अमरावती : सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्ती झाल्याबद्दल अमरावती जिल्हा वकील संघातर्फे येत्या बुधवारी (ता. 12) न्यायमूर्ती भूषण आर. गवई यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
जिल्हा वकील संघातर्फे आयोजित सत्कार सोहळा अमरावतीच्या संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात सायंकाळी सहा वाजता सुरू होईल, अशी माहिती जिल्हा वकील संघाच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी (ता. 9) श्रमिक पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. समारंभाच्या अध्यक्षस्थानी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती रवी के. देशपांडे, प्रमुख पाहुणे म्हणून न्यायमूर्ती व अमरावतीचे पालक न्यायमूर्ती सुनील बी. शुक्रे, न्यायमूर्ती प्रदीप एन. देशमुख, न्यायमूर्ती झेड. ए. हक, न्यायमूर्ती अतुल एस. चांदूरकर, न्यायमूर्ती विनय एम. देशपांडे, न्यायमूर्ती मनीष पितळे, न्यायमूर्ती एम. जी. गिरटकर, न्यायमूर्ती एस. एम. मोडक, न्यायमूर्ती व्ही. जी. जोशी, न्यायमूर्ती पी. व्ही. गणेडीवाला यांच्यासह प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए. झेड. ख्वाजा उपस्थित राहतील. समारंभासाठी आठशे व्यक्तींनाच आमंत्रित करण्यात आले आहे. सभागृहाच्या बाहेर दोन स्क्रिन लावल्या जातील. त्याठिकाणी सत्कार समारंभाचे लाइव्ह चित्रीकरण दाखविल्या जाईल.
अमरावतीशी जिव्हाळ्याचा संबंध
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती होण्यापूर्वीपासून भूषण गवई यांचा जिल्हा वकील संघाशी जिव्हाळ्यांचा संबंध राहिला आहे. काही काळ अमरावती जिल्हा न्यायालयामध्ये वकील म्हणून ते कार्यरत होते.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.