Weekly Horoscope
Weekly Horoscope Sakal
सप्तरंग

साप्ताहिक राशिभविष्य : १९ सप्टेंबर २०२१ ते २५ सप्टेंबर २०२१

श्रीराम भट saptrang@esakal.com

अनंताचं अनुसंधान ठेवा !

काळ हा अनंत आहे. किंबहुना काळ हा अनंताच्या पोटात जगत असतो आणि याच काळाच्या पोटी जन्माला येत माणूस देह धारण करत असतो म्हणा किंवा हे देहरूपी भांडवल घेऊन तो संसाराचा धंदा करतो. शेवटी या भांडवलाची मुदत किंवा या भांडवलावरच व्याज आकारणं म्हणा किंवा या भांडवलाची परतफेड करणं म्हणा, निसर्गाकडून किंवा सृष्टीकडून अगदी नकळत किंवा अगदी सहजरीत्या केली जाते किंवा ती करवून घेतली जाते ! असे हे काळाचे अनंत काळ चाललेलं अनंततत्त्व सृष्टी अनुसरत असते ! शेवटी देता, घेता आणि भोक्ता हा अनंत असा काळच असतो.

देहरूपाने वावरणारं माणसाचे छोटेसे अवकाश म्हणा किंवा देहरूपी पोकळीत राहणारे माणसाचे मन, बुद्धी आणि अहंकाराचे अवकाश म्हणा, सतत ‘जरा थांब, जरा थांब’ असे काळाला विनवत आपले वाढदिवस साजरे करत असतं ! आणि विशेष म्हणजे आपणच काढलेल्या पंचांगातील मुहूर्तांवर आपली उत्सवप्रदर्शनं करत असतं !

देहरूपी माणूस हा काळाचं उच्छिष्टच आहे, असे हे काळाचं उष्टं खाणारा माणूस प्रत्येक वाढदिवशी ताजातवाना होत अमरपट्टा घेतल्यासारखा आपल्या देहरूपी पोकळीत फुरफुरत असतो. देश, काल, परिस्थिती यांचे सतत भान ठेवणारा हा माणसांचा संसार सतत होरपळत असला तरी माणूस आपली जन्मपत्रिका आधारकार्डासारखी सतत आपल्या खिशातील अवकाशात कोंबून वावरत असतो !

मित्रहो, आज अनंत चतुर्दशी आहे. कालमापन करणारे ज्योतिषशास्त्र माणूस नावाच्या पोकळीतील काळ उपभोगणाऱ्या आत्म्याची तडफड जाणून घेण्याचा प्रयत्न करत असते ! माणसाने अनंताचे अनुसंधान ठेवलं, की संसार मोक्षमय होत असतो. नाही तर माणूस काळरूपी भिंतीला पकडून राहणारी पाल किंवा देहरूपी बिळातला सर्प होत असतो !

परदेशस्थ तरुणांचा भाग्योदय

मेष : बुद्धिजीवी मंडळींना सप्ताह निश्‍चितच आत्मविश्‍वास वाढवेल. परदेशस्थ तरुणांचा भाग्योदय. अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींसाठी ता. २३ चा गुरुवार मोठे चमत्कार घडवेल. एखादे स्पर्धात्मक यश. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट वैयक्तिक कलागुणांतून प्रसिद्धीचा. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमेजवळ कोर्टात यश.

ओळखी-मध्यस्थीमधून मोठे लाभ

वृषभ : मृग नक्षत्राच्या व्यक्तींना बुध-गुरूचा शुभयोग पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात सेलिब्रेटी करेल. काहींना ओळखी - मध्यस्थींतून मोठे लाभ. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात नोकरीत अनपेक्षित बढती. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात राजकीय व्यक्तींकडून लाभ. पती वा पत्नीचा भाग्योदय.

नोकरीत वरिष्ठांची मर्जी राखाल

मिथुन : पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमेचे प्रभावक्षेत्र अतिशय सुंदर राहील. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. सप्ताह तरुणांना प्रेमप्रकरणातून गती देणारा. पौर्णिमेनंतर आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींचा रुबाब वाढेल. परदेशगमनाचे स्वप्न साकारेल. ता. २४ चा शुक्रवार सुवार्तांतून फ्लॅशन्यूज देईल. शनिवारी स्त्रीहट्ट पुरवाच.

विशिष्ट मानसन्मान मिळतील

कर्क : आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी पौर्णिमेचे प्रभावक्षेत्र शुभग्रहांच्या मोठ्या कनेक्‍टिव्हिटीचे. विशिष्ट मानसन्मानाचे वाटेकरी व्हाल. पुष्य नक्षत्रव्यक्ती शुक्र-हर्षल योगाचा उत्तम लाभ उठवतील. नोकरीत प्रशंसा. पुनर्वसू नक्षत्रास ता. २३ चा गुरुवार सुवार्तांतून मोठ्या सुखस्वप्नांत ठेवेल. स्त्रीच्या कर्तृत्वास पात्र व्हाल. और क्‍या!

व्यवसायातील मोठी वसुली होईल

सिंह : पूर्वा नक्षत्राच्या व्यक्ती शुक्र-हर्षल योगाची शुभफळे खेचून घेतील. मुलाखतींतून छाप पाडाल. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमेजवळ उत्तम सहली-करमणुकीचे योग. कोरोना विसराल. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमेचे फिल्ड मोठ्या व्यावसायिक वसुलीचे. ता. २४ चा शुक्रवार कलाकारांच्या मोठ्या भाग्योदयाचा. शनिवारी मोठ्या गाठीभेटी.

व्यावसायिक प्राप्तीचं रेकॉर्ड होईल

कन्या : पौर्णिमेचं एक भरतं राहील. आपले मानसिक अँटिने स्वच्छ ठेवून पौर्णिमेची स्पंदनं खेचून घ्या. विवाह प्रस्तावांचा सकारात्मक पाठपुरावा करा. चित्रा नक्षत्राच्या व्यक्ती हुकमी सीक्वेन्स लावतील. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्ती व्यावसायिक प्राप्तीचे रेकॉर्ड मोडतील. हस्त नक्षत्राच्या व्यक्ती चैन करतील. वैवाहिक जीवनात लाड पुरवले जातील.

प्रेमिकांच्या गाठीभेटी होतील

तूळ : पौणिमेनंतर बुध-शुक्राचे ग्रासकोर्टच राहील. स्वाती नक्षत्राच्या व्यक्ती सप्ताहात सतत छाप पाडतील. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २३ चा बुधवार मोठ्या यश-प्रसिद्धीचा. प्रेमिकांच्या हृद्य गाठीभेटी. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी ता. २३ चा गुरुवार महत्त्वाच्या गाठीभेटींचा. स्त्रीकडून लाभ. पौर्णिमेजवळ उत्सवमूर्ती व्हाल.

नोकरी - विवाहाचे प्रस्ताव येतील

वृश्‍चिक : ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी पौर्णिमेचे फिल्ड विशिष्ट महत्त्वाकांक्षा पूर्ण करणारे. तरुणांचे स्पर्धात्मक यश. काहींना ओळखीतून विवाहप्रस्ताव. ज्योतिष आडवं आणू नका. अनुराधा नक्षत्राच्या स्वतंत्र व्यावसायिकांना सप्ताह नवे उत्तम व्यावसायिक प्रस्ताव देणारा. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमा ओळखीतून नोकरी देणारी.

ज्याची इच्छा कराल ते होईल

धनु : पौर्णिमेजवळ शुभग्रहांची मांदियाळी बलवानच राहील. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना दैवी शक्ती प्राप्त होईल. अनंतत्त्वाची अनुभूती घ्याल. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना कुबेर प्रसन्न होतील. ज्याची इच्छा कराल ते होईल. प्रेमिकांना हा सप्ताह मोठ्या कनेक्‍टिव्हिटीचा. आपलं हृदय मोकळं कराच. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्ती नोकरीत लाभसंपन्न होतील.

व्यावसायिकांचं मार्केटिंग यशस्वी होईल

मकर : पौर्णिमेची स्पंदनं खेचून घेणारी सप्ताहातील एक अद्वितीय रास राहील. मात्र विश्‍वातील अनंततत्त्वाचे अनुसंधान ठेवा. सप्ताहात श्रवण नक्षत्राच्या व्यक्ती बलसंपन्न होतील. अर्थातच ते सुवार्तांतून चर्चेत राहील. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमेचं अंगण प्रेमात पाडणारे. पौर्णिमेजवळ व्यावसायिकांचे मार्केटिंग यशस्वी होईल.

मुलाखतीत व स्पर्धापरीक्षांत यश

कुंभ : पौर्णिमेचं फिल्ड संमिश्र राहील. दुखापती सांभाळा. बाकी सप्ताहात बुध-शुक्राच्या प्रेमलहरी तरुणांना उत्तम साथ देतील. मुलाखतींतून छाप पाडाल. काहींना स्पर्धात्मक यशातून मोठा दिलासा. काहींना कॅम्पसमधून नोकऱ्या. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमेजवळ मोठे व्यावसायिक लाभ. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना न्यायालयीन प्रकरणांमध्ये यश.

सरकार दरबारची कामं मार्गी लागतील

मीन : राशीतील पौर्णिमा आणि बुध-शुक्राची स्थिती व्यावसायिकांना छानच. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींची सप्ताहाची सुरुवात व्यावसायिक तेजीची. मंत्रालयातील कामे होतील. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींनी आरोग्यविषयक पथ्यं पाळावीच. खरेदीत फसू नका. द्वाड मित्र सांभाळा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट! परिसर हादरला; घरांची मोठी पडझड, पाहा व्हिडीओ

पुण्यासह पाच रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला बेड्या

Virat Kohli : इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमावर विराटचीही टीका;सामन्याचा समतोल बिघडत असल्याचे व्यक्त केले मत

VIDEO: आरसीबी प्लेऑफमध्ये जाताच विरुष्काचं भन्नाट सेलिब्रेशन; व्हिडीओनं वेधलं साऱ्यांचे लक्ष

शेतीवर कर्ज घेणारा शेतकरी झाला अब्जाधीश! खात्यात आले ९९ अब्ज रूपये, रक्कम पाहून बँकेसह खातेधारकाला बसला धक्का

SCROLL FOR NEXT