Girish Natu
Girish Natu Sakal
सप्तरंग

बॅडमिंटनमधला ‘भारतीय आवाज’

सुनंदन लेले sdlele3@gmail.com

पुण्यातील अप्पा बळवंत चौकाजवळच्या आमच्या नूमवि शाळेच्या इमारतीकडे बघून माझा ऊर नेहमी भरून येतो. लांबलचक दगडी मजबूत बांधकामाची इमारत खुणावते.

पुण्यातील अप्पा बळवंत चौकाजवळच्या आमच्या नूमवि शाळेच्या इमारतीकडे बघून माझा ऊर नेहमी भरून येतो. लांबलचक दगडी मजबूत बांधकामाची इमारत खुणावते. काहीजण इमारत तुरुंगासारखी दिसते, शाळा वाटत नाही असेही म्हणतात. ‘छात्र आम्ही नूमविचे, घडवू राष्ट्र उद्याचे’ या शाळेच्या ब्रीदवाक्याला सार्थ ठरवत या इमारतीतून शिकून अनेक विद्यार्थी बाहेर पडले ते पंखात बळ भरूनच. त्यात परत माझी म्हणून सांगत नाहीये पण १९७९ ची दहावीची बॅच फारच अफलातून होती यात शंका नाही. अनेक विद्यार्थी दहावीच्या गुणवत्ता यादीत आले होते. त्यातले खूपजण अत्यंत उत्तम डॉक्टर्स झाले. ख्यातनाम वकील झाले. इंजिनिअर्स तर अनेकजण झाले आणि आज विविध मोठ्या कंपनीत उच्चपदावर काम करतात. राहुल सोलापूरकर सारखा रंगकर्मी झाला. आणि प्रदीप कुरुलकर सारखा शास्त्रज्ञ सुद्धा निर्माण झाला जो आता ‘डी आरडीओ’ चा टॉप बॉस आहे.

‘नूमवि’तून खेळाडूही भरपूर तयार झाले. अगदी शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरीही आहेत. राष्ट्रीय पातळीवर खेळून मग खेळणे थांबल्यावर त्याच खेळाच्या क्षेत्रात खूप मोठी उंची गाठणाऱ्या गिरीश नातू नुकताच मला भेटला. बर्मिंगहॅमला राष्ट्रकुल स्पर्धा बघायला गेलो असताना त्याची भेट झाली. त्याला मिठी मारताना न कळत माझे हात त्याच्या पाठीवर अभिमानानं शाब्बासकीची थाप मारत होते.

गिरीश राष्ट्रकुल स्पर्धेतील बॅडमिंटन खेळाचा सर्वोच्च तांत्रिक अधिकारी म्हणजेच ‘चीफ रेफ्री’ म्हणून काम करत होता. थोडक्यात सर्व बॅडमिंटन पंचांचा गिरीश बॉस होता. लांबून गिरीशला काम करताना बघून समजत होते की स्पर्धेतील बॅडमिंटनचे सामने नियमाला धरून होतात याकडे गिरीशचे ''घारे'' डोळे लक्ष ठेऊन होते.

आपण बरे आपले काम बरे असे वागणारा गिरीश नातू कधीच तो काय पातळीवर काम करतो ह्याच्या गमजा मारत नाही. आम्ही पुण्यात भेटलो असताना गिरीश मस्त मूड मध्ये होता आणि मी त्याला बोलतं केलं.

प्रश्‍न : कसा झाला तुझा हा बॅडमिंटनच्या प्रेमाचा प्रवास?

गिरीश नातू : पंचगिरी खूप नंतर आली रे, माझं पहिलं प्रेम बॅडमिंटन खेळावर होतं आणि आहे. तुला कल्पना आहेच की आपल्या घराशेजारी लक्ष्मी क्रीडा मंदिर मध्ये बॅडमिंटन कोर्ट होते. तिथे आमचा मुक्त संचार असायचा. खेळाची इतकी गोडी लागली की मी बऱ्यापैकी म्हणजे राष्ट्रीय पातळीवर बॅडमिंटन खेळलो. अभ्यासात गती होती म्हणून चार्टर्ड अकाऊंटंट झालो. काम जोरात चालू झाले आणि स्पर्धात्मक खेळणे मागे पडले. खेळावरच्या प्रेमाने मला परत खेचून आणले आणि मी अम्पायरिंग करू लागलो. त्यात आनंद मिळू लागल्याने त्याचा अभ्यास चालू केला.

फक्त खेळाडू होता म्हणून अम्पायरिंगचा मार्ग खुला होत नसतो ना. त्यासाठी काय केलेस ?

- तसे बघायला गेले तर १९९३ मध्ये मी इंटरनॅशनल बॅडमिंटन फेडरेशनचा अधिकृत पंच झालो. त्यानंतर पाच वर्षांनी सर्टिफिकेटेड अम्पायर झालो. तिथपासून २०१३ सालापर्यंत खूप चांगल्या सामन्यात पंचगिरी करायला मिळाली. २०१३ साली मी पहिल्यांदा रेफ्री झालो. परत ५ वर्षांचा प्रवास करून अभ्यास करून मी २०१८ साली नियमाप्रमाणे ५५ वर्षांचा झाल्यावर अम्पायरिंग बंद करून सर्टिफिकेटेड रेफ्री झालो. आणि आता होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेकरिता मी चीफ रेफ्री आहे. एकंदरीत असा होता प्रवास खडतर पण खूप मजेदार.

मित्रा हे तर खूपच भारी आहे सगळं, पण आत्ताच्या घडीला जगात तुझ्यासारखे किती अधिकृत रेफ्री आहेत?

- वर्ल्ड बॅडमिंटन फेडरेशनच्या सेमी प्रोफेशनल रेफ्रीपॅनलचा मी सदस्य आहे. असे जगात फक्त आठ रेफ्री आहेत. त्यातला या पातळीवर काम करणारा मी एकमेव खरा एशियन रेफ्री आहे. काय सांगू तुला. अरे अगोदर तर असे फक्त चार रेफ्री होते. गेल्या काही वर्षात अजून चार वाढवून आता आठ झाले आहेत. आम्हाला वर्षातून किमान सहा स्पर्धात रेफ्री म्हणून काम करायची बांधीलकी असते.

किती कठीण असते बॅडमिंटनच्या खेळात रेफ्री किंवा अम्पायरिंगचे काम करणे? कारण फुटबॉल सारखी हाणामारी दिसत तरी नाही.

- एका अर्थाने तसे दडपण नसते. पण सामना जितका मोठा, चुरशीचा - खुन्नसचा तसे पंचांवरचे दडपण वाढते हे नाकारून चालणार नाही. युरोप मधले बहुतांशी खेळाडू व्यावसायिक बॅडमिंटनपटू असल्याने त्यांच्यासाठी खेळणे ही रोजीरोटी आहे. मग प्रत्येक गुण त्या इर्षेने खेळाला जातो. मारलेले शटल आत पडले का बाहेर यावरून वादंग होतो. पंचांना एकाग्रता राखून कसोशीनं काम करावे लागते. नियमांची सखोल माहिती असावीच लागते. निष्पक्षपाती निर्णय घेण्याची क्षमता असावी लागते.

मित्र तू खेळत होतास तेव्हा खेळ कसा होता आणि हिरो कोण होते?

- हिरो अर्थातच प्रकाश पदुकोण होते. खेळ म्हणायला गेला तर कौशल्यावर जास्त आधारित होता आणि तंदुरुस्तीला बऱ्यापैकी मोल होते. आता खेळातील नवीन नियमांनी तंदुरुस्तीचे महत्त्व प्रचंड वाढले आहे. अगोदर मलेशियन खेळाडू खूप फिट असायचे जे ताकदवान फटक्यांची माळ लावायचे. आपले खेळाडू कौशल्यात कधीच कमी नव्हते. थोडा फिटनेस ताकद नक्कीच कमी पडायचा. आता परिस्थिती बदलली आहे.

फेडरेशन किंवा सरकार पातळीवर दृष्टिकोन बदलला आहे का ?

- खूप चांगला बदल झालाय. अगोदर तुम्ही जिंकलात तर मदत मिळायची. आता खेळाडू तयार होण्यासाठी सर्व मदत मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाते. आर्थिक मदतीसाठी सरकारकडे सतत हात पसरावे लागत नाहीत. जे मान्य केले गेले आहे ते आपोआप जमा होते. सर्वोत्तम प्रशिक्षणासाठी सरकारी पातळीवरून प्रयत्न केले जातात. आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आर्थिक अनुदानात भरीव वाढ झाली आहे. कष्टकरी दर्जेदार खेळाडूला आता तयारी करायला काहीही कमी पडू दिले जात नाही. हे सर्व बदल मोठे लक्षणीय आहेत असे मला दिसते आहे.

तू अगोदर मनातून खेळाडू आहेस आणि मग रेफ्री ... कधीतरी सामन्यात काम करत असताना उच्च खेळ बघून खेळाडू जागा होतो का?

- होतो ना. कारण एखादा गुण एखादा खेळाडू असा काही चमत्कार करून गुण मिळवतो की थक्क व्हायला होते. मग नुसता रेफ्री असलो तर न कळत टाळ्या वाजवल्या जातात. अगदी खुर्चीत पंचांचे काम करत असतानाही बोटे वाजतात किंवा डोळ्यांनी वाहवा केली जाते. पण खरे सांगू त्यातच खेळाचा रोमान्स आहे. त्यातच खरी मजा आहे. पंच म्हणून मी केलेला एक सामना आठवतो. २००६ मध्ये एशियन गेम्स चा अंतिम सामना. लिन डॅन आणि तौफिक हिदायतमधला. बापरे काय सांगू तुला, सामन्याअगोदर चांगलीच खडाजंगी झाली होती तौफिक हिदायत आणि लिन डॅनच्या कोचमध्ये. तौफिक हिदायतने तोडीसतोड उत्तर देताना सरळ दोन गेम्स जिंकून विजेतेपद मिळवले होते तो सामना अविस्मरणीय होता. त्या सामन्यात मुख्य पंच म्हणून काम करताना जाणवलेल्या दडपणाचा मी आनंद घेतला होता.

भारतीय बॅडमिंटन योग्य मार्गावर आहे असे वाटते का तुला ?

- होय, होय आहे ना. अगोदर आपल्याकडे एखादा कमाल खेळाडू असायचा. आता पुरुष एकेरीत ३-४ चांगले दर्जेदार खेळाडू आहेत. पी. व्ही. सिंधू सतत आपले नाणे खणखणीत वाजवत आहे. विचार केला तर दुहेरी विभागात आपण अजून खूप मागे आहोत असे वाटते. पण आपली सात्विक साईराज - चिराग शेट्टी ही जोडी मस्त प्रगती करत आहे.

पुण्यात झालेल्या आमच्या गप्पा आठवल्या आणि राष्ट्रकुल स्पर्धेत माझा बालमित्र इतक्या मोठ्या स्थानावर काम करत असलेला बघून माझा उर अभिमानाने फुलून आला. चांगली बातमी अशी की आगामी येणाऱ्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुद्धा गिरीश पंच म्हणून भूमिका निभावणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma T20 WC 24 : टी 20 वर्ल्डकप तोंडावर आलाय अन् रोहित पुन्हा फेल गेला... माजी खेळाडूनं व्यक्त केली चिंता

Omprakash Raje Nimbalkar : जनतेनेच निवडणुक हाती घेतल्याने विजयाचा मार्ग सुकर - ओमराजे निंबाळकर

Lok Sabha Election : पहिल्या उमेदवारावर विश्वास नसल्याने दोन फॉर्म भरण्यात आले; राजेश मोरे यांची ठाकरे गटावर टीका

Champions Trophy 2025: 'तर पाकिस्तानला न येण्याचं लॉजिकल कारण द्या', भारतीय संघाच्या भूमिकेबाबत माजी क्रिकेटरचं स्पष्ट वक्तव्य

Latest Marathi News Live Update: मनसे अध्यक्ष राज ठाकरे सिंधुदुर्गात दाखल

SCROLL FOR NEXT