उत्तर महाराष्ट्र

म्युच्युअल फंड इंडस्ट्रीत दहा टक्के वाढ

सकाळवृत्तसेवा

जळगाव - नोटाबंदीच्या निर्णयानंतर बॅंकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोकड जमा झाल्याने बॅंकांचे ठेवींवरील व्याजदर कमी झाले. परिणामी, शेअर बाजारातील गुंतवणुकीकडे नागरिकांचा कल वाढला आहे. विशेष म्हणजे शेअर बाजारातील म्युच्युअल फंड इंडस्ट्रीतील गुंतवणुकीत गेल्या तीन महिन्यांत भरीव अशी दहा टक्के वाढ झाल्याचे सांगितले जात आहे. जळगावसारख्या छोट्या महानगरात शेअर बाजाराविषयी जागृकता नसली तरी ही स्थिती अलीकडच्या काळात बदलू लागल्याचेही चित्र दिसत आहे. 

जळगावसारख्या शहरात शेअर बाजाराविषयी नागरिकांमध्ये फारशी जागरूकता नाही. एकूण लोकसंख्येच्या दोन-तीन टक्के लोक त्यातही विशिष्ट वर्ग शेअर बाजारातील गुंतवणुकीत ‘रस’ घेताना दिसतो. साधारणपणे बडे राजकीय दिग्गज, व्यापारी, उद्योजक, व्यावसायिक आणि विशेषत: करक्षेत्रातील तज्ज्ञ या मार्केटवर लक्ष ठेवून तसेच त्यात गुंतवणूक करण्यावर भर देत असतात. जळगाव शहरात हे प्रमाण ४ टक्‍क्‍यांपर्यंत असले तरी जिल्ह्याचा विचार करता ते दोन-तीन टक्केच आहे.  मात्र, गेल्या काही वर्षांत हे चित्र बदलू लागले आहे. एलआयसीसारख्या शासकीय कंपन्यांनी म्युच्युअल फंडच्या योजना बाजारात आणल्यानंतर याकडे कल वाढू लागला, शिवाय ‘सिप’च्या माध्यमातूनही नागरिक शेअर बाजाराकडे आकर्षित होऊ लागले आहेत. कृषिक्षेत्राशी संबंधित उपकरणे, उत्पादन तयार करणाऱ्या कंपन्यांच्या शेअरमध्ये ग्रामीण भागातील प्रगत शेतकरी गुंतवणूक करीत असल्याचेही काही विशिष्ट भागात दिसून येते. 

म्युच्युअल फंड गुंतवणुकीत वाढ
नोव्हेंबरमध्ये पंतप्रधानांनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर बॅंकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोकड जमा झाली. पैसे काढण्यावरही काही दिवस निर्बंध होते. आता हे निर्बंध शिथिल झाले असले तरीही रोकड व्यवहारांवर मर्यादा व आयकर विभागाचे लक्ष असल्याने बॅंकांमधील गंगाजळी कायम आहे. स्वाभाविकच बॅंकांनी ठेवींवरील व्याजदर कमी केले आहे, तर कर्जाचे व्याजदरही काही प्रमाणात कमी होत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांचा कल अन्य गुंतवणुकीच्या घटकांकडे वाढला आहे. याचाच परिणाम म्हणून म्युच्युअल फंड इंडस्ट्रीतही गुंतवणूकदार ‘इंटरेस्ट’ घेऊ लागले असून गेल्या तीन-चार महिन्यांत ही वाढ जवळपास दहा टक्के एवढी आहे. केवळ म्युच्युअल फंडच नव्हे तर शेअर बाजारातील गुंतवणुकीबद्दलही सामान्य ग्राहक विचारणा करु लागला आहे. 

गेल्या वर्षांत शेअर बाजाराविषयी सामान्य नागरिकांच्या मनातही उत्सुकता वाढली आहे. बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात आयोजित मार्गदर्शन सत्रांना लोकांचा प्रतिसाद मिळत आहे, शेअर मार्केटविषयी अभ्यास करण्याकडे लोकांचा कल वाढू लागला आहे. म्युच्युअल फंडाकडे वाढता कल हे शेअर बाजाराच्या व्याप्तीच्या दृष्टीने सुचिन्हच म्हणावे लागेल. 
- ज्ञानेश्‍वर बढे,संचालक, श्री सद्‌गुरु इन्व्हेस्टमेंट. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: सेंड ऑफ देणाऱ्या KKRच्या खेळाडूलाच BCCI ने दिला सेंड ऑफ; दंडाचीच नाही, तर बंदीचीही झाली कारवाई

Aditya Thackeray : बाहेरचे लोक कोण आम्हाला येऊन सांगणारे? आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका

LSG vs MI IPL 2024 Live : लखनौसमोर मुंबईनं नांगी टाकली; 5 षटकात 4 फलंदाज तंबूत

तुम्हाला पत्रावळीवर जेवायची इच्छा झाली आणि तुम्ही वाटोळे करून घेतलं; जितेंद्र आव्हाड यांची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका

Ulhasnagar News : उल्हासनगरातील बेवारस वाहने पालिकेच्या रडारवर; 11 वाहन मालकांकडून 17 हजाराचा दंड वसूल

SCROLL FOR NEXT