खामगाव (जिल्हा बुलडाणा) : मिसेस महाराष्ट्र 2019 सिझन 4 ही सौंदर्य स्पर्धा पुणे येथे नुकतीच उत्साहात पार पडली. या सौंदर्य स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील सौंदर्यवतींनी मोठ्या प्रमाणात भाग घेतला होता. यामध्ये येथील देवयानी श्रीराम हजारे या मिसेस महाराष्ट्र 2019 बनल्या आहेत.
देवयानी हजारे या जिगाव उपसा सिंचन विभाग खामगावचे कार्यकारी अभियंता श्रीराम हजारे यांच्या अर्धांगिनी आहेत. त्यांच्या यशाने खामगावचे नाव सौंदर्य स्पर्धेत राज्यात उंचावले आहे. दीवा पीजेन्ट्स तर्फे मिसेस महाराष्ट्र 2019 सीजन 4 या सौंदर्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
राज्यभरातून चारशे स्पर्धक
या स्पर्धेत महाराष्ट्रातील मुंबई, नागपूर, पुणे, औरंगाबाद, अकोला यासह इतर जिल्ह्यांतून सुमारे 400 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यामधून उत्तम 50 स्पर्धकांची स्पर्धेकरिता निवड करण्यात आली होती. यामध्ये गोल्ड श्रेणीत 25 स्पर्धक 35 वर्षापेक्षा जास्त वयाचे तर सिल्व्हर श्रेणीत 25 स्पर्धक 35 वर्षापेक्षा कमी वयाचे होते. येथील देवयानी हजारे यांची अकोला झोन मधून गोल्ड श्रेणीमध्ये निवड करण्यात आली होती. यामध्ये उंची, व्यक्तिमत्व, आत्मविश्वास, रॅम्पवॉक, सामाजिक वागणूक, मानवी स्वभाव, इच्छाशक्ती, संवाद कौशल्य तसेच इतर बारीकसारीक गोष्टींचे बारकाईने निरीक्षण केले जाते. यासोबतच परीक्षकांनी दिलेले गुण हे निकष लक्षात घेऊन कठीण निवड प्रक्रिया होते. या सौंदर्य स्पर्धेत देवयानी हजारे यांनी दिलेले सर्व निकष सरस ठेवीत परीक्षकांना हवे असलेले गुण मिळाल्याने त्यांना मिसेस महाराष्ट्र ही उपाधी मिळाली. या खास सौंदर्यस्पर्धाच्या परीक्षक म्हणून सिने अभिनेत्री वर्षा उसगावकर, झोया अफ्रोज, सिने अभिनेता गुलशन ग्रोव्हर, डॉ. सुहानी व्ही.मेंडोसा या उपस्थित होत्या. वर्षा उसगावकर यांच्या हस्ते देवयानी हजारे यांना मिसेस महाराष्ट्र 2019 चा मुकूट परिधान करण्यात आला.
हेही वाचा - नाथाभाऊंच्या ‘बहुजनत्वाचे’ जिल्ह्यात पडसाद!
परिवाराच्या सहकार्याने स्वप्न सत्यात उतरले
सन 2017 मध्ये मानुषी छील्लर या विश्वसुंदरी झाल्या. त्यांची प्रेरणा घेऊनच आपणही एक दिवस सौंदर्य स्पर्धेत भाग घेऊन सौंदर्यवती बनू शकतो, असा दृढनिश्चय केला. मात्र याकरिता स्पर्धेची तयारी करण्यासाठी परिवाराचे सहकार्य महत्वाचे ठरले. परिवाराच्या सहकार्यानेच माझे स्वप्न सत्यात उतरले आहे.
- देवयानी श्रीराम हजारे, खामगाव
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.