Nagpur Exam News : मागासवर्गीय होतकरू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण देण्यासाठी महात्मा जोतिबा फुले शैक्षणिक व प्रशिक्षण केंद्राद्वारे (महाज्योती) रविवारी झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पूर्वतयारीसाठी घेण्यात आलेल्या उमेदवारांच्या सामायिक परीक्षेत ज्या अकादमीला प्रशिक्षणाची जबाबदारी दिली, त्याच संस्थेतील सरावाची प्रश्नपत्रिका आल्याने संस्थेने क्लासकॉपी केल्याची चर्चा सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांनी याविरोधात उघडपणे नाराजी व्यक्त केल्यावर ‘महाज्योती’ने सावरासावर करीत, चौकशी समिती नियुक्त केली आहे.
‘महाज्योती’च्या वतीने एमपीएससीच्या राज्यसेवा परीक्षेच्या उमेदवारांना मोफत प्रशिक्षण दिले जाते. यासाठी संस्थेकडून आर्थिक सहाय्यही केले जाते. या प्रशिक्षणासाठी उमेदवारांची निवड करण्यासाठी रविवारी सामायिक परीक्षा घेण्यात आली.
राज्यभरातील विविध केंद्रांवर झालेल्या या परीक्षेची जबाबदारी ही ज्ञानदीप अकॅडमीला देण्यात आली होती. या परीक्षेची प्रश्नपत्रिकाही या संस्थेलाच तयार करायची होती. मात्र, ज्ञानदीप अकादमी ही एमपीएससीची शिकवणी घेत असल्याने त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांच्या सराव परीक्षेसाठी देण्यात आलेली प्रश्नपत्रिकाच या सामायिक परीक्षेमध्ये वापरल्याची बाब विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आली. त्यामुळे या सरावात त्यांच्याकडे शिकवणी घेणाऱ्या मुलांनी अगदी सहज प्रश्नपत्रिका सोडविल्याची माहिती समोर आली.
इतर विद्यार्थ्यांना ही बाब लक्षात येताच, त्यांनी अकादमीच्या माध्यमातून जाणिवपूर्वक अशाप्रकारे प्रश्नपत्रिका देत, त्याच्या विद्यार्थ्यांना फायदा करवून दिल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात चौकशीची मागणीही त्यांनी केली. दरम्यान महाज्योती प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेत, वित्त लेखा अधिकाऱ्यांची चौकशी समिती नेमून योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
वादातील ‘महाज्योती’
मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी असलेली महाज्योती सातत्याने वादाचा भोवऱ्यात असते. कधी अनुदान तर कधी परीक्षा यामुळे सातत्याने महाज्योती चर्चेत राहिली आहेत. नुकत्याच ‘महाज्योती’कडून यूपीएससी परीक्षेतही गोंधळ झाल्याने ती रद्द करण्यात आली. आता ज्ञानदीप अकादमीमुळे एमपीएससीच्या परीक्षेतही गोंधळ झाला.
प्रकरणाची चौकशी करण्याकरता मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. प्राप्त तक्रारींची चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत. चौकशी अहवाल प्राप्त होतात त्या संदर्भात योग्य ती कार्यवाही करण्यात येणार आहे.
- राजेश खवले, व्यवस्थापकीय संचालक, महाज्योती.
रोहित पवारांचे ट्वीट
महाज्योतीच्या या भोंगळ कारभाराकडे राष्ट्रवादीचे (शरद पवार) नेते रोहित पवार यांनी ट्वीट करून लक्ष वेधल आहे. यावेळी त्यांनी रविवारी महाज्योतीच्या वतीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पूर्वतयारीसाठी घेण्यात आलेल्या उमेदवारांच्या सामायिक परीक्षेमध्ये सर्वच प्रश्न एका खासगी क्लासमधून आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आल्याचे सांगून पहिल्यावेळी ‘मास कॉपी’ तर आता पुन्हा ‘क्लास कॉपी’ अशी खोचक टीका केली आहे. त्यांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत गुन्हा दाखल करण्याची मागणीही केली आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याचा धंदा करणाऱ्याला कठोर शिक्षा द्यावी असे मत मांडले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.