उत्तर महाराष्ट्र

जैताणे वीज उपकेंद्रात अग्नितांडव!

प्रा.भगवान जगदाळे

निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील 25 गावांचा समावेश असलेल्या जैताणे (ता.साक्री) येथील 33 केव्ही वीज उपकेंद्रात आज (ता.3) दुपारी साडेबाराच्या सुमारास विजेच्या अतिरिक्त भारामुळे शॉटसर्किट होऊन पॉवर केबलसह पाच मेगावॉट क्षमतेचे रोहित्र आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. सुमारे दीड कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. सुदैवाने जीवितहानी झाली नाही व पुढील अनर्थ टळला.

सुमारे तासभर अग्नितांडव...

हे अग्नितांडव दुपारी साडेबारापासून तब्बल तासभर सुरू होते. दुपारी दीड ते दोनच्या सुमारास साक्री येथील अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. आज (ता.3) वीजबिल वसुलीसंदर्भात जैताणे वीज उपकेंद्रात साक्री उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता प्रशांत ढवळे, पिंपळनेरचे उपकार्यकारी अभियंता किशोर पाटील, जैताणे वीज उपकेंद्राचे सहाय्यक अभियंता रोहित पाटील आदींच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठक सुरू असतानाच अचानक हा सर्व प्रकार घडला.

पोलीसांसह अग्निशमन दलास सूचना!

साडेबाराच्या सुमारास रोहित्रास आग लागल्याचे लक्षात येताच वीज तंत्रज्ञ किरण नांद्रे, दिनेश माळी, योगेश सोनवणे यांनी ताबडतोब निजामपूर पोलीस प्रशासन व साक्री येथील अग्निशमन दलास माहिती देऊन पाचारण केले. पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दल सुमारे अर्ध्या तासांनी घटनास्थळी दाखल झाले. साक्री नगरपंचायतीचे कर्मचारी जुबेर शेख यांनीही याबाबत सतर्कता दाखविली.

धूर व आगडोंबामुळे बघ्यांची गर्दी...
वीज उपकेंद्रातील रोहित्रास लागलेल्या आगीमुळे धुरासह प्रचंड आगडोंब उसळल्याने बघ्यांनी एकच गर्दी केली होती. आजूबाजूच्या परिसरातील महिला व मुलेही धाब्यावर व गच्चीवर चढून हे थरकाप उडविणारे दृश्य बघत होते. तर काही जण मात्र फेसबुक लाईव्हसह छायाचित्रण व व्हिडिओ चित्रीकरण करण्यात मग्न होते. परंतु संबंधित विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसह काही लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ मात्र जीव धोक्यात टाकून आग आटोक्यात आणण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते. खडी, मातीसह मिळेल त्या वस्तूच्या साहाय्याने आग विझवित होते. परंतु काही उपयोग झाला नाही. अखेरीस एकच्या सुमारास अग्निशमन दल दाखल झाल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासातच आग आटोक्यात आली.

रोहित्र जळाल्याने खुडाणे फिडर बंद...

सद्या जैताणे वीज उपकेंद्रात 10 मेगावॉटचे एक व पाच मेगावॉटचे दोन असे एकूण तीन रोहित्र असून त्यापैकी पाच मेगावॉट क्षमतेचे एक रोहित्र जळाल्याने खुडाणे फिडरवरील खुडाणेसह डोमकानी, मळगाव, दिवाळयामाळ आदी पाच गावांचा वीजपुरवठा खंडित झाला असून उद्यापर्यंत तोही सुरळीत होण्याची शक्यता आहे. सायंकाळी सातला निजामपूर-जैताणेसह, दुसाणे, आखाडे, फोफादे आदी गावांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. तर रात्री उशिरापर्यंत वासखेडी, वाजदरे, रोजगाव, वाघापूर आदी गावांचा वीजपुरवठा सुरळीत होईल अशी माहिती सहाय्यक अभियंता रोहित पाटील यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली. 10 मेगावॉट क्षमतेचे रोहित्र सायंकाळी सातला कार्यान्वित झाले. वीजपुरवठा सुरळीत होताच बालगोपालांनी एकच जल्लोष केला.

अग्निशमन दलाचे सहकार्य...

अर्ध्या तासांनी आलेल्या अग्निशमन दलावर काहींनी नाराजी व्यक्त केली. परंतु संबंधित कर्मचाऱ्यांनी मात्र आपले काम चोख केले. त्यात चालक हमीद पठाण, राकेश पाटील, फायरमन बंडू उर्फ युवराज गीते, अनिल सूर्यवंशी, मदतनीस सतीश कार्ले, नदीम पठाण आदींचा समावेश होता. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी साक्री वीज उपविभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी रात्री उशिरापर्यंत उपकेंद्रात तळ ठोकून होते. रात्री उशिरापर्यंत पोलिसांत घटनेची नोंद नव्हती. वेळीच आग आटोक्यात आली नसती तर जवळील पाच मेगावॉट क्षमतेचे दुसरे रोहित्रही आगीच्या भक्ष्यस्थानी पडले असते. एका रोहित्रात जवळपास पाच हजार लिटर ऑईल असल्याची माहिती वीज तंत्रज्ञ किरण नांद्रे यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली!

"विजेअभावी माळमाथा परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांची गैरसोय होऊ नये म्हणून संबंधित विभागाने ताबडतोब समस्येचे निराकरण करून एक वाढीव पाच मेगावॉट क्षमतेचे रोहित्र बसवावे."

-संजय खैरनार, माजी सरपंच, जैताणे

"पाच मेगावॉट क्षमतेच्या दुसाणे वीज उपकेंद्राचे काम प्रगतीपथावर असून येत्या चार ते सहा महिन्यात ते कार्यान्वित झाल्यास जैताणे उपकेंद्रावर पडणारा अतिरिक्त भार कमी होऊन ही समस्या कायमची दूर होईल."

- रोहित पाटील, सहाय्यक अभियंता, जैताणे उपकेंद्र

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता, ती जर सुपारी होती तर आमचीही..'; आव्हाड, राऊतांच्या टीकेला मनसे आमदाराचं प्रत्युत्तर

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : Lok Sabha Election 2024 : जाणून घ्या 6 वाजेपर्यंत महाराष्ट्रातील मतदानाची टक्केवारी

Lok Sabha Election 2024 : मतदान केंद्रावरील निवडणूक आयोगाने दिलेल्या सुविधांचा मतदारांना दिलासा

Latest Marathi Live News Update : कंगना रणौत यांच्या रॅलीवर दगडफेक; काँग्रेसविरोधात निवडणूक आयोगाकडे भाजपची तक्रार

Devendra Fadanvis: 'उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू, पराभव समोर दिसू लागल्यानेच त्यांची मोदींवर टीका'; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

SCROLL FOR NEXT