file phote
file phote 
विदर्भ

Vidhan Sabha 2019 : समाजाच्या संघटनांवर उमेदवारांची नजर

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असून, सभा व पदयात्रेनंतर उमेदवार आपापल्या भागातील विविध समाजाच्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची मर्जी संपादनासाठी प्रयत्न करीत आहे. जातीनिहाय प्रचारासाठी समाज संघटनांच्या पदाधिकाऱ्यांवर उमेदवारांचा डोळा असल्याचे दिसून येत आहे. विविध व्यापारी संघटना, क्रीडा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटीही घेतल्या जात आहे. त्यामुळे विकासाचा मुद्दा गौण ठरण्याची चिन्हे आहेत.शहरातील सहाही मतदारसंघात प्रचाराला जोर आला आहे. पदयात्रा व रॅली काढून उमेदवार मतदारांचे लक्ष वेधत आहे. एवढेच नव्हे तर विविध पक्षाच्या नेत्यांची सभाही घेतली जात आहे. सभांमधून विकासाच्या मुद्द्याला हात घातला जात असला तरी पडद्याआड निवडणुकीत जातीय रंग चढल्याचेही चित्र आहे. लोकसभा निवडणुकीत "डीएमके' अर्थात दलित, मुस्लिम व कुणबी असा जातीय मुद्दा रंगला होता. आता विधानसभा निवडणुकीत विविध मतदारसंघातही असेच चित्र दिसून येत आहे. मध्य नागपुरात "एचएमटी' अर्थात हलबा, मुस्लिम व तेली फॅक्‍टर महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. या समाजाची मते येथे निर्णायक ठरणार आहे. यासाठी येथील उमेदवारांनी समाजाच्या प्रतिनिधींकडे धाव घेतली आहे. येथे प्रमुख उमेदवारांपैकी कुणीही मुस्लिम नसल्याने या समाजावर अनेकांची नजर आहे. त्यामुळे या समाजातील नेत्यांची मनधरणी उमेदवारांनी सुरू केली आहे. पूर्व नागपुरात मोठ्या प्रमाणात वेगवेगळा समाज विखुरलेला आहे. या भागात हिंदी भाषिकांची मोठी मते आहेत. त्यामुळे हिंदी भाषिकांच्या नेत्यांकडे उमेदवारांनी फेऱ्या मारणे सुरू केले आहे. येथे तेली व कुणबी मतदारही मोठ्या प्रमाणात आहेत. या समाजाच्या पदाधिकाऱ्यांना जाळ्यात ओढण्यासाठी उमेदवारांत रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र आहे. येथे दोन्ही प्रमुख प्रतिस्पर्धी पक्षांनी एकाच समाजाचा उमेदवार दिला आहे. त्यामुळे मतांचे विभाजन होणार असल्याने पूर्व नागपुरात हिंदी भाषिक मते निर्णायक ठरणार आहे.पश्‍चिम नागपुरात प्रमुख पक्षांनी एकाच समाजाचा उमेदवार दिला आहे. मात्र, मागील निवडणुकीतही हे दोन्ही उमेदवार एकमेकांपुढे ठाकले होते. या मतदारसंघातही हिंदी भाषिकांची लाखावर मते आहेत. याशिवाय मुस्लिम मतेही मोठ्या प्रमाणात आहे. परिणामी प्रमुख पक्षाचे उमेदवार मुस्लिम नेत्यांसह हिंदी भाषिक नेत्यांनाही सभांमध्ये स्थान देत आहेत.दक्षिण नागपुरात प्रमुख प्रतिस्पर्धी मुख्य पक्षाच्या उमेदवारांना तीन अपक्षांनी जेरीस आणले आहे. त्यामुळे प्रमुख पक्षाच्या उमेदवारांकडून कुठलाही समाज दुखावला जाणार नाही, याची काळजी घेण्यात येत आहे.उत्तर नागपुरात मुस्लिमसह सिंधी समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे आरक्षित असलेल्या या मतदारसंघातील उमेदवारांची मुस्लिम, सिंधी व पंजाबी समाजावर मदार आहे. दलित मतदारांचे प्राबल्य असलेल्या या मतदारसंघात मुस्लिम, सिंधी व पंजाबी मतदार काय भूमिका घेतात, यावरच उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे.दक्षिण-पश्‍चिम मतदारसंघात कुणबी समाज मोठ्या प्रमाणात असला तरी हिंदी भाषिक, दलित, मुस्लिम मतेही मोठ्या प्रमाणात आहे. या मतदारसंघात मुख्यमंत्रीच उमेदवार असून, त्यांच्या प्रचाराची धुरा स्थानिक नेत्यांवर आहे. आतापर्यंत या भागात जातीय मतांचा प्रभाव नाही. मात्र, प्रतिस्पर्धी उमेदवार कुठले "कार्ड' खेळतात याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कोल्हापुरात आज बाईक रॅली

SCROLL FOR NEXT