकतं, असं नासानं सूचित केलं आहे. त्याच वेळी येत्या शुक्रवारी (ता. 29 मार्च) एक वेगळी घटना घडणार आहे. इंटरनॅशनल स्पेस स्टेशनच्या डागडुजीसाठी पाठवल्या जाणाऱ्या तीन चमूंपैकी एक चमू हा संपूर्णपणे महिलांचा असणार आहे. या दोन्ही घटनांचं महत्त्व, त्यांच्यासाठी चाललेली तयारी, इतर अनुषंगिक घटक आणि एकूणच अंतराळातली ही स्त्रीशक्ती कशा प्रकारे तिचं तेज दाखवत आहे यावर प्रकाशझोत.

"हिडन फिगर्स' या दोन वर्षांपूर्वी प्रचंड गाजलेल्या चित्रपटात, 1960-61 या काळातला कृष्णवर्णीय महिलांचा नासामधला संघर्ष दाखवला आहे. अत्यंत बुद्धिमान महिलांची ही कहाणी. एक महिला आहे म्हणून, आणि एक कृष्णवर्णीय म्हणून त्यांची झालेली कुचंबणा दिसत राहते, अस्वस्थ करत राहते. चित्रपटाच्या शेवटी या महिलांचं तेज, त्यांचं यश, त्यांची हिंमत आपल्याला स्तीमित करून जाते. तो दिवस, तो काळ आणि 29 मार्च 2019 हा दिवस. अक्षरशः "जमीन-अस्माना'चं अंतर. ता. 29 मार्चचा दिवस हा एका मोठ्या पर्वाचा साक्षीदार असेल. सन 2020 मध्ये होऊ घातलेल्या मंगळ मोहिमेची उत्तम नांदीच आहे जणू. एक अंदाज असाही बांधला जातोय, की 2020 मध्ये होणाऱ्या मंगळ मोहिमेमध्ये महिलांचा अग्रगण्य वाटा असणार आहे. कुणास ठाऊक; पण पुढं होऊ घातलेल्या मंगळावरच्या मानवी मोहिमेदरम्यान मंगळावर पडणारं पहिलं पाऊल महिलेचंही असू शकतं.

अंतराळात महिला जायची ही काही पहिलीच वेळ नाही. कल्पना चावला, सुनीता विल्यम्स अशी नावं आज घरोघरी माहीत आहेत. अगदी अवकाशयान उडण्याच्या प्राथमिक तयारीपासून ते अंतराळात जाणाऱ्या अंतराळवीरांच्या आरोग्याची जबाबदारी घेणाऱ्या डॉक्‍टर्सपर्यंत अनेक महिला अग्रभागी आहेत. कित्येक विद्यापीठांमध्ये अंतराळशास्त्रात मुली अग्रेसर आहेत. अर्थात हे चित्र तयार होण्यासाठी अनेक वर्षं जावी लागली. आधी आपण पुढच्या वर्षी होणारी महत्त्वाकांक्षी मंगळ मोहीम नक्की काय आहे हे पाहू या. या मंगळ मोहिमेचं नाव असेल "मार्स 2020.' नासा आणि जगातल्या अनेक अंतराळविज्ञान संस्था मंगळ ग्रहाचा अभ्यास गेली अनेक वर्षं करत आहेत. त्याचाच कळसाध्याय म्हणजे ही मोहीम असेल. या मोहिमेची चार ठळक उद्दिष्टं आहेत. मंगळावर कधी जीवसृष्टी अस्तित्वात होती का किंवा भविष्यात जीवसृष्टीला आधार मिळू शकतो का, मंगळावरचं वातावरण, तिथलं भूविज्ञान, भौगोलिक संरचना काय आणि मंगळावरची माती, दगड आणि इतर भौगोलिक वैशिष्ट्यं यांचा सखोल आणि काळजीपूर्वक अभ्यास करणं; सखोल संशोधन करण्यासाठी तिथली माती, दगड यांचे नमुने गोळा करणं ही या मोहिमेची मुख्य उद्दिष्टं आहेत. तिथल्या भौतिक आणि भोगौलिक अभ्यास करण्यासाठी मंगळावरच्या जेझेरो क्रेटरवर (Jezero Crater) रोव्हर (Rover) नावाचं अवकाशयान उतरवले जाईल. हे अवकाशयान साधारण एका कारच्या आकाराचं असून, वजनाला मात्र कारपेक्षा थोडं हलकं आहे. सध्या या यानावर वेगवेगळ्या चाचण्या घेतल्या जात आहेत. येऊ घातलेल्या, अतिशय अद्‌भुत अशा या मोहिमेचा निर्विवादपणे सगळ्यात महत्त्वाचा हिस्सा असलेलं हे अवकाशयान अत्यंत कठोर चाचण्यांमधून तावून सुलाखून बाहेर पडेल, यात शंका नाही. मंगळ हा फक्त अमेरिकेच्या नव्हे, तर इतर अनेक देशांच्या कुतूहलाचा विषय आहे.

नासाच्या महत्त्वाकांक्षी मार्स 2020 रोव्हरच्या बरोबरीनं सन 2020मध्ये चीन, जपान, युरोप आणि संयुक्त अरब आमिरात इथून अजून पाच अंतराळयानं मंगळाच्या दिशेनं उड्डाण घेतील, असंही सांगितलं जातंय. भविष्यात मानवाचे पाय मंगळावर पडावेत, हेच जगभरातल्या अंतराळ वैज्ञानिकांचं स्वप्न आहे. पुढच्या वर्षीच्या महत्त्वाकांक्षी मोहिमेत रोबोच्या साह्यानं मंगळावरची धूळ, माती, हवामान, वारे, तापमान आणि वातावरण यांचा अंदाज आणि अभ्यास हेदेखील महत्त्वाचे मुद्दे ठरतील. नासानं दिलेल्या माहितीनुसार, 17 जुलै ते 5 ऑगस्ट या कालावधीत फ्लोरिडाच्या एअर फोर्स स्टेशनवर या मोहिमेची सुरवात होईल आणि साधारण एक मंगळ वर्ष म्हणजे 617 दिवस ही मोहीम चालेल आणि पृथ्वीवर यान पुन्हा आगमन करेल.

महिला अंतराळवीराचं महत्त्व
असं धरून चालूया, की पहिली मानवी मंगळ मोहीम ही महिलांची असेल- किमान मंगळावर पडणारं पहिलं पाऊल तरी महिलेचं असेल. नासानं तसं सूचित केलं आहेच; पण महिलांचं महत्त्व इथं का आहे हे थोडं बघितलं पाहिजे. अवकाशात सफर करताना कोणत्या अडचणी येऊ शकतात याचा अभ्यास करण्यासाठी 2013-14मध्ये हवाई इथं एक अत्यंत रंजक निवासी अभ्यास केला गेला. हवाई इथल्या अत्यंत कठोर, ओबडधोबड अशा मृत ज्वालामुखीच्या जवळ बंदिस्त अशा डोममध्ये चार महिने- जणू मंगळावर राहत आहोत असं वातावरण तयार करून- सहा व्यक्ती राहिल्या. या अभ्यासातून काही माहिती पुढं आली. या अभ्यासात महिला आणि पुरुष दोघंही सहभागी होते. समोर आलेल्या निष्कर्षांत असं दिसून आलं, की, महिलांनी जवळजवळ सारखं काम केलं आणि त्या कमी आजारी पडल्या. त्यांची अन्नाची गरज पुरुषांपेक्षा कमी होती. आता त्यांची अन्नाची गरज कमी होती या निष्कर्षाचा आणि मंगळ मोहिमेचा काय संबंध, असा प्रश्‍न पडू शकतो. मात्र, अंतराळात जितकं जास्त अन्न न्यावं लागेल, तितकं अंतराळयानातलं वजन वाढतं, त्या मोहिमेवरचा खर्च वाढतो, हेही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजेच फक्त महिला मोहीम आर्थिकदृष्ट्या फायद्याची ठरू शकते, हेही लक्षात घेतलं पाहिजे.

शरीरावर होणारे परिणाम
या अभ्यासात अजूनही काही महत्त्वाच्या गोष्टी पुढं आल्या. अवकाशात मानवी शरीरावर काही परिणाम होतात. अनेकदा मानवी दृष्टीवरसुद्धा परिणाम होऊ शकतो; परंतु महिलांच्या दृष्टीवर अवकाशातल्या परिमाणांमुळं होणारा परिणाम पुरुषांच्या दृष्टीवर होणाऱ्या परिणामापेक्षा कमी होता, असं अभ्यासाअंती आढळून आलं. अर्थात या अशा फायद्याबरोबर महिलांसाठी काही तोटेदेखील आढळून आले. अवकाशात नेहमीच रेडिएशनचा धोका असतो आणि रेडिएशनमुळं होणारे आजार पुरुषांपेक्षा महिलांना दुपटीनं जास्त होऊ शकतात, असं संशोधनातून सिद्ध झालं आहे. म्हणजेच महिलांना या रेडिएशनचा धोका हा पुरुषांपेक्षा दुप्पट असतो. अर्थात त्याच वेळी नासानं केलेल्या काही प्रयोगांमध्ये असंही आढळून आलं, की मानसिकदृष्ट्या महिला जास्त कणखर असून, अवकाशातल्या एकांतवासात महिला पुरुषांपेक्षा जास्त प्रभावी पद्धतीनं आणि एकाग्रतेनं काम करू शकतात.

अवकाशात जाणं, अंतराळवीर होणं यात प्रचंड ग्लॅमर, प्रसिद्धी आहे, यात शंका नाही; पण ती केवळ एक बाजू झाली. त्या ठिकाणी पोचण्यासाठी या सगळ्या अंतराळवीरांना कठोर परिश्रम आणि अगणित चाचण्यांमधून जायला लागतं. छोट्याशा जागेत एक ते तीन वर्षांपर्यंत काही माणसं सतत एकत्र राहणं हे मानवी मनाची, भावनांची कसोटी पाहणारं आव्हान आहे. तीन वर्षांपर्यंत एकमेकांबरोबर राहून, रोज कोणतंही वैविध्य नसलेलं एकाच पद्धतीचं काम करत राहणं याचा आकलनशक्तीवर, निर्णयक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. अंतराळात असताना तिथून पाठवलेला संदेश पृथ्वीपर्यंत जायला काही मिनिटांचा फरक पडतो. हा फरक साधारण 11 ते 12 मिनिटांचा असतो. म्हणजेच पृथ्वीपासून कित्येक किलोमीटर लांब असताना, अंतराळयानामध्ये काही बिघाड झाला, आग लागली तर तो संदेश पृथ्वीपर्यंत यायला आणि पृथ्वीवरून त्याचं उत्तर जायला 12+12 अशी 24 मिनिटं जातील. याचाच सरळ अर्थ म्हणजे त्या क्षणी त्या अंतराळवीरांना अगदी स्वतंत्रपणे विचार करून, अगदी चटकन्‌ निर्णय घेऊन कृती करणं भाग असेल. हे सगळं पाहता माणसाची मानसिक, शारीरिक आणि भावनिक क्षमता कसोटीला लावणाऱ्या चाचण्या अंतराळवीरांना का द्याव्या लागत असतील याचं उत्तर मिळतं. आपण ज्या मोहिमेवर जात आहोत तिथून कदाचित आपण जिवंत परत येणार नाही, अशीच मनाची तयारी करून हिमतीनं काम करणाऱ्या, ध्येयानं पछाडलेल्या वैज्ञानिकांना पाहता, "की न घेतले व्रत हे आम्ही अंधतेने' याची खात्री पटते.

अंतराळात एक छोटंसं यान पाठवणं हीच एक अत्यंत महागडी गोष्ट आहे. मार्स 2020 सारख्या मोहिमांना खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक बळ लागतं. या मोहिमेसाठी अंदाजे 2 अब्ज डॉलर्स खर्च होणार आहे. हा खर्चाचा आकडा बघता, जगात इतके अनंत प्रश्न असताना अशा अवकाश मोहिमांची काय गरज आहे, हा प्रश्न पडला तर त्यात काहीच गैर नाही; पण एकाच ग्रहावर राहणाऱ्या सजीवांना नामशेष होण्यापासून वाचण्यासाठी सतत नवीन जागा शोधत राहिल्या पाहिजेत, असंच उत्क्रांती-तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

संपूर्ण चमू महिलांचा
...तर भविष्यात होऊ घातलेल्या महिला स्पेशल मंगळ मोहिमेची नांदी याच महिन्यात 29 तारखेला होत आहे, असं म्हणायला हरकत नाही. 29 मार्च हा तसं पाहायला गेलं, तर साधाच दिवस; पण जमिनीवर नाही तर अंतराळात या दिवशी एक वेगळीच घटना घडणार आहे. नासाच्या आंतरराष्ट्रीय अवकाशस्थानकाच्या (इंटरनॅशनल स्पेस स्टेशन) बाहेरच्या बाजूला काही डागडुजी करण्यासाठी तीन चमू पाठवण्यात येणार आहेत. यात आनंदाची आणि अत्यंत अभिमानाची गोष्ट म्हणजे यातला एक चमू हा संपूर्ण महिलांचा असणार आहे. मार्च महिना हा आंतरराष्ट्रीय पातळीवर महिलांचा महिना मानला जातो. याच महिन्यात हा योग जुळून यावा याहून आनंदाची गोष्ट कोणती?
ऍन मॅकक्‍लेन आणि क्रिस्टिना कोच या दोन महिला आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रात सुखरूप पोचल्या आहेत. गेली 18 वर्षं देशोदेशीचे शात्रज्ञ अंतराळातल्या अवकाश केंद्रात राहून अव्याहतपणे अवकाशाचा अभ्यास करत आहेत. "एक्‍स्पिडिशन 59' या मोहिमेअंतर्गत एकूण तीन छोट्या मोहिमा होतील. यातल्या दुसऱ्या मोहिमेत, अवकाश केंद्राच्या बाहेरच्या भागातली काही डागडुजी करणं; तसंच काही बॅटरीज बदलणं या कामासाठी महिलांचा चमू काम करेल. हे काम अत्यंत जोखमीचं आणि धोकादायक आहे. अवकाशातली कठोर आणि जीवघेणी बाब म्हणजे म्हणजे निर्वात, गुरुत्वाकर्षण नसलेला भाग. अशा ठिकाणी हे खडतर काम प्रथमच संपूर्ण महिला चमू करतील. अजून एक ठळक गोष्ट म्हणजे पृथ्वीवरून तीन महिलांचा चमू त्यांना सतत मार्गदर्शन करत असेल. या स्पेसवॉकची संपूर्ण मोहीम आपल्याला इंटरनेटवरून लाइव्ह पाहता येईल. आतापर्यंत अवकाशात अशाच पद्धतीच्या स्पेसवॉक मोहिमा झाल्या आहेत; परंतु संपूर्ण महिलांचा चमू हा योग प्रथमच जुळून आला आहे.

मुद्दाम घडवलेला योग नव्हे
प्रथमच संपूर्णपणे महिलांचा चमू एका अंतराळ मोहिमेवर जाणं, हे नासानं मुद्दाम घडवून आणलेलं नाही, हे इथं स्पष्ट करावं लागेल. हा एक मस्त योगायोग जुळून आला आहे. कोणे एकेकाळी महिलांना काम करायला बंदी असण्यापासून, आज अगदी सहजतेनं महिलांचा चमू काम करतोय यातली सहजता फार उल्लेखनीय आहे. मागच्या काही पिढ्यांसाठी महिलांनी अंतराळात काम करणे ही अपवादात्मक गोष्ट असेल; पण येणाऱ्या पिढ्यांमध्ये, आपल्या मुलींमध्ये या करिअरप्रती सहजपणा येतो आहे, ही अत्यंत आनंदाची बाब असेल आणि आहे.

एखाद्या छोट्याशा खेड्यातली मुलगी जेव्हा, एक स्त्री मंगळावर निघाल्याची किंवा अवकाशात भ्रमण करायला निघाल्याची बातमी वाचते, तेव्हा तिची स्वप्नं, तिच्या महत्त्वाकांक्षांना पंख फुटतात. तिचा आत्मविश्वास आणि ध्येयाप्रती निष्ठा वाढते. महिलांच्या अंतराळातल्या या आगळ्यावेगळ्या सफारीचं महत्त्व केवळ प्रतीकात्मक नसून, वास्तवातही किती महत्त्व आहे, हे यातून दिसतं. स्त्रियांच्या या भरारीचे पडसाद आणि प्रतिसाद सगळ्याच क्षेत्रांत उमटणार आहेत. काही गुंतवणूक कंपन्यांच्या मते, या घटनेमुळं आणि महिलांच्या वाढत्या प्रतिसादामुळं जगभरातून अंतराळातील गुंतवणूक जागतिक लेबर फोर्समध्ये 12 हजार अब्ज डॉलर्सची पुढच्या सहा वर्षांत वाढ होऊ शकते.

भारतीय "रॉकेट वूमन'
जगभरातल्या महिला अंतराळ शास्त्रज्ञांच्या उल्लेखनीय कामगिरीबरोबरच भारतीय महिला अंतराळ वैज्ञानिकदेखील मागं नाहीत. भारताच्या इस्रोनं अगदी थोड्या कालावधीत अत्यंत दिमाखदार काम केलं आहे. एका प्रक्षेपणात 104 सॅटेलाइट्‌स अवकाशात प्रस्थापित करण्यात महत्त्वाचा वाटा असणाऱ्या, भारतीय महिला अंतराळ वैज्ञानिकांनी "रॉकेट वूमन' म्हणून नाव कमावलं आहे. चारचौघींसारख्या दिसणाऱ्या, वागणाऱ्या या दुर्गांना पाहून खूप अभिमान वाटतो. आपल्यातल्या आणि आपल्यासाठी काम करणाऱ्या या झळाळत्या यशस्विनींना पाहून मान उंच होते.
केवळ कुणी एक बाई आहे म्हणून एखाद्या क्षेत्रात काम करायला न मिळणं, शिकायला न मिळणं इथून सुरू झालेला स्त्रीचा हा प्रवास आज कुठपर्यंत आला आहे, हे पाहता थक्क व्हायला होतं. इथपर्यंत येणं हे नक्कीच सोपं नव्हतं आणि हा प्रवास संपलेला नाहीच. नव्या पिढीतल्या मुली अत्यंत निष्ठेनं आणि आपल्या ध्येयाकडं लक्ष ठेवून मार्गक्रमण करत आहेत. नासाच्या स्पेसकॅम्पना लक्षणीय संख्येनं येणाऱ्या मुली, येत्या काळात महिलांचा अंतराळातील उज्ज्वल भविष्यकाळ दाखवतात. शाळेत काय, समाजात काय किंवा अंतराळात काय, बाईला तिचं स्थान झगडूनच मिळवायला लागलं आणि तिनं ते मिळवलं आणि मिळवत राहील. हाच आहे तो प्रवास अवकाशयानाचा आणि त्याबरोबर एका स्त्रीचा जमिनीपासून अंतराळापर्यंत. जगातल्या तमाम स्त्रियांना त्यांच्या गावापासून ते पार अंतराळापर्यंत नव्या वाट शोधायला, चालायला आणि जोखायला मिळोत हीच सदिच्छा.

एलिसा कॅरिसनचं नाव चर्चेत
मंगळावर पहिलं पाऊल कुणाचं असेल याविषयी चर्चा सुरू असली, तरी मंगळावर माणूस जाण्याच्या मोहिमेला अजून बराच वेळ असेल. पुढच्या वर्षी मंगळावर यंत्रमानवच जाणार आहे. प्रत्यक्ष मानवी मोहीम ही साधारण सन 2033मध्ये असेल, असं सांगितलं जात आहे. गंमत म्हणजे एकीकडं मंगळावर पडणारं पहिलं पाऊल महिलेचं असावं किंवा असेल असं सांगितलं जात असताना अमेरिकेतल्या माध्यमांमध्ये एका नावाची चर्चाही सुरू झाली आहे. एलिसा कॅरिसन या सतरा वर्षांच्या मुलीचं नाव त्यासाठी चर्चेत आहे. ऍलिसा ही सध्या ऍस्ट्रोनॉट ट्रेनी आहे. ती अंतराळवीर बनण्यासाठी अतिशय काटेकोर असं प्रशिक्षण घेत आहे आणि ती जेव्हा 33 वर्षांची होईल, तेव्हा मंगळावर जाणाऱ्या या मोहिमेत आपला सहभाग असावा या दृष्टीनं ती प्रयत्न करते आहे. आता तिचा सहभाग खरंच असेल का, ती नक्की कोणत्या मोहिमेत असेल, इतर निकष काय असणार हे सगळं अजून चर्चेच्याच पातळीवर आहे; पण सगळ्या गोष्टी मनासारख्या घडल्या, तर कदाचित एलिसा इतिहास तयार करू शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Water Scarcity : पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा वणवण ; राज्यात भीषण टंचाई,७४९५ वस्त्यांवर टँकरद्वारे पुरवठा

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 30 एप्रिल 2024

Narendra Modi in Pune : रेसकोर्सवर अवतरला ‘केसरिया सागर’

Nashik Ashok Kataria Fraud Case: अशोक कटारिया यांचा ‘अटकपूर्व’ फेटाळला! अडचणीत वाढ; हायकोर्टात जाण्याची शक्यता

IPL 2024, KKR vs DC: कोलकातानं मागच्या सामन्यातून धडा घेतला अन् पंतच्या दिल्लीला चारीमुंड्या चीत केलं

SCROLL FOR NEXT