Pateshwar
Pateshwar 
सप्तरंग

सहस्रावधी शिवलिंगांचं पाटेश्‍वर

सकाळ वृत्तसेवा

वीकएण्ड पर्यटन - अरविंद तेलकर
श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सर सर शिरवे क्षणात फिरुनि ऊन पडे...

बालकवींनी श्रावण महिन्याचं साधारण शतकभरापूर्वी केलेलं हे वर्णन, आजही आबालवृद्धांच्या मनांत चैतन्य पसरविण्यास समर्थ आहे. आकाशाचं अमृत प्राशन करून धरित्री तृप्त झालेली असते. आसमंत पाचूसारखा हिरवागार बनलेला असतो. हिरवाईच्या कित्येक छटा, नेत्र आणि मनाला उल्हसित करतात. श्रावणातल्या ऊन-पावसाच्या सततच्या लपंडावामुळं, भटके आणि भाविक अशा दोन्ही प्रकारच्या समाजघटकांना वेध लागतात गिरीशिखरांचे. काही भाविक थेट पूजास्थानापर्यंत सरधोपट मार्गानं जाता येईल, अशी भीमाशंकरसारखी मंदिरांची वाट धरतात, तर काही देवदर्शन आणि साहसाची सांगड घालता येईल, अशी अडचणीच्या ठिकाणी असलेली शिवमंदिरं धुंडाळतात. बहुतेक प्राचीन शिवमंदिरं दुर्गम ठिकाणी बांधलेली दिसतात. आधुनिक युगात काही दुर्गम मंदिरांपर्यंत जाण्यासाठी पक्के रस्ते तयार झाले आहेत. परंतु अनेक ठिकाणं अद्याप थोडेफार श्रम आणि साहसाशिवाय प्राप्त होत नाहीत. साताऱ्याजवळचं पाटेश्‍वर हे दुसऱ्या प्रकारचं मंदिर आहे. काही वर्षांपूर्वी घाटरस्ता तयार करण्यात आला असला, तरी बरंच अंतर हे आजही चढून जावं लागतं.

सातारा-इस्लामपूर रस्त्यावर साताऱ्यापासून अवघ्या १४ किलोमीटरवर देगाव नावाचं छोटंसं गाव आहे. या गावाच्या मागच्या डोंगरावर पाटेश्‍वराचं अप्रतिम मंदिर आणि आसपास पसरलेली लेणी आहेत. या लेण्यांमध्ये व इथल्या मंदिरामध्ये विविध आकार आणि प्रकारात कोरलेली शिवलिंगं पाहायला मिळतात. बोटाच्या पेरांएवढ्या उंचीपासून ते चार फूट उंचीच्या शिवलिंगांची इथं रेलचेल दिसते. या पिंडींवरील कलाकुसरीचेही विविध प्रकार पाहता येतात. पाटेश्‍वराची लेणी कोणी आणि कधी खोदली याची माहिती काळाच्या ओघात गडप झालेली असली, तरी अठराव्या शतकात सरदार अनगळ यांनी पाटेश्‍वराचं मुख्य मंदिर बांधल्याची इतिहासात नोंद आहे. पाटेश्‍वराचा डोंगर चढताना चालण्याचे श्रम जाणवू नयेत, इतकी हिरवाई सभोवताली असते. चढणीवरच पाषाणात कोरलेली गणेशाची मूर्ती दिसते. मुख्य मंदिराच्या पायथ्याशी कमलपुष्पांनी भरलेली विश्‍वेश्‍वर नावाची पुष्करिणी आहे. पुष्करिणीच्याच एका भिंतीवर शिवाची मूर्ती कोरलेली आहे. या मूर्तीला एकच पाय आहे.

पुष्करणीला लागूनच बांधीव दगडी पायऱ्या आहेत. या मार्गानं चढत गेल्यानंतर पाटेश्‍वराचं मुख्य मंदिर लागतं. मंदिराकडं जाताना दोन शिवलिंगं दिसतात. त्यापैकी एका पिंडीच्या मध्यभागी शिवलिंग आणि त्याच्या बाजूनं ६८ सयोनी शिवलिंगं कोरलेली आहेत. दुसऱ्या शिवलिंगावर मध्यभागी दाढी-मिशा असलेलं महादेवाचं शिल्प आणि त्याच्या बाजूनं ७१ अयोनी शिवलिंगं कोरलेली आहेत. पुष्करिणीजवळून पहिल्या लेण्याकडं जाता येतं. ही लेणी मरगळ म्हशीचं लेणं म्हणून ओळखली जातात. या लेण्यात मृतावस्थेतील म्हशीच्या पाठीवर शिवलिंग आहे. इथं एकूण सहा शिवलिंगं आहेत.

लेण्यातील एका शिल्पपटातली पाच शिवलिंगं पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांचं प्रतिनिधित्व करतात. हे मंदिर स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना आहे. मंदिरासमोरचं नंदीचं शिल्प आणि गाभाऱ्यातील चार फूट उंचीच्या शिवलिंगाची प्रमाणबद्धता चकित करणारी आहे.

थोडं पुढं गेल्यावर पाच लेण्यांचा गट दिसतो. याला बळीभद्र मंदिर लेणं म्हणतात. एका गुहेत शिवलिंगाच्या बाजूनं चक्र, बदाम, वर्तुळ अशा विविध आकारांतल्या दहा आकृत्यांची शिल्प आहेत. त्यापैकी आठ आकृत्या अष्टदिशा आणि उर्वरित दोन सूर्य आणि चंद्राचं प्रतीक म्हणून दर्शवल्या आहेत. या प्रमुख शिल्पाव्यतिरिक्त दशावतार, अष्टमातृका, माहेश्‍वरी, नवग्रह, शेषशायी विष्णू, महिषासुरमर्दिनी, कार्तिकेय, चामुंडा आदी दैवतांची शिल्पंही पाहता येतात. या लेण्यात वृषभ-मानव म्हणजेच अग्नी-वृषाची एक सुंदर मूर्तीही आहे. या मूर्तीला सात हात असून, हातात विविध आयुधं आणि मुद्रा कोरलेल्या आहेत. समोरच्या बाजूनं ही मूर्ती दाढीधारी पुरुषाची आणि बाजूनं वृषभाची भासते. काही अंतरावर वऱ्हाडघर हा तीन लेण्यांचा समूह आहे. त्यातल्या मुख्य लेण्यात ९७२ शिवलिंगं आहेत. गुहेच्या एका भिंतीवर विष्णुसहस्रनामाची महती सांगण्यासाठी सहस्र शिवलिंगं कोरलेली आहेत, तर दुसऱ्या भिंतीवर सूर्यप्रतिमा आणि पुन्हा सहस्र शिवलिंगं आहेत. भालचंद्र शिव आणि ब्रह्मदेवाची शिल्पही या समूहात आहेत. या गुहांमध्ये एकमुखी, चतुर्मुखी आणि सहस्रमुखी, अशा अनेक प्रकारांत शिवलिंगं कोरलेली आहेत. गुहेत देवनागरी लिपीतला संस्कृत शिलालेख आहे. परंतु झिजल्यामुळं तो वाचता येणं अशक्य आहे.

कसे जाल? - पुण्याहून सातारामार्गे पाटेश्‍वर १२१ आणि मुंबईहून २६४ किलोमीटर. सातारा शहरात अनेक हॉटेल आणि रिसॉर्ट आहेत. साताऱ्यातील मुक्कामात अजिंक्यतारा, सज्जनगड, ठोसेघर धबधबा, कास पठार, बामणोली, चाफळ आदी ठिकाणं पाहता येतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT