Player-Exercise
Player-Exercise 
सप्तरंग

योयो नाही तर गो गो !

सुनंदन लेले saptrang@esakal.com

खूप जुन्या काळातलं तर सोडाच, पण अगदी अलीकडं अर्जुना रणतुंगा आणि इंझमाम उल हक खेळत असत, तोपर्यंत खेळाडूंच्या तंदुरुस्ती चाचण्या करण्याचा विचारही आशिया खंडातील संघ व्यवस्थापनाच्या मनात नव्हता. सौरव गांगुलीच्या कर्णधारपदाखाली खेळणाऱ्या भारतीय संघात व्यायामाची आवड होती यात शंका नाही. फरक असा होता, की त्याचा जास्त बोलबाला व्हायचा नाही. मात्र गेल्या ५ वर्षांत तंदुरुस्तीबद्दल जागरूकता वाढली आणि अर्थातच त्याचे निकष झपाट्यानं बदलत गेले. वरुण चक्रवर्ती नावाच्या खेळाडूला ‘योयो’ टेस्टमध्ये नापास झाल्यानं निवड झालेली असूनही भारतीय संघापासून लांब ठेवण्याचा कठोर निर्णय घेतला गेला. आजच्या लेखाचं कारण हेच आहे, की नक्की ही ‘योयो’ टेस्ट म्हणजे आहे तरी काय?

क्षणात सारे बदलले
भारतीय संघात तंदुरुस्तीची नवीन पातळी गाठायला ‘स्वत: केले मग सांगितले’ या उक्तीप्रमाणे बदल घडवणाऱ्या कर्णधार विराट कोहलीनं एकदा गप्पा मारताना मला सांगितलं होते, की त्याच्यात बदल कधी आणि कसा घडला. विराट म्हणाला, ‘एका सामन्यात मला खेळाडू आणि कर्णधार असं दोन्ही पातळीवर अपयश आल्यावर मी संघ राहत असलेल्या खोलीवर आलो. मी शांत होण्याकरिता पहिल्यांदा गार पाण्यानं तोंड धुतलं आणि आरशात बघितलं तेव्हा मला जाणवलं, की माझे गाल बऱ्यापैकी गुबगुबीत आहेत. याचा अर्थ माझ्या शरीरात मेद भरलेले आहे. त्या क्षणापासून मी निश्चय केला, कठोर व्यायाम करायचा आणि आहारातील शिस्त पाळायची. मग माझ्या सवयी मी नखशिखांत बदलून टाकल्या. आहारावर प्रचंड नियंत्रण आणलं. फक्त शरीराला गरजेचं आहे तेवढं आणि आरोग्याकरिता १०० टक्के चांगलं आहे असंच अन्न मी सेवन करायला लागलो. व्यायामाचा मी वेगळाच ध्यास घेतला.

सुरुवातीला अंगाला आणि मनाला जडलेल्या सवयी तोडायला त्रास झाला, पण खरं सांगतो काही महिन्यांतच मला फरक जाणवू लागला. मला मैदानात वावरताना हलके वाटू लागले. फलंदाजी करताना असो वा क्षेत्ररक्षण करताना, मला कोणतीही कृती करताना माझे शरीर मला योग्य वेळी, योग्य साथ देणार याची खात्री वाटू लागली. तंदुरुस्तीची एक अपेक्षित पातळी गाठल्यावर मी सहकाऱ्यांना त्याचं महत्त्व पटवून दिलं आणि त्यांना पातळी गाठायला पुरेसा अवधी दिला. त्यानंतर ठरवून टाकले, की भारतीय संघातून खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूला तंदुरुस्तीचा मापदंड असलेली पातळी गाठणं सक्तीचं करायचं. मग ‘योयो टेस्ट’चे निकष आम्ही अंगीकारू लागलो. मला वाटतं भारतीय संघाच्या खेळात सर्वांगीण सुधारणा दिसू लागायला या सगळ्या शिस्तीचा मोठा फरक पडला आहे’, विराट कोहली भरभरून सांगत होता.

सोप्या भाषेत सांगायचा प्रयत्न करतो. प्लॅस्टिकचे दोन कोन २० मीटर अंतरावर ठेवले जातात आणि सुरुवातीच्या रेषेच्या मागे ५ मीटर अंतरावर अजून एक कोन ठेवला जातो. परीक्षा चालू होते तेव्हा खेळाडूला कोनापासून पळणे चालू करून, गजर वाजायच्या आत २० मीटर अंतरावरच्या कोनापर्यंत पोहोचून न थांबता लगेच उलटं पळणं सुरू करून, पहिल्या कोनापर्यंत येऊन मग मागच्या कोनापर्यंत चालत जाऊन, दहा सेकंदांची विश्रांती घेऊन परत पहिल्या कोनापासून दुसर्‍या कोनापर्यंत पळणे चालू करायला लागते. यात सुरुवातीला वेग कमी असतो आणि नंतर तो वाढत जातो. म्हणजे दमणूक वाढत जाताना सावरायचा वेळ मात्र १० सेकंदांचाच कायम असतो. यू-ट्यूब योयो इटरमीटंट रिकव्हरी टेस्ट लेव्हल १ असा शोध घेतलात, तर तुम्हाला क्लीप पण बघायला मिळेल.

भारतीय संघातून खेळणार्‍या प्रत्येक खेळाडूला अगोदर १६.१ निकष असलेली योयो टेस्ट पार करायला लागायची, जी आता १७.१ ची करण्यात आली आहे. अंगानं जाड दिसणारा रिषभ पंत १७.२ची योयो परीक्षा पास करतो, तर विराट कोहली, रवींद्र जडेजा आणि हार्दिक पंड्या १९.१ची योयो टेस्ट सहजी पार करतात असं समजलं.

योयो टेस्ट म्हणजे परीक्षा नाहीये, तर सत्त्वपरीक्षा आहे असे केदार जाधव म्हणाला. खेळाडूनं सातत्यानं व्यायाम, मेहनत आणि आहारातील शिस्त पाळली नाही, तर योयो टेस्ट पास करायला प्रचंड कठीण जातं. सुरुवातीला पळताना दम लागतो, पण जशी जशी परीक्षा पुढे सरकत जाते, तसा वेग वाढत जातो आणि विश्रांतीची १० सेकंदच कायम राहतात. १० वेळा २० मीटरचं अंतर पळून परत आलो, की तेच १० सेकंद २ सेकंदांइतके कमी वाटू लागतात, इतका दम लागलेला असतो. तयारी केली नसलेल्या खेळाडूंना काढा संघातून, पण ही परीक्षा नको असे वाटले, तर मला आश्चर्य वाटणार नाही इतकी ती कठीण जाते. अर्थातच व्यायाम योग्य केला आणि आहारातील शिस्त पाळली, तर योयो परीक्षा पास करणं अशक्य होत नाही असा माझा अनुभव आहे, केदार जाधव म्हणाला.

नव्या खेळाडूंना जाच
२०२० च्या आयपीएल मोसमात भन्नाट कामगिरी केल्यानं वरुण चक्रवर्ती आणि राहुल तिवाटिया या दोन खेळाडूंना भारतीय संघाचे दरवाजे उघडले गेले. दोघांना भारतीय संघाचे तंदुरुस्तीच्या बाबतीतले निकष माहीत होते आणि सुधारणा करायला पुरेसा अवधी होता. तरीही तिवाटिया आणि वरुण चक्रवर्ती योयो चाचणीत नापास झाले आणि दोघांना भारतीय संघाचे दरवाजे आत्ता खुले नसल्याचे समजले. केदार जाधवनं या बाबत मार्मिक टिप्पणी केली. तो म्हणाला, ‘वरकरणी नव्या खेळाडूंना या गोष्टीचा जाच वाटत असला, तरी जर तुम्हाला भारतीय संघाची मानाची टोपी हवी असेल, तर गरज असलेली पातळी गाठणे आणि त्याकरिता शिस्तपालन करणे किंवा काही गोष्टींचा त्याग करणे, हे हसत करायला जमले पाहिजे. कारण या सगळ्यांचा शेवटचा फायदा त्या त्या खेळाडूला सर्वोत्तम कामगिरी करताना होतो. तसेच दुखापती टाळायला आणि दमणुकीतून लवकरात लवकर सुटका करून घ्यायला या मेहनतीचा खरा फायदा कळतो, केदारनं अनुभव कथन केले. वरकरणी जाचक वाटत असला, तरी ‘योयो नाहीतर गो गो’चा नियम भारतीय संघाला नवे वळण देतो आहे, जे अत्यंत चांगले आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

Latest Marathi News Update: सुप्रिया सुळे यांच्याविरोधात आचारसंहिता उल्लंघन केल्याची तक्रार

SCROLL FOR NEXT