- वैभव वाळुंज
लहान मुलांचे कुपोषण किंवा आरोग्याच्या समस्या या विकसनशील देशांसाठी नव्या नाहीत; पण इंग्लंडमध्येही या समस्यांनी आता थैमान मांडलं आहे. इंग्लंडमधून एकेकाळी जगभरात उपासमार होणाऱ्या देशांमध्ये अन्नाचा पुरवठा केला जात असे; मात्र सध्याच्या काळात कठीण आर्थिक परिस्थितीतून जात असलेल्या सर्वसामान्यांचे जीवन अधिकाधिक खडतर होत चाललं आहे.
उपासमारीने आणि पोटाला खाण्यासाठी घरात पैसा नाही म्हणून शहराकडे स्थलांतर करणे भारताच्या सर्व ग्रामीण व निमशहरी क्षेत्रातील नेहमीची बाब आहे. यातून शहरांमध्ये लोकसंख्येचा संचय होऊन अनेक नव्या समस्या तयार होतात. यातून होणारे लहान मुलांचे कुपोषण किंवा आरोग्याच्या समस्या या विकसनशील देशांसाठी नव्या नाहीत; पण इंग्लंडमध्येही या समस्यांनी आता थैमान घातलं आहे.
काही महिन्यांपूर्वी सातवर्षीय मुलाला शाळेतून ब्रेड आणि खाण्याचे पदार्थ चोरताना पकडण्यात आलं. आपल्या घरी जेवण असेल की नाही, या विवंचनेतून त्यानं हे पाऊल उचलल्याचे उघड झालं. ही घटना इंग्लंडच्या कोवेंट्री या शहरात घडली. अन्न चोरी करण्याच्या अशा लाखो घटना दररोज इंग्लंडमध्ये घडत असतात; मात्र या घटनेनं देशात चांगलीच खळबळ उडाली.
देशभरात वाढत जाणाऱ्या गरिबीच्या पार्श्वभूमीवर तसेच तगण्याची किंमत वाढल्यानं (जिवंत राहण्यासाठी जीवन आवश्यक वस्तूंच्या किमतीतील वाढीमुळे) अशा अनेक घटना देशभरात घडत आहेत. इंग्लंडमधून एकेकाळी जगभरात उपासमार होणाऱ्या देशांमध्ये अन्नाचा पुरवठा केला जात असे; मात्र सध्याच्या काळात कठीण आर्थिक परिस्थितीतून जात असलेल्या इंग्लंडमध्ये चाकरमान्या वर्गाचे जीवन अधिकाधिक खडतर होत चाललं आहे.
यातून सामान्य माणसांना रोजच्या दैनंदिन गरजांसाठी सरकारवर अवलंबून राहावं लागत आहे, याचा प्रत्यय अनेकांना येतच होता; पण या लहानग्या मुलाच्या हृदयद्रावक घटनेचा उल्लेख थेट संसदेत झाल्यानं येथील सुखकर व्यवस्थेचा व कल्याणकारी राज्याचा बुरखा फाटला आहे.
गेल्या वर्षी इंग्लंडमधील सातपैकी एक व्यक्ती उपाशी राहिल्याचा अहवाल गरिबांसाठी अन्न बनवणाऱ्या स्वयंसेवी संस्थेने संसदेला सादर केला. यात केवळ अन्नधान्यांच्या किमती गगनाला भिडल्याने अनेक लोकांवर उपासमारीची वेळ येत असल्याचं नोंदवलं होतं. काही संस्थांनी केलेल्या सर्व्हेमध्ये लोकांना ‘गेल्या वर्षभरात कधीही तुम्ही पैसे नसल्याने उपाशी राहिला आहात का?’ असा प्रश्न केल्यावर जवळपास १० टक्के जनतेनं ‘हो’ असं उत्तर दिलं होतं.
यातून इंग्लंडमध्ये उपासमारी किती टोकाला पोचली आहे, याची प्रचीती येईल. त्यातल्या त्यात विकसनशील देशांसारख्या रेशनिंग किंवा शाळेमध्ये माध्यान्ह भोजन अशा सुविधा इंग्लंडमध्ये उपलब्ध नसल्याने गरीब नागरिकांना अजूनच मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले. स्वतंत्र संसद मिळाल्यापासून स्कॉटलंडने आपल्या संसदेमध्ये अन्नसुरक्षेसाठी कायदा केला होता व लहान मुलांना शाळेमध्ये पुरेसा आहार मिळेल, याची दक्षता घेत अन्नाच्या अधिकारांतर्गत दुपारच्या जेवणाची व्यवस्था केली होती.
किमान कॅलरीज आणि पोषणमूल्ये मिळतील, असा आहार स्कॉटलंडमधील शाळांमधून पुरवला जातो; मात्र ही तरतूद इंग्लंडमध्ये किंवा इतर प्रांतांमध्ये उपलब्ध नाही. यातून लहान मुलांच्या जगण्याची परिस्थिती बिकट झाली आहे. त्यातही दुसऱ्या देशातून इंग्लंडमध्ये आलेल्या व नव्याने स्थलांतरित झालेल्या पालकांच्या मुलांना आहाराच्या पातळीवर वेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागते.
आपल्या वातावरणाशी सुसंगत असा आहार नसल्याने उपासमारीच्या घटना इंग्लंडमधील वेगवेगळ्या समुदायांमध्ये घडल्या आहेत. काही घरांची आर्थिक परिस्थिती अचानक ढासळल्याने सरकारी मदत मागण्यासाठी लागणारी मानसिकता व एकूण सामाजिक संरचना इंग्लंडमध्ये अस्तित्वात नाही.
गेल्या वर्षी ससेक्स प्रांताच्या आसपासच्या भागांमध्ये पंचवीसशे मुलांना कुपोषणाचा त्रास झाल्यानं दवाखान्यात दाखल करावं लागलं होतं. अनेकदा अन्नदान करणाऱ्या अनेक स्वयंसेवी संस्था हिवाळ्यात वा शाळेच्या ख्रिसमसच्या सुट्ट्यांमध्ये बंद असतात. या काळात मुलांची उपासमार होणं आता सर्वसामान्य झालं असून त्याला ‘हॉलिडे हंगर’ असं म्हटलं जातं.
या सर्व घडामोडींच्या अनुरूप इंग्लंडमधील काही जागरूक खासदारांनी तसेच उदारमतवादी चर्च व डाव्या संघटनांनी संसदेमध्ये अन्नधान्य सुरक्षेसाठी लहान मुलांना शाळेमध्ये मोफत पोषण आहार देण्यात यावा, अशी मागणी केली. वास्तव पाहता या मागणीमध्ये चुकीचे असे काहीच नव्हते; तसेच यासाठी फार मोठ्या आर्थिक तरतुदीचीही गरज नव्हती.
याविषयी झालेल्या अनेक अहवालांना तसेच शोधनिबंधांना बाजूला सारून मोठमोठ्या खासगी शाळांच्या शुल्कात भरमसाट वाढ करण्यात आली आहे. यावर उपाय म्हणून अनेक बिगरसरकारी संस्था २००९ पासून सातत्याने अन्न फुकट वाटप करणाऱ्या फूड बँक तसेच अनेक समांतर संस्था चालवत आहेत.
भारतात अनेक शाळांमध्ये शालेय भोजनात पोषक आहार देणाऱ्या काही संस्था इंग्लंडमध्येही कार्यरत झाल्या असून, त्यांच्यामार्फत ठराविक शाळांमध्ये माध्यान्ह भोजन दिले जाते. एकेकाळी सूर्य मावळत नसणाऱ्या साम्राज्यामध्ये आता भुकेनं कळवळलेल्या नागरिकांच्या रोषाचा सामना सरकारला करावा लागत आहे.
श्रीमंत आणि गरीब यांच्यामधील दरी प्रमाणाबाहेर वाढत गेली, तर अगदी साम्राज्यही लयाला जाण्यापासून कुणी थांबवू शकत नाही, असाच संदेश या एकूण घटनाक्रमातून दिला गेला आहे.
vaiwalunj@gmail.com
(लेखक इंग्लंडमध्ये यूके सरकारच्या शिष्यवृत्तीअंतर्गत नीती व धोरण या विषयावर संशोधन करत आहेत.)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.