कोट्यवधींच्या जमीनवादाला हिंसक वळण
मजूर, महिला व कामगारांना मारहाण, १० ते १२ जणांवर गुन्हा
सकाळ वृत्तसेवा
नाशिक रोड, ता.२४ : देवळाली शिवारातील कोट्यवधी रुपयांच्या जमीन वादाने पुन्हा एकदा हिंसक स्वरूप धारण केले आहे. कायदेशीर मालकीच्या जमिनीवर कंपाउंड वॉल उभारण्याचे काम सुरू असताना जमावाने मजूर, कामगार आणि महिलांवर हल्ला केल्याची घटना सिन्नर फाटा परिसरात घडली. याप्रकरणी सिन्नर फाटा पोलिस ठाण्यात १० ते १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अमर विजय पाटील (रा. विसे मळा, कॉलेज रोड, नाशिक) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, देवळाली शिवारातील सर्व्हे क्रमांक २५४/५/२ आणि २५४/२ ही जमीन कायदेशीर खरेदीद्वारे त्यांच्या मालकीची असून तेथे कुंपण उभारण्याचे काम सुरू होते.
पोलिसांच्या माहितीनुसार, रूपेश भागवत, विजय भागवत, साहेबराव भागवत, सचिन भागवत, परशराम सोनवणे यांच्यासह १० ते १२ जणांचा जमाव घटनास्थळी आला. त्यांनी काम तात्काळ बंद करण्याची धमकी देत मजूर आणि कामगारांना मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
फिर्यादीनुसार, जमावातील एका व्यक्तीने लोखंडी पहार घेऊन पप्पू मुकेश सिंग यांच्यावर धाव घेतली. त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या अमर पाटील यांनाही मारहाण करण्यात आली. तसेच किरण पाटील, अंकुश पाटील आणि शारदा दिघोळे यांना धक्काबुक्की करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.
यावेळी दोन अनोळखी व्यक्तींनी एका महिलेला अश्लील शिवीगाळ करून ढकलल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तसेच मजुरांना जीवे मारण्याची धमकी देत लाठ्या-काठ्यांनी मारहाण करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
हल्लेखोरांनी कुंपणाच्या कामासाठी आणलेल्या आयशर वाहनावर दगडफेक करून त्याची पुढील काच फोडल्याचा आरोप असून, या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
या प्रकरणी सिन्नर फाटा पोलिसांनी गुन्हा क्रमांक ३८४/२०२६ दाखल केला असून भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. हवालदार मोरे तपास करीत आहेत.
चौकट
जमीन प्रकरण न्यायप्रविष्ट
सदर मालमत्तेसंदर्भात विजय भागवत आणि दत्तात्रय भागवत यांच्याविरुद्ध यापूर्वीही गुन्हा दाखल झाला होता. त्या प्रकरणात चार्जशीट क्रमांक ८७/२०२१ न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. बनावट कागदपत्रे तयार करणे, फसवणूक, विश्वासघात आणि कट रचल्याच्या आरोपांखाली विविध गंभीर कलमांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला होता. या प्रकरणात संबंधित आरोपींना अटकही करण्यात आली होती. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून त्यावरील अंतिम निर्णय अद्याप प्रलंबित आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.