नागपूर : कॉटन मार्केट येथील खवा व पान विक्रेत्यांना मेट्रोने नवी बाजारपेठ दिली असून, वर्षभरापासून येथे स्थायिक झालेल्या व्यापाऱ्यांच्या जीवनात रंगत आली. मूळ बाजारपेठेतच मेट्रोने सर्व सोयीयुक्त हक्काची जागा येथील व्यापाऱ्यांना दिली. नवी इमारत ग्राहकांना आकर्षित करीत असून, व्यवसायाने वेग घेतल्याने येथील व्यापाऱ्यांनी मेट्रो प्रशासनाप्रति कृतज्ञता व्यक्त केली.
नागरिकांच्या सेवेसाठी मेट्रोचे काम वेगाने सुरू आहे. मेट्रो प्रकल्पासाठी काही ठिकाणच्या जागा घेण्यात आल्या. यात कॉटन मार्केटजवळील खवा व पान मार्केटच्या जागेचाही समावेश आहे. जुन्या खवा व पान मार्केटमध्ये व्यापाऱ्यांना केवळ ओटे देण्यात आले होते. मात्र, मेट्रो प्रशासनाने त्यांची जागा घेऊन त्याच परिसरात प्रशस्त जागा दिली. त्यामुळे व्यावसायिकांमध्ये उत्साह असून, व्यवसायासाठी बळ आले. मेट्रोमुळे व्यवसाय नष्ट होईल, अशी भीती व्यक्त होत होती. मात्र, येथील व्यापाऱ्यांनी मेट्रो प्रशासनाचे आभार मानत अनेकांचे बोल खोटे ठरविले. वर्षभरापासून येथे व्यावसायिक स्थानांतरित झाले. नव्या जागेत संपूर्ण सोयी-सुविधा असल्याने ग्राहकही खरेदीसाठी आकर्षित होत असल्याचे काही व्यापाऱ्यांनी सांगितले. ग्राहक वाढल्याने जीवनात सकारात्मक बदल झाल्याचेही काहींनी नमूद केले. मेट्रोने मोक्याच्या ठिकाणी दुकाने बांधून दिलीच, शिवाय प्रसाधनगृहे, विजेची सोय, पिण्याच्या पाण्यासाठी पाण्याची टाकी बांधून दिली आहे. याशिवाय येथे मेट्रो स्टेशन निर्माण होणार असल्याने व्यापाऱ्यांना ग्राहक मिळणार आहे. खवा मार्केटमधील व्यापारी मेट्रोच्या कामाला सहकार्य करीत असून, मिळालेल्या नवीन गाळ्यांसाठी आनंद व्यक्त करताना दिसून येत आहेत. शहराच्या विकासासोबतच नागरिकांचे समाधान आणि प्रगती हेच ध्येय असल्याचे नागपूर मेट्रो प्रशासनाने स्पष्ट केले.
मोक्याच्या जागेवर मार्केट उभे राहिले. स्वतःचा हक्काचा गाळा मिळाल्याने भविष्याच्या चिंता संपल्या. या प्रशस्त जागेत व्यावसायामुळे लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोनही बदलला.
-देवेंद्र औरंगपूर, व्यावसायिक
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.